श्रीमंतीच्या शिखरावरील या स्टार्सचं पुढे जे झालं ते जीवनाचा मोठा धडा शिकवून जातं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती त्याच्या आयुष्यात या तीन गोष्टींची अपेक्षा करत असतात: Name, Fame & Money. काम करणारी प्रत्येक व्यक्ती पैसे कमवतच असते.
काही लोकांना नाव आणि प्रसिद्धी तर मिळते; पैसे पण मिळतात पण त्यांना एक तर वाढवायचे कसे हे माहीत नसतं म्हणजे जी वेळ आपली आहे ती ओळखून त्याचा सदुपयोग कसा करावा हे माहीत नसतं.
तर काहींना शेवटपर्यंत टिकवायचे कसे हे माहीत नसतं. आपल्याला असं वाटतं, की असे उदाहरण फक्त सामान्य लोकांमध्येच सापडत असतील. पण, तसं नाहीये.
बॉलीवूड हे सुद्धा असं क्षेत्र आहे जिथे लोक यशाच्या शिखरावर जातात आणि काही न काही गोष्टी चुकीच्या करतात आणि त्यांनी उभा केलेला यशाचा मनोरा एखाद्या पत्त्याच्या डावासारखा खाली कोसळतो.
तुम्ही जर का ‘फॅशन’ हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला या गोष्टी घडतात कश्या याचं एक उदाहरण पहायला मिळेल. त्यात एक डायलॉग खूप छान आहे,
“सक्सेस मिलने के लिये जो लोग आप को मिलते है, वही लोग सक्सेस की सीडी उतरते वक्त भी मिलते है…”
अर्थात, आज कालचे बॉलीवूड स्टार्स हे या आर्थिक बाबतीत फारच हुशार आहेत. पण, काही नट असे होऊन गेले आहेत ज्यांनी बॉलीवूड मध्ये एक काळ गाजवला होता.
पण, त्या लोकांना त्यांचं यश तर टिकवता आलं नाही. शिवाय, त्यांना त्यांचं व्यक्तिगत आयुष्य सुद्धा खूप हलाखीत जगावं लागलं.
या सर्व गोष्टींना बॉलीवूड मध्ये असलेली अनिश्चितता सुद्धा कारणीभूत असेल. पण, ती सर्वांसाठीच आहे.
आम्ही आज बोलत आहोत त्या ११ सेलेब्रिटी बद्दल ज्यांनी यशाची चव सुद्धा चाखली आणि करिअरच्या उत्तरार्धात फक्त अपयश आणि गरिबीच बघितली:
१. मीना कुमारी :
बॉलीवूड ची एक स्टार अभिनेत्री. ज्यांना की tragedy queen असं ही संबोधलं जातं. हे नाव त्यांना त्यांच्या पडद्यावरील कामासाठी तर मिळालंच; पण त्यांचं व्यक्तिगत आयुष्य सुद्धा या नावाला पूरकच होतं.
मीना कुमारी यांनी त्यांच्या करिअर ची सुरुवात वयाच्या चौथ्या वर्षी केली. त्यांचं लग्न कमाल अमरोही या लेखक आणि दिगदर्शक व्यक्ती सोबत झालं होतं.
त्यांच्या आयुष्यात काही वर्षांनी धर्मेंद्र यांची एन्ट्री झाली. असं बोललं जातं की, धर्मेंद्र यांना बॉलीवूड मध्ये काम मिळण्याचं श्रेय हे पूर्णपणे मीना कुमारी यांना दिलं जातं.
यामुळे धर्मेंद्र यांचं करिअर तर घडलं; पण, मीना कुमारी यांचं लग्न मोडलं. मीना कुमारी यांना दारू पिण्याची सवय लागली. त्या व्यसनामुळे त्यांचं लिव्हर खराब झालं.
त्यांच्या करिअर च्या उतरत्या काळात कमाल अमरोही आणि त्यांनी परत एकत्र येऊन ‘पाकिझा’ हा क्लासिक सिनेमा बॉलीवूड ला दिला.
ज्याचे गाणे ‘यू ही कोई मिल गया था, सारे राह चलते चलते…’ हे लोक आजही आवडीने ऐकतात. या सिनेमा मध्ये मीना कुमारी यांच्या opposite धर्मेंद्र यांना आधी घेण्यात आलं होतं.
पण, नंतर तो सिनेमा त्यांना बदलून राज कुमार यांच्याकडून पूर्ण करण्यात आला.
मीना कुमारी यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात दिगदर्शका सोबत असलेली कटुता आणि त्यांची ढासळलेली तब्येत हे पडद्यावर कुठेही जाणवू दिलं नाही.
सिनेमा रिलीज झाला आणि तीन आठवड्यातच मीना कुमारी यांचं निधन झालं आणि त्यावेळी त्यांना त्यांच्याकडे हॉस्पिटलचं बिल भरता यावं इतके सुद्धा पैसे नव्हते.
२. परवीन बाबी :
७० आणि ८० च्या दशकातील सर्वात ग्रेसफुल अभिनेत्री. त्या काळात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या TIME या मॅगझीन ने परवीन बाबी यांची दखल घेतली होती.
त्यांच्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन बोल्ड आणि बिनधास्त अंदाजमुळे परवीन बाबी कायमच चर्चेत असत. अमिताभ बच्चन यांच्यावरचं त्यांचं एकतर्फी प्रेम हे त्याकाळच्या मीडिया मध्ये खूप चर्चिला गेलेला विषय होता.
करिअर मध्ये जेव्हापासून उतरती कळा यायला सुरुवात झाली तेव्हापासून परवीन बाबी यांना मानसिक आजाराने ग्रासले होते. ज्याचा दोष त्यांनी खूप जणांना दिला होता.
पण, या आजाराचं मुख्य कारण हे त्यांच्या आयुष्यातील एकटेपण हेच होतं.
मुंबईतील ज्या फ्लॅट मध्ये त्या राहत होत्या तिथेच त्यांचा गूढ मृत्यू झाला आणि लोकांना त्याबद्दल तीन दिवसांनंतर कळलं.
जेव्हा तीन दिवस त्यांच्या घरासमोर ठेवलेला न्यूजपेपर आणि दूध हे परवीन बाबी यांनी उचललं नव्हतं म्हणून.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांचा मृतदेह घ्यायला सुद्धा दोन दिवस कोणीही समोर आलं नाही. महेश भट यांनी नंतर परवीन बाबी यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
३. भगवान दादा :
भगवान दादा म्हणजेच भगवान आबाजी पालव. मराठी माणूस. भगवान दादा यांनी त्यांचा बॉलीवूड मधील डेब्यु हा ‘क्रिमिनल’ या सिनेमातून केला.
त्यांचा पहिला सुपर हिट ठरलेला सिनेमा होता गीता बाली यांच्या सोबत काम केलेला ‘अलबेला’. या सिनेमातील ‘शोला जो भडके…’ हे गाणं आज सुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे.
त्यानंतर त्यांनी काही वर्ष मागे पाहिलंच नाही. त्यांनी त्यांचं आयुष्य अगदी एखाद्या राजसारखं ते जगत होते. पण, त्यांच्या करिअर ला उतरती कळा लागली ती म्हणजे ‘झमेला’ आणि ‘लबेला’ सारख्या फ्लॉप चित्रपटांमुळे.
भगवान दादा यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट झाली होती की, त्यांना त्यांचा जुहू येथील आलिशान बंगला आणि त्यांच्याकडे असलेल्या ७ कार विकाव्या लागल्या होत्या.
असं म्हंटलं जातं की, भगवान दादा हे आठवड्याच्या सातही दिवस रोज वेगवेगळ्या कार ने शुटिंग ला जात असत.
खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना काही वर्षांनी मुंबईतील एका चाळीत रहावं लागलं होतं. २००२ मध्ये त्यांना तीव्र ह्रदयरोगाचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
४. भारत भूषण :
बॉलीवूड मध्ये पदर्पणसाठी भारत भूषण यांना जवळपास दहा वर्ष खूप संघर्ष करावा लागला होता. त्यानंतर त्यांचा ‘बैजू बावरा’ हा सिनेमा आला आणि तो चांगला हिट झाला.
या सिनेमाने भारत भूषण यांना बॉलीवूड मध्ये एक चांगला कलाकार आणि हिरो म्हणून सिद्ध केलं. त्यांनी भरपूर नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला. त्यांचे मुंबई मध्ये बरेच फ्लॅट्स होते.
पण, त्यांची एक सवय वाईट होती ती म्हणजे कमावलेला प्रत्येक रुपया खर्चून टाकणे. त्यांना पैशांची बचत हे प्रकरण अजिबात आवडत नव्हतं.
निर्माता म्हणून त्यांच्या भावासोबत काही चित्रपटांची निर्मिती केली ज्यामध्ये त्यांना खूप नुकसान झालं होतं. त्यामुळेच त्यांना उतरती कळा आली.
असलेले फ्लॅट्स विकावे लागले आणि त्यांना मुंबईतल्या एका चाळीत रहावं लागलं.
ज्या स्टुडिओ मध्ये त्यांनी एकेकाळी शुटिंग केलं होतं त्याच स्टुडिओ समोर त्यांना वॉचमन म्हणून नोकरी करत उभं रहावं लागलं. १९९२ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
५. ए के हंगल :
शोलेमधील रोल आणि ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ हे अजरामर करणारे ए के हंगल लोकांच्या कायम समरणात राहतील यात शंकाच नाही.
त्यांनी २२५ सिनेमांमध्ये काम केलं होतं. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांची आर्थिक स्थिती इतकी वाईट झाली होती की त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट चे बिल्स भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते.
ही जेव्हा अमिताभ बच्चन यांना कळाली तेव्हा त्यांनी २० लाख रुपयांची मदत केली आणि ए के हंगल यांची ट्रीटमेंट पूर्ण केली. वयाच्या ९५ व्या वर्षी ए के हंगल यांचं निधन झालं.
६. विमी :
विमी या अभिनेत्री ने ‘हमराज’ या बी आर चोप्रा यांच्या १९६७ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं.
बॉलीवूड मध्ये येण्या आधीच विमी यांचं एका यशस्वी उद्योगपती सोबत लग्न झालं होतं.
दिग्दर्शक रवी यांच्या सोबत विमी याची कलकत्ता येथे एका पार्टी मध्ये भेट झाली आणि त्यांनीच पुढे जाऊन बी आर चोप्रा यांच्यासोबत विमी यांची ओळख करवून त्यांना सिनेमा मिळण्यास मदत केली.
हे सगळं घडत असताना विमी यांचं व्यक्तिगत आयुष्य मात्र डिस्टर्ब झालं होतं. त्यांच्या नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे दोघांमध्ये फूट पडली.
विमी यांच्या नवऱ्याने त्यांना काम मिळूच नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले. ज्यामुळे विमी यांना नैराश्यामुळे दारू पिण्याचं व्यसन लागलं.
वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी म्हणजे १९७७ मध्ये विमी यांनी नानावती हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला.
७. गीतांजली नागपाल :
एकेकाळी यशस्वी मॉडेल म्हणून काम केलेली गीतांजली नागपाल ही एका Navy officer ची मुलगी होती.
पण, acting मध्ये काम करायचं ठरवल्यावर तिच्यासोबतचे संबंध तोडले आणि ती मुंबईत येऊन एकटीच राहू लागली.
मॉडेलिंग मध्ये तिला बरीच कामं मिळाली पण त्यासोबत तिला ड्रग्स घेण्याची सवय सुद्धा लागली. काही प्रादेशिक सिनेमा मध्ये काम मिळाल्यानंतर तिला काम मिळणं बंद झालं!
आणि २००७ मध्ये ती दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना पोलिसांना सापडली.
एक बातमी अशीही आली होती की, एका फोटोग्राफर ने तिला ओळखलं तेव्हा जेव्हा तिने एखाद्या मॉडेल सारखी पोज देऊन तिचे फोटो काढण्याचा त्याच्याकडे आग्रह केला.
काही दिवसांनी तिला ठाण्याच्या मानसिक रुग्णालयात भरती करण्यात आलं.
८. राज किरण :
स्व. ऋषी कपूर यांच्या ‘कर्ज’ या सुपरहिट सिनेमा मध्ये त्यांच्या आधीच्या जन्माचा रोल करणारा हा कलाकार ७० आणि ८० च्या दशकात करिअर च्या सर्वोच्च स्थानी होता.
हे दहा वर्ष कुठेतरी अचानक गायब झाले होते. काही लोकांनी त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवली होती.
ऋषी कपूर यांनी राज किरण यांचे भाऊ गोविंद मेहतानी यांच्या मदतीने राज किरण यांना शोधायचं ठरवलं.
२०१० मध्ये राज किरण हे ऋषी कपूर यांना अमेरिकेतील अटलांटा मधील एका मानसिक रुग्णालयात ट्रीटमेंट घेतांना भेटले होते.
पण, त्यानंतर २०११ मध्ये राज किरण यांच्या मुलीने एक प्रेस नोट रिलीज करून हे सांगितलं की, राज किरण हे बेपत्ता आहेत आणि न्यू यॉर्क पोलीस त्यांना मागच्या ८ वर्षांपासून शोधत आहेत.
९. ओ पी नय्यर :
बॉलीवूड च्या यशस्वी संगीत दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे ओ पी नय्यर. त्यांच्या ट्युन्स या आज सुद्धा लोकांना आवडतात.
पण, त्यांच्या करिअर च्या उतरत्या काळात त्यांना दारू पिण्याची सवय लागली. या सवयीमुळे त्यांच्या परिवाराने त्यांना घराबाहेर काढले.
असं सांगितलं जातं की, त्यांच्या आयुष्यातील काही शेवटचे दिवस हे ओ पी नय्यर यांनी त्यांच्या एका फॅन च्या घरी ते राहिले होते.
या काळात त्यांना कोणी मुलाखत घेण्यासाठी विचारलं तरीही ते दारू आणि पैश्याची मागणी करत असत. २००७ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.
१०. सतीश कौल :
सतीश कौल हे पंजाबी सिनेमा चे सुपरस्टार होते. त्यांना पंजाबी सिनेमा चे अमिताभ बच्चन असं म्हणायचे. हिंदी आणि पंजानी मिळून त्यांनी एकूण ३०० सिनेमांमध्ये काम केलं होतं.
त्यांनी बॉलीवूड मध्ये देव आनंद, दिलीपकुमार आणि शाहरुख खान यांच्यासोबत सुद्धा काम केलं आहे.
२०११ मध्ये सतीश कौल यांना त्यांच्या पंजाबी सिनेमामधील योगदानासाठी लाईफ टाईम आचिवमेंट अवॉर्ड देण्यात आला होता.
सतीश कौल यांनी लुधियाना मध्ये एक acting school सुरू केली. त्यामध्ये त्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागलं होतं.
त्यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला आणि ती त्यांच्या मुलासोबत अमेरिकेला निघून गेली. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची झाली की त्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सुद्धा पैसे नाहीयेत.
ते सध्या लुधियाना येथील विवेकानंद वृद्धाश्रमात आहेत. २०१९ मध्ये आलेल्या एका बातमीनुसार एक सामाजिक संस्था त्यांना भटिण्डा येथे नेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
११. मिताली शर्मा :
मिताली शर्मा ही मूळची दिल्लीची आहे. बॉलीवूड मध्ये काम करण्यासाठी ती घरातून पळून आली होती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले.
२५ वर्ष वय असलेल्या अभिनेत्रीने काही भोजपुरी सिनेमा मध्ये काम केलं आणि काही मॉडेलिंग ची कामं केली.
करिअर ने पाहिजे तशी उभारी न घेतल्याने मिताली शर्मा ही मानसिक रुग्ण झाली आणि मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागताना दिसू लागली.
एका कारची काच तोडताना ओशिवरा पोलिसांनी तिला पकडले आणि तिला मानसिक रुग्णालयात सध्या भरती करण्यात आलं आहे.
हा लेख आम्ही का लिहिला असेल? प्रश्न पडणं सहाजिक आहे. याची दोन कारणं सांगता येतील. एक तर पालकांसाठी आहे आणि एक आजच्या तरुणांसाठी आहे.
पालकांनी त्यांच्या मुलांच्या कलेवर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या यशासोबतच त्यांना त्यांच्या अपयशात सुद्धा त्यांना साथ द्यावी. त्यांना अपयश सुद्धा पचवायला शिकवा.
तरुणांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी परिवाराची साथ सोडू नये.
त्या क्षेत्रातील एक्सपर्ट कडून सल्ला घेऊनच तुमच्या करिअर ची दिशा ठरवा आणि कोणतीही परिस्थितीत खचून जाऊ नका.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.