' स्वराज्याची पहिली महिला सेनापती जिने मुघलांना शब्दाने नव्हे शस्त्राने उत्तर दिले. – InMarathi

स्वराज्याची पहिली महिला सेनापती जिने मुघलांना शब्दाने नव्हे शस्त्राने उत्तर दिले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

छत्रपतींच्या एका आदेशावर जिव ओवाळून टाकणारे सरदार या स्वराज्याला लाभले होते. असंच एक मराठी घराणं म्हणजे, पुण्यातील तळेगावचं दाभाडे घराणं. बजाजी आणि त्यांचा मुलगा येसाजी हे छत्रपतींच्या पदरी होते. याच घराण्यातील उमाबाई या स्वराज्यातील पहिल्या महिला सरसेनापती होत्या. हिंदूराज्याच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी इतिहासात अनेक महिलांचं योगदान आहे. सरसेनापती उमाबाई दाभाडे हे अशाच एका रणरागिणीचं नाव!

 

umabai dabhade inmarathi

 

झाशीची राणी असो की अहिल्याबाई होळकर, आपल्या अतुलनीय पराक्रमानं अनेक स्त्रियांनी या हिंदूराष्ट्राचा इतिहास अजरामर केलेला आहे. क्रूर मुघल आक्रमणाला तोंड देताना पुरुषांच्या बरोबरीनं अनेक रणरागिण्यांनीही आपली तलवार पाजळली होती.

 

rani laxmibai inmarathi

 

असंच एक नाव म्हणजे सरसेनापती उमाबाई दाभाडे. छत्रपतींच्या घराण्यात सत्तेवरून झालेल्या दोन गाद्यांच्या संघर्षात ताराराणींच्या बरोबरीनं झुंजलेली ही रणरागिणी फारशी चर्चेत आली नाही.

महाराष्ट्रातील सतराव्या शतकात मराठी साम्राज्यात गाजलेलं घराणं म्हणजे तळेगावचं दाभाडे घराणं! या घराण्याचे मूळपुरुष बजाजी आणि त्यांचा मुलगा येसाजी हे छत्रपती शिवरायांच्या चाकरीत होते. महाराजांच्या एका हाकेसरशी मागचा पुढचा विचार न करता जीव ओवाळून टाकणार्‍यापैंकी दाभाडे सरदार हे एक नाव होतं.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर येसाजीराव दाभाडे सरदारांना संभाजी राजेंनीही रायगडाची धुरा सांभाळण्याची मोठी जबाबदारी दिली. संभाजी राजांनंतर दाभाडे सरदार राजाराम महारांजाच्या सेवेत दाखल झाले.

येसाजींना खंडेराव आणि शिवाजी हे दोन पुत्र! यातल्या खंडेरावांना त्रिंबकराव आणि यशवंतराव ही दोन अपत्यं. खंडेराव खूप पराक्रमी. आपल्या वडील-आजोबा, पणजोबांप्रमाणेच त्यांनीही अनेक मोहिमा आपल्या पराक्रमानं फत्ते केल्या. त्यांचा हा पराक्रम पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेनाखासखेल आणि कालांतरानं १७१७ साली सरसेनापतीपदी नियुक्त केले. खंडेरावांनी ही जबाबदारी निष्ठेने पार पाडली. उत्तर सरहद्दीवर राहून त्यांनी खानदेश, वर्‍हाड आणि गुजरात या तीन प्रांतांवर आपली पकड ठेवली.

 

maratha inmarathi

 

खंडेरावांच्या पश्चात शाहू छत्रपतींनी त्रिंबकरावांना सेनापतीपद दिले. मात्र अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर त्रिंबकरावांच्या मातोश्री आणि खंडेरावाच्या पत्नी उमाबाई या राजकारणात सक्रीय झाल्या. त्या काळात स्त्रिया प्रामुख्यानं कुटुंबाकडे लक्ष देणार्‍या असल्या तरिही वेळ प्रसंगी राजकारणातही सक्रीय असत. घरचे पुरुष या स्त्रियांशी सल्लामसलत करत असत इतका त्यांचा अभ्यास असे.

सरसेनापतीपदाची वस्त्रं त्रिंबकरावांच्याच कुटुंबात रहावी असं या दोघीना वाटत होतं. साक्षात छ. शाहू महाराजांनी तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढली. त्रिंबकरावांचे बंधू यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रं देण्यात आली. मात्र यशवंतराव अल्पवयीन असल्यानं कारभाराची सूत्रं उमाबाईंच्या हाती आली. अशा रितीनं मराठा साम्राज्यातली पहिली महिला सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडेंची नोंद झाली.

खंडेरावांच्या पश्चात त्रिंबकरावांकडे ही जबाबदारी आलेली मात्र त्रिंबकरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा लहान भाऊ यशवंतरांकडे सरसेनापतीपद आणि धाकट्या बंधू बाबुरावांकडे सेनाखासखेल हे पद गेलं. मात्र वयानं हे दोन्ही भाऊ लहान असल्यानं, राज्यकाराभाराची जाण पुरती न आल्यानं अनुभवी उमाबाईंनी दोन्ही पदांची सूत्रं आपल्या हाती घेतली. नुसतीचं सूत्रं घेतली असं नाही तर पती आणि मुलाच्या मृत्यूचं दु:ख बाजूला सारुन त्या रणांगणात उतरल्या.

गुजरातचा बहुतेक भाग मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवित पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला.

 

abhaysing inmarathi

महाराणी ताराबाई : औरंगजेबाच्या स्वप्नांना धुळीस मिळविणारी मर्दानी!

इतिहासाच्या पानांतून वगळली गेलेली, झाशीच्या राणीचे प्राण वाचवणारी अज्ञात विरांगना!

१७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसऱ्यांदा स्वारी केली. मात्र वरकरणी त्यांना घाबरलेल्या मुघलांनी उमाबाईंना चिथवण्यासाठी एक निरोप पाठवला. ”एक विधवा स्त्री आमच्याशी काय लढणार? हार पत्करण्यापेक्षा सैन्य घेऊ परत जा” असा खलिता पाठवणाऱ्या जोरावरखान बाबी या मुघल सरदाराला त्याच्या भविष्याची कल्पनाही नव्हती.

मात्र मुघलांच्या या खलित्याला उमाबाईंनी प्रत्युत्तर दिले नाही. कारण रंणांगणात घोड्यावर बसलेल्या रणरागिणीला पाहिल्यावर जोरावरखान असा काही घाबरला की त्याने अहमदाबादच्या तटात लपणं पसंत केलं. आपल्या कृतीतून मुघलांना उत्तर देणारी ही विरांगना म्हणजे स्वराज्याची पहिली महिला सेनापती!

एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.

पुढे पेशव्यांशी असलेल्या शत्रुत्वामुळे त्यांनी छत्रपतींची दुसरी गादी असणार्‍या ताराराणींशी हातमिळवणी करत १७५० साली पेशवा बाळाजी बाजीराव मुघल मोहिमेवर गेले असता चलाखीनं छ. राजाराम (दुसरे) यांना कैद केलं. ताराराणींच्या मदतीसाठी म्हणून उमाबाईंनी मराठा आणि गुजरात असे दुहेरी सैन्य दामाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाठविले.

 

umabai bajirao inmarathi

 

सुरवातीला या व्युहांना यश लाभले असले तरिही नंतर मात्र परिस्थिती पालटली. दामाजी जाळ्यात अडकले आणि त्यांची कृष्णेच्या काठी कोंडी झाली. १६ मे १७५१ रोजी दामाजींचं संपुर्ण कुटुंब आणि उमाबाईंचं कुटुंब ताब्यात घेतलं गेलं आणि त्यासोबतच दाभाडे घराण्याची जहागीरही परत घेतली गेली, या जहागिरीसोबतच त्यांच्या घराण्यात असणारं सरसेनापतीपदही गेलं.

उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या, रणांगणात शौर्य गाजवून शत्रूला सळो की पळो करून सोडलेल्या, पायात सोन्याचे तोडे घालण्याचा सन्मान लाभलेल्या आणि दुर्दैवाने शत्रू म्हणून आपल्यांच्याच समोर उभ्या ठाकलेल्या उमाबाई खंडेराव दाभाडे या एकमेव महिला सरसेनापती आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?