सर्व अबालवृद्ध लोकांना कुतूहल असणारी ट्रेनची चेन; ती खेचल्यावर नेमकं काय होतं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया”
हे बडबडगीत आणि त्यातली ढगांत धुरांच्या रेषा ओढीत जाणारी अगीनगाडी आपल्या सर्वांनाच प्रिय आहे. रेल्वेचं पसरलेलं जाळं हे जणू एक वरदानच म्हणता येईल.
ह्याच रेल्वेमुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकर झालंय. भारतातील रेल्वेचं जाळं हे सर्वांत लांब जाळ्यांपैकी एक मानलं जातं. आपली ही लाईफलाईन म्हणवली जाणारी अग्निरथपथगामिनी आपल्याला रोजच उपयोगी पडते.
–
- रेल्वे चुकली? आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया…
- “यात्रीगण कृपया ध्यान दे…”, रेल्वे platform वर ऐकू येणारा हा आवाज कुणाचा आहे?
–
लाखो लोक रोज ट्रेनने प्रवास करतात. १८५३ मध्ये भारतात पहिली ट्रेन दाखल झाली ती पुन्हा कधीही न थांबण्यासाठी. अनेक बदलांना सामोरी गेलेली ही ट्रेन अजूनही दिमाखात दौडत आहे.
जसा काळ बदलत गेला तशी आपली ट्रेनताईही विकसित होऊ लागली.
तर मंडळी आपण सर्वच ट्रेन मधे कधी ना कधी बसलेलो आहोत. ट्रेन म्हटली की, लहानग्यांना तिचं आकर्षण असतंच पण आपल्यासारखे मोठेही तिला कुतूहलाने न्याहाळत असतात.
तेव्हा ट्रेन मधे लटकणारी साखळी आपल्या नजरेत आल्याशिवाय नक्कीच राहिली नसेल. आणि ती ओढली तर नक्की काय होतं? ओढून बघावी का? कोणाला कळणारे की मीच ओढलीये?
एखाद्या कठीण प्रसंगी ती खेचलीच गेली नाही तर? नक्की नीट सुरू आहे का ते एकदा बघूच खेचून…असे अनेक विचार आणि प्रश्न नक्कीच तुमच्या डोक्यात संचार करून गेले असतील.
मात्र नक्कीच त्यांना लांब सारून तुम्ही अशी कृती केली नसेल. तसेच कदाचित ह्या फास्ट आयुष्यात ह्या प्रश्नांची उत्तरं शोधेपर्यंत तुमचं स्थानकही आलं असेल.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण काळजी नसावी. कारण आज ह्या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
ट्रेनच्या साखळीचं नेमकं काम काय? विनाकारण ती खेचल्यास दंड आकारला जातो का? वगैरे प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील.
१. चेन ओढल्यावर ट्रेन कशी थांबते?
मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना पेटीचं तंत्र ठाऊक असेल. भात्यामुळे हवेचा दाब निर्माण होऊन सुर ऐकू येतात. हे उदाहरण द्यायचं कारण असं आहे की, ह्या आपत्कालीन चेन ट्रेनच्या ब्रेकच्या पाईपला जोडलेल्या असतात.
हे ब्रेकचे पाईप एका विशिष्ट प्रमाणात हवेचा दाब संतुलित करतात, जेणेकरून ट्रेन व्यवस्थित कार्यरत राहील. जेव्हा आपत्कालात चेन खेचली जाते तेव्हा ह्या ब्रेक पाईप मधली हवा एका छिद्राद्वारे बाहेर पडून हवेचा दाब कमी होऊ लागतो.
ट्रेनचा वेग कमी होऊ लागतो. ही बाब लोको पायलटच्या सर्वप्रथम लक्षात येते व तो शिताफीने ट्रेन कंट्रोल करत थांबतो.
मात्र चेनद्वारे सूचना मिळाली की लगेच ट्रेन थांबवणं मात्र शक्य नाहीये. तसं केल्यास ट्रेनचा अपघात होण्याची शक्यता असते. तासाला ११० किमी वेगाने धावणारी ट्रेन आपत्कालात साधारण ३-४ मिनिटांत थांबवता येते.
२. ट्रेनमधील आपत्कालीन चेनची संख्या काय?
जुन्या ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये प्रत्येक कोचच्या एका बाजूला चेन असायची. मात्र त्याचा सततचा होणारा गैरवापर रेल्वेयंत्रणेसाठी तापदायक होऊ लागला.
म्हणूनच नवीन गाड्यांमध्ये प्रत्येक डब्यात मध्यवर्ती असं एक बटण लावण्यात आलं आहे. चेनची जागा आता ह्या बटणांनी घेतली आहे.
३. चेनच्या सूचनेकडे कानाडोळा करता येऊ शकतो का?
एखादवेळी जर चेन किंवा बटण दाबले आणि ट्रेन न थांबता पुढे गेली तर? पूर्वी चोरी किंवा इतर घातपाताचा प्रकार करता यावा म्हणून ठराविक ठिकाणी ट्रेन मधली चेन खेचली जाई.
म्हणूनच त्यावेळी ह्या सूचनेकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले जाई व कायदाही त्यास पाठिंबा देत असे.
मात्र हल्ली अशा फारशा गोष्टी होत नसल्याने शक्यतो असं घडत नाही. मात्र असं काही घडल्यास ट्रेनचा लोको पायलट उत्तर देण्यास बांधील असतो.
४. चेन-बटण कधी खेचावं/दबावं?
चेन कधी खेचावी ह्याकरता विशिष्ट नियमावली नक्कीच नाहीये, परंतु कारण नसताना उगीचच चेन खेचून उपद्रव करू नये. पुढील गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच चेन खेचू शकता.
एखाद्या व्यक्तीला बरं नसेल व तातडीने उपचारांची गरज असेल तर, तुमचे आप्तजन चुकून फलाटावरच राहिले तर, एखादा चोरीचा प्रसंग घडला किंवा आग लागली तर नक्कीच तुम्ही ह्या चेनचा सदुपयोग करून दुर्घटना टाळू शकता.
५. आर.पी.एफ. यांना कसं कळतं की नक्की कोणी/कुठे चेन खेचली आहे?
आता इतक्या मोठ्या ट्रेन मध्ये एखाद्याने साखळी ओढली तर योग्य ठिकाणी कशी बरं मदत मिळते? त्याचं असं असतं की ज्या डब्ब्यात चेन खेचली जाते तिथे बसवलेले फ्लॅशर सुरू होतात.
इतकंच नव्हे तर लोको पायलटच्या केबिन मधेही लाईट सुरू होतो व बझर वाजू लागतो. आर.पी.एफ त्या डब्ब्यात जाऊन ती चेन reset करेपर्यंत तो लाईट तसाच सुरू राहतो .
ती चेन मॅन्युअली सेट केल्यावर पुन्हा ब्रेक पाईप मधील हवेचा दाब पूर्ववत होतो व ट्रेन सुरू होऊ शकते.
–
- धावती ट्रेन “रूळाचे ट्रॅक” इतक्या सहजतेने कशी बदलते? एक जबरदस्त यंत्रणा!
- रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?
–
६. विनाकारण चेन खेचल्यास काय शिक्षा होते?
कारण नसताना चेन खेचली तर मात्र तुमची काही खैर नाही. काही उपद्रवी महाभाग उगाच अशाप्रकारच्या कृती करतात. त्यांच्या अशा मनोवृत्तीला लगाम लावण्यासाठी नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.
संबंधित आरोपीला रेल्वे कायदा १४१ च्या अंतर्गत रुपये १ हजार इतका दंड आकारला जातो. तसेच १ वर्षाचा कारावासही भोगावा लागतो.
वरीलपैकी एक किंवा दोन्ही शिक्षा ठोठवल्या जाऊ शकतात.
तर मित्रांनो, थोडक्या मस्तीसाठी अशाप्रकारे वर्तन करणं नक्कीच योग्य नाही. रेल्वेतील साखळी ही आपल्या सोयीसाठी देण्यात आली असून प्रशासनाला त्याचा पश्चाताप होईल असं न वागण्याची जबाबदारी आपली आहे.
एक सुजाण नागरिक म्हणून आपलं वागणं हे जबाबदार असलं पाहिजे आणि आपल्यावर येन केन प्रकारेण अशी वेळ आलीच तर ती चेन नक्की कशी काम करते हे आपण जाणतोच त्यामुळे बिनदिक्कत त्याचा वापर तुम्ही करा आणि संकटमुक्त व्हा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.