हिंदू धर्मातील “शाकाहाराचं” उदात्तीकरण मोजक्याच समूहांच्या अहंकारातून
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मूळ लेख – देवदत्त पटनायक
अनुवाद – ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
===
हिंदू व शाकाहार
शाकाहाराची संकल्पना जगभरात रुजवण्यात, इंग्लंड-अमेरिकेतले स्थलांतरीत हिंदू आणि जैन मंडळी तसेच योग विद्येचा प्रसार याचे योगदान मोठे आहे.
पण खरंतर सगळे हिंदू शाकाहारी नाहीत, किंबहुना असंही म्हणता येईल की बहुतांश हिंदू मांसाहारी आहेत.
शाकाहार हिंदूंना इतर समाजापासून वेगळं करतो, अगदी अलिकडच्या काळापर्यंत पाश्चात्य समाजामध्ये शाकाहाराला विचित्र नजरेने पाहिले जाई.
शाकाहार हिंदू धर्माचे गुणवैशिष्ट्य म्हणून बघितला जातो आहे, आकडेवारी काही वेगळच दर्शवत असली तरी! हिंदू धर्मीय शाकाहारी आणि मांसाहारी असू शकतात.
हिंदू धर्म म्हणजे अनेकत्व, यात खुप वैविध्य आहे. ‘हिंदू धर्म’ सर्वसमावेशक आहे ज्यात अनेक जाती, संप्रदाय, परंपरा सामावलेल्या आहेत.
यापैकी काही घटक काही काळाकरता शाकाहारी असू शकतील किंवा कधीच नसतीलही.
हिंदूंनी काय खावे किंवा काय खाऊ नये सांगणारी कोणतीही धर्म-प्रमाण अशी बंधने हिंदू धर्मात नाहीत.
एकाच प्रकारच्या चालीरीतींमध्ये हिंदू धर्माला संकुचित करण्याच्या अट्टाहासाकरता फक्त दोन गट कारणीभूत आहेत – कट्टर हिंदू आणि त्यांचे उघड शत्रू हिंदूद्वेष्ट्ये.
एका तमिळ संताची गोष्ट अन्नाच्याप्रती हिंदू मानसिकता स्पष्ट करते. ती गोष्ट अशी –
शिकारी आणि पुजारी
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक पुजारी आणि शिकारी शंकराचे निस्सीम भक्त होते. दोघे नियमितपणे शंकर मंदिरात जात असत. पुजारी शाकाहारी होता.
विधीपूर्वक पूजा अर्चा करायचा तर शिकारी कसलेही विधी करत नसे. रोज पहाटे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे पुजारी सर्व विधी पूर्ण करायचा तर तिन्ही सांजेच्या वेळी शिकारी जंगलात दिवसभर शिकार करून मिळवलेलं सर्व काही देवतेला अर्पण करायचा.
फुले, पर्वतातील झऱ्याच शुद्ध पाणी, आणि शिकार केलेल्या जनावराचं उत्कृष्ट मांस!
शिकारी फुले डोक्यात घालून मंदिरात आणायचा तर पाणी तोंडात धरून आणून देवावर चूळ अोतायचा. अगदी शिकार केलेल्या जनावराचं मांसदेखील चावून मऊ करून देवाला अर्पण करायचा.
रोज पहाटे पुजाऱ्याला देवळात मांस, हाडे, सुकलेली फुले पाहून तिटकारा येत असे. हे असं बरेच आठवडे चालू होतं. कैलास पर्वतावरून शंकर-पार्वती हे सर्व बघत होते.
पार्वतीने शंकराला विचारलं :
“या दोन्हीपैकी तुमचा आवडता भक्त कोणता आहे?”
शंकराने पुजारी आणि शिकाऱ्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि चमत्कार घडला. मंदिरात असलेल्या शिवलिंगावर २ डोळे उगवले.
पुजाऱ्याला वाटले हा देवाचाच आशीर्वाद आहे पण नंतर एका डोळ्यातून रक्त वाहू लागले. आता पुजारी घाबरला! आता काहीतरी अपशकून घडणार असे वाटून त्याने तिथून धूम ठोकली.
पण जेव्हा शिकाऱ्याने शिवलिंगावरील डोळ्यातून वाहणारे रक्त पाहिले तेव्हा तो दुःखी झाला, त्याने जंगलातील औषधी वनस्पती (जडीबुटी) वापरून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला पण रक्त थांबेना.
शिकारी शंकरावर निस्सीम भक्ती करत असे. त्याने स्वतःचा डोळा काढून शिवलिंगाला अर्पण केला आणि काय आश्चर्य!
रक्तस्राव थांबला पण आता शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यातून रक्तस्राव होऊ लागला…
ही शिकाऱ्यासाठी कठीण परीक्षेची वेळ होती. पण न डगमगता त्याने आपला दुसरा डोळा शिवलिंगाला अर्पण करण्याचा निर्णय घेतला.
परंतु दोन्ही डोळ्यांनी अंध झाल्यावर त्याला शिवलिंग कसे दिसणार आणि तो आपला काढलेला डोळा कसा अर्पण करणार असा त्याला प्रश्न पडला.
म्हणून खुणेसाठी त्याने त्याचा पाय शिवलिंगाच्या रक्तस्राव होणाऱ्या डोळ्याला लावला आणि आता तो स्वतःचा डोळा काढणारच होता तितक्यात भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी शिकाऱ्याला थांबवले.
मग या विलक्षण कथेतून आपण काय शिकलो?
परमात्म्यापर्यंत पोहोचायचे असेल तर अंतःकरणातील भाव महत्त्वाचा आहे. विधी किंवा कर्मकांडे नाहीत!
देव उच्च-नीच करत नाही, देव धार्मिक विधींशी संबंधित शुद्ध-अशुद्धतेच्या संकल्पनांची अजिबात फिकीर करत नाही.
माणसांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने रहावे, स्वतःची काळजी न करता दुःखी आणि गरजूंना निःस्वार्थ भावनेने मदत करावी, देवाची एवढीच अपेक्षा असते.
आपल्यातल्या अहं, ईगोमुळे आपण इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, निर्मळ आहोत, असे भाव आपल्या मनात येतात.
आत्म्याकडे जातानाचा प्रवास आपल्याला जाणिव करून देतो की कुणीही अशुद्ध, कनिष्ठ नाही; प्रत्येकजण समान आणि आदरणीय आहे.
आपण समजून घ्यायला हवं की, पुजाऱ्याच्या धार्मिक विधी किंवा कर्मकांडापेक्षा शिकाऱ्याचे देवावरील प्रेम महत्त्वाचे आहे. तुमचं देवावरील प्रेम, विश्वास हेच विधी मानावेत.
कसलाही यांत्रिकीपणा नको किंवा इतरांवर वर्चस्व गाजवून, अन्याय करून अहं जोपासणे नको. भारतातल्या विविध समाजांमध्ये खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या सवयी आहेत.
आणि मुख्य म्हणजे कुठेही याबाबत एक नियम नाही. अनेकांना वाटतं की सर्व ब्राम्हण शाकाहारी असतात. हे खोटं आहे.
बंगालमध्ये ब्राम्हण मासे खातात. शाक्त्य परंपरेनुसार कालीमातेला बोकडाचा, रेड्याचा बळी देतात. काश्मीरमधले काही ब्राम्हण शंकराचं रूप असलेल्या भैरव देवतेला मांसाचा नैवेद्य चढवतात.
दक्षिण भारतातले ब्राम्हण शाकाहारी आहेत. उच्चशिक्षित तसेच गणितात पंडित आहेत. त्यामुळेच अनेक वर्षांपूर्वी हे ब्राम्हण भारतातील अनेक शहरांमध्ये लिपिक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थलांतरीत झालेत.
त्यांच्याच संपर्कात आल्यामुळे अनेकांचे गैरसमज होऊन अगदी थेट बॉलीवूड मध्ये ही त्यांची प्रतिमा ‘मद्रासी म्हणजे शाकाहारी’ म्हणून ठळकपणे अधोरेखित झाली.
याचा परिणाम असा झाला की, दक्षिण भारतातली मांसाहारी खाद्यपरंपरा झाकोळली गेली.
भारतातले काही यशस्वी उद्योजक गुजरात-राजस्थानमधील जैन आणि वैष्णव समाजाचे असून या समाजातील लोक कडक शाकाहारी आहेत.
व्यापाराच्या माध्यमातून अनेक परदेशी लोकांशी यांचा संबंध आल्याने परदेशी लोकांना वाटते सगळे भारतीय शाकाहारीच आहेत. जैन म्हणजे हिंदू नाहीत. ते शिव, विष्णू, किंवा ब्रम्हाची पुजा करत नाहीत.
पण जैन लोक जन्म-मृत्यू-पुनर्जन्माच्या (सनातन धर्मातल्या) संकल्पनांवर विश्वास ठेवतात.
शाकाहारी असलेल्या मारवाडी किंवा बनिया समाजामुळे उत्तर भारतातील मांसाहाराची मोठी परंपरा झाकोळली जाते.
हिंदू पुराणांच्या मते, विष्णू शाकाहारी देवता आहे, शंकर जे मिळेल ते खातो, आणि देवीला रक्त आवडतं. पुन्हा हा काही कडक नियम नाही!
विष्णू रामाच्या रुपात असताना अन्नासाठी हरणाची शिकार करतो. (ही संकल्पना अनेक शाकाहारी हिंदू अतिशय आक्रमकपणे नाकारतात) जैन धर्मग्रंथांप्रमाणे नेमी नाथांच्या लग्नाच्या मेजवानीत श्रीकृष्णाने सहभाग घेतल्याची नोंद आहे.
त्यात प्राण्यांची कत्तल केली गेली होती.
माणूस आणि सिंहाचा एकत्र अवतार असलेला नरसिंह रक्त पितो. भोळासांब शंकर जे अर्पण केले जाईल ते स्वीकारतो.
शंकराच्या गोरा-भैरव अवतारात तो फळ आणि दुध आनंदाने स्वीकारतो तर त्याचवेळी कालभैरव या अवतारात त्याला रक्त आणि मदिरा अर्पण केली जाते.
शक्ती ही निसर्गातील सर्वात जास्त मुलभूत क्रियांशी (लैंगिकता आणि हिंसा) जोडली गेलेली आपल्याला दिसते. देवीला रक्त अर्पण केले जाते. ओरिसातील वराही मंदिरात तिला मासे अर्पण केले जातात. त्याचवेळी अनेक वेळा जिथे ती विष्णूशी जोडली गेली आहे, तिथे ती शाकाहारी आहे.
उदा. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर किंवा पंजाब आणि जम्मूमधील पर्वतवासी. म्हणजेच काय तर कडक नियम देवी-देवतांना देखील लागू होत नाहीत.
काही लोक शाकाहार म्हणजेच अहिंसा असं समर्थन करतात. अहिंसा जैन धर्म आणि योग प्रक्रियेचे मुलभूत तत्त्व आहे. पण अहिंसा ही अतिशय जटील संकल्पना आहे.
अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवित प्राण्याच्या शरीराला किंवा मनाला न दुखावणे आणि म्हणूनच ते खाण्याच्या क्रियेला लागू होत नाही. कारण अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेत हिंसा ही ठरलेलीच असते.
शेती अतिशय हिंसक क्रिया असून यात अनेक प्राण्यांचा आणि कीटकांचा जीव जातो.
अहिंसा या संकल्पनेचा अनेकांतवाद (अनेकत्त्व), अपरिग्रह (कोणत्याही गोष्टीला किंवा विचाराला चिकटून न राहणे) व स्यादवाद (अनिश्चितता स्वीकारणे) या सर्वांशी जवळचा संबंध आहे.
अनेक सैनिक शाकाहारी आहेत. अनेक भ्रष्ट आणि स्वार्थी राजकारणी, भांडवलदार आपल्या कारखान्यांद्वारे पर्यावरणाचा नाश करणारे, आपल्या कारखान्यांमध्ये कामगारांचे शोषण करणारे पण ते शाकाहारी आहेत.
ह्याला खचितच अहिंसा म्हणता येईल.
अनेक संन्यासी, आध्यात्मिकरित्या शुद्ध होण्यासाठी मांसाहार वर्ज्य करतात. ते मांस आणि रक्ताला अशुद्धतेशी जोडतात. ही धोकादायक समजूत आहे.
यातून शिवाशिवीची भावना निर्माण होते. ज्यामुळे रक्त आणि मांसाशी संबंधित पारंपरिक पेशा असलेल्या अनेकांना अस्वच्छ ठरवले जाते.
रक्ताला “घाण” मानण्यामुळे महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत आणि प्रसूतीच्या वेळी अस्वच्छ समजले जाते. धार्मिक विधींच्या पवित्रतेसाठी रक्ताचा तिरस्कार करण्याला यामुळे अधिकच खतपाणी मिळते.
आपण या प्रकाराहून आपण अगदी दूर राहिलं पाहिजे.
अनेक शाकाहारी संन्याशांना वाटते की मांसाहार करण्याऱ्या गृहस्थाश्रमातील लोकांपेक्षा ते सरस आहेत. ही स्पर्धा अहं भावनेमुळे भ्रम निर्माण करते. आपण यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
आपल्याला लक्षात असायला हवं की कालीमाता रक्ताचं बलिदान मागते. त्यामुळे कालीमाता अशुद्ध होते का? देवता म्हणजेच निसर्ग आहे, मग निसर्गाला अशुद्ध मानता येईल का?
हिंदू धर्माचे ठेकेदार, हिंदु धर्माची अब्राहमिक धर्माच्या अनुषंगाने मांडणी करताना दिसतात आणि अनेकांतवाद नाकारतात. जणू काही त्यांना हिंदूंनी कसे वागावे-वागू नये याची यादी बनवायची आहे.
काही वर्चस्ववादी ब्राम्हण आणि बनिया (वैश्य) समाजातील रिती म्हणजेच खऱ्या रुढी! त्यांना वाटतं या समाजातील चालीरीतींचा सर्वांनी अंगीकार करावा.
हे लोक मांसाहारी लोकांना मागास आणि शाकाहारी लोकांना प्रगत मानतात, ज्यामागे कसलेही विज्ञान नसून स्वतःचा अहं जोपासणे हाच हेतू आहे.
हे लोक संख्येने कमी असलेल्या अनेक समाजांच्या मांसाहाराच्या चालीरीती नाकारतात.
अन्न गणनेच्या (food census) आकडेवारी नुसार, ७०% भारतीय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मांसाहार करतात. लक्षात ठेवा!
ब्राम्हणांना किंवा वैश्य समाजाच्या लोकांना काय हवं त्यानुसार हिंदू धर्मातल्या चालीरीती ठरत नाहीत. ब्राम्हण समाज हिंदू धर्माचा एक भाग आहे आणि त्यातही १००% ब्राम्हण शाकाहारी नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.