LIC कर्मचारी ते मिसेस मुख्यमंत्री: ठाकरे कुटुंबातील अनोखी लव्हस्टोरी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. ही गाठ केव्हा, कुठे आणि कुणाशी बांधली जाणार आहे हे आधीच ठरलेलं असतं. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत हे खरं आहेच पण अगदी मोठ्या घराण्यातल्या मुलामुलींची लग्नगाठही त्यांच्याच तोलामोलाच्या घराण्यातल्या कुणाशीतरी बांधली गेली असेलच असं नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
प्रेमाला जात, वय, भाषा, धर्म कश्याकश्याचंही बंधन नसतं. अगदी दोन वेगळ्या आर्थिक स्तरांतून आलेल्या अनेकांच्या बाबतीतही प्रेमसंबंध जुळल्याची उदाहरणं आपल्याला दिसतात.
दोन वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतून आलेली अशी जोडपी जशी आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये दिसतात तशी ती अगदी मोठं नाव असलेल्या घराण्यांमधूनही दिसतात. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हे असंच एक उदाहरण!
ज्यांना महाराष्ट्रातील वाघ आणि हिंदू हृदय सम्राट म्हटलं जायचं त्या बाळासाहेबांचे पुत्र आणि आजचे आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लग्न ज्या रश्मी ठाकरेंसोबत झालंय त्या मूळच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या होत्या हे आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसेल.
लोकांसमोर उद्धव ठाकरेंची एक प्रतिमा आहे. ते मुख्यमंत्री म्हणून कसे आहेत याविषयी प्रत्येकाची मतं वेगवेगळी असली तरी आजच्या घडीला ते मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा हाती घेतल्यापासून अनेक चढ-उतार पाहिलेत. लोकांचं कौतुक जसं त्यांच्या वाट्याला आलं तसाच लोकांचा रोषही आला. शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते मुख्यमंत्री हा प्रवास उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच सोपा नसणार.
उद्धव ठाकरेंच्या राजकीय निर्णयांच्या बाबतीत रश्मी ठाकरेंचा सहभाग असतो का,असला तर किती असतो याची आपल्याला कल्पना नाही पण त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात आणि प्रगतीत पत्नी रश्मी ठाकरे यांचे फार महत्त्वाचे योगदान आहे.
उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गेली अनेक वर्षे उद्धव ठाकरेंना अतिशय खंबीर साथ दिली आहे. पण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट कशी झाली, मैत्री कशी झाली, मैत्रीचे प्रेमात झालेले रूपांतर याविषयी जाणून घेण्याचं औत्सुक्य आपल्याला नक्कीच असेल. तर जाणून घेऊया यांची प्यारवाली लव्हस्टोरी!
डोंबिवली ते मातोश्री…
रश्मी ठाकरे यांचे माहेरचे आडनाव पाटणकर होते. त्यांचा जन्म डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ८० च्या दशकात वझे-केळकर महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. उद्धव ठाकरेंच्या मागे बाळासाहेब ठाकरेंचं एक प्रचंड मोठं वलय होतं तसं काही रश्मी ठाकरेंच्या बाबतीत नव्हतं.
घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर एका सामान्य मुलीप्रमाणे रश्मी ठाकरेंनी १९८७ साली एलआयसीत नोकरी करायला सुरुवात केली होती. त्यांची नोकरी कंत्राटी स्वरूपाची होती.
एलआयसीमध्ये नोकरी करत असतानाच त्यांची मैत्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे यांच्यासोबत झाली. जयवंती ठाकरे यांनीच रश्मी ठाकरेंची पहिल्यांदा उद्धव ठाकरेंशी भेट घडवून आणली होती.
उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. ते तेव्हा ‘जे जे स्कुल ऑफ आर्ट्स’ मध्ये शिकत होते. ते फोटोग्राफी करायचे. त्यांनी एक ऍड एजन्सी सुद्धा सुरू केली होती.
उद्धव ठाकरेंमधल्या नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या आपल्या रश्मीवहिनी प्रभावित झाल्या असतील बरं? आणि उद्धव ठाकरेही वहिनींच्या कसे प्रेमात पडले असतील? याची उत्तरं त्या दोघांनाच ठाऊक असतील. पण इतक्या मोठ्या घराण्यातल्या व्यक्तीने एका मध्यमवर्गीय मुलीच्या प्रेमात पडणं आणि त्या मुलीनेही स्वतःला झोकून देऊन त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणं ही फार मोठी गोष्ट आहे.
नंतर १३ डिसेंबर १९८८ रोजी दोघे विवाहबद्ध झाले.
मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यानंतरही इतक्या मोठ्या घराण्यात रश्मी ठाकरे फारच छान रुळल्या. उद्धव ठाकरेंसाठी त्या अतिशय अनुरूप सहचारिणी ठरल्याच पण त्यांनी ठाकरे कुटुंबियांनाही अगदी मनापासून आपलंसं केलं.
या घराण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंवरच्या प्रेमाखातर त्यांनी या संसाराला आपलं सगळं सर्वस्व वाहिलं.
शिवसैनिकांच्या रश्मीवहिनी
रश्मी ठाकरे यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी त्या राजकारणात सक्रीय नाहीत असे म्हणता येणार नाही. कारण मातोश्रीवर रहात असल्यापासून त्यांनी शिवसेना आणि शिवसैनिक यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते जपले. याचा परिणाम म्हणजे शिवसैनिकांना पक्षाशी बांधून ठेवण्यात त्यांचा उपयोग झाला.
ठाकरे कुटुंब राजकारणाच्या रणांगणात कार्यरत असताना घरी या पसारा रश्मी ठाकरे सांभाळायच्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातोश्रीवर येणारा प्रत्येक माणूस, त्यांची कामं याकडे त्या जातीने पहायच्या. प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था, प्रत्येकाची सोय, घरातील नियोजन सांभाळताना प्रत्येकाची जातीने विचारपूस करायच्या.
रश्मी ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व एकाच वेळी फार सौम्य आणि कणखरही आहे. रश्मी ठाकरे शांत स्वभावाच्या आहेत. शिवसेनेचे सगळे चांगले वाईट दिवस त्यांनी पाहिले आहेत. त्या कायमच फार संयमी असल्याचे आपण पाहिले आहे.
त्यांच्या या मितभाषी स्वभावाचा फायदा म्हणजे शिवसैनिकांना ठाकरे कुटुंब आणि मातोश्री हे हक्काचे, आदराचे स्थान वाटते.
उद्धव ठाकरेंच्या चांगल्या काळात आनंदाने त्या हुरळूनही जात नाहीत आणि त्यांच्या वाईट दिवसात उद्धव ठाकरेंच्या राजकीय विरोधकांवर उगीचच ताशेरेही ओढत नाहीत. आपल्या नवऱ्याच्या वाईट काळातही त्या अतिशय संयम ठेवतात आणि चांगल्या काळात अर्थातच सगळ्यांशी फार मृदुतेने वागतात. रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आईवडील आणि सासु-सासऱ्यांच्या प्रभाव आहे.
उद्धव यांचे कामकाज, आदित्य-तेजस यांचे शिक्षण, ठाकरे कुटुंबाचा वाढता पसारा, राजकारण, समाजकारण यांपासून ते थेट कौटुंबिक आघाड्यांवर त्या रोज लढताना दिसतात.
एखाद्या जोडप्यापैकी दोघेही फार नावाजलेले असतील तर अश्या वेळी त्या दोघांच्याही वाट्याला लोकांचं कौतुक येतं. पण जेव्हा एक व्यक्ती प्रकाशझोतात असते आणि दुसरी कायम पडद्यामागे राहून त्या प्रकाशझोतात असलेल्या आपल्या जोडीदाराला खंबीर साथ देत असते तेव्हा त्या व्यक्तीने जोडीदारासाठी केलेलं समर्पण अमूल्य असतं. त्यासाठी त्या व्यक्तीला मानलंच पाहिजे. रश्मी ठाकरे यांच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल:
https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.