' महाभारताबद्दल प्रचलित गैरसमज मोडीत काढणारे – “महाभारताचे वास्तव दर्शन” – InMarathi

महाभारताबद्दल प्रचलित गैरसमज मोडीत काढणारे – “महाभारताचे वास्तव दर्शन”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका: प्रिया प्रभुदेसाई

===

नऊ दहा वर्षाची असताना शिवाजी सावंत यांनी लिहिलेले “मृत्युंजय” वाचले होते. कर्णाच्या त्या रंगवलेल्या व्यक्तिमत्वाचा एवढा पगडा मनावर पडला होता की पुढील काही वर्षात कौंतेय, कर्णायन, राधेय, महापुरुष ह्या कर्णचरित्रांची पारायणे केली. लहान वय. केवळ पुस्तक म्हणून पाहीले आणि विसरले असं होत नाही. त्या विचारांचा मनावर पगडा बसतो.

एक नजर उसनी घेतली जाते लेखकांची आणि ही सवय किती घातक आहे हे नंतरच्या आयुष्यात लक्षात आले –

जेव्हा प्रत्ययास आले की व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली असंख्य व्यक्तिरेखांवर चिखलफेक करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे.

 

mahabharat-marathipizza

 

महाभारतावर असंख्य लोकांनी लिहिले आहे. पंडितांच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणारा आणि ललित लेखकांच्या प्रतिभेला वाव देणारा हा ग्रंथ असल्याने असंख्यानी आपली लेखणी झरवली आहे. महाभारतात असंख्य व्यक्तिमत्वे आहेत. व्यासांनी ती नैसर्गिक रंगात रंगवली आहेत.

असंख्य ठिकाणी असे वाटते की हे या पात्रांनी केले नसते तर किती चांगले घडले असते युद्धाच्या दरम्यान घेतले गेलेले निर्णय, द्रौपदीची झालेली विटंबना, त्यावेळेस भीष्मासारख्यानी स्वीकारलेले मौन, युधिष्टिराचा अविवेकीपणा…असे अनेक प्रसंग आहेत की वाचक म्हणून आपण नक्की कोणाची बाजू घ्यावी या संभ्रमात पडतो.

या मानसिक द्वंद्वामुळे असेल अनेक विचारवंतांनी महाभारताचे चित्रण त्यांना भावले तसे केले आहे. कदाचित म्हणूनच महाभारतातील वस्तुस्थितीवर आपल्याकडून अन्याय झाला आहे याची जाणीवही या आधुनिक लेखकांना नाही.

यातील अनेक मान्यवर – इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, आनंद साधले, शं क पेंडसे, नरहर करुंदकर – हे सर्व आपापल्या क्षेत्रातले तज्ञ.

तरीही असे म्हणावे लागेल की लेखन स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते लिहिण्याची मुभा घेऊन, आपली जबादारी न ओळखता अनेक सुप्रतिष्टितांनी अनेक व्यक्तिचित्रांचे विकृतीकरण केले आहे. अनेक दोषांचे समर्थन केले आहे. त्याचे खंडन करणे ही सामान्य गोष्ट नाही.

 

mahabharata-marathipizza04
daily.bhaskar.com

यातील मान्यवरांना आव्हान देणे यासाठी मूळ महाभारताचा अभ्यास असणे, निःपक्षपातीपणे तो करणे हे अतिशय आवश्यक होते. भोळ्या भाविकतेने महाभारताकडे न पाहता, रोखठोक तर्कवादाचा आणि साधार चिकित्सेचा आधार घेऊन प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांनी लिहिलेले “महाभारताचे वास्तव दर्शन” ही अपेक्षा पूर्ण करते.

 

mahabharatache wastaw darshan marathipizza

 

दहा मे ला माझ्या हातात पडलेले पुस्तक एक दोन दिवसात सहज संपेल असे वाटले खरे. पण तसे घडले नाही. व्यासपर्व, युगांत, हा जय नावाचा इतिहास आहे, महाभारतातील व्यक्तिदर्शन ही चार पुस्तके परत वाचून या पुस्तकाला हात घालावा लागतो.

व्यासपर्व माझे स्वतःचे आवडीचे पुस्तक. तरीही जेव्हा आठवले यांचे पुस्तक वाचले तेव्हा दुर्गाबाईंनी आपल्या शब्दाचे सामर्थ्य वापरून ललित दृष्ट्या जरी असामान्य कलाकृती निर्मिली आहे हे पटते त्याच वेळी ते शब्द वाचकांना भ्रमात पाडतात हे ही स्पष्ट जाणवते.

कृष्ण – द्रौपदीचे नाते, तिला कामिनी संबोधताना तिच्या आणि कृष्णाच्या चारित्र्यावर केलेला “हळुवार” वार, अर्जुनाचे उत्तराशी असलेले नाते ही जी काही विधाने त्यांनी केली आहे त्याला मूळ महाभारतात कसलाही आधार नाही हे हे सोदाहरण आठवले यांनी पटवून दिले आहे.

इरावती कर्वे यांच्या युगान्तावरची टीका तिखट आहे आणि रास्तही आहे. मुळात पांचालीचा शेवटचा प्रसंग आणि गांधारीचे मूळ रूप हा स्वतःचा कल्पना विलास असल्याचे बाईंनी पुस्तकात मान्य केले आहेच.

तरीही त्यांचे भीष्म, पंडू, द्रौपदी वरील टीका सुद्धा अनुचित आहे हे श्लोकांच्या साहाय्याने आठवले यांनी दाखवून दिले आहे.

हे प्रकरण दोन्ही पुस्तके समोर ठेवून वाचले तर लक्षात येते बाईंनी खूप कोलांट्या उड्या मारल्या आहेत.

yuganta mahabharat irawati karve inmarathi

 

मला स्वतःला साधले यांची पुस्तके कधीच आवडली नव्हती. द्वेषबुद्धीने लिहिलेली ही पुस्तके स्वतःचा कंड शमविण्यासाठी लिहिलेली असावी हे विधान कोणत्याही लेखकाला पटेल. दुर्गाबाईंनी त्यांच्यावर अतिशय जहरी भाषेत टीका केली आहे.

सर्वात महत्वाचे प्रकरण आहे ते पेंडसे यांच्या पुस्तकाबद्दल लिहिलेले. अध्यात्म, तर्कशास्त्र , तत्वज्ञान आणि खंडन-मंडन या सर्वांचे दर्शन इथे दिसते. हे मुळातून वाचण्यासारखे.

पेंडसे यांचे पुस्तक वरील तीन लेखकांपेक्षा वेगळे. कारण ते संहितेला धरून आहे. कल्पना विलास नाही. तर्कशास्त्राला धरून असल्याने त्यांचे मुद्दे आणि आठवले यांनी ते खोडलेले मुद्दे हे वाचून महाभारत पुन्हा मुळातून वाचावे ही इच्छा होणे हे या पुस्तकाचे यश आहे.

मुळात हे पुस्तक एका वेळी संपून टाकावे अशी कलाकृती नाही. एकेक मुद्याचे मनन करून, त्यावर विचार करण्यासाठी प्रवूत्त करणारे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे स्वरूपच विधान आणि त्याचे खंडन या स्वरूपात आहे.

मूळ श्लोक – त्यांची पार्श्वभूमी दिलेली आहे. त्याचा इतर लेखकांनी त्याचा केलेला विपर्यास किंवा प्रक्षिप्त म्हणून जे तारे तोडले त्याचा समाचार घेणे हा मूळ उद्देश इथे सफल झालेला आहे.

ह्या पुस्तकात व्यक्तीद्वेष नाही. भाषा रसाळ आणि सोपी.

महाभारताचा अभ्यासक आणि प्रशंसक अशा सर्वानी संग्रही ठेवण्याजोगे हे पुस्तक आहे हे निश्चित.

इच्छुकांना हे पुस्तक इथे क्लीक करून विकत घेता येईल.

प्रकाशक – श्रीराधादामोदर प्रतिष्ठान
“प्रतीक” ४०३/०१ शनिवार पेठ
मेहुणपुरा , पुणे ४११०३०

mahabharat-marathipizza01
indiaopines.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?