' जगाने युक्रेनला दाखवली त्याच्या ०.०१% सहानभूती सर्वसामान्य रशियन्सबाबत दाखवावी – InMarathi

जगाने युक्रेनला दाखवली त्याच्या ०.०१% सहानभूती सर्वसामान्य रशियन्सबाबत दाखवावी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – संकेत कुलकर्णी 

===

हा फोटो खरंतर मी पोस्ट करणार नव्हतो. पण आज शेवटी एकदाचा करावासा वाटला. आणि त्याला सद्यपरिस्थिती कारणीभूतही आहे. कशी ते सांगतो. तीन महिन्यांपूर्वी मॉस्कोतल्या माझ्या रशियन सहकाऱ्यांसोबत काढलेला हा फोटो.

सहकारी नुसते म्हणण्यापुरते. खरं तर मित्रमैत्रिणीच. रोजच्या बोलण्यातले. तुमच्या आमच्यासारखे. आपल्यासारखेच रोज बस ट्रेनचे धक्के खात लांबून ऑफीसला येणारे चहाकॉफीचे दर्दी  कामात अतिशय तंत्रशुध्द विचार करणारे  मदतीला सतत तत्पर असणारे ऑफीसात भरपूर कामं करून संध्याकाळ झाली की घरी पळणारे..

 

russia 1 im

 

विकेंडला किंवा सुट्टी घेऊन नवरा बायको मुलं,  गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बरोबर काहीतरी प्लॅन्स आखणारे, शॉपिंग करणारे भरपूर जबाबदाऱ्या असणारे,  नोकऱ्या करून, पगार आणि इतर बजेट संभाळून पैसे वाचवणारे.  त्यातून बरी गाडी, मोठं घर किंवा वर्षातून एकदा परदेशी सुट्टीला जायची स्वप्नं बघणारे!

८-१० दिवसांपूर्वी हे युध्द सुरु झालं आणि जगाने समस्त रशियनांकडेच ‘खलनायक’ म्हणून पहायला सुरुवात केली. यात या सामान्य रशियनांचा काय दोष? रशियावर जगाने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रुबल कोसळला आणि यात सर्वसामान्यांचे अशक्य हाल झाले. इथल्या बॅंकांनी व्याजदर दुप्पट केले.

(विचार करून पहा – की तुमचं होमलोन सुरु आहे, पगार तितकाच, आणि व्याजदर अचानक दुप्पट झालेत!) सेव्हींगची आणि पर्यायाने पुढच्या प्लॅनिंगची वाट लागली आहे. बहुतांश सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी रशियातून काढता पाय घेतला किंवा घेत आहेत. वर्षानुवर्ष सवयीच्या कंपन्या. या ठप्प झाल्याने रोजचे व्यवहार करणंही मुश्किल झालंय. पश्चिम युरोपातून कोणतेही विमान रशियात यायचा मार्ग बंद झालेला आहे. रशियन विमानकंपन्याही पंख गमावून बसल्या आहेत.

 

apple iphone InMarathi

 

या खंडप्राय देशातले सामान्य नागरिक मृतप्राय झाले आहेत. आधीच शरमेने – कारण पुतिनच्या कृत्याला सर्वसामान्यांपैकी कोणीच समर्थन दिलेले नाहीये (वर कोणी त्याविरोधात निदर्शनं केली की तुरुंगवास आणि पोलिसांचा ससेमिरा आहेच!) त्यात आता ‘मी रशियन आहे’ म्हटलं की संपूर्ण जगच तिरस्काराच्या नजरेने बघतंय.

 

putin1-inmarathi

 

माझं यांच्याबरोबर रोज काम. इतर वेळी रोज अवांतर विषयांवर भरपूर गप्पा मारणारी ही मंडळी आता घुमी झाली आहेत. कामापुरतंच बोलायचं आणि गप्प बसायचं असं सुरु झालंय. मी त्यांना जास्त काही विचारूही शकत नाही कारण ते काहीच खुलेपणाने सांगणार नाहीत. आणि या उप्पर ते तरी काय करणार? ह्या युध्दाबद्दलचे त्यांचे विचार आणि त्यांची मतं काय आहेत ते मला माहीत आहे  पण ते उघड मांडू शकत नाहीत. बाहेरचं जग त्यांच्याकडे किती तिरस्काराने पहातंय हेही त्यांनी अनुभवलंय.

या सगळ्या परिस्थितीत सर्वसामान्य रशियन लोकांची काय चूक? फक्त ते रशियाचे नागरीक आहेत ही? त्यातल्या अनेकांचे सख्खे नातेवाईक युक्रेनमध्ये आहेत. त्यांच्याबद्दल वाईटही वाटत आहे. पण करणार काय? जे काही सुरु आहे तो सर्वसामान्य रशियनांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. जे चाललंय ते सहन करण्यापलीकडे काहीच दुसरा पर्याय पुतिनने आणि संपूर्ण जगाने ठेवलेलाच नाहीये.

 

russian people im

 

एकीकडे युक्रेनीयन जनता आणि त्यांचा अध्यक्ष झेलेंन्स्कीचं कौतुक कौतुक करताना आपण सर्वसामान्य रशियनांना विसरून गेलो आहोत का? किंवा त्यांचा दुःस्वास तर करत नाही ना?

राक्षसी महत्वाकांक्षा आणि विनाशकारी युध्दं वगैरे शेवटी मोठ्या लोकांचे खेळ. इकडच्या काय किंवा तिकडच्या काय – जीव तर मात्र फक्त सर्वसामान्यांचेच जाणार! युक्रेनीयन जनतेच्या वाट्याला आलेल्यापैकी ०.०१ टक्का तरी सहानुभूती जगाने सर्वसामान्य रशियनांबद्दल दाखवावी ही तूर्तास अपेक्षा. इतकंच काय ते!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?