“शिवसेनेला राजकारणापासून दूर ठेवणार”, पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब गरजले होते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
३० ऑक्टोबर १९६६ ची दुपार! अस्वस्थ बाळासाहेब येरझा-या घालत होते. संध्याकाळी शिवाजी पार्कावर शिवसेनाच्या पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्याचा घाट घातला होता मात्र तो यशस्वी होइल का? मेळाव्याला पार्कात गर्दी जमेल अशा शंकांनी पहिल्यांदाच बाळासाहेब काहीसे घाबरले होते.
अर्थात इथे प्रश्न शिवसेनाच्या इभ्रतीचा होता. त्यामुळेच अखेर बाळासाहेबांनी आपलं कलाकारी डोकं लढवलं, आणि पार्कात अशी काही जादुची कांडी फिरवली की पाचच्या दरम्यान खच्चाखच भरलेल्या सभेत त्यांनी हाक दिली’ इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो”…
अर्थात हा इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही. मेळावा असो वा जाहीर सभा, शिवसेनेला कधीच माणसांची, कार्यकर्त्यांची कमी भासली नाही मात्र तुम्हाला खरं वाटणार नाही पण शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला गर्दी खेचण्यासाठी बाळासाहेबांनाही शक्कल लढवावी लागली होती. अर्थात त्यानंतर अनेक कारणांमुळे हा पहिला दसरा मेळावा राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला.
या दसरा मेळाव्याने बाळासाहेबांची ठाकरी शैलीतील भाषणं ऐकली, विरोधकांवरील टिकाही ऐकल्या, २०१२ साली प्रकृती अस्वस्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित न राहिलेल्या बाळासाहेबांचा ऑनलाईन आवाज ऐकला, याच भाषणात ”माझ्यासारखंच उद्धव आणि आदित्यलाही सांभाळून घ्या” ही त्यांची साद ऐकताना मेळावाही गहिवरला आणि त्यानंतरचा प्रत्येक मेळावा बाळासाहेबांशिवाय साजरा होतानाचं दुःखही पचवलं.
गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन दसरा मेळावा साजरा केला, मात्र यंदा पुन्हा एकदा जुन्या परंपरेनुसार प्रत्यक्ष हा मेळावा उद्या साजरा होतोय. याचनिमित्ताने या दसरा मेळाव्याची मुहुर्तमेढ कशी रोवली गेली याचा आठवणींना उजाळा…
महाराष्ट्र गीताच्या सुरांवर मेळाव्याची नांदी
शिवसेना पक्षाचं शक्तीप्रदर्शन आणि यानिमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांशी खुला संवाद व्हावा याउद्देशाने बाळासाहेबांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. तो काळ होता १९६६ चा!
बाळासाहेबांचं लाडकं ठिकाण असलेल्या पार्काच मेळावा भरणार हा त्यांचा हट्ट, त्यामुळे शिवसैनिकांनी तयारी सुरु केली. मात्र मेळाव्याचा पहिलाच प्रयत्न, त्यात सणाचा दिवस म्हणजे घरोघरी सुरु असलेली लगबग आणि सोबतीला प्रचंड अवाढव्य असे शिवाजी पार्क! अशा अनेक कारणांमुळे गर्दी झालीच नाही तर? हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
काहीही झालं तरी पहिला मेळावा दणक्यात व्हायला हवा, रंगाचा बेरंग झाला तर त्याचा परिणाम पक्षावर होईल या एकाच विचाराने त्यांनी तडक शाहीर साबळेंना बोलावणं धाडलं.
शाहिरांच्या खड्या आवाजात ‘महाराष्ट्र गीत’ सुरु झालं आणि पाहता पाहता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांची पावलं पार्काकडे वळली.
यात बाळासाहेबांनी आणखी एक युक्ती केली. दसऱ्याच्या निमित्ताने अनेक कलाकारांचे कार्यक्रम, कसरतीही आयोजित केल्या गेल्या, त्यामुळे महिला कार्यकर्त्या, तरुण मुलं यांनीही पार्काकडे गर्दी केली.
शिवसेना राजकारणापासून दूर राहणार
प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे, रामराव आदिक अशा अनेक ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत पहिल्या मेळाव्यात बाळासाहेब सभेपुढे बोलायला उभे राहिले.
या व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत रामराव आदिक, बळवंत मंत्री आणि प्रा. स. अ. रानडे हे देखील उपस्थित होते.
‘महाराष्ट्राला आज खरी गरज महाराष्ट्रवादाची आहे’, असं म्हटलं आणि त्याक्षणी बाळासाहेबांनी सभा जिंकली. बाळासाहेबांच्या या वाक्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
–
शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!
‘त्या’ एका भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”!
–
आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारण हे ‘गजकरणासारखं’ आहे. असं म्हणत बाळासाहेबांनी आपल्या शिवसेनेचे धोरण स्पष्ट केले होते.
मात्र असं म्हटल्याचा एक फायदा असा झाला की राजकारणापासून दूर राहू इच्छिणाऱ्या मात्र सामाजिक क्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांनी समाजसेवेसाठी शिवसेनेचा पर्याय निवडल्याचं जाहीर केल्यानंतर बाळासाहेबांची दूरदृष्टी लक्षात आली.
मराठी माणसासाठी पहिला मेळावा ठरला खास
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आजही मराठी माणसं लक्षात ठेवतात यामागे अनेक कारणं आहेत. या पहिल्या मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती.
महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत आणि मराठी लिहिता-वाचता किंवा चांगले मराठी बोलता येते अशा व्यक्तीलाच राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या द्याव्यात अशी बाळासाहेबांनी मागणी केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यात, घराघरात शिवसेनेचे कार्यकर्ते घडू लागले.
त्यानंतरही बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पाठपुरावा सुरुच ठेवला.
अशारितीने शिवसेनेचा पहिला मेळावा, ज्याला गर्दी होईल का? हा प्रयत्न यशस्वी होईल का? अशी शंका बाळासाहेबांना वाटत होती, त्या मेळाव्याने राजकीय इतिहासात एक नवी परंपरा सुरु केली.
बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी दरवर्षी दसरा मेळाव्याची परंपरा जपली.
दसऱ्याला अनेक पक्ष, अनेक राजकीय नेते जनतेशी संवाद साधत असले तरी शिवाजी पार्कात शिवसेनेसाठी होणारी गर्दी आणि मेळाव्यात यंदा ठाकरी शैलीत कोणाचा समाचार घेतला जाणार याबाबत आजही उत्सुकता कायम असते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.