' तरुण कवयित्रीशी प्रेमसंबंध, राजकीय संगीतखुर्ची ते थेट जन्मठेप: लखीमपूरची वादग्रस्त केस – InMarathi

तरुण कवयित्रीशी प्रेमसंबंध, राजकीय संगीतखुर्ची ते थेट जन्मठेप: लखीमपूरची वादग्रस्त केस

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेले काही दिवस लखीमपूर हे नाव आपल्याला चांगलंच परिचयाचं झालं आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर लागलेले आरोप आणि गाडी अडवल्यामुळे शेतकऱ्यांची केलेली हत्या यामुळे मध्यंतरी फक्त उत्तरप्रदेशच नव्हे तर साऱ्या देशभरात चांगलंच वातावरण तापलं होतं.

या सगळ्या प्रकरणाची वाच्यता देशपातळीवर झाली, भारत बंद तसेच महाराष्ट्र बंद इथपर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या आणि प्रकरण चांगलंच चिघळलं. पण तब्बल १८ वर्षांपूर्वी एका हत्याकांडामुळे लखमीपूर खेरी हे गाव चांगलंच चर्चेत आलं होतं.

बड्या राजकीय लोकांचा सहभाग असलेल्या मधुमिता शुक्ला हत्याकांडाने सगळ्या देशाची झोप उडवली होती. एका तरुण कवयित्रीच्या निर्घृण हत्येने कित्येक प्रश्न समाजासमोर निर्माण केले.

 

madhumeeta inmarathi
outlookindia.com

 

आज या लेखातून या हत्येमागचं नेमकं कारण, राजकारण आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर उमटलेले पडसाद या सगळ्याच आढावा घेणार आहोत.

उत्तर प्रदेशचं राजकारण, बाहुबली लोकांचं वर्चस्व आणि एकंदरच गुन्हेगारी विश्व हे आपल्याला काही नवीन नाही, गंगाजलसारख्या कित्येक हिंदी सिनेमातूनसुद्धा उत्तरप्रदेशच्या या भयावह परिस्थितिचं चित्रीकरण हुबेहूब केलं आहे.

याच उत्तरप्रदेशात स्वतःचा दबदबा निर्माण केलेले अमरमणि त्रिपाठी यांच्यावर आज तुरुंगवास भोगायची का वेळ आली? मधुमिताच्या हत्येशी यांचा संबंध कसा होता, हे सगळं आपण यातून जाणून घेऊया.

मधुमिता शुक्ला कोण होती?

२००३ मध्ये लखनऊच्या पेपर मिल कॉलनीमध्ये एका तरुण कवयित्रीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, पोस्ट्मॉर्टेममध्ये ही तरुण कवयित्री मधुमती शूक्ला गरोदर असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणाने हळूहळू भलतंच वळण घ्यायला सुरुवात केली.

प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर DNA टेस्ट झाली आणि त्यात अमरमणि त्रिपाठी या उत्तरप्रदेशच्या मोठ्या आमदाराचे नाव समोर आले आणि यामुळेच या आमदाराने उभारलेलं साम्राज्य ढासळायला सुरुवात झाली.

अमरमणि त्रिपाठी हे नाव उत्तरप्रदेशच्या प्रत्येक राजकीय पक्षातलं एक महत्वाचं नाव होतं, कधी समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी तर कधी थेट भाजप अशा वेगवेगळ्या पक्षांची कास धरत त्याने सत्तेचा उपभोग घेतला होता.

 

amarmani tripathi inmarathi

मधुमिता हत्याकांडामुळे मात्र याच बाहुबलीचं राजनैतिक तसेच खासगी जीवन उध्वस्त झाले.

अमरमणि आणि मधुमिता यांच्यातलं कनेक्शन काय?

या गोष्टीबद्दल बऱ्याच माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. काही मीडिया रिपोर्टसनुसार अमरमणि त्रिपाठी यांच्या आईला कवितेची बरीच आवड होती. आणि मधुमिता तिच्या खास सादरीकरणामुळे चांगलीच चर्चेत असायची.

मधुमिता कवितांच्या माध्यमातून कित्येक राजकीय व्यक्तींची पोलखोल करत असे. तिचे कलागुण बघूनच अमरमणि यांच्या आईने मधुमिताला आपल्या घरी कविता वाचन आणि सादरीकरणासाठी आमंत्रित केलं होतं.

यानंतर मधूमिताची त्रिपाठी यांच्या घरी नियमित उठबस व्हायला सुरुवात झाली, तसेच अमरमणि यांच्या मुली आणि त्यांची बायको यांच्याशीसुद्धा तिची चांगलीच गट्टी जमली.

याचदरम्यान अमरमणिसुद्धा मधुमितावर चांगलेच खुश असायचे आणि इथूनच त्यांच्यातले प्रेमसंबंध वाढले, आणि या प्रेमसंबंधामुळेच मधूमिताची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

 

amarmani and madhumeeta inmarathi

राजनैतिक संगीतखुर्ची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी :

अमरमणि यांनी त्यांच्या राजनैतिक प्रवासाची सुरुवात कॉँग्रेसमधून केली, नंतर समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी असा प्रवास करत त्याने भाजप सरकारमध्येसुद्धा मंत्रीपद भूषविलं.

वस्तीतल्या एका मोठ्या बिजनेसमनच्या मुलाचं अपहरण करून त्याला अमरमणि यांच्याच बंगल्यावर ठेवण्यात आल्याची बातमी जशी पसरली तसं त्यांना कॅबिनेटमधून बाहेर काढण्यात आलं, आणि यानंतरच काही वर्षांत मधुमिता हत्याकांड घडलं.

DNA टेस्टनंतर मधुमिताच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, आणि सीबीआयच्या तपसातून या सगळ्या प्रकरणात अमरमणि आणि त्यांची पत्नी मधूमणि त्रिपाठी यांचा हात होता हे सिद्ध झालं आणि २००७ साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

cbi featured 2 inmarathi

 

नुकतंच मधूमणि त्रिपाठी यांनी शिक्षा कमी करावी यासाठी याचिकासुद्धा दाखल केली आहे, १७ ते १८ वर्षानंतर त्यांच्यात बराच बदल घडला असल्याचा दावासुद्धा त्यांनी केला, पण या याचिकेवर उत्तराखंड सरकारने अजून काहीच निर्णय दिलेला नाही.

अटक होऊनसुद्धा अमरमणि यांच्या राजनैतिक करियरला ब्रेक लागला नाहीच. २००७ ची निवडणूक त्याने तुरुंगातूनच लढली.

छोट्याशा कालावधीत कवितांच्या विश्वातून कित्येक राजकीय व्यक्तींवर टीका टिप्पणी करणारी, तसेच बड्या बड्या लोकांमध्ये उठबस करणाऱ्या मधुमितासारख्या कवयित्रीच्या हत्येमुळे उत्तरप्रदेशमधलं बाहुबली त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आणि बघता बघता त्यांचं साम्राज्य रसातळाला गेलं.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?