' एका बेरोजगार तरुणाच्या मदतीने इंडिया गेटवर होणारा मोठा दहशतवादी हल्ला टळला! – InMarathi

एका बेरोजगार तरुणाच्या मदतीने इंडिया गेटवर होणारा मोठा दहशतवादी हल्ला टळला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात यादवी माजवण्यासाठी, इथली शांतता सुव्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी अनेक बाहेरच्या शक्ती प्रयत्नात असतात आणि त्यांना मदत करण्यासाठी आपल्याच देशातले काही देशद्रोही केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांना सामील असतात.

भारतावर असे अनेक हल्ले पूर्वी झाले आहेत ज्यात हजारो निर्दोष लोकांनी त्यांचे प्राण गमावले. अजूनही रोज आपले गुप्तहेर खाते, आपली सुरक्षा दले देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जीवाचे रान करीत असतात. गर्दीच्या ठिकाणी, पर्यटनस्थळी तर असे हल्ले होण्याचे प्रमाण खूप जास्त असते.

भारतात तर अशी अनेक स्थळे आहेत जिथे भेट देण्यासाठी रोज हजारोंच्या संख्येने लोक येत असतात. राजधानी दिल्लीतील इंडिया गेट हे असेच एक स्थळ आहे जे बघण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात.

 

india gate delhi inmarathi

इंडिया गेट हे केवळ दिल्लीच नाही तर भारताची शान आहे. आश्चर्याची बाब अशी की २००३ पूर्वी याठिकाणी सुरक्षेसाठी अशी कुठलीही व्यवस्था नव्हती. तिथे ना पोलीस असत ना सैनिक! लोक अगदी आरामात इंडिया गेटच्या जवळ जाऊन तिथे फोटो काढू शकत होते, इंडिया गेटला हात लावू शकत होते.

पण २३ फेब्रुवारो २००३ रोजी असे काही घडले की इंडिया गेटवर अचानक कडक सुरक्षा ठेवणे सुरू झाले. पोलीस नाही तर चक्क सैन्यातील जवान तिथे हत्यारे घेऊन तैनात असतात. २४ तास ३६५ दिवस इंडिया गेटवर जवानांचा एक गट तैनात असतो.

सर्वसामान्य नागरिक आता इंडिया गेटच्या अगदी जवळ जाऊ शकत नाही. इंडिया गेटला हात लावणे तर लांबच, तिथे जवळही आता जाण्याची परवानगी नाही. पण असे का झाले?

काश्मीरमध्ये २००२ मध्ये एक अतिरेकी यमसदनी धाडला होता. त्याच्या सामानात एक डायरी सापडली होती. त्या डायरीमध्ये काही नोंदी केलेल्या होत्या. त्याच्या आधारे दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल अनेक दिवस एका ईमेल आयडीचा तपास करत होते.

 

delhi police inmarathi

 

या आयडीवर काही विचित्र मेसेजेस येत होते. आणि त्या आयडीवरून कोड लँग्वेजमध्ये काही मेसेजेस पाठवण्यात येत होते. ती भाषा अगम्य असल्याने त्यात नेमक्या कुठल्या माहितीची देवाणघेवाण सुरु आहे हे कळायला मार्ग नव्हता.

हे ईमेल्स दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील सायबर कॅफेजमधून पाठवले जात होते. त्यामुळे नेमके कोण या सगळ्याच्या मागे आहे हे शोधून काढण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.

तरीही दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल त्या ईमेल आयडीवर करडी नजर ठेवून होते आणि कसून तपास करत होते. स्पेशल सेलचे प्रमुख एसीपी प्रमोद कुशवाहा हे होते.

१३ फेब्रुवारी २००३ रोजी अचानक नेहा नाव असलेल्या एका ईमेल आयडीवर एक ईमेल आला. या ईमेलमुळे दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल अधिक बुचकळ्यात पडले. कारण या मेलमध्ये एका फुटबॉल मॅचबद्दल उल्लेख केला होता.

मेल वाचून दिल्ली पोलिसांना हे लगेच कळले की फुटबॉल म्हणजे कदाचित बॉम्ब असू शकतो आणि मॅच म्हणजे बॉम्ब हल्ला किंवा दहशतवादी हल्ला असू शकतो. पण हा हल्ला कुठे आणि कधी होणार ह्याबद्दल पुसटसाही उल्लेख नव्हता.

terrorists inmarathi

 

त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी परत एका वेगळ्या ईमेल आयडीवरून दुसऱ्या मेल आयडीवर मेसेज पाठवण्यात आला. या मेल मध्ये एक कोड लिहिण्यात आला होता. दिल्ली पोलिसांची टीम आता हा कोड सोडवण्याच्या मागे लागली. एसीपी प्रमोद कुशवाहा संपूर्ण टीमबरोबर दिवस रात्र हे कोडे सोडवण्याच्या मागे लागले. पण तरीही हे कोडे काही सुटत नव्हते.

तो कोड डिकोड करण्यासाठी अनेक क्रिप्टोलॉजिस्टनादेखील बोलावण्यात आले पण तरीही हा कोड डिकोड करणे काही जमत नव्हते. म्हणूनच प्रमोद कुशवाह यांच्यासह त्यांची स्पेशल सेलची टीम प्रचंड तणावाखाली होती. १८ फेब्रुवारी नंतर असे संशयास्पद ईमेल येणे बंद झाले.

१९ फेब्रुवारी रोजी कुशवाहा यांचा एक शालेय मित्र त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या कार्यालयात आला. त्यांचा हा मित्र नोकरीच्या शोधात होता. त्यांना नोकरी नव्हती. त्यांचे नाव विवेक ठाकूर असे होते. त्यावेळी कुशवाहा त्या कोडमुळे तणावात होते त्यामुळे त्यांच्या मित्राच्या ते लगेच लक्षात आले.

विवेक ठाकूर यांनी विचारल्यावर कुशवाहा यांनी त्यांना त्या कोड विषयी सांगितले. आणि हे ही सांगितले की तो कोड डिकोड करण्यात टीमला अडचणी येत आहेत.

 

code inmarathi 2

 

हे सांगितल्यावर विवेक ठाकूर तो कोड सोडवण्याच्या मागे लागले. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि अखेर तो कठीण असा गुप्त कोड सोडवण्यात त्यांना यश मिळाले.

त्या कोडमध्ये इंडिया गेटवर दहशतवादी हल्ला करण्याविषयी सांगितले गेले होते. या हल्ल्याची तारीख २५ नोवेंबर २००३ ही होती. जेव्हा हा कोड सुटला तेव्हा ही माहिती गृह मंत्रालयाला दिली गेली.

२२ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी ह्यांच्या निवासस्थानी एक आपत्कालीन बैठक बोलावली गेली. या बैठकीसाठी देशातील गुप्तहेर संस्थांचे प्रमुख, गृह सचिव आणि दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे संयुक्त पोलीस आयुक्त नीरज कुमार आणि इतर काही महत्वाच्या पदांवरील व्यक्ती उपस्थित होत्या.

 

india gate security inmarathi

 

नीरज कुमार ह्यांनी हे प्रकरण सर्वांना नीट समजावून सांगितले आणि त्या कोडविषयी माहिती दिली. यानंतर सरकारने एक निर्णय घेतला.

२३ फेब्रुवारी २००३ रोजी सकाळी सकाळी इंडिया गेटच्या परिसरात मोठ्या संख्येने सैन्याचे जवान तैनात झाले. सैन्याचे टॅंकदेखील आणले गेले आणि लोकांना इंडिया गेटच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात आली. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. त्यामुळे लोकांना इतक्या मोठ्या संख्येत सैनिक दिसल्यावर आश्चर्य वाटले.

ही घटना नीरज कुमार ह्यांच्या ‘खाकी फाइल्स: इनसाइड स्टोरीज ऑफ पुलिस इन्वेस्टिगेशन’ ह्या पुस्तकात सांगितली आहे. इतक्या मोठ्या संख्येने सैनिक तैनात आहेत हे बघून कदाचित दहशतवाद्यांनी हा हल्ला करण्याचा निर्णय बदलला असावा.

 

khaki files inmarathi

 

असे म्हणतात या हल्ल्याचे सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी होते. लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर जाकीर रहमान लख्वी यानेच पुढे २६/११चा भयंकर मुंबई हल्ला घडवून आणला. त्यामुळेच या कोडला “द लख्वी कोड” असे नाव दिले गेले.

लष्कर-ए-तोयबा इंडिया गेटवर हल्ला करू शकले नाहीत पण अतिरेक्यांनी २००८ साली मात्र डाव साधत २६/११ रोजी मुंबईत भयंकर हल्ले घडवून आणले.

२६/११ आठवले की अंगावर काटा येतो आणि मनात दुःख आणि संतापाची तिडीक जाते. २६/११ रोजी ज्यांनी हल्ल्यात जीव गमावले त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?