' या महान मराठी नाटककाराच्या नाटकांची कायमच “अश्लील” म्हणून हेटाळणी झाली… – InMarathi

या महान मराठी नाटककाराच्या नाटकांची कायमच “अश्लील” म्हणून हेटाळणी झाली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सत्तरचं महाराष्ट्रातलं दशक मध्यमवर्गियाचं दशक आहे. बहुतांश मध्यमवर्गिय असणार्‍या या राज्यात पापभिरू समाज रहात होता. चौकटीतलं आयुष्य जगणारा, अनेक गोष्टींचे “टॅबू” घेऊन वावरणारा असा हा समाज पांढरपेशा नितीमत्ता जपत, संस्कार जपत जगणारा होता.

परस्त्रीकडे डोळे वर करून बघणं, परपुरूषाचं कौतुक करणं हे अनैतिक मानणारा होता. योग्य वयात मुलीचं लग्न झालं नाही तर तिला बिनदिक्कत घोडनवरी संबोधणारा हा समाज एका लेखकाच्या लेखणीनं मात्र पूर्ण ढवळून निघाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या अशा समाजासमोर जेव्हा त्यांनी एकाहून एक बोल्ड विचारांची नाटकं आणली तेंव्हा या गोष्टी सहज पचनी पडणं शक्यच नव्हतं. हे विचार पचवू शकणार्‍या विशिष्ट वर्गानं मात्र वेगळ्या वाटेवरचे हे विचार नीट वाचायला सुरवात केली आणी तेंडुलकर हे या विशिष्ट “क्लासचे” लेखक बनले.

 

vijay tendulkar IM

 

विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचा जन्म १९२८ साली मुंबईत झाला. गिरगावच्या कनिष्ठ मध्यमवर्गिय कुटुंबात एका चाळीत वाढलेल्या तेंडुलकरांना शिक्षणाचं मात्र वावडं होतं. शालेय शिक्षणात ते फारसे रमले नाहीत.

वयाच्या १५ वर्षी त्यांनी अखेर शिक्षणाला रामराम ठोकला आणि एका ग्रंथ विक्रेत्याकडे नोकरी धरली. यानंतर दैनिक नवभारत, लोकसत्ता आणि मराठा अशा वृत्तपत्रातून त्यांनी उपसंपादक म्हणून काम केलं.

याच काळात दिवाळी अंकांच्या संपादनाचं काम करत असतानाच त्यांनी लघुकथा लेखनाला आरंभ केला आणि १९५५ साली त्यांनी गृहस्थ हे पहिलं नाटक लिहिलं.

तेंडुलकर जेंव्हा नाट्यक्षेत्रात आले तो काळ मराठी नाटकांचा संक्रमणाचा काळ होता. जुनी संगीत नाटकं मागे पडत चालली होती आणि वरेरकर-रांगणेकर- अत्रे यांच्या वास्तववादी नाटकाशी प्रेक्षक जुळवून घेण्यात कमी पडत होते.

अशातच एक नविन लेखन शैली घेऊन विजय तेंडुलकर नावाचा युवा लेखक अवतरला आणि प्रयोगशिल संस्थांना हक्काचा लेखक मिळाला.

 

vijay tendulkar 2 IM

 

गृहस्थ नंतर श्रीमंत, श्रीकांत, माणूस नावाचं बेट, कावळ्यांची शाळा, चिमणीचं घर होतं मेणाचं, भल्याकाका अशी नाटकांची एकामागे एक लड आली. आजवर न चर्चा केले गेलेले विषय आता नाटकातून दिसू लागले.

मराठी प्रेक्षकांसाठी हा फार मोठा बदल होता. तेंडुलकर या नावाची चर्चा होऊ लागली. मित्राची गोष्ट हे समलैंगिकतेवरचं नाटक आलं तेंव्हा विचार करा काय हाहा:कार माजला असेल. या नाटकाची गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातली होती.

१. शांतता कोर्ट चालू आहे (१९६३)

या नाटकाने तर अक्षरश: विक्रम केला. नाटकात नाटक असं अभिनव काहीतरी तेंडुलकरांनी रंगमंचावर आणलं. अभिरूप न्यायालय साकारुन एक वेगळाच कोर्ट ड्रामा रंगमंचावर सादर केला गेला.

 

shantata court chalu ahe IM

सुलभाताई देशपांडे त्यांच्या यातल्या मिस बेणारेच्या भूमिकेसाठी कायम ओळखल्या गेल्या. या नाटकाचं १६ भारतीय भाषांत रुपांतर होऊन त्याचे प्रयोग केले गेले.

एका अविवाहित स्त्रीला समाज कशाप्रकारे टोचण्या मारतो हे नाटकतून दाखविलं गेलं. अप्रतिम संवाद असणारं हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेलं.

२. सखाराम बाईंडर

त्या काळात सखाराम सारखा विषय मांडणंही खरंतर धाडसाचं होतं. अत्यंत बोल्ड असं हे नाटक बंद पाडण्यासाठीही प्रयत्न झाले . पुरुषवादी अहंकार आणि स्त्रीला वैषयिक वस्तू म्हणून बघणारा समाज यांचे बुरखे फाडणारं हे नाटक. समाजानं टाकलेल्या परितक्त्यांना आधार देणारा सखाराम फक्त त्यांचा उपभोग घेत असतो.

हक्काची आणि कसलीही जबाबदारी नसणारी तात्पुरती पत्नी त्याला स्त्रियांच्या रूपात भेट असते. मात्र आठवी स्त्री चंपा त्याच्या आयुष्यात येते आणि सखारामचा पुरुषी अहंकार टराटरा फाडून टाकते.

 

sakharam binde IM

 

या नाटकानं त्याकाळात प्रचंड खळबळ माजविली होती. तेंडुलकरांवर धडधडीतपणे अश्लिलतेचा शिक्का मारणारं हे नाटक. भारतीय विवाहसंस्था धोक्यात आणणारं, भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारं नाटक अशा शब्दात यावर विखारी टिका करण्यात आली.

सेन्सॉरनंही अखेर पहिल्याच प्रयोगानंतर या नाटकावर बंदी घातली. दिग्दर्शक कोर्टात गेला आणि आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर केस जिंकून पुन्हा एकदा सखाराम रंगमंचावर अवतरला. सखारामची लढाई अजून संपली नव्हती. प्रयोग चालू झाले तरिही राजकीय पक्ष चवताळले होते.

प्रयोग बंद पाडण्यासाठी झुंडीनं रंगमंचावर घुसून राडे करण्यात आले. अखेर तेव्हाचे मुंबईचे सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे यांना राजी करण्यात आलं आणि त्यांनी आशिर्वाद दिल्यावर या नाटकाचे सुरळीत प्रयोग चालू झाले. निळू फ़ुले आणि लालन सारंग यांच्या भूमिका असणारं तेंडुलकरांचं हे अजरामर नाटक आहे.

 

३. घाशिराम कोतवाल

तेंडुलकरांचं आणखिन एक विवादास्पद नाटक. पेशवाईच्या कालखंडात घडणारं. वरवर बघता हे पेशवाईतली अंधाधुंदी दाखविणारं नाटक असलं तरिही ते सत्तेचा घाणेरडा खेळ मांडणारं नाटक आहे.

अपात्र माणसाच्या हाती सत्ता आली की तो त्याचा वापर कसा अंधाधूंदपणे करतो हे बघायचं तर घाशिराम बघणं अपरिहार्य आहे. हे नाटक कालातीत आहे.

 

ghashiram kotwal IM

 

प्रयोगिक थिएटरवर अशाच वेगळ्या विचारांच्या नाटकांमुळे तेंडुलकरांनी राज्य केलं. त्यांच्या नाटकांवर भलेही अश्लिलतेचे शिक्के बसले असतील मात्र आजही या नाटकांचा विचार केला तर परिस्थिती फारशी  बदललेली नाही हेच दिसेल. सत्तेचा खेळही तसाच चालू आहे आणि स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणंही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?