' डिस्क ब्रेकवरील छिद्रं केवळ “शो” साठी असतात का? वाचा त्यामागचं नेमकं कारण… – InMarathi

डिस्क ब्रेकवरील छिद्रं केवळ “शो” साठी असतात का? वाचा त्यामागचं नेमकं कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हल्लीच्या धावपळीच्या जगात, स्वतःची दुचाकी ही अगदीच काळाची गरज बनली आहे. छोटीमोठी कामं उरकण्यासाठी दुचाकी हा महत्त्वाचा भाग ठरतो. अनेकांना तर बाईक रायडिंगची फार आवड असते. अशांसाठी तर बाईक म्हणजे अगदीच जीव की प्राण!

दुचाकी, विशेषतः बाईक म्हटलं, की सुरक्षेच्या बाबतीत कारपेक्षा अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. सुरक्षा हा दुचाकीसाठी कळीचा मुद्दा असतो म्हणा ना… या सुरक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे वाहनाचा वेग नियंत्रित होणं. जे काम पार पाडलं जातं ब्रेक्सच्या माध्यमातून.

आता तर नवी टेक्नॉलॉजी असणारी ABS म्हणजेच अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टिम सुद्धा बाईकमध्ये सर्रास वापरली जाते. या अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टिमचा महत्त्वाचा भाग म्हणजेच डिस्क ब्रेक…

 

disc brake inmarathi

 

डिस्कब्रेकचा आकार आणि…

हा डिस्क ब्रेक जर तुम्ही नीट पाहिला असेल, तर काही गोष्टी नक्कीच तुमच्या लक्षात आल्या असतील. त्यांचा वेगळा आकार आणि त्यावर असलेली छिद्रं तुमच्या नजरेतून नक्कीच सुटली नसतील. हा वेगळा आकार देण्यामागे, बऱ्याचवेळा डिझाईन हाच मुख्य मुद्दा असतो. असा आकार देऊन डिस्कचं वजन कमी करणं हादेखील यातील एक महत्त्वाचा मुद्दा असतो.

 

designer disc brake inmarathi

 

डिस्कला असणारी छिद्रं मात्र, केवळ डिझाईन किंवा बाईक चांगली दिसावी यासाठी पाडलेली नसतात. त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. सुरक्षेसाठी ती महत्त्वाची आहेत.

१. वजन

ब्रेकच्या डिस्कचा आकार, त्याचं डिझाईन या गोष्टी चांगल्या दिसण्यासाठी गरजेच्या आहेत, त्याचप्रमाणे बाईकचं एकूण वजन नियंत्रणात राखण्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत.

डिस्क संपूर्ण गोलाकार ना ठेवता, वेगवेगळ्या आकाराची ठेवली तर गरजेचं नसलेला धातूचा तुकडा काढून टाकता येतो. तीच गोष्ट डिस्कवरील भोकांच्या बाबतीत लागू पडते. डिस्कचा मजबूतपणा कमी होणार नाही, याची काळजी घेऊन जर गरजेचा नसलेला धातू काढून टाकता आला, तर डिस्कचं वजन जवळपास ३०० ते ५०० ग्रॅमने कमी होऊ शकतं.

 

heavy disc brake inmarathi

 

दोन डिस्क ब्रेक असणाऱ्या बाईकसाठी तर हे कमी झालेलं वजन फारच महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणूनच डिस्कची मजबुती कमी न करता त्याला भोकं पाडण्यात येतात.

२. थंड होण्यात अडचण येऊ नये…

कुठल्याही गाडीचा ब्रेक लावला जात असताना, मोठ्या प्रमाणावर घर्षण होत असतं. धातू एकमेकांवर घासल्यावर त्यांचं तापमान वाढतं हे तर तुम्ही अगदी लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं असेल. हे वाढणारं तापमान ब्रेकच्या कामात अडथळा आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.

तापमान कमी होण्यासाठी पृष्ठभागाला अधिकाधिक हवा लागणं गरजेचं आहे, हेसुद्धा तुम्हाला माहित असेल. डिस्कला असणाऱ्या छिद्रांमुळे, धातूचा अधिक पृष्ठभाग हवेच्या संपर्कात असतो. थोडक्यात काय, तर तापमान कमी करणारी हवा खेळती राहावी यासाठी अधिक एरिया मिळतो. परिणामी तापलेली डिस्क लवकर थंड होणं शक्य असतं.

 

disc brake design inmarathi

३. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून 

एखादी गोष्ट पूर्ण ओली असेल, तर तिच्यावर होणार घर्षणाचा परिणाम कमी होतो, हे तर तुम्हाला माहित असेलच. पावसाळ्याच्या दिवसात बाईक ओली होणं ही अगदी स्वाभाविक बाब आहे. अशावेळी डिस्क जर पूर्ण ओली झाली असेल, तर घर्षण कमी होऊन वेगावर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल, नाही का?

 

riding in rain inmarathi

 

हे असं होऊ नये, म्हणून सुद्धा डिस्कवर छिद्रं असतात. ही अशी छिद्रं असल्यामुळे, डिस्क पूर्ण भिजत नाही. त्या छिद्रांमधून पाणी वाहून जाण्यास मदत होते. शिवाय पाणी डिस्कच्या पृष्ठभागावर साचून राहत नाही. छिद्रांमध्ये जागा मिळाल्यामुळे, पाणी त्या जागांमध्ये जाऊ शकते. असं झाल्यामुळे घर्षण होण्यामध्ये पाण्याचा अडथळा कमी होतो.

हेदेखील कारण आहेच… 

वर उल्लेखित कारणांव्यतिरिक्त, बाईकचा लुक हादेखील डिस्कला छिद्रं असण्यामागे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या छिद्रांना एखादा विशिष्ट पॅटर्न तुम्ही पाहिला असेल.

आता डिस्कचं वजन कमी करण्यासाठी आणि हवा खेळती राहावी म्हणून तिला छिद्रं पाडायचीच आहेत म्हटल्यावर, त्याचं डिझाईन बनवण्याचा विचार मनात येणं साहजिकच आहे.

 

disc brake for looks inmarathi

 

पूर्ण गोलाकार डिस्कऐवजी डिस्कला वेगळा आकार देऊन डिझाईन आणि वाढणारा पृष्ठभाग यांचा मिलाफ साधणं, डिस्कची मजबुती कमी न होऊ देता, वेगवेगळ्या आकाराची आणि सौंदर्य वाढवणारी छिद्रं डिस्कला पाडणं या गोष्टी अनेकदा सर्रासपणे केल्या गेलेल्या दिसून येतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?