फोन धरताना करंगळीचा वापर करताय? याचा मनगटाला धोका तर नाही ना…?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘स्मार्टफोन ही आता गरज राहिली नसून, व्यसन झालं आहे’ हा संवाद म्हणजे काही आता फक्त पालकांचं पेटंट राहिलेलं नाही. हल्लीच्या काळात तरुण वयातील नातवंडं आजी-आजोबांना, मुलं पालकांना ही ओळ ऐकवताना पाहायला मिळतात. नुकत्याच रांगायला लागलेल्या लहानग्यापासून ते नव्वदीत असलेल्या जख्खड म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळेच अबालवृद्ध आता स्मार्टफोनचा वापर करताना दिसतात.
पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींना तुम्ही मोबाईल वापरताना पाहिलं असेल, तर त्यांची मोबाईल हातात धरण्याची पद्धत काहीशी वेगळी असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. एका हातात मोबाईल धरून दुसऱ्या हाताच्या तर्जनीने मोबाईलवर हवं तिथे टच करायचं, ही या मंडळींची मोबाईल वापरण्याची पद्धत!
तरुण मंडळी मात्र दोन्ही हातात मोबाईल धरतात आणि दोन्ही हातांचे अंगठे वापरून टायपिंग करत असतात. यामुळे अंगठ्यांचं आरोग्य धोक्यात येत असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं, ऐकलं किंवा वाचलं असेल.
आज मात्र आपण एका वेगळ्याच बोटाबद्दल बोलणार आहोत, ते बोट म्हणजे करंगळी! एका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे मोबाईलचं करंगवळीवर येणारं वजन, दुमडून ठेवली जाणारी करंगळी या सगळ्यामुळे करंगळीला धोका निर्माण होऊ शकतो का, याचा कधी विचार केला आहात का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
—
करंगळीवरील वजनाचा मनगटावर परिणाम?
करंगळीचा आधार देऊन मोबाईल धरत असाल, तर मोबाईलच्या वजनाचा करंगळीवर ताण येतो आणि परिणामी मनगटाला त्रास होण्याची शक्यता असते, असा दावा अनेकदा करण्यात येतो. मोबाईल अशा पद्धतीने धरला म्हणून करंगळीच्या आकार बदलला असल्याचं, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी म्हटलं आहे. यात खरंच तथ्य आहे का? हेच आज समजून घ्यायचं आहे.
मोबाईलचं वजन करंगळवीवर पडण्याचा वाईट परिणाम होत नाही. किंवा कुठलाही वैद्यकीय पुरावा असं काहीही सिद्ध करत नाही. सहसा अशा प्रकारच्या नव्या आजारांना वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळी नावं दिली जातात. मात्र, अशा कुठल्याही प्रकारचा आजार किंवा त्रास वैद्यकीय क्षेत्रात नोंदवला गेलेला नाही. म्हणजेच, केवळ मोबाईलचं वजन करंगळीवर असणं ‘फारसं’ धोकादायक ठरत नाही.
मग नेमका धोका कशामुळे?
‘अति तिथे माती’ किंवा ‘कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट’ ही वाक्यं सुद्धा तुम्ही अनेकदा ऐकलं असतील. करंगळीच्या या विषयात सुद्धा असंच काहीसं आहे असं म्हणूयात. अशा पद्धतीने मोबाईल धरून त्याचा अतिवापर करणार असाल, तर मात्र तुम्ही आरोग्याचा धोका पत्करताय यात तथ्य आहे!
स्नायूवर सतत येणारा ताण म्हणजेच, repetitive strain injury (RSI) चा धोका सततच्या मोबाईलवापरामुळे संभवतो. सतत करंगळी आणि पर्यायाने हातांच्या स्नायूंवर येणारा ताण हा हाताच्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे, यात काहीच शंका नाही.
काही संशोधनांमधून असंही समोर आलं आहे, की अंगठे आणि करंगळी यांच्यावर एकत्रितपणे तणाव आल्यामुळे मोबाईल वापराचा धोका संभवतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर…
करंगळीने मोबाईलला आधार देणं हे फार धोक्याचं नसलं, मनगटावर त्याचा थेट वाईट परिणाम होत नसला, तरी त्यामुळे हाताचे आरोग्य धोक्यात येणारच नाही, असं गृहीत धरणं बरोबर ठरणार नाही. यासाठी योग्य ती काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. मोबाईल वापराचा कुठल्याही प्रकारे ताण येणार नाही, यासाठी प्रयत्न करावे लागणार.
काय काळजी घ्याल?
बोटांना त्रास होतोय असं वाटत असेल, तर हातांचे हलके व्यायाम करणं कधीही फायदेशीर असतं. एक अगदी सोपा व्यायाम तुम्हाला कुठेही आणि कधीही करता येऊ शकतो. सतत मोबाईलच्या वापराने बोटांना त्रास होत असेल, तर हा व्यायाम नाकी करून पहा.
हात मोकळे ठेऊन आधी थोडे सैल सोडा, मग हाताच्या मुठी घट्ट मिटून घ्या. काही क्षण या स्थितीत हात ठेवल्यानंतर, अगदी अलगदपणे मुठी उघडून बोटं शक्य तेवढी अधिक स्ट्रेच करा. यामुळे बोटांच्या स्नायूंवर योग्य ताण पडेल आणि त्यांची ताकद वाढेल. स्नायू आखडणार नाहीत आणि अधिक मजबूत होतील.
याहूनही उत्तम आणि खात्रीशीर उपाय म्हणजे तुमच्या हातांना आराम द्या. सतत हातात मोबाईल असेल, तर बोटांवर ताण येईल हे साहजिक आहे. त्यामुळे काही काळ का होईना, पण मोबाईल वापरापासून हातांना आराम द्या.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.