तुकोबांसारखे संत जन्माला येतात ते त्यांच्या घरच्या संस्कारांमुळे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २५
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २४
===
दुपारची जेवणे, विश्रांती आदी सारे नीट पार पडल्यावर आबाने रामभट थोडे रिकामे झालेले पाहून विचारले,
ह्यो आवड तुकोबांस्नी कशापायी लागली आसंल? कुनी म्हन्तात, दुष्काळ पडला आन् तुकोबा संत झाले. म्यां म्हन्तो, दुष्काळ तर सर्वांन्सीच हुता की. ह्योच कसे आसे झाले?
आबा सारखे नवे नवे प्रश्न काढून विचारत असतो हे नारायणाने रामभटांच्या हळूच कानात सांगितले होतेच. रामभटांना त्याचा पहिला अनुभव आला. ते म्हणाले,
आबा, छान विचारलेत तुम्ही. दुष्काळ हे तुकोबांच्या संतपणाचे रहस्य नव्हेच. दुष्काळात त्यांच्या संतत्वाची परीक्षा लोकांना झाली इतकेच. सोन्याने अग्नी सहन करून अजून लखलखीत दिसावे तसा तो प्रकार झाला. तुकोबांच्या घरातील वातावरणच मुळात आध्यात्मिक होते. पिढ्या न् पिढ्या पंढरपूरची वारी होती. विठ्ठलाची भक्ती होती. तुकोबांसारखे संत जन्माला येतात ते त्यांच्या घरच्या संस्कारांमुळे. पिढ्या न् पिढ्या जपलेल्या सद्वर्तनामुळे. तुकोबांचा एक अभंग लगेच सर्वांच्या मुखी झाला आहे. तो पाहून मला वाटते की हे तुकोबांच्या घराण्याचंच जणू वर्णन आहे. ते म्हणतात –
शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।
मुखी अमृताची वाणी । देह वेचावा कारणी ।।
सर्वांगी निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ।।
तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ।।
आबा, तुकोबांकडे पाहून कुणालाही असेच वाटते ना? एखादा मनुष्य त्यांना नुसता भेटला तरी शांत होतो. तो कसा? तुकोबांना पाहून त्याला वाटते, माझे संसारताप पळून गेले! ज्याला पाहून अशी भावना होते तो मनुष्य सर्वांगी निर्मळ असतो असे तुकोबा म्हणतात. ते म्हणतात, अशाचे मन गंगाजलासारखे निर्मळ, शुद्ध असते! तो बोलू लागला की अमृतवाणी ऐकल्यासारखे वाटते. त्याचे जगणे पाहिले की कळते की ह्याने देह कारणी लावला! हे सारे उगीच घडत नाही. इतकी रसाळ गोमटी फळे ज्या वंशवृक्षाला लागतात त्याचे बीज सामान्य असू शकत नाही. अती शुद्ध बीजापोटीच अशी रत्ने जन्माला येतात. आबा, वैराग्य हे तुकोबांच्या कुटुंबाचेच वैशिष्ट्य आहे. तुकोबांचे थोरले बंधू लहानपणीच वैराग्य स्वीकारले आणि घर सोडले. तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा तुम्ही पाहिलेत. रामाचा लक्ष्मण तो. विलक्षण प्रेमळपणा हे त्या घराचे लक्षणच आहे.
पवित्र सोवळी । एक तीं च भूमंडळीं ।।
त्यांचा आवडता देव । अखंडित प्रेम भाव ।।
तीं च भाग्यवंते । सरतीं पुरतीं धनवित्तें ।।
तुका ह्मणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ।।
हा अभंग ऐकताना तुकोबांचे अवघे कुटुंबच समोर उभे राहते. ह्या भूमंडळावरील अतिशय पवित्र, सोवळी असे ते कुटुंब. त्यांचा देव कोण? तर अखंडित प्रेम भाव! आबा मी म्हणत होतो ना की त्याच्या पिढ्या न् पिढ्यांकडून झालेल्या साधनेचे फळ म्हणजे हे तुकोबा आहेत म्हणून? हा अभंग तेच सांगतो की नाही? ह्या अभंगात अखंडित हा शब्द आहे. तो आपल्याला गुह्य सांगतो. काही घडो, ह्यांचा प्रेमभाव कधीही खंडित झाला नाही! अशा थोर कुटुंबांचे, थोर व्यक्तींचे वर्तन कसे असते ते ही तुकोबांनी ह्या अभंगात सागितले आहे. तुकोबा म्हणतात, सरतीं पुरतीं धनवित्तें।।
संपत्ती कधी आहे, कधी नाही. नसेल तेव्हा जे आहे त्यात भागवायचे. आबा, तुम्ही म्हणाल, यांत काय विशेष? आहे त्यात अनेक कुटुंबे भागवितात. तर, तुमचे चूक नाही. पण आपल्याला कमी आहे अशी त्यात भावना असते. ती भावना अशी वाढते की काही प्रेम मनात असेल तर ते टिकू देत नाही. तुकोबांच्या घरी असे झाले नाही. जे आणि जेवढे असेल, त्यात ही मंडळी समाधानाने जगत राहिली. त्यांचा प्रेमभाव कठीण परिस्थितीतही अखंडच राहिला. मोठा विषय अजून पुढे आहे आबा. गरीबीत प्रेम टिकवले आणि जेव्हा श्रीमंती पाहिली तेव्हाही टिकवले. हे काही सोपे नव्हे हो. श्रीमंतीत माणसे नको वाटतात आणि प्रेम तुटत जाते. यांचे तसे झाले नाही. का? तुकोबांनी याचे उत्तर त्या तीन शब्दांत दिले आहे. सरतीं पुरतीं धनवित्तें ।। गरीबीत होते ते पुरवून घेतले आणि श्रीमंतीत ते सरतें केले! म्हणजे ते अतिरिक्त धन आपले मानले नाही! हे फार विशेष आहे. हे फार दुर्मीळ आहे. हे असे आहे म्हणून ती मंडळी पवित्र आहेत, ती मंडळी सोंवळी आहेत. तुकोबांनी पवित्र सोवळे कोण ते सांगण्यासाठी हा अभंग रचला आहे पण आपल्याला त्यातून बोध हा असा होतो. अशांची सेवा केली तर ती पावेल असे तुकोबा शेवटी सांगतात. असे जगल्याने त्यांच्या घरात तुकोबांसारखे नररत्न जन्माला आले. तुकोबांनी खरेच कळस केला. आपल्या पूर्वजांचे पांग फेडले. पूर्वजांची साधना मूक होती, ह्यांनी तिला बोलके केले. साधनेला शब्दरूप दिले. त्यामुळे आता त्यांचा विचार सर्वदूर पोहोचतो आहे. तुकोबांचा अजून एक अभंग आहे, पाहा –
शब्दांची रत्ने करूनी अळंकार । तेणे विश्वंभर पूजियेला ।।
भावाचे उपचार करूनि भोजन । तेणे नारायण जेवविला ।।
संसारा हातीं दिले आचवण । मुखशुद्धी मन समर्पिले ।।
रंगली इंद्रिये सुरंग तांबूल । माथां तुलसीदळ अर्पियेले ।।
एकभावदीप करूनि निरांजन । देऊनी आसन देहाचें या ।।
न बोलोनी तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ।।
तुकोबांना शब्दकळा कशी वश आहे पाहा. ह्या अभंगात त्यांनी रूपक अलंकार वापरलाय. आपले जीवन हीच विश्वंभराची म्हणजेच जनता जनार्दनाची पूजा – ती कशी केली ते तुकोबा सांगत आहेत. तुकोबा म्हणतात, शब्दाचीच रत्ने वापरली आणि त्याचा अलंकार केला. तुकोबांचे अभंग म्हणजे त्यांनी घडविलेला एक एक अलंकार. तो वाहून ते विश्वंभर पूजतात. त्यांनी आपला प्रत्येक अभंग जनतेला वाहिला आहे. पूजा केली की देवाला नैवेद्य दाखविला पाहिजे. त्याचे वर्णन तुकोबा पुढे करतात. ते म्हणतात आपल्या भावाचेच पदार्थ केले आणि ते जनतेला जेवू घातले. आपल्या अवघ्या संसारानेच आंचवण केले आणि मुखशुद्धीसाठी मन दिले. तांबूल म्हणून रंगलेली इंद्रिये दिली आणि शेवटी आपल्या माथ्यावर तुळशीपत्र ठेविले! आपला भाव असा एकसारखा करून त्याचे निरांजन केले व आरती केली. ही सर्व सेवा ह्या देहाचेच आसन करून केली. मनातल्या मनात विश्वंभराची अशी पूजा केली आणि त्या देवास आपल्याच मनाच्या गाभाऱ्यात निजविला! अगदी थोडक्यात सांगायचे तर आबा, ह्या माणसाने आपले सारे आयुष्य लोकसेवेला वाहिले. जगाचा संसार आपला केला. स्वतःला जगाचा केला. आपला जन्म जगदुद्धारासाठी झालेला आहे हे तुकोबांनी ओळखले व तसे ते जगत आहेत. ते म्हणतात,
आह्मीं वैकुंठवासी । आलो या चि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्तावया ।।
झाडूं संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवूं ।।
अर्थे लोपली पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ।।
पिटूं भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका ह्मणे करा । जयजयकार आनंदे ।।
आबा, तुम्ही मला विचारलेत तुकोबा संत कसे झाले? तर त्याचे उत्तर हेच की आपला जन्म कशासाठी झालेला आहे हे त्यांना कळले! आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो हाच! आधीच्या अभंगात तुकोबांनी सांगितले की देवाला मनाच्या माजघरात निजवले! म्हणजे काय? तर तुकोबांचे मन देवासारखे झाले! आता पुढे काय? आता जगाला वाट दाखवायची! ज्या उपदेशाने जनांना योग्य रस्ता सापडेल असा बोध करायचा. तुकोबा आज हे कार्य अविरत करीत आहेत. पाहा, ह्या अभंगात ही गोष्ट त्यांनी स्पष्टपणे सांगितली आहे. ते म्हणतात, आम्ही वैकुंठवासी असलो तरी ह्याच कारणाकरिता जन्मलो आहेत की पूर्वीच्या ऋषींनी जे सत्य सांगितले ते आपण पुन्हा सांगावे. ते रुढे म्हणतात, असे करण्याकरिता आधीच्या संतांनी जो मार्ग आखून दिला तो आम्ही स्वतः झाडून काढू, स्वच्छ करू. त्यामुळे तो सर्वांना वापरता येईल. आज त्या रस्त्याचे आडरान झाले आहे. जग स्वतःपुरते जगते. आम्ही असे करणार नाही. आम्ही स्वतः संतांनी आखून दिलेल्या मार्गाचा लाभ तर घेऊच पण इतर घेतील असेही पाहू. इतकेच काय, इतर आधी तृप्त होतील असे पाहू आणि मिळेल त्या शेष भागावर संतोष मानू. वास्तविक पुराणांत सारी शिकवण आहे पण सांगणाऱ्यांनी शब्दांच्या नादी लागून त्यांच्या खऱ्या अर्थाचा नाश केला आहे. त्या लोभी मनाच्या लोकांनी अशी परंपरागत साधने चुकीचे अर्थ सांगून अक्षरशः बुडविली आहेत. आम्ही खरे ते सांगू. भक्ती म्हणजे काय ते आम्ही समजावून सांगू. खऱ्या भक्तीला काळाचे बंधन नाही. कलीचे भय नाही. खरी भक्ती काय ती आम्ही करू आणि सर्वांना करायला शिकवू. त्या भक्तीचा मी जयजयकार करतो, तुम्हीही करा. आबा, जनसेवा हीच भक्ती असे तुकोबा म्हणतात आणि तसे वागतात. म्हणून ते संत आहेत. शु्द्ध बीजाच्या मातापित्यांच्या पोटी जन्माला आले आणि त्यांनी जीवनाचे सार्थक केले. आपल्यासाठी मार्ग दाखविते झाले. मी त्यांचा आनंदाने जयजयकार करतो!
आबा म्हणाला,
म्यां बी तुकोबांचा जयजयकार करतुं!
===
(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.