मनात जनांत कृष्णमय व्हा, त्यानेच तुम्ही हा संसार सहज तरून जाल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २१
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०
===
गाडीवानाचा अंदाज बरोबर निघाला. थोड्याच अंतरावर दाटीने काही झाडे होती, भर दुपारी बसण्यासारखी सावली होती आणि चक्क विहीरही होती. त्यामुळे बैलांसह सर्वांची पाण्याची सोय झाली. बैलांना वैरण मिळाली. सर्वांनाच जरा शांत वाटले. गाडीवानाने सतरंजी अंथरली आणि आवलीबाईंनी कपड्यात बांधून दिलेली चटणीभाकर आणली. ते पाहून नारायण म्हणाला,
काय योग आहे पाहा, आवलीमायच्या हातचे जेवायचा योग इथे आला!
गाडीवान म्हणाला,
बुवा, तो योग नाही तुमच्या नशिबात. आम्ही दोघे ही भाकरी खाऊ, तुमच्याकडे रामेश्वरकाकांना द्यायच्या जिनसा आहेत, त्यातील काही तुम्ही खा आन् वेळ भागवा.
नारायणाचा चेहेरा पडला, म्हणाला,
मग राहू दे. तुमचं होऊ द्या. एक दिवस उपास घडला तर काही बिघडत नाही, आता यापुढे सवय केलीच पाहिजे.
हे ऐकून आबा म्हणतो,
बुवा, लई जिद करू न्हाई. ह्यो बरोबर बोलतुया. आईका त्येचं.
नारायण म्हणाला.
जिद्द मी नव्हे, तोच करतोय. एक भाकरी मी खाल्ली तर बिघडलं कुठे? माझ्यासाठी देवाचा प्रसाद आहे तो!
हे ऐकून आबा समजावणीच्या सुरात म्हणाला,
बुवा, येंचं आईका बरं. तुमी मोटी मानसं हाय. कुनी पाह्यलं तर आमाला बोल लागंल. द्येव हाय अासं म्हना आनी द्येव न्हाई ह्ये अनुभवा. तुमी काई खानार नसलां तर हारकत कश्याची? ऱ्हावा तसंच. मी बी खात न्हाई. म्यां किती बी येळ ऱ्हाऊ शकतुया आसंच.
आबा असे म्हणे तोवर मघां घोड्यावरून निघून गेलेला तो घोडेस्वार अजून एकास घेऊन परत आला. तो दुसरा माणूस लगबगीने नारायणाजवळ येऊन पाया पडला आणि म्हणाला,
बुवा, आज अलभ्य लाभ. तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहे. इथेच चार पावलांवर आमचं गाव आहे. माझ्या आईने आमच्या कुलदेवतेचे व्रत केले होते. त्याचे उद्यापन आज केले. ब्राह्मणांची पंगत बसणार इतक्यात हे आले आणि तुम्ही येथवर आल्याची बातमी मिळाली. तसा लगोलग इकडे आलो. आपण कृपया भोजनास यावे ही विनंती. तसेच तुमच्या बरोबरची मंडळीही येवोत. त्यांनाही मी आमंत्रण करतो. लवकर निघू या, ब्राह्मण पाटावर खोळंबलेत.
आबा मनात म्हणाला,
देव आहे हेच खरं की काय?
अशा तऱ्हेने पुन्हा बैलगाडी जुळवून मंडळी जेवणाच्या ठिकाणी पोहोचून पाहतात तो देवीच्या देवळासमोर मोठा मंडप घातलेला. देवळात ब्राह्मणांची पंगत खरोखर बसलेली आणि एक पान नारायणासाठी राखीव ठेवलेले. नारायण हातपाय धुवून सोवळे नेसून बसला तशी यजमानाने सर्वांना दक्षिणा ठेवली आणि सर्वांनी जेवण्यास सुरू करावे यासाठी म्हणू लागला,
ॐ सह नाववतु, सह नौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।
ज्ञान वैराग्य सिद्धयर्थ भिखां देहि च पार्वति।।
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना ।।
इतके म्हटल्यावर त्याने पार्वतीपते श्री हर हर महादेव असा घोष करताच भोजनास सुरुवात झाली. सर्वांच्या मुखात दोन घास गेले असतील नसतील तोच एका तरूणाने खणखणीत आवाजात श्लोक म्हटला,
सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
यजमान नारायणाजवळ येऊन म्हणाले,
आम्हाला आपलाही आवाज ऐकू दे की.
नारायणानेही लगेच सूर लावला,
सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ॥हे देवी! हे नारायणी, ह्या सृष्टीचे पालन व संहार करणारी सनातन देवी तूच आहेस. तू गुणांचा आधार आहेस, तू सर्वगुणसंपन्न आहेस, तुला तुमस्कार असो.
नारायणाने श्लोक नुसता म्हटला नव्हता तर गायला होता. ब्रह्मवृंदाने दाद दिली,
गोविंद..गोविंद..
तिकडे बाहेर दुसरी पंगत बसत होती. आबा आणि गाडीवान बाजूबाजूला पानावर बसले होते. यजमानाच्या मुलाने त्यांनाही आदरपूर्वक आसन दिले होते. पाने वाढली जात होती. तिकडचे गोविंद गोविंद ऐकून आबा गाडीवानाला हळूच विचारतो,
ह्ये गोविंद गोविंद काय व्हो?
गाडीवान म्हणतो,
बामनांत पंक्तीत श्लोक म्हनतात ना, आमच्या बुवांनी श्लोक छान म्हनला मग सगळे छान छान म्हनाले.
आबाने पुन्हा विचारले,
मग छान म्हनू न्हाई का? गोविंद म्हंजी छान कसे वो?
गाडीवानाने उत्तर दिले,
अहो आबा, बामनात रीत हाय. ज्येवताना बोलायचं नाही. आनी बोलायचं काम पडलंच तर गोविंद म्हनायचं…
इतक्यात यजमान, त्याचा मुलगा इकडे येऊन उभे राहिले आणि त्यांनी गजर सुरू केला,
जय जय रामकृष्ण हरि ।
जय जय रामकृष्ण हरि ।।
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव माऊली माऊली ।
मंडळी बसा, सावकाश होऊ द्या
असे म्हणत पितापुत्रांनी पंगतीस दंडवत घातले आणि त्या पंगतीतही भोजनास सुरुवात झाली. ह्या पंगतीत एक वारकरी टोकाला बसला होता. ब्राह्मणांच्या पंगतीतून ऐकू येणारा एक श्लोक थांबला तसा हा चटकन सुरू झाला,
अन्न देव आहे । अन्न देव आहे ।।
आहे अन्नामध्ये विठ्ठल । तृप्त करी जन सकळ ।।
सकळ म्हणती पांडुरंग । जेवितसे अपुल्या संग ।।
संग करा विठ्ठलाचा । सांगावा हा ज्ञानीयांचा ।।
हे ऐकून गजर उठला,
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल!
इतक्यात मंडपात एक अनोळखी आवाज घुमला!
अन्नासवे झाली भेटी । पडली श्री हरिची गाठी ।।
भुका झाल्या अनिवार । जिव्हें आली रूचि फार ।।
घासागणिक आठवण । पुण्याची हो साठवण ।।
हरि हरि करिता जेवू । आनंदाचे धनी होऊ ।।
ज्ञाना तैसा तुकया संत । भेटो सर्वां भगवंत ।।
पुन्हा मोठा गजर झाला,
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ।
सर्वांची जेवणे झाली आणि सगळे मंडपात जमले. यजमानांनी नारायणाला विनंती केली,
बुवा, मंडळी जमली आहेत, आपण आहा, काही उपदेश कराल काय? आपला मानपान जो असेल तो करू.
नारायणाचा चेहेरा पडला! तो यजमानांना म्हणाला,
मानधनाचे काही नाही हो. पण….
जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ।। हे तुकोबांचे शब्द नारायणासमोर नाचू लागले. त्याची अडचण शेजारी उभ्या असलेल्या आबाच्या लक्षात आली. त्याने नारायणाला बाजूला घेतले व म्हणाला,
बुवा, लय इचार नका करू. जेवन होऊन गेलंया आन् लोक तुम्हास्नी ऐकाया जमलेती. नांव हाय तुमचं. येक आभंग घ्या न् थोडा येळ बोला. कीर्तन न्हाई ह्ये.
आबाच्या सांगण्याप्रमाणे नारायण लोकांसमोर उभा राहिला आणि त्याने निरुपणाला अभंग लावला,
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता ।
बहीण बंधु चुलता कृष्ण माझा ॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझे तारूं ।
उतरी पैलपारू भवनदीचे ॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन ।
सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥
तुका ह्मणे माझा कृष्ण हा विसावा ।
वाटे ना करावा परता जीवा ।।
मंडळी, काय सांगू, तुमच्या गावाजवळच्याच तुकोबांनी आपले मन कसे बांधलेले ठेवावे हे सांगण्यासाठी हा अभंग रचला आहे. एका वाक्यात सांगायचे तर कृष्णमय व्हा, कृष्णमय राहा, कृष्णमय जगा असा संदेश तुकोबांनी दिला आहे. कृष्ण म्हणजे काय? कृष्ण म्हणजे भगवंत. त्याला राम म्हणा वा कृष्ण. त्याला हरि म्हणा वा विठ्ठल. भगवंत एकच आहे. एक भगवंतच चराचराला व्यापून राहिलेला आहे. किंवा म्हणा, एका भगवंतापासूनच ही सारी सृष्टी झालेली आहे. आपण राहतो ते जग, आपले आप्त, सोयरे आणि आपण त्या एकाच भगवंतापासून निर्माण झालेलो आहोत. असा तो भगवंत माझा सोयरा आहे असे म्हणणे आणि सोयरे भगवंत असे आहेत असे म्हणणे ह्यांत काही अंतर आहे का हो? पण आपली अडचण अशी की आपले नातलग, आपले सहोदर आपल्याला वेगवेगळे दिसतात. आपण त्यांच्या वेगवेगळ्या रूपांना, त्यांच्या वेगवेगळ्या वागण्याला धरून बसतो. होते काय? कोणावर प्रेम तर कोणावर राग! कुणाशी सख्य तर कुणाशी तंटा! मग आपल्या जीवाला विसावा म्हणून मिळत नाही. सगळी अशांती. ती कशी घालवायची? तर मंडळी, रोजचे जगताना, सगळी नाती सांभाळायची आणि मनात म्हणायचे एक कृष्णच काय तो माझा पिता, कृष्णच काय ती माझी माता आहे. एक कृष्णच काय तो माझा नातलग आहे. माझा गुरु तोच एक, मला तारणारा तोच एक. तुकोबा म्हणतात, असे मन करा. मनात जनांत कृष्णमय व्हा. त्यानेच तुम्ही हा संसार सहज तरून जाल. पैलतीराला पोहोचाल. तुमच्या जीवाला मग खरा विसावा सापडेल. खरे तर, तुमचा जीवच कृष्ण असल्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि असे पार पडल्यावर आपला जीव आणि तो कृष्ण यांचा सांधा तोडून परत ह्या संसारात रमावेसे वाटायचे नाही!
नारायण बोलताना अगदी रंगून गेला, वेळेचे भान सुटले. लांबून आबाने खूण केली तेव्हा तो भानावर आला आणि त्याने आवरते घेतले. मग त्याने घाई केली. युक्ती केली. लोकांचे नमस्कार चमत्कार चुकवून तो गाडीत जाऊन बसला आणि गाडी आंसगावच्या दिशेने निघाली सुद्धा!
===
(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.