' कोर्टात न्याय मिळाला नाही? करा स्टॅम्पपेपरवर अर्ज, घाला न्यायदेवतेच्या या देवळात साकडं – InMarathi

कोर्टात न्याय मिळाला नाही? करा स्टॅम्पपेपरवर अर्ज, घाला न्यायदेवतेच्या या देवळात साकडं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्याकडे जुनीजाणती मंडळी कायम सांगतात, की ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’. हे म्हणण्याचे कारण असेच असावे, की आपल्याकडे न्याय वेळेत मिळणे ही फार अवघड गोष्ट आहे. एकदा वेळ निघून गेल्यावर न्याय मिळून सुद्धा फार काही फायदा होत नाही.

आपल्याकडची सिस्टीमच अशी गंजलेली आहे, की लोक पोलीस आणि कोर्टकचेऱ्या ह्यांच्या फंदात न पडणेच पसंत करतात आणि दुसऱ्याला सुद्धा कोर्टकचेरीच्या भानगडीत न पडता, आहे त्यात समाधान मानण्याचा सल्ला देतात. कारण आपल्याकडे कोर्टाची केस ही वर्षानुवर्षे चालते. “तारीख पे तारीख” करत  वकील नव्या नव्या तारखा घेत राहतात आणि न्याय प्रलंबित होतो.

कोर्ट केस जिंकण्यासाठी लोक काय काय करतात, प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतात, प्रसंगी स्वतः ‘व्योमकेश बक्षी’ होत पुरावे गोळा करतात. जागृत देवाला कौल लावण्यापासून ते अगदी गुंडांना सुपाऱ्या देण्यापर्यंत अनेक उपाय कोर्ट केस जिंकण्यासाठी लोक करतात.

 

pak-court.InMarathi

 

न्यायदेवता आपल्याला प्रसन्न व्हावी म्हणून काही लोक तिच्या देवळात धाव घेऊन तिच्याकडे केस जिंकण्यासाठी प्रार्थना करतात. न्यायदेवतेचे असे एक आगळेवेगळे देऊळ उत्तराखंड राज्यात आहे.

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड राज्यातील अल्मोडा जिल्ह्यात वास करणारी गोलू देवता ही भक्तांच्या प्रार्थनेला नेहमी पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे. ह्या देवळात येणारे भक्तगण स्वतःची दुःखे आणि इच्छा एका कागदावर लिहून देवळातील देवतेच्या पायाशी ठेवतात आणि ही देवता त्यांची सगळी दुःखे दूर करते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असे म्हणतात.

उत्तराखंडातील अल्मोडा जिल्ह्यात अनेक जागृत देवस्थाने आहेत. त्यातील एक म्हणजे हे गोलू देवता मंदिर होय. ह्या मंदिराला एक वेगळेच महत्व आहे.

 

golu temple inmarathi1

 

अल्मोडा मध्ये चित्तई येथे स्थित ही गोलू देवता म्हणते इथली स्थानिक ग्रामदेवता आहे. चित्तई गोलू मंदिर हे अल्मोडा पासून १४ किमी लांब पिथौरागड हायवेवर आहे, परंतु ह्या देवतेचे भक्त संपूर्ण भारतात पसरलेले आहेत आणि देशभरातून लोक येऊन ह्या देवतेच्या दर्शनासाठी गर्दी करतात. अगदी रोज या देवतेचे दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.

पर्यटक ह्या भागात आले तर आवर्जून ह्या देवळात दर्शनासाठी येतात आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवतेची प्रार्थना करतात. गोलू देवतेला न्यायाची देवता असे मानले जाते. असे म्हणतात, की ह्या देवळातून कुठलाच भक्त रिकाम्या हाती जात नाही. त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा ही देवता पूर्ण करते.

जमिनीसाठी टाकलेली केस असो, की कोणाशी भांडण झाले म्हणून त्या व्यक्तीवर टाकलेली केस असो, घटस्फोटाची केस असो लोक अशी कुठलीही केस जिंकण्यासाठी ह्या देवतेकडे अर्ज देतात.

 प्रत्येकाच्या रिकाम्या झोळीत ही देवता केस जिंकण्याचे, न्यायाचे दान देते. ह्या देवळात येणारे भक्त आपले म्हणणे एका कागदावर लिहून काढतात आणि देवतेच्या पायाशी ठेवतात.

मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवळात घंटा बांधण्याची परंपरा देखील ह्या देवळात आहे. आपले म्हणणे देवतेच्या कानावर पडावे ह्यासाठी आपल्या अर्जासह लोक देवळात घंटा देखील बांधतात. हा अर्ज साधासुधा नसतो. काही लोक चक्क दहा रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर  आपला अर्ज लिहितात.

 

golu temple inmarathi

 

म्हणूनच ह्या देवळात केव्हाही गेलो, तर हजारो घंटा देवळाच्या परिसरात बांधलेल्या दिसतात. आपला नवस किंवा आपली इच्छा पूर्ण झाल्यास लोक परत देवळात येऊन देवाचे दर्शन घेतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात.

ह्या देवळात भक्तांनी बांधलेल्या घंटा परत विकल्या जात नाहीत किंवा त्यांचे परत काहीच केले जात नाही. देवळाच्या परिसरात सगळीकडे हजारो घंटा दिसतात. म्हणूनच ह्या देवळाला घंटांचे मंदिर असे सुद्धा म्हटले जाते.

गोलू देवतेला स्थानिक संस्कृतीत सगळ्यात मोठा आणि पटकन न्याय देणारा देव म्हणून पुजले जाते. ह्या प्रदेशात गोलू देवतेला गौर भैरव  भगवान असेही म्हणतात. गोलू देवता म्हणजे भगवान महादेवांचाच एक अवतार आहे असे म्हणतात.

 

golu temple inmarathi2

 

देवळात गोलू देवता पांढऱ्या घोड्यावर पांढरी पगडी घालू विराजमान आहेत. त्यांच्या हातात एक धनुष्य बाण आहे. असे म्हणतात ज्यांना न्याय मिळत नाही ते लोक गोलू देवतेला शरण गेले, की ते भक्तांना न्याय देतात. हे देऊळ १२ व्या शतकात चंद वंशाच्या एका सेनापतीने बांधले आहे.

ह्या देवळाबद्दलची कहाणी अशी आहे की गोलू देव चंद राजा बाज बहादूरच्या सैन्याचे सेनापती होते आणि एका युद्धात त्यांना वीरमरण आले.  त्यांच्या सन्मानार्थ अल्मोडामध्ये चित्तई देवळाची स्थापना करण्यात आली.

तुम्हालाही एखाद्या भावकीच्या केसचा निकाल स्वतःच्या बाजूने लागायला हवा असेल तर ह्या अल्मोडाच्या देवळात नक्की जाऊन बघा.  तुमची बाजू सत्याची असेल तर गोलू देवता नक्कीच केसचा निकाल तुमच्या बाजूला झुकवतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?