छत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाचा जाज्वल्य इतिहास! नक्की वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक: पवनपुत्र जकाते
===
एक उत्तम प्रजाहितदक्ष शासक, अष्टावधानी राजा, राष्ट्रनिर्मितीचे उत्तुंग स्वप्न उराशी बाळगणाऱ्या वैभवशाली कृष्णदेवरायच्या विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि पुढे दीडशे वर्ष काळरात्र झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे सोनेरी स्वप्न साकार करणारे महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर केलेल्या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याची विजयपताका फडकत राहिली.
पुढे जुल्फिकार खानाने ते सिंहासन तोडून पळवून नेलं पण ते सिंहासन होत कसं ते कशाचं प्रतिनिधित्व करत होत त्याच्याबद्दल थोडसं..
हिंदुस्थानातल्या तमाम यवन पादशहांची गुर्मी उतरवल्यानंतर महाराजांनी स्वतःस राज्यभिषेक करवून घ्यावा असे मनात आणले. अन्य पातशाह्या आपणाला हवा तो मान देणार नाहीत, आपल्याला वचकून राहणार नाहीत, हे जर व्हावयाचे असेल तर छत्रसिंहासन आणि राजचिन्हे धारण करावी लागतील हे महाराज ओळखून होते.
आपण परकीय राजांचे प्रजाजन आहोत आपल्याला कोणी एतद्देशीय छत्र नाही. जाणता राजा नाही. असे जनतेला वाटत होते हे महाराजांना माहित होते.
राज्यभिषेक आणि सिंहासनाला अनंत अडचणी आल्या, त्यावरच्या सभेत गागाभट्टांनी असा निर्णय दिला की,
महाराज शिसोदे कुलोत्पन क्षत्रिय आहेत. नर्मदेच्या अलीकडे येऊन ते स्वतःस मराठे म्हणवून घेत असले, मुंज वगैरे संस्कारास त्यांनी फाटा दिला असला तरी त्यांचे क्षत्रियत्व नष्ट होणार नाही. उदेपुर,जयपूरच्या राजपूत राजांचे जसे व्रतबंध होऊन जसे राज्यभिषेक होतात तसे महाराजांचा होण्यास काहीच अडचण नाही.
या निर्णयाने महाराज संतोषले आणि सोहळ्याची तयारी सुरु झाली…
सप्त नद्यांची पुण्योदके, समुद्रजल, सुलक्षणी अश्व आणि हत्ती आणले गेल. हरीण आणि वाघाची कातडी आणली गेली. सोन्याचे कलश व इतर भांडी तयार करण्यात आली. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी (आनंदनाम संवत्सर) पहाटे ५ वाजताचा मुहूर्त ठरला. विद्वान, मांडलिक, राजे, हितसंबंधी, स्वराज्यातील जनता इत्यादींना आमंत्रणे धाडली.
राजधानी कोणती असावी यावर विचार करून सर्वबाजूनी म्हणजेच अवघड, जवळ तीर्थक्षेत्रे असणारा, सर्वप्रकारचे धान्य जवळपास पिकत असणारा, पाण्याची सोय असलेला, जवळ पवित्र नद्या असलेला असा देखणा गड म्हणजेच दुर्गदुर्गेश्वर रायगड ही राजधानी करण्याचे ठरले.
जिथे सिंहासन स्थापन करण्याचे आहे, त्या सदरेस उंची वस्त्रांचे चांदवे भारी किमतीचे पडदे लावले. सिंहासन जेथे ठेवायचे आहे तिथे सोन्याचे चार खांब लावून त्याला किमती जरीचा चांदवा लावला. त्याला मुक्ताफळांच्या गेंदाचे घोस लटकवले सारा गड रंगवून साफ केला.
प्रशासकीय व्यवस्था उत्तम तयार केली अधिकारी, देशाधिकारी, नगराधिकारी यांच्या नेमणूका केल्या राज्यभिषेकाच्या दिवशी त्या सर्वांना स्नान करण्याचे सांगून, महाराजांनी स्वतः मंगलस्नान, पंचगव्यस्नान, पवित्र नद्यांच्या उदकाने तसेच पंचामृताने विधिवत स्नान केले. सर्वांनी शुभ्र वस्त्रें परिधान केली होती.
क्षीर वृक्षाच्या सोन्याने मढवलेल्या आसनावर महाराज बसले. पट्टराणी सोयराबाई व युवराज संभाजी त्यांच्याजवळ बसला मुख्यप्रधान मोरोपंत, सेनापती हंबीरराव मोहिते,रामचंद्र पंडित, अमात्य, छंदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव हे अनुक्रमे पूर्वेस तुपाने भरलेला सोन्याचा कलश, दक्षिणेस दुधाने भरलेला चांदीचा कलश, पश्चिमेस दह्याने भरलेला तांब्याचा कलश, तर उत्तरेस मधाने भरलेला सोन्याचा कलश घेऊन उभे होते.
–
- छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचे? वाचा यामागचा खरा इतिहास!
- राजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता…
–
कलशातील असलेल्या द्रव्यांचा महाराजांना विधिपूर्वक मंत्रोच्चारात अभिषेक झाला. आरती झाली. कास्याचे भांडे तुपाने भरून त्यात स्वमुख पाहायला सांगितले. त्यानंतर महाराज सिंहासन आरोहनासाठी मुहूर्ताची वाट पाहत बसले. श्री रामाजी दत्तो यांनी चार महिने कष्ट करून भारतीय शास्त्रानुसार राजसिंहासन तयार केले होते.
वड, औदुंबर, क्षीर या झाडांच्या लाकडाच्या वेदी करून, ती सोन्याच्या तगटाने मढवुन त्याच्यावर मौल्यवान रत्ने लावली होती. त्या तगटावर बैल, मार्जार, तरस, सिंह, वाघ यांची चित्रे अनुक्रमाणे एकावर एक अशी चारी बाजूना कोरली होती, त्याला सोन्याचे आठ स्तंभ होते. प्रत्येक स्तंभावर एक असे आठ सोन्याचे सिंह बसवले होते. त्यावर वेगवेगळी झाडे, फळे, फुले, मासे इत्यादींची चित्रे होती.
नर्तकी तंतूंवाद्य घेऊन नाच करत असलेली चित्रे होती. अशा या शास्त्रानुसार सिद्ध केलेल्या भव्य सिंहासनावर पहिल्यांदा हरिणाची चामडी अंथरली होती. त्यांनतर त्याच्यावर दुवर्णद्रव्य घालून परत त्यावर वाघाची कातडी अंथरली होती. त्यावर शुद्ध कापसापासून तयार केलेल्या वस्त्राचे मऊ आसन घातले होते. ते मखमलीने मढवले होते. त्यावर लोड, तक्के ठेवले होते. त्यांना बादली जरीवस्त्रांची आच्छादने घातली होती.
ते सिंहासन 32 मण वजनाचे होते. सिंहासनाच्या मागे प्रभावळ करून जडवाचे छत्र लावले होते. त्याला मोत्यांच्या झालरी होत्या त्यावर मंडप होता. त्याला सुवर्णमय वस्त्रांचा चांदवा लावलेला होता. त्याला मुक्ताफळाचे घोस अडकवले होते. चांगल्या गुणांचे हत्ती व घोडे सिंहासनासमोर सोन्याच्या दागिन्यांनी मढवुन सभांडपासमोर उभे केले होते.
मुहूर्त वेळ भरताच महाराजांनी आऊसाहेबांना नमस्कार केला व सिंहासनाला पाय न लावता, नमस्कार करून पूर्वेकडे तोंड करून आरोहण केले. पाठीमागे अष्ठप्रधान मंडळ उभे राहिले. मुख्यप्रधान मोरोपंत पिंगळे व गागाभट्ट सिंहासनाच्या शेजारी उच्च आसनावर बसले. निमंत्रित मंडळी दर्जानुसार नेमलेल्या जागी उभे राहिले. नौबती झडू लागल्या.
सनई-चौघडे वाजू लागले. मंगल वाद्यांच्या गाजेने सह्याद्री तृप्त झाला. सोन्यामोत्यांच्या झालरी लावलेले छत्र उचलून गागाभट्टाने महाराजांच्या मस्तकावर धरले. त्यावेळी महाराजांनी मस्तकावर शिरपेच घातला होता, लाल वस्त्रे परिधान केली होती. चौकडे, कंठ्या, माळा, तुरा, झगा, पोंच्या इत्यादी अलंकार अंगावर घातलेले होते.
त्यांच्या हातात पूजन करून घेतलेला धनुष्यबाण होता, खडग होते. त्यावेळी लोकांनी सोन्या-चांदीच्या फुलांची वृष्टी केली. छत्र धरून गागाभट्ट दीर्घस्वराने म्हणाला,
राजा श्री शिवछत्रपती सदा विजयी होवो…
तोफांची सरबत्ती सुरु झाली. प्रत्येक किल्याला अशी सूचना होती की एका किल्ल्यावरील तोफेचा आवाज दुसऱ्या गडावर ऐकू आला, की तेथेही तोफांची सरबत्ती सुरु करायची. ह्या प्रमाणे एकापाठोपाठ एक अशी तोफांची शिवगर्जना सुरु झाली.
अवघ्या महाराष्ट्रभर तोफा गरजल्या एकदम तोफांच्या सरबत्तीने सह्याद्री गर्जून उठला गेल्या. तीस वर्षातील धर्मासाठी अन्यायाविरुद्ध केलेल्या घोडदौडीचे सार्थक झाले. चार पातशाह्या घरचे शत्रू आणि बाकीचे विरोधक उरावर भाले रोखून असतानादेखील, त्यांना पराभूत करून सह्याद्रीचा छावा मराठा राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य जाहली नाही.
सुलतानांची मिरास संपली देवगिरी, वारंगले, द्वारसमुद्र, कर्णावती, विजयनगर आणि खुद्द इंद्रप्रस्थ येथील चिरफाळलेली सिंहासने परत रायगडावर सांधली गेली.
पाची पातशाह्यांना घाम सुटला. यावनी, परकीय सत्तेविरुद्ध, हिंदुस्तानात आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी, हबशी, इंग्रज यांच्या छाताडावर पाय रोवून शिवसिंहासन मोठ्या दिमाखात उभे राहिले. आता सर्वजण मराठ्यांच्या सत्तेला वचकून राहणार होते आणि राहिले देखील.
असं जीव की प्राण असणार सिंहासन पुनरपि रायगडावर स्थापन होणार…..!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.