' “सामान्य माणसाला परवडेल” अशी कार बनवणारा मराठी माणूस यशस्वी होऊ शकला नाही… – InMarathi

“सामान्य माणसाला परवडेल” अशी कार बनवणारा मराठी माणूस यशस्वी होऊ शकला नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कार विकत घेणं ही प्रत्येक व्यक्तीचं, कुटुंबाचं स्वप्न असतं. काही लोकांना हे साध्य करणं कमी वयात शक्य होतं, तर काही लोकांना कारच्या सतत वाढणाऱ्या किमती, पेट्रोलच्या खर्चाचा अंदाज घेऊन कार विकत घेण्यास जास्त वर्ष लागतात.

‘सर्वांना विकत घेण्याजोगी, परवडणारी कार’ म्हटलं की आपल्या समोर श्री. रतन टाटा यांनी उपलब्ध करून दिलेल्या ‘नॅनो’ चा पर्याय समोर येतो. ‘१ लाख रुपयात कार’ हे स्वप्न रतन टाटा यांनी बघितलं आणि आपल्या जिद्दीवर त्यांनी नॅनो कार बाजारात आणली आणि इतके वर्ष त्याचं उत्पादन सुरू ठेवलं.

 

nano inmarathi

 

‘मध्यमवर्गीय लोकांसाठी कार’ हे स्वप्न बघणारे रतन टाटा हे पहिले व्यक्ती नव्हते, त्यांच्या आधी १९७५ मध्ये ‘पंडित कुलकर्णी’ या मराठी माणसाने ‘१२,००० रुपयात कार’ हे स्वप्न उघड्या डोळ्याने बघितलं होतं आणि त्यावर काम देखील केलं होतं हे आपल्याला कदाचित माहीत नसेल.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सन्मानाने ‘पंडित काका’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या इंजिनियर बद्दल आज जाणून घेऊयात.

पंडित कुलकर्णी यांनी १९४९ मध्ये आपला मोठा भाऊ शंकरराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने या स्वप्नपूर्तीच्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रकल्पावर काम करून पंडित कुलकर्णी यांनी ५ प्रकारचे कार मॉडेल तयार केले होते.

१९७० मध्ये तयार केलेल्या पहिल्या ‘दोन आसनी कार’ मॉडेलला पंडित काका यांनी ‘मीरा’ हे नाव दिलं होतं. त्यावेळच्या ‘रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस (आरटीओ)’ ने या कारला मान्यता सुद्धा दिली होती. आजच्या नॅनो पेक्षाही छोट्या असलेल्या या कारला पासिंग नंतर ‘एमएचक्यू १९०६’ हा क्रमांक देण्यात आला होता.

 

pandit kaka inmarathi1

 

पंडित कुलकर्णी यांनी तयार केलेल्या कार पैकी शेवटच्या कारमध्ये आजच्या कार सारखे त्या काळानुसार बरेच ‘फिचर्स’ सुद्धा देण्यात आले होते. या कारला ‘एमएचई १९२’ हा क्रमांक देण्यात आला होता.

शंकरराव कुलकर्णी हे केवळ ७ वी इयत्तेपर्यंत शिकले होते, पण त्यांचं ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्ञान हे कोणत्याही इंजिनियर पेक्षा कमी नव्हतं. ‘एक व्हायपर’, ‘रिअर इंजिन’ आणि ‘२० किलोमीटर प्रति लिटर मायलेज’ या सर्व बाबींचा समावेश त्यावेळच्या ‘मीरा’ कारमध्ये सुद्धा करण्यात आला होता.

आज पंडित काका कुलकर्णी यांचे नातू हेमंत कुलकर्णी हे सुद्धा ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसायिक म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “‘मीरा’ ही कार तेव्हाच सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचली असती, पण त्यावेळच्या सरकारने तशी व्यवसायिक परवानगी आम्हाला मिळूच दिली नाही. माझ्या आजोबांनी (शंकरराव कुलकर्णी) यांनी ही कार ‘गेटवे ऑफ इंडिया’ इथे प्रदर्शनासाठी ठेवली होती. ‘मीरा’ ही कार त्यांनी पूर्ण मुंबई शहरात चालवली होती, खंडाळा घाटात सुद्धा या कारची चाचणी झाली होती.”

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जयसिंगपूर’ येथे मीरा कार उत्पादन करण्याचा पंडित कुलकर्णी आणि कुटुंबाचा विचार होता, पण तत्कालीन भारत सरकारने ही परवानगी नाकारली. शिवाय, कुलकर्णी यांना अतिरिक्त ‘एक्ससाईज ड्युटी’ भरण्याचे आदेश काढण्यात आले.

कुलकर्णी कुटुंबियाने ‘मीरा’ कारच्या संशोधनावर ५० लाख रुपये खर्च केले होते. त्यावेळेस अजून कोणताही अतिरिक्त खर्च करणं त्यांना शक्य नव्हतं.

 

pandit kaka inmarathi3

 

काही काळ हा संघर्ष असाच सुरू होता, पण एका ठराविक वेळेनंतर हा संघर्ष सुरू ठेवणं ‘पंडित काका’ यांना शक्य होत नव्हतं. ‘मीरा’ कारचा प्रवास हा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तिथेच संपला.

१९७० च्या दशकातील शंकरराव कुलकर्णी, शंतनूराव किर्लोस्कर आणि मोहन धारिया यांचे ‘मीरा’ कार मध्ये प्रवास करतांनाचे फोटो त्यांच्या नातवांनी आजही जतन करून ठेवले आहेत.

‘बेळगाव अभियांत्रिकी’ प्रदर्शनात सुद्धा ‘मीरा’ कारला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, पण सरकारी परवानगी नसल्याने तिथे आलेल्या नागरिकांना ‘मीरा’ला केवळ प्रदर्शनातच बघावं लागलं.

 

pandit kaka inmarathi2

 

२००८ मध्ये जेव्हा ‘टाटा नॅनो’ ही ‘मीरा’ सारखीच कार बाजारात येण्याची बातमी कुलकर्णी परिवाराला कळली तेव्हा त्यांना आपल्या वडिलांचं स्वप्न श्री. रतन टाटा पूर्ण करत आहेत याचं खूप समाधान वाटलं होतं.

६ जुलै २०२० रोजी ‘पंडित काका’ यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी कोल्हापूर येथे आपल्या राहत्या घरी निधन झालं.

पंडित कुलकर्णी हे पुण्यातील फ्युएल इन्स्ट्रुमेंट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (एफआयई) या २५ कंपन्यांचा समावेश असलेल्या उद्योग समूहाचे अध्यक्ष होते.

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राला लागणाऱ्या विविध उपकरणं तयार करण्याच्या कामात एफआयई या संस्थेने नेहमीच मोलाचं योगदान दिलं आहे.

 

pandit kaka inmarathi feature

 

जपानी कंपनी ‘केहीन’ सोबत एकत्र येऊन ‘केहीन-एफआयई’ ही वाहनाच्या कमीत कमी इंधन वापरावर संशोधन करणारी कंपनी१९५३ मध्ये पंडित कुलकर्णी यांनी तळेगाव येथे स्थापन केली आहे.

उद्योजक म्हणून काम बघत असतांनाच सामाजिक योगदान देण्यासाठी पंडित काका यांनी इचलकरंजी शहराचे महापौर म्हणून सुद्धा काम बघितलं होतं.

औद्योगिक क्षेत्रातील योगदानासाठी पंडित काका यांना प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘फाई फाउंडेशन’ च्या ‘राष्ट्रभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

सामान्य माणसाला परवडेल अशी कार तयार करण्याचं स्वप्न हे सर्वप्रथम एका मराठी माणसाने बघितलं होतं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?