' कॅप्टनशिपवरून वाद सुरु आहेच, मात्र KL राहुल या नवोदित क्रिकेटवीराच्या मदतीला धावून गेलाय… – InMarathi

कॅप्टनशिपवरून वाद सुरु आहेच, मात्र KL राहुल या नवोदित क्रिकेटवीराच्या मदतीला धावून गेलाय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“क्रिकेट इज या जंटलमन्स गेम” असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये अनेक जंटलमन पाहायला मिळतात. या जंटलमन्सच्या यादीत ‘राहुल’ हे एक भारतीय नाव अगदी नेहमीच घेतलं जातं, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. राहुल हे नाव असणारी व्यक्ती आणि भारतीय क्रिकेटमध्ये खांद्यावर पडणारी कुठलीही जबाबदारी स्वीकारणं, हे तसं पूर्वापार चालत आलं आहे.

 

 

त्याकाळी राहुल द्रविड हे नाव या यादीत होतं, आता हळू हळू भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार के एल राहुल असाच एक जबाबदार खेळाडू बनत चालला असल्याची चर्चा अनेक नाक्यांवर आजही घडते.

 

kl rahul inmarathi

 

हाच राहुल आज जंटलमन बनून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या संघाचा उपकर्णधार असल्याने, हाच भारताचा भावी कर्णधार आहे अशीही चर्चा सुरु झाली आहे. हे सत्यात उतरेल की नाही, हे जरी काळ ठरवणार असला, तरी राहुल नाव असणारा हा माणूस ‘जंटलमन’ या यादीत मात्र सामील झाला आहे.

तरुण खेळाडूच्या मदतीला धावून आला राहुल…

भारतीय सलामीवीर आणि उपकर्णधार के एल राहुल याच्या क्रिकेटप्रति श्रद्धेची आणि नव्या पिढीतील खेळाडूंविषयी असणाऱ्या भावनिक नात्याची एक वेगळीच झलक सध्या पाहायला मिळाली आहे. वरद नलावडे नावाच्या एका तरुण खेळाडूच्या मदतीसाठी राहुल धावून आला आहे.

पाचवीत असलेला ११ वर्षांचा वरद सप्टेंबर महिन्यापासून आजारी आहे. त्याच्या दुर्धर आजारावर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेले काही महिने अप्लास्टिक ऍनिमिया या रक्ताच्या आजाराचा सामना हा तरुण क्रिकेटपटू करत आहे.

 

varad im 1

 

या आजारामुळे ब्लड प्लेटलेट्सची संख्या फारच कमी होते. याचा रोगप्रतिकार शक्तीवर फारच विपरीत परिणाम होतो. साधा ताप बरा होण्यासाठी सुद्धा काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकच पर्याय आता त्यांच्यासमोर उरला आहे. याच दुर्धर आजाराशी दोन हात करणाऱ्या वरदकरिता उपचारांसाठी तब्बल ३५ लाख रुपयांची गरज आहे.

डिसेंबर महिन्यापासून वरदचे वडील सचिन नलावडे, आणि आई स्वप्ना झा यांनी मदतीसाठी आवाहन केलं होतं. ३५ लाख रुपये गोळा करण्यासाठी सुरु झाली ही धडपड राहुलने संपवून टाकली असं म्हणायला हवं.

 

bon maroow im

पैसे उरले नव्हते पण…

वरदचे वडील सचिन नलावडे यांच्यासाठी मुलाचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न फारच महत्त्वाचं आहे. हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी ते झटत आहेत. मात्र या दुर्धर आजारावरील उपचारांचा खर्च फारच अधिक असल्याने, अखेरीस त्यांच्या हाती असणारे पैसे संपू लागले. जवळपास असणारी बचतीची सगळी जमापुंजी वापरून वरद बरा व्हावा यासाठी त्याचे पालक प्रयत्नशील होते. मात्र पैशांची छानछान भासू लागल्यावर, मदतीचे आवाहन करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरला नाही.

 

varad im

 

या तरुण क्रिकेटपटूला मदतीची गरज आहे, हे कळताच के एल राहुल याने पुढाकार घेतला. थोडीथोडकी नाही, तर तब्बल ३१ लाखांची आर्थिक मदत करत त्याने वरदची शस्त्रक्रिया वेळेत व्हावी यासाठी सिंहाचा वाटा उचलला. राहुलने आर्थिक मदत केल्यामुळे, आज वरदची शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, तो त्याच्या स्वप्नांकडे पुन्हा नव्याने वाटचाल करण्यासाठी जिद्दीने उभा राहण्यास तयार आहे. वरदच्या पालकांनी राहुलचे विशेष आभार मानले आहेत.

“माझ्याकडून जे शक्य होतं, ते मी केलं असून इतरांना सुद्धा माझ्यामुळे प्रेरणा मिळावी अशी माझी इच्छा आहे.” असा भावना राहुलने व्यक्त केल्या असल्याचं पाहायला मिळतंय.

राहुल द्रविड प्रमाणे के एल राहुल सुद्धा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडेल की नाही, हे भारतीय क्रिकेटमधील येणारा काळ ठरवेल; मात्र राहुल या नावाला जागून, एक उत्तम जंटलमन होण्याचं काम मात्र त्याने निश्चितपणे केलं आहे. यासाठी त्याचं कौतुक नक्कीच व्हायला हवं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?