' बायकोने घेतला माहेरी जाण्याचा निर्णय आणि जन्म झाला पहिल्या ‘स्वयंचलित वाहनाचा’ – InMarathi

बायकोने घेतला माहेरी जाण्याचा निर्णय आणि जन्म झाला पहिल्या ‘स्वयंचलित वाहनाचा’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बायकांचं गाडी चालविणं हा विनोदाचा आवडता विषय आहे. मात्र मुळात आधुनिक गाडी चालविणारी किंबहुना जगाला आधुनिक स्वयंचलित गाडी रस्त्यावरून चालवून दाखविणारी एक स्त्रीच होती हे कितीजणांना माहित आहे?

नवर्‍याने लग्नात मिळालेल्या हुंड्यातून जगातल्या पहिल्या स्वयंचलित वाहनाची निर्मिती केली, मात्र ही गाडी गॅरेजमधेच पडून होती. बायकोने नवरा घरी नाही बघून ही गाडी बाहेर काढली आणि आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन माहेरचा रस्ता धरला.

अशा रीतीने बायकोचं माहेरी जाणं रस्त्यावर स्वयंचलित गाडी धावण्याला कारण बनलं आणि स्वयंचलित कारची जगातली पहिली ड्रायव्हर एक महिला बनली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बायकांच्या कार चालविण्यावर, नवऱ्यावर रुसून माहेरी जाण्यावर हौसेनं विनोद केले जातात, मात्र अशाच एका रुसव्यानं जर्मनीला जगाच्या पाठीवर वाहनांची राजधानी असा लौकीक मिळाला.

कार्ल बेंझ आणि बर्था बेंझ या दांपत्यामुळे आज रस्त्यांवर स्वयंचलित गाड्या धडाधड चालतात. २९ जानेवारी १८८६ हा दिवस महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी जगातल्या पहिल्या स्वयंचलित गाडीचं पेटंट उद्योजक-अभियंता कार्ल बेंझ यांना देण्यात आलं.

 

bertha benz inmarathi

 

तोवर जगभरात प्रवासासाठी घोडागाडी, बैलगाडी किंवा टांगा यांचाच वापर केला जात असे. याचाच अर्थ गाडी चालण्यासाठी एखाद्या प्राण्याला जुंपलं जात असे. व्यवसायानं अभियंता असणार्‍या कार्ल यांनी प्राणी विरहीत “स्वयंचलित” गाडीची निर्मिती केली आणि एकप्रकारे क्रांती घडविली.

कार्ल यांनी बनविलेलं हे स्वयंचलित वाहन दिसायला अगदी टांग्यासारखं होतं मात्र ते घोड्याच्या मदतीनं चालत नव्हतं तर चुकचुक आवाज करणारं, धूर सोडणारं दोन हॉर्सपॉवरचं इंजिन त्याला जोडण्यात आलं होतं आणि त्याच्या मदतीनं ही गाडी पळत असे.

कार्ल यांनी लग्नातल्या हुंड्यात मिळालेली सर्व रक्कम या गाडीवर खर्च केलेली होती. कार्ल रात्रंदिवस या गाडीवर काम करत होते. पेटंट मिळालं असलं तरीही त्यांच्यामते अद्याप ही गाडी रस्त्यावर धावण्यायोग्य नाही.

त्याकाळातले रस्तेही घोडा/बैल गाड्यांना धावण्यायोग्य म्हणजे मातीचे असत. या स्वयंचलित गाडीसाठी हे रस्ते सुरक्षित नाहीत असं कार्ल यांचं मत होतं आणि या कारणामुळेच बनवून तयार गाडी घरातच गॅरेजमधे लावून टाकली होती.

कार्ल यांची पत्नी बर्थाची मात्र यामुळे चिडचिड, त्रागा होत असे. एकतर हुंड्यात आलेली सर्व रक्कम ही गाडी बनविण्यात खर्च झालेली होती आणि आता हे धुड गॅरेजमधे सुस्त होऊन पडलेलं पाहून तिला राग यायचा. अशाच परिस्थितीत तब्बल दोन वर्षं सरली. गाडी काही रस्त्यावर जाण्याचं नाव निघत नव्हतं.

 

bertha benz inmarathi1

 

एक दिवस कार्ल कामानिमित्त बाहेरगावी गेला असता बर्थानं जरा गुश्श्यातच ही गाडी गॅरेजबाहेर काढली. रस्त्यावर धावण्यास सुरक्षित नाही हे नवर्‍याचं मत खोडून काढत ही गाडी रस्त्यावरही धावू शकते हे सिध्द करण्यासाठी तिनं गाडी गॅरेजबाहेर काढली आणि मुलांना सोबत घेऊन सरळ माहेरचा रस्ता धरला.

आता शंभर दिडशे वर्षांपूर्वीची विवाहित स्त्री नवर्‍याचं घर सोडून जायचं तर जाणार तरी कुठे? माहेरीच नां? तस बर्थानं माहेरच्या वाटेवर ही चुकचुक आवाज करत चालणारी गाडी दामटली.

हे करण्यामागे तिचा विचार असा होता की एकटी महिला अनेक शहरांचा प्रवास करून जर या गाडीतून जात असेल तर या गाडीच्या सुरक्षिततेची लोकांना खात्री पटेल आणि लोक गाडी विकत घेतील जेणेकरून हुंड्याची गुंतवलेली रक्कम परत मिळेल आणि पतीचं बस्तानही बसेल.

ती रहात असणार्‍या मॅन्हमपासून फ़ॉर्झएमपर्यंत जाऊन परत यायचं आणि १९४ किमी इतका प्रवास करायचा असं तिनं ठरविलं.

हा प्रवास खडतर असणार आहे याची तिला पूर्ण जाणीव होती कारण एकतर रस्ते खराब होते, आतासारखे रस्ते दाखविणारे ना गुगल मॅप होते, ना दिशादर्शक फ़लक. शिवाय वाटेत नद्या नालेही लागत होते. त्यात ती जी गाडी चालवत होती ती देखील अगदी बेसिक म्हणावी अशीच होती.

 

bertha benz inmarathi2

 

लाकडी फ्रेम, बसायला टांग्यात असतो तोच एक आसनी बाक आणि टांग्याला असतात तशीच चाकं. या टांग्यामागे इंजिन बसविलेलं होतं ज्याला सुरू करायला किल्ली नव्हती, तर चाक फ़िरवून ही गाडी चालू करावी लागत असे.

ती गाडीत बसली आणि तिच्या मुलांनी चाक फिरवून जगातल्या पहिल्या स्वयंचलित गाडीच्या प्रवासाला सुरवात झाली. या गाडीला शॉक अप नसल्याने यात बसल्यावर रस्त्यावरच्या खाचखळग्यातून जाताना हाडं खिळखिळी होत असत. सिटबेल्ट नसल्याने मधेच गाडीतून खाली पडण्याचा धोकाही होताच.

या प्रवासादरम्यान अनेकदा गाडी बंद पडली, काही किरकोळ बिघाडही झाले मात्र बर्थानं ते जुगाड करत दुरुस्तही केले पण प्रवास चालूच ठेवला. अशारीतीने बर्था ही जगातली पहिली ड्रायव्हरच बनली असं नाही, तर पहिली गाडी दुरुस्त करणारी मेकॅनिकही बनली.

 

bertha benz inmarathi feature

 

बर्थाचा हा प्रवास अनेकांना थक्क करून सोडत असे. लोकांनी कल्पनाही न केलेली आपोआप चालणारी एक गाडी घेऊन एक महिला जेव्हा गावात आगमन करत असे, तेव्हा काहीजण थक्क होऊन बघतच बसत, तर काही चेटकीण आली म्हणून घाबरून धावत सुटत असत.दरमजल करत बर्था माहेरी पोहोचली आणि काही दिवस विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला लागली.

इकडे कार्ल घरी परतले आणि त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांचा कानांवर विश्वास बसत नव्हता, मात्र हे सत्य होतं की त्यांची पत्नी मुलांना घेऊन, त्यांनी बनविलेल्या गाडीतून तब्बल १९५ किमी प्रवास करून आली होती.

कार्ल यांच्या या शोधाची सर्वत्र चर्चा चालू होती. जगातली पहिली स्वयंचलित गाडी बनविण्याचा मान जरी कार्ल यांना मिळत असला, तरीही बर्था यांचं योगदानही नि:संशयपणे तितकंच मोलाचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?