' अलूरकर केस: १३ वर्षं झाली तरी या गूढ हत्येचं कोडं सुटलेलं नाही… – InMarathi

अलूरकर केस: १३ वर्षं झाली तरी या गूढ हत्येचं कोडं सुटलेलं नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१४ डिसेंबर २००८, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ती शेजारी राहणाऱ्या गृहस्थांना दिसली. पुण्याच्या मध्यवर्ती परिसरात एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये भरदिवसा घडलेली घटना धक्कादायक होतीच मात्र खून झालेल्या व्यक्तीचे नाव कळताच पुणं हादरलं. पत्रकारांनी ‘स्वप्ननगरी’ सोसायटीकडे धाव घेतली, पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. ऐरव्ही लोकांसमोर नव्या जुन्या गाण्यांचा खजिना उलगडणारे, येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासह गाणी गुणगुणणारे, संगीतसृष्टीबाबत अफाट ज्ञान असलेले व्यवसायिक सुरेश अलुरकर त्या दिवशी मात्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते.

 

murder inmarathi

 

सुरुवातीला वाऱ्याच्या वेगात चौकशीची चक्र फिरली. पण तब्बल १३ वर्षांनंतरही अलुरकरांसारख्या प्रसिद्ध व्यक्तीचा मारेकरी आजही मोकाट फिरतोय ही बाब पोलिसांचे अपयश दाखवते की गुन्हेगारी प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप, की आणखी काही?…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कोण होते सुरेश अलूरकर?

”तुम्हाला एखाद्या गाण्याची कॅसेट कुठेही मिळत नाहीये?”, “एखादं गाणं नेमकं कोणत्या कॅसेटमध्ये सापडेल” असा प्रश्न पडलाय?, किंवा एखाद्या गाण्याचा संगीतकार कोण? गायिका कोण? अशा प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर पुणेकरांची हक्काची व्यक्ती म्हणजे सुरेश अलुरकर!

 

suresh inmarathi

 

हल्ली इंटरनेटमुळे कोणतीही माहिती एका क्लिवर मिळते, मात्र ‘गुरु गुगल’ नसताना ही माहिती मिळवण्यासाठी केवळ तज्ञ किंवा जाणकारांवर अवलंबून रहावे लागत होते. अशावेळी शहरातील अनुभवींना पर्याय नसायचा.

सांस्कृतिक नगरी, कलेचे माहेरघर अशा उपाधी लाभलेल्या पुण्यात अलुरकर म्युझिक हाऊस ठाऊक नाही असा संगीतप्रेमी दुर्मिळच! तर अशा म्युझिक हाऊसचा पाया रचणारे सुरेश अलुरकर हे मुळचे पुण्याचेच!

 

alurkar music inmarathi

 

पुण्यातील कसबा पेठेत त्यांचे बालपण गेले. गाण्याचा गळा नव्हता मात्र सशक्त कानांचीच देणगी मिळाली होती. आई-वडिल, चार भावंडं अशा सहाजणांच्या कुटुंबात कमावते दोन हात त्यामुळे संगीताची चैन कधी परवडलीच नाही, तरिही चाळीतील घराघरात रेडिओवर गाणी लागली की त्यांची मान आपोआप त्याकडे वळायची.

शिक्षण पुर्ण होतानाच त्यांनी संगीतक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला, मात्र यावेळी गायक, संगीतकार अशा पठडीतील वाटांपेक्षा त्यांनी म्युझिक हाऊस उभारण्याचे स्वप्न पाहिले. पुण्यात संगीतप्रेमींसाठी एक असे हक्काचे असावे जिथे त्यांना हिंदी मराठीतील प्रत्येक गाणं ऐकता यावं, कोणत्याही गाण्याची कॅसेट विनासायास मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.

सुरुवातीला लहानश्या दुकानात पाहिलेले हे स्वप्न पुण्यातील अग्रगण्य संस्था म्हणून बहरली याचे अनेक पुणेकर साक्षीदार आहेत. केवळ पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक मान्यवर गायक, संगीतकार यांची अलुरकरांकडे ये-जा असायची. एखादी नवी कॅसेट बाजारात आली की तिची पहिली कॉपी अलुरकरांच्या शो केसमध्ये ठेवली जावी हे प्रतिष्ठेची बाब समजली जायची.

 

 

music inmarathi

 

संगीतासह मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असलेल्या कॅसेट्स, कविता, बालगीते, गोष्टी यांचा श्राव्य खजिन्यांची निर्मितीही अलूरकर म्युझिक हाऊसतर्फे करण्यात आली.

काय घडलं त्या दिवशी?

कर्वे रोडवरून जाताना आजही अनेक पुणेकर काहीसे थबकतात, आणि त्या दिवसाची आठवण काढून दुःख व्यक्त करतात.  स्वप्ननगरी या उच्चभ्रु सोसायटीत सुरेश अलूरकर हे एकटेच रहायचे. दिवसभर म्युझिक हाऊसमध्ये रमणारे, पुण्यातील संगीतकार, कलाकार यांच्यासोबत व्यस्त असणारे सुरेश अलूरकर रात्री आपल्या घरी परतायचे. मात्र त्या दिवशी कामानिमित्त ते दिवसभर घरीच होते.

  1. १४ डिसेंबर २००८ चा दिवस. अबोल तरीही मिस्किल स्वभाव असलेले अलूरकर यांचे शेजाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रसिद्धीचे वलय असूनही शेजाऱ्यांशी त्यांचा चांगलाच घरोबा होता. शिवाय ते एकटेच रहात असल्याने शेजारीही त्यांची नित्यनियमाने चौकशी करायचे.

एरव्ही ते घरी असले तरी गप्पा मारायला आवर्जुन येणारे, एकत्र नाष्टासाठी बोलवणारे अलुरकर त्या दिवशी मात्र सकाळपासून न दिसल्याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गृहस्थांनी दुपारी दार ठोठावले. सुरेश अलूरकर हे निश्चित घरी होते याची साक्ष घराखाली उभी असलेली गाडी देत होती, मात्र असे असूनही खूप वेळ ते दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांना काळजी वाटली. अखेरिस त्यांनी सोसायटीतील इतरांची मदत घेत दार उडले आणि भितीने त्यांच्या छातीत धस्स झाले.

हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सुरेश अलूरकर निपचित पडले होते. त्यांच्या गळ्यासह शरिरातील काही भागांवर चाकुने वार केल्याच्या खुणा होत्या. त्यांना पाहताच शेजारच्यांनी धावपळ करत पोलिसांना बोलावले, डॉक्टरांनीही तपासात तब्बल ७-८ तासांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले आणि मग पुणे शहरात एकच हलकल्लोळ माजला.

 

murder inmarathi

 

पाहता पाहता ही बातमी शहरातील अनेक संस्था, कलाकार यांना समजली. सेलिब्रिटी, मिडीया, उद्योजक या सर्वांनीच कर्वेरोडकडे धाव घेतली.

अलूरकर म्युझिक हाऊसचे शेटर त्या दिवशी जे बंद झाले ते पुन्हा कधीही न उघडण्यासाठी…

दुसऱ्या दिवशी कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि पुण्यातील सूर हरपला अशीच हळहळ व्यक्त होत होती. मात्र या सगळ्याच्या मुळाशी प्रश्न होता की फारसं कुणाशी वैर नसताना अलूरकरांच्या जीवावर कोणीउठलं होतं?

जमिनीचा सौदा, वाद आणि बरंच काही

डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आला. सुरुवातीला तपासचक्र वेगाने फिरत होते. पहिला मुद्दा समोर आला तो अलूरकर यांचा जमिनीचा सौदा! मृत्युपुर्वी काही दिवसांआधीच त्यांनी मुळशी येथे जमिनीचा व्यवहार केला होता, त्यानिमित्ताने त्यांनी पुण्यातील एका बड्या प्रस्थाशी व्यवहार केला असून या प्रकरणी काही वादही समोर आले होते, या वादातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र या प्रकरणात अनेक मात्तब्बर व्यक्ती सहभागी असल्याने या विषयाला कधी पुर्णविराम लागला हे अनेकांना कळलंही नाही.

अलूरकर म्युझिक हाऊस

दुसरा मुद्दा समोर आला तो अलूरकर म्युझिक हाऊसची जागा! शहरातील अनेक बड्या व्यक्तींना म्युझिक हाऊसची जागा खरेदी करण्यात रस होता. त्याबाबत अनेकांनी सुरेश यांच्याशी संवादही साधला होता, मात्र याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने अनेकांसाठी सुरेश हे त्यांच्या मार्गातील काटा ठरत होते. मात्र नेमक्या कुणी हे धाडस केले? स्वतःच्या फायद्यासाठी असे टोकाचे पाऊल कुणी उचलले? याचा सुगावा अजूनही लागलेला नाही.

कौटुंबिक वाद?

अलूरकर यांची पत्नी तसेच दोन मुले ही त्यांच्यापासून विभक्त झाली असल्याने तपास यंत्रणेत कौटुंंबिक वाद ही बाबही अधोरेखित झाली. मात्र कालांतराने कौटुंबिक कलहाचा हा प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची बाबही समोर आली. मात्र कुटुंबात असलेल्या वादांमुळे अनेक बिल्डर्स, राजकीय वर्तुळातील व्यक्ती यांनी अलूरकर म्युझिक हाऊस विकत घेण्यासाठी प्रयत्न केले.

सुरेश अलूरकर हे एकटेच रहात असल्याने त्यांच्या पश्चात हा व्यवसाय आपल्याला मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी अनेकांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधल्याच्या चर्चाही होत्या. मात्र इतर कोणाशीही व्यवहार करण्यास तयार नसलेल्या सुरेश यांच्या रागातून ही हत्या झाल्याची बाबही तज्ञांनी व्यक्त केली होती.

या घटनेनंतर काही वर्ष पोलिस तपास करत होते, मात्र पडद्यामागील बड्या सुत्रधारांमुळे केसच्या फाईल्स कधी बंद झाल्या ते कुणालाही कळलं नाही. या फाईल्समध्ये दडलेली गुपितं आजही कुणाला ठाऊक नाहीत.

 

file closed inmarathi

 

अलूरकर यांच्या हत्येला तब्बल १३ वर्ष पुर्ण झाली. त्यानंतर त्यांच्या मुलांनी पोलिसांना सहकार्य करत केसचा निकाल लागावा यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र ना मारेकरी सापडला ना केसचा निकाल लागला. अर्थात या घटनेत यंत्रणा कुचकामी ठरल्या की यंत्रणांना रोखणारे हात अधिक मजबूत होते? याचंही उत्तर घटनेतील गुपितांप्रमाणे बंद फाईल्समध्ये लुप्त झालं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?