' गवळ्याच्या घरातील अशिक्षित मुलगा आज आहे जगप्रसिद्ध ‘महाकवी’!वाचा ही सुरस कथा – InMarathi

गवळ्याच्या घरातील अशिक्षित मुलगा आज आहे जगप्रसिद्ध ‘महाकवी’!वाचा ही सुरस कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – आदित्य कोरडे

महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही? फक्त भारतीयच नव्हे तर सगळ्या जगाला ललाम भूत झालेला हा थोर कवी, नाटककार.

पण त्याच्या बद्दल, म्हणजे त्याच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल फारसे काही कळत नाही एवढेच काय, त्याचा नक्की कालखंड कुठला हे देखिल खात्रीलायकपणे  सांगता येणे मुश्कील आहे.

एक तर विनयामुळे असेल किंवा अन्य काही कारणे असतील, पण त्याने स्वत:बद्दल फारसे काही लिहून ठेवले नाही किंवा लिहिले असेल तरी ते अजून कुठे सापडले नाही.

प्रा. वि वा मिराशी, रावबहादूर चिंतामणराव वैद्य, प्रा. र. ना. आपटे इ. पंडितांच्या मते तो शकांचा पराभव करणारा सम्राट विक्रमादित्य ह्याच्या पदरी होता.

ह्या विक्रमादित्याची राजधानी उज्जयनी होती आणि कालिदासाच्या काव्यातून त्याचा वावर व वास्तव्य बराच काळ उज्जयनी आणि तिच्या आसपास  होता असे कळते.

 

kalidas-marathipizza01

 

ह्या विक्रमादित्याचा काल इ.सं. पूर्व ५० च्या आसपास. (इ.सं. पूर्व ५७ मध्ये त्याने शकांचा पराभव केल्यावर स्वत:ची कालगणना सुरु केली हेच ते विक्रम संवत- सध्या विक्रम संवत २०७४ चालू आहे त्याला विक्रम शक असेही म्हणतात, नव्हे अशाप्रकारे निरनिराळ्या राजांनी चालू केलेल्या कालगणनेला शक म्हणायची प्रथा तेव्हापासूनच पडली.)

त्यामुळे ह्या राजाच्या पदरी असलेल्या राजकवी कालिदासाचा काल बहुधा इ.सं. पूर्वपहिले शतक असा येतो.

ह्याउलट डॉ भांडारकर, कोसंबी वगैरेंनी केलेल्या त्याच्या काव्याच्या अध्ययनावरून आणि त्यात प्रतिबिंबित झालेल्या समाज जीवनावरून तो कालखंड प्राचीन भारतातल्या सुवर्ण युगातील म्हणजे गुप्त कालखंडातील (इ.सं. चे ४थे किंवा ५ वे शतक) असावा असा काढला.

तर अनेक इतर (प्रो कीथ, विल्यम जोन्स इ.) पाश्चात्य पंडितांच्या मते कालिदास ११व्या शतकातील धारा नगरीचा राजा भोज ह्याच्या पदरी होता.

 

Raja Bhoj Inmarathi

 

म्हणजे कालिदासाचा काल इ.सं. पूर्व पहले शतक ते इ.सं. चे ११ वे शतक असा १२०० वर्ष ह्यामध्ये कुठे तरी येतो.

नशीब कालिदास नावाचा कुणी खरेच कुणी होऊन गेला ह्यावर ह्या लोकांनी शंका उत्पन्न  केली नाही.

अर्थात गेल्या काही दशकात पुढे आलेल्या पुराव्यावरून कालिदास हा इ.सं. पूर्व पहिल्या ते इ.सं. च्या ५व्या शतकात होऊन गेला असावा ह्या मताला काहीशी  पुष्टी मिळते.

त्याच्या ‘मालाविकाग्नीमित्र’ ह्या नाटकातील नायक अग्निमित्र हा सम्राट पुष्यमित्र श्रुंग ह्याचा मुलगा आहे असे कालिदास म्हणतो, म्हणजे त्याला पुष्यमित्र श्रुंग माहिती होता व आपल्या नाटकाचा नायक त्याच्या मुलाला करावा इतका तो महत्वाचा, प्रसिद्ध त्याला वाटला म्हणजे कालिदासाचा काल पुष्यमित्र श्रुंगाळचा असावा असे मानण्यास जागा आहे.

दुसरा पुरावा म्हणजे कर्नाटकातील ऐहोळे येथील जैन मंदिराच्या शिलालेखात कालिदासाचा उल्लेख सापडला आहे. हा लेख साधारण ५ व्या शतकातला आहे.

त्यामुळे कालीदास इ.सं. पूर्व पहिले ते इ.सं.चे ४थे, ५वे शतक ह्या कालखंडात होऊन गेला असावा असे मानण्याला सबळ पुरावा आहे. आता हा कालखंड १२०० वरून ६०० वर्षांपर्यंत खाली आला आहे.

भविष्यात अजून काही पुरावे, शिलालेख, जुनी हस्त लिखिते सापडली तर ह्यावर अधिक प्रकाश पडेल. असो इतकी मोघम आणि अपुरी माहिती असल्याने कालीदासाभोवती दंतकथा आणि अख्यायीकांचे एक जाळेच तयार झाले आहे त्याला ऐतिहासीक महत्व काहीही नसले तरी त्या फार मनोरंजक आहेत.

मनोरंजनासाठी त्यातील काही आपण पाहू.

कालिदासाने ‘मालविकाग्नीमित्र’, ‘शाकुंतल’ आणि ‘विक्रमोर्वशीय’ हि तीन नाटके, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ हि दोन महाकाव्ये, आणि ‘मेघदूत’ हे खंड काव्य तसेच ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य रचले आहे.

ह्या ७ रचना खात्रीने त्याच्या नावावर जमा आहेत. इतरही काही सुभाषिते, स्फुटकाव्य त्याच्या नावावर जमा आहेत पण ती याचीच आहेत असे खात्रीने अजून तरी सांगता येत नाही.

 

Shakuntal InMarathi

 

कालिदास हा जन्माने गवळी. त्यामुळे सुरुवातीला अशिक्षित होता पण दिसायला अत्यंत राजबिंडा अन देखणा होता. तर ह्या गवळ्याच्या पोराचा महाकवी कसा झाला ह्याची आख्यायिका मोठी रंजक आहे.

विक्रमाच्या साम्राज्यात अवंती नावाची नगरी होती. तेथील एका धनाढ्य व्यापाऱ्याची मुलगी अनंग मंजिरी हि रूपाने अत्यंत सुंदर आणि बुद्धीने तल्लख होती. त्यामुळे तिला शिकवायला वररुची ह्या महापंडीताची नेमणूक त्या व्यापाऱ्याने केली होती.

एकदा तारुण्य सुलभ अवखळपणामुळे, लाडावलेली मुलगी असल्याने  तिने वाररुचीचा अपमान केला. त्यामुळे संतापून जाऊन वररुचीने तिला शाप दिला की,

तु आपल्या  गुरुचाच अपमान करते आहेस. तुला आपल्या बुद्धिमत्तेचा आणि पैशाचा बराच अहंकार आहे असे दिसते. तर तुला एक अडाणी, गुराखी माणूसच नवरा म्हणून मिळेल आणि तोच तुझी आणि तुझ्या अहंकाराची रग जिरवेल.

त्यावर अनंग मंजीरीदेखील न डगमगता म्हणाली,

जरी तो गुराखी असला तरी तुमचा गुरूच असेल.

Anang manjiri Inmarathi

 

हा प्रसंग तसा छोटा त्यामुळे त्याची घरात फारशी वाच्यता झाली नाही. वररुची आणि अनंग मंजिरी दोघेही लवकरच हा प्रसंग विसरून गेले.

अनंग मंजिरी थोडी मोठी झाल्यावर तिच्याकरता योग्य वर शोधण्याची विनंती व्यापाऱ्याने वररुचीलाच केली. वररुची हि आनंदाने तयार झाला. तसाही तो उज्जयनीला विक्रमादित्याकडे चाललाच होता तेथे राजधानीतच एखादा सुयोग्य वर शोधायचे त्याने मनात ठरवले.

तर उज्जयनीला जात असता तो वाटेत उन्हामुळे व भूक तहान ह्यामुळे व्याकूळ झाला. कुठे काही पाणी अन्न मिळते का म्हणून पाहत असताना त्याला माळावर गुरे चारत असलेला हा गुराखी-कालिदास भेटला.

वररुचीने त्याला प्यायला पाणी व अन्न मागितले, पण नेमके त्याच्याकडेही वररुचीला द्यायला काहीच नव्हते आणि असते तरी एक ब्राह्मण गुराख्याच्या हाताचे अन्न पाणी कसे घेणार? पण चलाख गुराखी म्हणाला,

भटजी बुवा मी गुराखी, माझ्या हातचे अन्न पाणी तुम्हाला चालवायाचे नाही पण गाईचे दुध चालेल. ते तर भूलोकीचे अमृत, तर तुम्ही ते गाईची धार काढून प्या.

पण वररुचीला गाईची धार कुठे काढता येत होती! शिवाय त्याच्याकडे दुध जमा करायला भांडेही नव्हते, आता काय करावे ह्या विवंचनेत तो असतानाच कालिदास म्हणाला,

ओ भटजी बुवा, एवढा काय विचार करता? मी धार काढतो तुम्ही करचांडी करा.

हा करचांडी काय प्रकार असतो हे काही वररुचीला ठाऊक नव्हते. तेव्हा कालिदासाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला दाबून खाली बसवले आणि करचांडी म्हणजे दोन्ही हाताची ओंजळ करायला लावले.

मग त्या ओंजळीत त्याने गाईच्या आचळातली धार सोडली जी पिऊन वररुची तृप्त झाला.

आता अचानक वररुचीला आपण शिरावर घेतलेली अनंग मंजिरीच्या करता वर शोधायची जबाबदारी आठवली…तसेच काही वर्षापुर्वीची शापाची घटनाही आठवली.

हा तल्लख पण लौकिकार्थाने अडाणी निरक्षर मुलगा गुराखी होताच, पण त्याने वररुची सारख्या भाषाप्रभूला एक नवा शब्द शिकवला होता. शिवाय त्याच्या मस्तकवर हात ठेवून त्याच्या ओंजळीत दुध वाढले होते म्हणजे एका अर्थी तो त्याचा गुरु ही झाला होता.

हा ईश्वरी संकेत मानून त्याने कालिदासाला सर्व हकीकत सांगितली व त्याला आपल्याबरोबर अवंती नगरी येऊन अनंग मंजिरीशी विवाह करण्याची गळ घातली.

कालिदास भयंकर घाबरला. कुठे ती सुस्वरूप, धनवान अनंग मंजिरी आणि कुठे आपण! आपला अपमान करुन लोक गावातून हाकलून देतील. गावभर शोभा करतील, म्हणून तो आढे वेढे घेऊ लागला.

पण वररुचीने त्याला अनंग मंजीरीशी विवाह केल्यानंतर उपभोगायला मिळणारे ऐश्वर्य  व तिच्या स्वर्गीय सौंदर्याची अशी काही मोहिनी घातली कि शेवटी तो तयार झाला.

 

savitri InMarathi

 

तो  हुबेहूब एखादा विद्वान ब्राह्मण तरुण दिसेल असे वररुचीने त्याचे बेमालूम वेषांतर केले आणि त्याला सांगितले कि मी सगळे सांभाळून घेईन तू फक्त गंभीर चेहरा ठेवून राहायचे.

काही झाले तरी बोलायचे नाही. फक्त कुणी नमस्कार केला, अभिवादन केले तर फक्त “सुपीडास्तु दिने दिने…” (रोज तुम्हाला गोड गोड पीडा होवोत) असा थोडा वेगळाच आशीर्वाद द्यायचा. तसा आशीर्वाद त्याकडून घोकुनही घेतला.

त्याप्रमाणे ते दोघे अवंती नगरीत आले व वररुचीने आपण अनंग मंजिरी साठी सुयोग्य वर शोधून आणल्याची वार्ता व्यापाऱ्याला सांगितली.

व्यापारी आनंदित होऊन मोठा लवाजमा घेऊन, वाजत गाजत त्याला भेटायला वररुचीकडे आला. पण झाले काय कि व्यापाऱ्याचे ऐश्वर्य आणि थाट माट पाहून बावचळून गेलेल्या कालिदासाच्या तोंडून सुपीडास्तु दिने दिने ह्या आशीर्वादा ऐवजी “त्रीपीडास्तु दिने दिने…” (तुला रोज तीन तीन प्रकारच्या पीडा होवोत) असा चरण निघून गेला.

आता प्रसंग मोठा गंभीर झाला. गाजावाजा करत मानाने ज्याला न्यायला आलो त्या भावी जावयाने असा शाप द्यावा. व्यापारी चिडला पण वररुचीने प्रसंगावधान राखून सांगितले कि वाटते तसा हा शाप नाही. पूर्ण श्लोक असा

प्रदाने विप्र पीडास्तु , शिशु पीडास्तु भोजने |

शयने रति पीडास्तु, त्रिपीडास्तु दिने दिने ||

म्हणजे –

दान करताना याचक ब्राह्मणांची पीडा होवो (प्रत्यही इतके दान करता येण्याजोगे ऐश्वर्य व भाग्य लाभो), जेवताना मुलांनी त्रास देवो (भरपूर मुलं असो) व झोपताना प्रेयसी/ पत्नी रोज त्रास देवो म्हणजे रोज उत्तम शरीर भोग भोगायला मिळो अशा तीन प्रकारच्या गोड गोड पीडा तुला रोज रोज होवोत.

– हा असा अफलातून आशीर्वाद ऐकून व्यापाऱ्याची खात्रीच झाली कि असा वर आपल्या कन्ये करता शोधूनही सापडावयाचा नाही.

त्याने मोठ्या थाटामाटाने कालिदासाचे लग्न आपल्या लाडक्या कन्येशी अनंग मंजिरीशी लावून दिले.

 

Kalidas marriage Inmarathi

 

पण लग्नानंतर लवकरच अनंग मंजिरीला आणि व्यापाऱ्याला वस्तुस्थिती कळून आली. आणि अनंग मंजिरीला हेही कळले कि धूर्त वररुचीने दिलेला शाप खरा करून दाखवला, पण आता काय करणार?

हे सगळे बाहेर कळले तर आपली व आपल्या वडलांचीच छी थू होणार म्हणून ती गप्प बसली. पण आपले बिंग बाहेर फुटू नये म्हणून त्यानी कालिदासाला कुठे घराबाहेर जायला, कुणाशीही बोलायला बंदी घातली.

कालिदासाला खूप वाईट वाटले. त्याने ठरवले कि ह्याना आपण मूर्ख निरक्षर आहोत म्हणून आपली लाज वाटते ना, मग आपण आपली आराध्य देवता काली माता (म्हणून तो कालिदास) हिला साकडे घालू, तिला प्रसन्न करून घेऊ आणि तिच्याकडे विद्येचे वरदान मागू.

म्हणून मग तो गावाबाहेरच्या ओसाड पडलेल्या कालीमातेच्या मंदिरात जाऊन तिचे पाय धरून बसला.

त्याने पण केला कि जोपर्यंत देवी त्याला प्रसन्न होत नाही व त्याला विद्येचे वरदान देत नाहे तो पर्यंत तो तेथून हलणार नाही व अन्न पाणीही घेणार नाहे. असेच १५-२० दिवस गेले.

आता अनंग मंजिरीला काळजी वाटू लागली कि देवी तर ह्या मुर्खाला प्रसन्न व्हायची नाही, पण उपासा तपासाने हा मरून आपल्याला वैधव्य  मात्र यायचे.

म्हणून मग तिने आपल्या एका दासीला विश्वासात घेतले व सांगितले कि अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री तिनेच देवीचे सोंग घेऊन जावे व आपण कालिदासाला प्रसन्न झालो आहोत असे सांगून तो म्हणेल तो वर त्याला द्यावा. म्हणजे तो हे खूळ डोक्यातून काढेल.

इकडे देवीने विचार केला हा माझा भक्त मूर्ख अडाणी खरा, पण साधा भोळा आणि एक निष्ठ आहे. त्याला माझे रूप घेऊन कुणी फसवणे म्हणजे माझ्याच प्रतिष्ठेला कमी पणा येणार, त्यापेक्षा मी त्याला प्रसन्न होऊन त्याचे मनोरथ पूर्ण करते. म्हणून दासी यायच्या आधी देवीच त्याला प्रसन्न झाली व वर माग म्हणाली.

कालिदासाने तिच्याकडे विद्या मागितली, सरस्वती त्याला प्रसन्न व्हावी असे मागितले. देवी तथास्तु म्हणून अंतर्धान पावली.

 

kalidas worship sarswati Inmarathi

 

हा सर्व प्रकार त्या दासीने पाहिला व अनंग मंजिरीला जाऊन सांगितला. तेवढ्यात वरदान प्राप्त झालेला कालिदास ही तिथे येऊन पोहोचला. तेव्हा खरेच का ह्याला सरस्वती प्रसन्न झाली आहे हे पाहण्याकरता अनंग मंजिरीने त्याला –

“अस्ति कश्चित वाग्विशेष:” (बोलण्यासारखे काय विशेष आहे तुझ्याकडे ..)

असा प्रश्न विचारला. आता कालीदासाची प्रतिभा व स्वाभिमान दोन्ही जागृत झाले होते.  त्याने त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल, त्या प्रश्नातील  प्रत्येक शब्दा पासून सुरु होणारी तीन महाकाव्ये तिथेच रचली.

त्यातले  पहिले म्हणजे कुमारसंभव सुरु होते अस्ति ह्या शब्दाने.

अस्त्युत्तरस्या दिशी देवतात्मा, हिमालयो नाम नगाधिराज:|

ह्या चरणाने

तर दुसरे म्हणजे मेघदूत  सुरु होते,

कश्चित कांता विरह विगुणा, स्वाधिकारात प्रमत्त:|

ह्या चरणाने आणि,

वागर्था विव संपृक्तौ, वागार्थ प्रतिपत्तये|

जगत: पितरौ वन्दे पार्वति परमेश्वरौ||

ही सुरुवात आहे रघुवंशाची.

 

2 Shakuntal InMarathi

 

हे पाहून/ ऐकून हा आता साधा अडाणी गुराखी कालिदास न राहता महाकवी कालिदास झाला आहे हे अनंग मंजिरीने ओळखले व त्याचा अपमान केल्याबद्दल क्षमा मागितली.

कालिदासाने ही तिलाच आपल्या ह्या महाकवी होण्यामागचे खरे कारण मानून तिचा स्वीकार केला व तो पुढे राजा विक्रमादित्याच्या पदरी जगद्विख्यात महाकवी कालिदास म्हणून नावारूपाला आला .

ही एक गोष्टच  आहे पण मोठी मनोहारी गोष्ट आहे, नाही का…

( संदर्भ संस्कृत काव्याचे पंचप्राण- डॉ. के. ना. वाटवे)

 

तर ह्या कालिदासाच्या प्रसिद्ध कुमारसम्भवम् या महाकाव्याची सुरुवात हिमालयाच्या सुंदर वर्णनाने होते.
त्यातलाच हा तिसरा श्लोक –

अनन्तरत्नप्रभवस्य अस्य हिमं न सौभाग्य विलोपि जातुम्।
एको हि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोः किरणेष्विवाङ्कः॥

अनंत प्रकारच्या रत्नांची खाण असलेल्या हिमालायाचे महत्व त्यावरील थंडगार बर्फामुळे कमी होत नाही (उलट अधिकच वाढते) त्याच प्रमाणे चंद्राच्या तेजामुळे त्यावरील डाग झाकून जातात नव्हे ते त्याला शोभूनच दिसतात.( अनेक सद्गुण असलेल्या कर्तृत्ववान पुरुषांमधल्या एखाद-दुसऱ्या दुर्गुणामुळे त्यांच्यात काही न्यून येत नाही उलट तो दुर्गुण हि त्यांना शोभूनच दिसतो.)

हा श्लोक वाचून एका गरीब कवीला राहवले नाही आणि त्याने हा श्लोक रचला,

एको हि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोरिति यो बभाषे।
नूनं न दृष्टं कविनापितेन दारिद्र्यमेकं गुणराशिनाशिः॥

अनेक सदगुणांच्या ढिगाऱ्यात एखादा दुर्गुण खपून जातो, चंद्र तेज डाग वगैरे कायच्या काय  म्हणणाऱ्या कवीने (म्हणजे कालिदासाने) हे मात्र नाही पहिले कि दारिद्रया सारखा एक दोष एखाद्या मनुष्यातील सद्गुणांच्या राशीचाहि नाश करतो.

 

kalidas statue Inmarathi

 

इथे गंमत अशी कि कविनापितेन ह्याचा एक अर्थ कविना + अपि + तेन “परंतु त्या कवीने हे नाही पहिले…” असा होतो, तर दुसरा अर्थ कवि + नापितेन म्हणजे “हज्जाम छाप कवी” असा होतो.

म्हणजे चक्क कालिदासाला कविता करतो का हजामती? असे गरिबीने गांजलेल्या पण स्वाभिमानी गुणी कवीचे वाक्ताडन….!

(के वि बेलसरे ह्यांच्या एका पुस्तकावरून स्वैर …)

अशा अनेक सुरस गोष्टी कालिदासाच्या नावाने प्रचलित आहेत पण त्या सवडीने लिहीन…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?