' बिकानेरी भुजिया : १५० वर्षांपूर्वी केलेला प्रयोग ते ४ हजार कोटींचा बिझनेस – InMarathi

बिकानेरी भुजिया : १५० वर्षांपूर्वी केलेला प्रयोग ते ४ हजार कोटींचा बिझनेस

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संध्याकाळचा चहा असो किंवा जेवणासोबतचे काही चटपटीत खाणे, बहुतांश भारतीयांना आठवते ती ‘बिकानेरी भुजिया शेव’ तिच्या चटपटीत खुमासदार चवीने सगळ्यांना भुरळ पाडली आहे. ‘अमितजी लव्हज…’ ही जाहिरात तर सगळ्यांनाच माहिती आहे.

अशी तुमची आमची सर्वांची लाडकी बिकानेरी भुजिया शेव नक्की कधी आणि कशी जन्माला आली असेल बरे? कधीतरी हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल, हो ना?

तुम्हालाही या भुजिया शेवेच्या जन्माची कथा माहीत करून घ्यायला नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया या चटपटीत, खुमासदार शेवेची जन्मकथा या लेखामधून!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राजस्थान म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहते दूरवर पसरलेले वाळवंट, गुलाबी घरे, नक्षीदार आणि मोठाल्या पगड्या बांधलेले लोक आणि घागरे घालून नृत्य करणार्‍या स्त्रिया, पण या रंगेबिरंगी राजस्थानची आणखी एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे तेथील खाद्य संस्कृती.

भारतात पश्चिमेला असलेले राजस्थान आपल्या शाही संस्कृती आणि अनोख्या पाककृतीसाठी ओळखले जाते. एकदम तिखट नाहीतर एकदम गोड पदार्थांची रेलचेल असणार्‍या राजस्थानी थाळीत एक पदार्थ मात्र वेगळ्या वैशिष्ट्याने आपली आब राखून आहे. तर तो खास पदार्थ आहे ‘बिकानेरी भुजिया शेव.’

 

bikaneri shev inmarathi

 

ही भुजिया शेव जिथे बनवली जाते त्या बिकानेरची स्थापना १५ व्या शतकात ‘राव बिका’ यांनी केली होती. इतिहासात नोंदवलेले हे छोटे शहर आज राजस्थानचे चौथे मोठे शहर आहे आणि इथल्या खास बनवलेल्या ‘भुजिया’ प्रसिद्ध आहेत.

या शहरात अनेक प्रकारचे स्नॅक्स तयार केले जातात आणि केवळ देशातच नाही तर जगभरात पाठवले जातात. जयपूर, दिल्ली, मद्रास, कोलकाता यासह अनेक राज्यांमध्ये बिकानेरी भुजिया आणि नमकीन बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, मात्र व्यापाऱ्यांना बिकानेरीची चव आणता आली नाही.

काही व्यापरांनी सांगितले, की बिकानेरमधील पाणीच बिकानेरी भुजियाला सर्वात वेगळी आणि स्वादिष्ट बनवते. नागपूर, कोलकाता, मद्रास, दिल्ली इत्यादी मोठ्या शहरात भुजियाचा व्यवसाय करणारे बिकानेरचे व्यापारी तिथेही भुजिया बनवतात, पण त्यांनाही बिकानेरची चव आणता येत नाही.

बिकानेरमध्ये भुजियाची सुमारे २५० युनिट्स आहेत, जिथे दररोज २००टन भुजिया बनवला जातो. या उद्योगातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाच लाख लोकांना रोजगार मिळत आहे. असेही म्हटले जाते की बिकानेरची अर्धी जनता भुजिया सेव बनवते आणि अर्धी ती खाण्यात गुंतलेली असते.

 

bikaner bhujia inmarathi3

 

या बिकानेरी भुजियाचा इतिहास जवळपास १४४ वर्षांचा जुना इतिहास आहे. असे म्हणतात, की भुजियाची संकल्पना ही आग्रा येथून राजस्थानमध्ये आली. तिथे ‘डालमोठ’ या पदार्थांचा मोठा ट्रेंड होता. बीकानेरी भुजिया मध्ये बेसन पीठामध्ये स्थानिक पाण्यावर घेतलेल्या मसूरचा वापर केला जातो.

स्थानिक मसुराचे पीठ हा भुजिया मधील महत्वाचा घटक आहे. नमकीन म्हणजे बिकानेरी भुजिया शेव हे समीकरण जगभर प्रसिद्ध होत आहे. बिकानेरी भुजिया बनवण्याच्या लघुउद्योगात लाखो लोक गुंतलेले असून राजाच्या स्वयंपाकघरात बनलेले हे पदार्थ लाखो लोकांच्या घरात दोन वेळच्या भाकरीचे साधन बनले आहे.

राजाच्या स्वयंपाकघरातून बाहेर आल्यानंतर बिकानेरी भुजिया जगामध्ये इतका लोकप्रिय झाला की सप्टेंबर २०१० मध्ये त्याला GI (जिऑग्राफिकल इंडिकेशन) टॅग देण्यात आला.

 

bikaner bhujia inmarathi2

 

सन १८७७ च्या दरम्यान बिकानेरचे महाराज श्री डुंगरसिंग यांच्या राजवटीत पहिल्यांदाच बिकानेरी भुजिया शेव बनवण्यात आली होती. एकट्या बिकानेरमधून दरवर्षी चार हजार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होते.

विशेष म्हणजे बिकानेरी भुजियाच्या रेसिपीचे ‘रहस्य’ इतकेच आहे, की ते बिकानेरच्या वातावरणात बनवावे लागते. येथील पाणी आणि कोरडे हवामान भुजियाला वेगळीच चव देते.

राजस्थानातील मारवाड प्रांतात नमकीन खाण्याचा छंद नेहमीच आहे. हे नमकीन बनवताना बिकानेरच्या काही कारागिरांनी बेसनामध्ये विविध मसाले मिसळून भुजिया बनवला. प्रयोग म्हणून हा भुजिया प्रथम परकोटे येथील नमकीनच्या दुकानात तयार करण्यात आला. यानंतर कारागिरांनी विविध प्रकारचे मसाले वापरुन भुजिया बनवण्यास सुरवात केली.

या भुजिया व्यवसायाचे प्रवर्तक ज्यांना म्हणता येईल असे ‘ हल्दिराम अग्रवाल’ यांनी ‘ बिकानेरी भुजिया शेवेची’ ओळख खवय्यांना करून दिली. भुजिया शेव विक्रीचे पहिले व्यावसायिक दुकान त्यांनीच सुरू केले. आणि देशभर भुजिया शेवेची चव पोहोचवली.

 

bikaner bhujia inmarathi

 

त्यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी देखील याच व्यवसायात राहिली आणि भुजिया शेव सातासमुद्रापार पोचवण्याची कामगिरी या पिढीने केली. हल्दिराम यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र मुलचंद आणि त्यानंतर त्यांची मुले शिवकृष्ण, मनोहरलाल आणि मधु अग्रवाल यांनी ‘हल्दिराम’ या नावाने भुजियाचा ब्रॅंड स्थापन केला, तर त्यांचा चौथा मुलगा शिवरतन अग्रवाल यांनी ‘बिकाजी’ नावांनी बिकानेर मधून नवीन नवीन ब्रॅंड सुरू केला.

अधिक मागणीमुळे जरी आता भुजिया यंत्राच्या सहाय्याने बनवल्या जात असल्या तरी बिकानेर मधील अनेक कारागीर आजही पारंपरिक पद्धतीनेच भुजिया बनवतात. मोठा जाळ असलेल्या भट्टीवर तेल भरलेली मोठी कढई ठेवली जाते, ते तेल उकळायला लागले की त्यावर एक मोठा झारा ठेवला जातो त्या झार्‍यावर बेसनाचे मिश्रण मसल्यात मिसळून झार्‍यावर ओतले जाते आणि हातांनी घासून त्याची शेव बनवून ती सोनेरी रंगावर तळली जाते.

उकळत्या तेलाजवळ असे काम करण्यासठी निश्चितच कौशल्य हवे, जे या कारागिराना परंपरेने मिळालेले आहे आणि म्हणूनच आपण इतकी चटकदार , खुमासदार, चटपटीत भुजिया शेव खाऊ शकतो.

 

bikaner bhujia inmarathi1

 

भुजिया कारागीर खुमाराम गोदरा सांगतात, की त्यांचे आजोबा आणि नंतर त्यांचे वडीलही तीन पिढ्यांपासून भुजिया बनवायचे. गेली शंभर वर्षे भुजिया बनवण्याचे काम त्यांचे कुटुंब करत आहे. एकेकाळी महिन्याची कमाई दोन-तीनशे रुपये होती, पण आज एका दिवसाची मजुरी पंधराशे ते दोन हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

बिकानेरमधील शेकडो कुटुंबांना केवळ भुजिया बनवून रोजगार मिळत आहे. भुजियाच नाही तर बिकानेरी पापड आणि बडीचा व्यवसायही सातत्याने वाढत आहे. येथील कारागिरांना आता बिकानेरच्या बाहेरही काम मिळू लागले आहे. आजमितीला मुंबई, दिल्ली, बेंगलोर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या कारागिराना मोठी मागणी आहे.

अमेरिका, जर्मनी, फ्रांस, नेपाळ, न्यूझीलंड, रशिया, ओस्ट्रेलिया अशा मोठमोठ्या देशांबरोबरच अनेक आखाती देशांमध्ये स्नैक्स म्हणून भुजिया शेव ‘हॉट फेव्हरेट’ आहे.

आपले माजी राष्ट्रपती मा. भैरवसिंग शेखावत यांनाही या भुजिया प्रचंड आवडत असत. जेव्हा जेव्हा कोणी राजस्थानी मंत्री त्यांना भेटायला जात असत त्यावेळी ते खासकरून त्यांना भुजिया आणायला सांगत.

अशी होती ‘भुजियाशेवे’ ची जन्मकथा. आता जेव्हा कधी तुम्ही भुजिया शेव खाल तेव्हा तिची चव तुम्हाला अजूनच चटपटीत आणि खुमासदार लागेल हे नक्की!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?