भारताच्या नव्हे तर चक्क लंकेच्या विजयासाठी प्रार्थना करत होता सेहवाग
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताचा पहिलावहिला त्रिशतकवीर, गोलंदाजांचा कर्दनकाळ, वादळी, स्फोटक फलंदाज, षटकार-चौकारांचा बादशहा, मुलतानचा सुलतान, नजफगढचा नवाब, एक नाही तर अनेक नावं, उपाध्या, विशेषणं ज्याच्या नावासोबत जोडली गेली, तो भारताचा फलंदाज म्हणजे वीरेंद्र सेहवाग!
वीरूचे अनेक चाहते आहेत. त्याच्या बिनधास्त फलंदाजीची आणि तितक्याच बेधडक स्वभावाची ही किमया म्हणायला हवी. फॉर्मात नसूनही, ज्या फलंदाजांची कायमच गोलंदाजांना भीती वाटायची, असे जे मोजके फलंदाज होऊन गेले, त्यांच्यात वीरू हे नाव आपसूकपणे घेतलं जातं.
एक धडाकेबाज फलंदाज म्हणून वीरू जसा सगळ्यांना ठाऊक होता, तशीच त्याच्या आणखी दोन बाबींची चर्चा अवघ्या क्रिकेट वर्तुळात व्हायची. एक म्हणजे, त्याने फलंदाजी करताना गाणी गुणगुणणं आणि दुसरं म्हणजे त्याचं अंधश्रद्धाळू असणं.
सेहवाग हेल्मेटच्या आत लाल फडकं वापरायचा हादेखील त्याच्या अंधश्रद्धेचा भाग असल्याचं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे. फलंदाजीला येताना सीमारेषेच्या आता उजवाच पाय आधी ठेवणं वीरूने नेहमी पाळलं.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
एवढंच नाही तर या अंधश्रद्धेपायी जर्सीवरील क्रमांक बदलणाऱ्या सेहवागने चक्क नंबर नसलेली जर्सी सुद्धा वापरून पाहिली.
आता तुम्ही म्हणाल, वीरूच्या अंधश्रद्धेचा इथे काय संबंध? पण आज आम्ही जी आठवण सांगणार आहोत, ती वीरूच्या अशाच एका अंधश्रद्धेशी निगडित आहे.
भारताची तडाखेबाज फलंदाजी :
हा भारत विरुद्ध श्रीलंका संघाचा तो सामना आहे, ज्यावेळी भारताने वनडे सामन्यात दुसऱ्यांदा ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाने लंकेच्या गोलंदाजांची पिसं काढली होती. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणं लंकेला चांगलंच महागात पडलं होतं.
सेहवागने अवघ्या ६६ चेंडूत शतक झळकावलं. त्याने एकूण १०२ चेंडूंचा सामना करताना तब्बल १४६ धावा वसूल केल्या होत्या. त्याच्या सोबतीला सलामीला आलेला सचिन तेंडुलकरसुद्धा धावांची आतषबाजी करून गेला होता.
६३ चेंडूंत त्याने ठोकलेल्या ६९ धावादेखील आजही लंकेच्या गोलंदाजांना लक्षात असतील. २० षटकांच्या आतच भारतीय फलंदाजांनी १५० चा टप्पा ओलांडला.
सचिन बाद झाल्यावर कर्णधार धोनी आणि वीरू या जोडीने जवळपास १६ षटकांतच १५० हून अधिक धावांचा रतीब घातला होता. अखेरीस भारताने ७ गडी गमावून ४१४ धावा फलकावर लावल्या. तो दिवस होता, १५ डिसेंबर २००९!
–
- क्रिकेटर्सच्या शर्टवर नंबर का असतात? ते कसे ठरवले जातात?
- कपिल देव ‘त्या’ मॅचमध्ये खेळला नसता तर भारताला ८३ चा वर्ल्डकप जिंकणं कठीण होतं!
–
वीरू त्या मालिकेत भलताच फॉर्मात होता. वनडे मालिकेआधी खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेत त्याने २९३ धावांची दमदार खेळी केली होती. तिसरं त्रिशतक झळकावणारा एकमेव खेळाडू होण्याची संधी त्याने अवघ्या ७ धावांनी गमावली होती.
फलंदाजीत अशी बेधडक वृत्ती बाळगणारा वीरू एकदा का, अंधश्रद्धाळू झाला की वेगळंच वागू लागतो. त्यादिवशी सुद्धा असंच काहीसं घडलं. भारताने ४०० हून अधिक धावांचा डोंगर उभा केल्यानंतरही सेहवाग मात्र लंकेच्या विजयासाठी प्रार्थना करत होता.
वीरूला नेहमीच असं वाटायचं, की त्याने भारतीय संघ जिंकावा अशी इच्छा व्यक्त केली, तर भारताला पराभवाचा सामना करावा लागेल.
लंकेचं चोख प्रत्युत्तर :
लंकेच्या फलंदाजांनी सुद्धा ते कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे दाखवून दिलं. त्यांची सलामीची जोडी सुद्धा दमदार खेळली. दिलशान आणि उपुल थरांगा यांनी थोडीथोडकी नाही, तर तब्बल १८८ धावांची भागीदारी रचली. २५ षटकंदेखील पूर्ण झालेली नसताना दिलशानने त्याचं शतक पूर्ण केलं होतं.
लंकेची फलंदाजी पाहून भारतीय गोलंदाजांची पळता भुई थोडी झाली. ४१४ धावा कमी पडतील अशी स्थिती निर्माण झाली. भारताचा यष्टीरक्षक आणि कप्तान धोनी तिसऱ्या क्रमांकावर आला, तसाच लंकेचा यष्टीरक्षक आणि कप्तान असलेला संगकारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
स्फोटक खेळी करत त्याने २०० हून अधिक स्ट्राईक रेटने ९० धावा जमवल्या. प्रवीण कुमारने त्याचा झंझावात रोखला खरा, पण तोपर्यंत उशीर झालाय की काय असं वाटू लागलं होतं. लंकेला १०० धावांची सुद्धा आवश्यकता नव्हती. खेळपट्टीवर स्थिरावलेला दिलशान फलंदाजी करत होता.
त्याने विजयाकडे वाटचाल सुरु ठेवली. लंकेच्या विजयासाठी केलेली प्रार्थना खरी ठरणार, अशी भीती कदाचित वीरूलाही वाटू लागली असेल; अशावेळी दिलशान बाद झाला. १२४ चेंडूंमध्ये १६० धावांची धुवाँधार खेळी खेळून तो तंबूत परतला.
त्यावेळी मात्र भारतीय गोलंदाजांचा जीव भांड्यात पडला. तरीही लंकेने ४११ धावांपर्यंत मजल मारलीच होती. ३ धावांनी निसटता विजय मिळवत भारतीय संघाने लंकेवर मात केली. वीरूची प्रार्थना फळली असती, तर कदाचित ४०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा दुसरा संघ १५ डिसेंबर २००९ ला पाहायला मिळाला असता.
वीरूची प्रार्थना फळली नाही. त्याची अंधश्रद्धा वरचढ ठरली आणि भारताने त्या सामन्यात विजय मिळवला.
वीरूची कबुली :
सामनावीर ठरलेल्या सेहवागने सामन्यानंतर या अंधश्रद्धेविषयी गौप्यस्फोट केला होता. भारतीय संघाच्या विजयासाठी वीरूने प्रार्थना केली तर संघ तो सामना हरणार, असा त्याचा ठाम विश्वास होता.
त्यामुळेच या सामन्याच्या वेळी सुद्धा तो लंकेचा संघ जिंकावा यासाठी प्रार्थना करत होता. अर्थात, या रोमहर्षक सामन्यातील रोमांच आणि निकाल पाहिला तर सेहवागच्या या अंधश्रद्धेत तथ्य होतं, असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.