' फारशा माहीत नसलेल्या इतिहासावर बेतलेल्या ‘सरदार उधम’मध्ये चांगलं काय आणि वाईट काय? – InMarathi

फारशा माहीत नसलेल्या इतिहासावर बेतलेल्या ‘सरदार उधम’मध्ये चांगलं काय आणि वाईट काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

‘रंग दे बसंती’मध्ये आमीर आणि त्याचे मित्र ढाब्यावर जेवत असताना त्याची आई त्या मुलांना शहीद उधम सिंह यांच्या शौर्याबद्दल सांगते, बास तेवढाच इतिहास कदाचित आपल्याला माहीत आहे, पाठ्यपुस्तकातून तर उधम सिंह हे नाव वाचायलासुद्धा मिळणार नाही.

इतकी दयनीय अवस्था असलेल्या देशात आज सरदार उधम सिंह यांच्यावर सिनेमा बनवला गेलाय आणि ओटीटीच्या कृपेने जगभरात तो सिनेमा पाहिला जाणार आहे, हे ही नसे थोडके!

शुजित सरकार दिग्दर्शित या सिनेमात प्रथम इरफान मुख्य भूमिकेत दिसणार होता, पण नंतर काही कारणास्तव इरफानला हा सिनेमा करता आला आणि आणि गेल्यावर्षी त्याने आयुष्यातूनच एक्जिट घेतली, या भूमिकेत इरफान असता तर नक्कीच हा सिनेमा आणखीन वेगळ्या लेवलवर पोहोचला असता.

अर्थात शुजितचा विकी कौशलला घेण्याचा निर्णयही काही चुकलेला नाही, पण हा सिनेमा बघण्यासाठी तुमच्याकडे पराकोटीचा संयम हवा हे मात्र नक्की. २ तास ४२ मिनिटं लांबी असलेला हा सिनेमा पचायला बराच जड आहे.

 

sardar udham inmarathi

 

वैयक्तिक मत सांगायचं झालं तर मला हा सिनेमा फारसा आवडला नाही, एकतर याची लांबी आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमातूनही कम्युनिस्ट विचारधारेचा केलेला प्रचार. या दोन प्रमुख गोष्टी बाजूला ठेवल्या तर खरंच हा सिनेमा खूप अभ्यासपूर्वक बनवला आहे, टेक्निकली हा एक मास्टरपीस आहे यात काहीच शंका नाही.

हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग ज्यापद्धतीने त्यांच्या सिनेमाचं एक वेगळं विश्व निर्माण करतात त्याप्रमाणेच स्वातंत्र्यपूर्व भारतात तसेच त्या काळातल्या लंडन, रशिया अशा देशातल्या विश्वात खेचून घेऊन जाण्यात शुजित सरकार पूर्णपणे यशस्वी झालेला आहे.

यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो सिनेमॅटोग्राफर अविक मुखोपाध्याय याचा, त्याने ज्या पद्धतीने प्रत्येक फ्रेमवर बारकाईने काम केलंय की आपण तेव्हाच्या युगात खेचले जातो. वेशभूषा, सेट्स, लाईट्स, मेक-अप सगळीच भट्टी जमून आल्याने सिनेमा टेक्निकली लाजवाब बनलाय.

 

aveek mukhopadhyay inmarathi

शिवाय सिनेमाच्या सेकंड हाल्फमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ज्यापद्धतीने समोर येतं ते बघताना खरंच काहीच सुचत नाही, तोंडातून शब्द फुटत नाहीत, डोळ्यातून घळाघळा पाणी वहात असतं.

हे सगळं उत्तम असलं तरी सिनेमा खूप रटाळ आणि खेचल्यासारखा वाटला, म्हणजे पहिली ३० ते ४० मिनिटं तुम्ही इतर कामं करत जरी सिनेमा बघितला तरी सिनेमाचं कथानक ‘जैसे थे’च, आणि या अशा ऐतिहासिक सिनेमात वेग हा अत्यंत महत्वाचा असतो, जो या सिनेमात अजिबात दिसत नाही.

अखेर सिनेमा कीती दाखवायचा आहे हा सर्वस्वी दिग्दर्शकाचा निर्णय असतो त्यामुळे तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी अशा प्रकारच्या सिनेमात जे थ्रिल अपेक्षित असतं ते तुम्हाला अजिबात बघायला मिळणार नाही.

सरदार उधम यांची भारताच्या तुरुंगातून सुटका ते थेट लंडन व्हाया रशिया असा प्रवास आणि मग तिथे गेल्यावर Sir Michael O’Dwyer (त्या काळातले पंजाबचे गवर्नर ज्यांनी जालियनवाला इथे गोळीबार करण्यास ऑर्डर दिली) यांना गोळ्या घालून यमसदनी पाठवणे, या सगळ्या घटना इतक्या अरसिकपणे दाखवल्या आहेत की त्यामागची सरदार उधम यांची बाजू स्पष्ट करायला सिनेमा तुमच्याकडून पुढचे आणखीन अडीच तास घेतो.

 

sardar udham 2 inmarathi

 

सुरुवातीचे बरेचसे सीन्स म्हणजे landscape photoshoot असल्यासारखे उगाच ताणलेले आहेत, याबरोबरच सरदार उधम आणि भगत सिंह यांच्यातलं नातंसुद्धा तितकं प्रभावीपणे मांडलेलं नाही.

शिवाय या सिनेमात कम्युनिझम आणि मार्क्सवाद अशा विचारधारांची फोडणी देऊन सिनेमा मध्येच काही वेळ भरकटलेला वाटतो, म्हणजे सरदार उधम यांचं ध्येय आणि कम्युनिस्ट लोकांची क्रांति हे कसं सारखं आहे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सिनेमात होतो ज्यामुळे कथा भरकटते.

शिवाय भगत सिंहसारख्या पात्राच्या तोंडून आतंकवाद आणि क्रांतिकारी यांच्यातला फरक समजवून दाखवण्याचा सीन आणि संवाद तर खूपच हास्यास्पद वाटतात.

पण याचबरोबरच भगत सिंह यांचा एक संवाद मनात कायम घर घरतो तो म्हणजे “ideology ही नेहमीच स्पष्ट आणि चांगली असायला हवी नाहीतर यानंतर मिळणारं स्वातंत्र्य हे आत्ताच्या गुलामीपेक्षाही भयावह असेल.”

 

udham and bhagat inmarathi

 

या सगळ्या प्रकारानंतर सिनेमा पुन्हा रुळावर येतो खरा पण उधम सिंह यांना ज्याप्रकारे सादर करायला हवं होतं ते करण्यात सिनेमा नक्कीच कुठेतरी कमी पडतो. कोर्टरूममध्ये उधम ज्याप्रकारे इंग्रजांवर टीका करतो तो सीन किंवा रस्त्यावरच्या एका फेरिवाल्यासमोर फ्री स्पीचच्या नावावर दिलेलं भाषण असे काही मोजके सीन्स सोडले तर शहीद उधम सिंह म्हणावा तसा लोकांपर्यंत पोहोचतच नाही.

या सिनेमाची खरी जमेची बाजू असेल तर ती याची शेवटची ५० मिनिटं. ज्या घटनेमुळे सरदार उधम सिंह यांनी एवढा मोठा निर्णय घेतला, त्या जालियनवाला बाग हत्याकांडाला ज्या पद्धतीने दाखवलं आहे ते बघता मला नाही वाटत कोणीही रात्री झोपू शकेल.

कारण आपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे. खरंच ती २० मिनिटं मन सुन्न करणारी आहेत. कशाप्रकारे इंग्रजांनी तो नरसंहार घडवून आणला, ते आपण वाचलं आहे पण या सिनेमात त्याचं चित्रीकरण बघताना अंगावर काटा येतो.

या सगळ्या प्रकारानंतर उधम सिंह यांनी तिथल्या बऱ्याच जखमी लोकांना बाहेर आणलं, तर बऱ्याच लोकांचे अंत्यविधी पार पाडले, एकंदरच ती काळरात्र अमृतसरची कोणतीही व्यक्ति कधीच विसरणार नाही.

 

jalianwala baug inmarathi

 

यासगळ्याचा बदला म्हणून उधम सिंह यांनी ही हत्या केली असं सरळसोटपणे म्हंटलं जात असलं तरी या सिनेमातून त्यांची यामागची विचारधारा ही बरीच वेगळी होती हे स्पष्ट होतं. हे स्पष्टीकरण देण्यात सिनेमा बराच वेळ घेतो खरा, पण शेवटची ५० मिनिटं तुम्हाला विचार करायला भाग पाडतात.

जशी सरदार उधम यांची एक बाजू आहे तशीच त्या काळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचीसुद्धा बाजू होती, तीसुद्धा या सिनेमात अगदी स्पष्टपणे मांडली आहे. उघडउघडपणे ब्रिटिशांच्या या वागण्याला प्रोत्साहन जरी हा सिनेमा देत नसला तरी काही अंशी ब्रिटिश त्यांच्या बाजूने कसे बरोबर होते आणि भविष्यातली हिंसा थांबवण्यासाठीच एवढं मोठं पाऊल ब्रिटीशांना का उचलावं लागलं? असे प्रश्न हा सिनेमा निर्माण करतो.

अर्थात शेवटी येणाऱ्या हंटर कमिशन दरम्यान जनरल डायर आणि Sir Michael O’Dwyer यांची चौकशी करताना ते कीती निर्ढावलेले आहेत आणि त्यांनी जे केलं त्याचा त्यांना पश्चात्तापही नाही हेदेखील दाखवायला दिग्दर्शक विसरत नाही.

 

dyer and o dwayer inmarathi

शेवटी स्क्रीनवर येणारं एक वाक्य आपल्यात आक्रोश निर्माण करतं ते म्हणजे “१०० हून अधिक वर्षं उलटून गेली तरी अजूनही जालियनवाला हत्याकांडाबद्दल ब्रिटिशांनी भारताची माफी मागितलेली नाही.”

खरंच ही वाक्य पाहून मनाला घरं पडतात, खूप संताप होतो, आणि हाच सगळा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकातून शिकवला जात नाही याची खंत वाटत राहते बास.

विकी कौशल काही ठिकाणी कमी पडला आहे हे प्रकर्षाने जाणवतं, पण त्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. बाकी सिनेमातले न पटण्यासारखे मुद्दे आहेत ते सोडून हा सिनेमा एकदातरी बघाच, फक्त भरपूर पेशन्स हवेत!

बाकी सिनेमात आणखीन एक खटकणारी गोष्ट म्हणजे हिंदी सिनेमा असूनही ८०% संवाद हे इंग्रजीमध्ये असल्याने मास ऑडियन्स याच्याशी नक्कीच कनेक्ट होणार नाही, एक बरंय की हा सिनेमा ओटीटीवर रिलीज केला गेला, थिएटरमध्ये रिलीज केला असता तर पहिल्या तासाभरातच थिएटर रिकामं झालं असतं.

बाकी मद्रास कॅफेसारखा फास्टेस्ट सिनेमा देणाऱ्या शुजित सरकारने हा विषय खूपच स्लो हाताळला आहे, पण काही डोक्याला खाद्य देणारे आणि काळजाला भिडणारे संवाद आणि शहीद उधम सिंह यांचा कधीच न सांगितलेला इतिहास मोठ्या पडद्यावर मांडल्याने त्याचे आभार मानायलाच हवेत.

 

shoojit sircar inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?