“संघ हरायला लागल्यावरच ‘अशा’ उलटसुलट चर्चा का रंगतात?” एका चाहत्याचा सवाल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – ईशान पांडुरंग घमंडे
===
भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा पराभव झाला त्या क्षणापासून किंवा खरं तर ईशान किशन आणि के.एल.राहुल सलामीला आला तेव्हापासूनच भारतीय क्रिकेट विश्वात (विशेषतः घरी एसीत बसून सामने बघणाऱ्या चाहत्यांकडून) उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.
विराटच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं ते गेल्या अनेक दिवसांपासून, पण यावेळी मात्र नव्याच चर्चा सुरु झाल्या. भारतीय संघात दुफळी आहे म्हणे. रोहित आणि विराट यांच्यात मतभेद आहेत. त्यांचं एकमेकांशी पटत नाही.
अहो, एक आळशी आणि फिटनेसकडे काहीसं दुर्लक्ष करणारा, एक अगदीच फिटनेस फ्रिक! एक तसा शांत आणि एक अगदीच आक्रमक वृत्तीचा… मग या दोघांमध्ये मतभेद असणारच ना…
या मतभेदाची चर्चा भारतीय संघाचा पराभव होऊ लागला आणि कामगिरी खालावली की मगच का व्हायला लागते बरं?
मतभद असतील सुद्धा संघातल्या खेळाडूंमध्ये, वादविवाद सुद्धा असतील कदाचित, पण हेच सगळं बाजूला सारून मैदानावर एकीचं बळ दाखवत जेव्हा भारतीय संघ दर्जेदार कामगिरी करतो, त्यावेळी आठवत नाहीत का हे मतभेद?
सराव सामन्यात रोहित कर्णधार असताना, विराट आज खेळणार नाही असं म्हणाला आणि मग विराट कसा मैदानावर उतरला, रोहितचा फलंदाजीचा क्रम बदलला त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवलं. यावर चर्चा होतेय. म्हणजे यांच्यात विस्तव जात नाही, असा निष्कर्ष.. विराटचा हा निर्णय चुकलाच, त्यात शंकाच नाही. पण विराटने रोहितचा फलंदाजी क्रम बदलला तसाच स्वतःचाही बदलला की… मग दुफळी आहे, यावर चर्चा कशाला हवी…
निर्णय चुकतात, चुकू शकतात. पण म्हणून ‘विराट हा भारताचा सगळ्यात मूर्ख कर्णधार आहे’, ‘असा फालतू कर्णधार नकोच होता’ अशी वाक्यं सुरु व्हावीत थेट? विराटने वर्ल्डकप आधीच कर्णधारपद सोडायला हवं होतं, त्याच्या कर्णधारपदाची कालावधी संपावा याची सगळे खेळाडू वाट बघतायत, अशा चर्चा ड्रेसिंग रूमबाहेर सुरु आहेत.
थोडक्यात संघातले लोक काहीच म्हणत नाहीयेत, जे काही म्हटलं जातंय ते बाहेरच्या लोकांकडूनच… म्हणजे नुसत्याच हवेतल्या बाता!
–
- “प्रेक्षक ८ तास बसू शकत नाहीत, आपण असं करूया…” टी-२० क्रिकेटची जन्मकथा…
- भारतीय संघाच्या पराभवाची कारणं आजची नाहीत; ‘त्याच’ दिवशी याची सुरुवात झाली…
–
रवी शास्त्री सुद्धा होतोय ट्रोल…
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचा अनुक्रमे परीक्षक म्हणून आणि कर्णधार म्हणून कार्यकाल संपत आहे. मग ‘नोटीस पिरियडवर कोण काम करतं?’ असं म्हणत रवी शास्त्रीला ट्रोल केलं जातंय. विचित्र नजरा, विचित्र हावभाव असणारे रवी शास्त्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालतायत…
या अशा पद्धतीचा रवी शास्त्री याआधी आपण पाहिला नाहीये का? पाहिलाय की, पण मग आज संघ सुमार दर्जाचा खेळ करत असतानाच यावरून टीका सुरु आहेत. याचंही कारण शोधायचं झालं तर ते उमजत नाही.
धोनी मेंटॉर झाला म्हणून…
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी म्हणजे भारतीय क्रिकेट विश्वातलं मोठं नाव… आज भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून तो वर्ल्डकपच्या कंपूसोबत आहे. रिषभ पंत, ईशान किशन या यष्टीरक्षक फलंदाजांना टिप्स देतोय, स्वतःच्या अनुभवाची पोतडी बाहेर काढून संघातील प्रत्येकालाच वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतोय.
असं असतानाही संघाच्या पराभवाचं खापर फोडताना माहीला सुद्धा टार्गेट केलं जातंय. मेंटॉर किंवा मार्गदर्शक हा फक्त आणि फक्त दिशा दाखवू शकतो, मैदानावर खेळताना चांगली कामगिरी खेळाडूंनाच करावी लागते. बरं हाच संघ धोनी नसताना चांगली कामगिरी करत होता, धोनीच्या येण्याने अधिक ऊर्जा मिळणार हे नक्की… मग त्याच्यावर टीका कशाला?
यालाही आता संघातील दुफळी या मुद्द्याशी जोडायला कमी करणार नाहीत ही मंडळी… कारण भारतीय संघ हरला, की ‘सो कॉल्ड फॅन्स’च्या चर्चा सुरु होतात…
मोहम्मद शमीवर टीकेची झोड
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुमार गोलंदाजी केल्यानंतर शमीवर चहूबाजूंनी हल्ला झाला. त्याची गोलंदाजी चांगली होत नाही म्हणून त्याला संघातून वगळावं अशी इच्छा व्यक्त करण्यापर्यंत ठीक आहे. पण थेट धार्मिक हल्ला चढवायचा? तेही का, तर केवळ तो मुस्लिम आहे म्हणून?
भारतीय संघ जिंकला असता, पाकिस्तानचा नेहमीप्रमाणे आपण वर्ल्डकपमध्ये धुव्वा उडवला असता, तर शमीच्या धर्माचा विषय कुणी काढला असता हो? पत्नीशी त्याचे राडे झाले, तो चुकीचं लागलाय तेव्हा केली टीका योग्य असेलही, पण भारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??
–
- भारत तर ‘फेव्हरेट’ आहेच, पण ‘हे’ संघ सुद्धा आहेत विजेतेपदाचे दावेदार…!!
- १२ व्या वर्षीच देशाच्या क्रिकेट संघाला तिने दिली नवी ओळख! जगभर सुरु आहे चर्चा…
–
संघात वादविवाद, मतभेद नसतील असं मुळीच म्हणणं नाही. क्रिकेट खेळाडू असले तरी तीदेखील माणसंच आहेत. त्यांना क्रिकेट व्यतिरिक्त माणूस म्हणून जगायचा हक्क आहे. भारतीय संघ जिंकताना त्यांच्या पाठीशी उभं राहतो, तसेच आज संघ हरत असताना सुद्धा पाठीशी उभे राहुयात.
त्यांच्या सुमार खेळाविषयी नक्की बोलू, चिंता व्यक्त करू, त्यांची उणीदुणी काढू (आपल्याला फारसं काही कळत नसतानाही, कारण भारतात क्रिकेट हा खेळण्याचा कमी आणि बोलण्याचा विषय जास्त आहे)
एक चाहता म्हणून तो आपला हक्क आहे असं आजवर मनात आलोय तसंच आजही मानू… पण हा हक्क आहे, तसंच एक कर्तव्य पार पाडू… पडत्या काळात खेळाडूंचं आणि संघाचं मानसिक खच्चीकरण होणार नाही, याची काळजी सुद्धा घेऊ…
आज संघ ठरलाय, वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडलाय, हे जरी खरं असलं तर येत्या दोन वर्षांत पुन्हा दोन वर्ल्डकप येतायत. त्या ट्रॉफीज वाट बघतायत. एक वर्ष खराब गेलं, म्हणून सगळं संपलं असं नाहीये… काय सांगावं २०२२ चा टी-२० आणि २०२३ चा वनडे वर्ल्डकप आपलाच असेल कदाचित…
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.