' पत्नीचा जीव वाचवण्यासाठी वास्तु बांधणारा ‘भारतीय पती’ आजही दुर्लक्षितच आहे… – InMarathi

पत्नीचा जीव वाचवण्यासाठी वास्तु बांधणारा ‘भारतीय पती’ आजही दुर्लक्षितच आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पाकिस्तानचं नाव घेतलं, की आपल्यासमोर गरिबी, अतिरेकी, सत्ता संघर्ष या गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. साहाजिकच आहे, जो देश अतिरेकी संघटनांना आपल्या पाठीशी घालतो त्याची अशी ओळख होणं काहीच चूक नाहीये. पण, आज आम्ही १९२७ मध्ये बांधण्यात आलेल्या आणि फाळणी नंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या ‘मोहत्ता पॅलेस’ची माहिती सांगणार आहोत. ही वास्तू जगातील सर्वात सुंदर वास्तूंपैकी एक मानली जाते.

‘मोहत्ता पॅलेस’चं वेगळेपण हे आहे, की हा राजवाडा ‘शिवरतन चंद्रातन मोहत्ता’ या भारतीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी बांधला होता.

भारताची शान असलेल्या ‘ताज महाल’ सारखीच प्रेमकथा असलेला ‘मोहत्ता पॅलेस’ बांधतांना काय परिस्थिती होती? कसं आहे या वास्तूचं बांधकाम? कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.

 

tajmahal InMarathi 4

 

१९२७ मध्ये राजस्थानच्या शिवरतन मोहत्ता या व्यवसायिकाच्या पत्नीची प्रकृती ढासळली होती. प्रकृती सुधारण्यासाठी त्यांच्या पत्नीला समुद्र किनारी, तिथला मंद वारा त्वचेला मिळेल अशा पद्धतीने राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.

शिवरतन मोहत्ता यांना अशी जागा आज कराची जवळ असलेल्या ‘क्लिफ्टन’ या ठिकाणी सापडली होती. पत्नीवर प्रचंड प्रेम असलेल्या शिवरतन यांनी ‘क्लिफ्टन’ येथे जागा विकत घेतली आणि अहमद हुसेन आगा या भारताच्या पहिल्या मुस्लिम आर्किटेक्टला जयपूरहून राजवाड्याचा नकाशा तयार करायला बोलावले.

 

clifton karachi inmarathi

 

अहमद हुसेन आगा या आर्किटेक्टने मुघल राजे वापरायचे तसे गिझरीचे पिवळे आणि जयपूरचे गुलाबी खडक वापरून हा राजवाडा बांधण्याचा सल्ला शिवरतन मोहत्ता यांना दिला. शिवरतन मोहत्ता यांना अहमद हुसेन आगा यांनी ‘मोहत्ता पॅलेस’चं तयार केलेलं डिझाईन आवडलं आणि हे भव्य बांधकाम तयार होण्यास सुरुवात झाली.

१८,००० चौरस फूट जागेत बांधलेल्या या राजवाड्यासारखी दुसरी भव्य इमारत पाकिस्तानमध्ये तेव्हाही नव्ह्ती आणि आजही नाहीये. ‘मोहत्ता पॅलेस’मध्ये आत शिरल्यावर सुंदर रंगसंगती वापरलेल्या खिडक्या आणि भिंती नजरेस पडतात.

स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या या जागेच्या पहिल्या मजल्यावर मोठ्या आसनव्यवस्था असलेल्या खोल्या आहेत. तर, दुसऱ्या मजल्यावर एक भव्य हॉल बांधण्यात आला आहे जिथून समुद्राचं विहंगम दृश्य बघायला मिळायचं.

तिथेच मोहत्ता यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आजूबाजूला एकही इमारत नसल्याने त्या काळात ‘मोहत्ता पॅलेस’पर्यंत समुद्राचा मंद वारा नेहमीच पोहोचायचा.

 

mohatta palace inmarathi

 

‘मोहत्ता पॅलेस’च्या दुसऱ्या मजल्यावर कारागिरांनी पाच घुमट असलेल्या बांधकाम प्रकाराचा वापर केला होता ज्यामुळे मोहत्ता यांच्या पत्नीपर्यंत सूर्याचे प्रखर किरण पोहोचायचे नाहीत. या घुमटांवर आतील बाजूने सुंदर चित्राकृती काढण्यास सुद्धा कारागीर विसरले नव्हते. रंगसंगतीची विशेष समज हे मोहम्मद हुसेन आगा यांने केलेल्या कामाचं वैशिष्ट्य होतं.

‘मोहत्ता पॅलेस’च्या सभोवतालचा भाग हा विविध रंगांच्या फुलांनी सजवून हा राजवाडा अजून सुंदर दिसण्यास हातभार लावण्यात आला होता.

शिवरतन मोहत्ता यांनी भव्य ‘मोहत्ता पॅलेस’ची निर्मिती केली. पण, फाळणी नंतर ही निर्मिती पाकिस्तान सरकारच्या डोळ्यात खुपणारी होती.

त्यांनी शिवरतन मोहत्ता यांना हा राजवाडा रिकामा करण्यास सांगितले. शिवरतन मोहत्ता यांना सरकारने दिलेली ही तंबी अजिबात आवडली नाही. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या कुटुंबासह मुंबई गाठली आणि निघतांना ‘मोहत्ता पॅलेस’ची किल्ली त्यांनी सरकारने नियुक्त केलेल्या मॅनेजरला सुपूर्त केली.

“पाकिस्तान सरकारने मला हा राजवाडा मागितला असता, तर मी भेट म्हणून दिला असता. माझ्यावर बळजबरी करण्याची काहीच गरज नव्हती” अशी प्रतिक्रिया शिवरतन मोहत्ता यांनी पाकिस्तान सोडतांना दिली होती. प्रसार माध्यमांना सांगितल्याप्रमाणे मोहत्ता कुटुंबियांपैकी कोणीही परत पाकिस्तानचं तोंड सुद्धा बघितलं नाही.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची बहिणी ‘फातिमा जिना आणि शिरीन जिना’ यांना ‘मोहत्ता पॅलेस’ वापरण्यास पाकिस्तान सरकारने दिला होता.

 

pakistan jinnah inmarathi

 

१९८० मध्ये शिरीन जिना या आपल्या शेवटच्या दिवसात इथेच रहायच्या. त्यांच्या मृत्यूनंतर या इमारतीत आज ‘मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स’चं ऑफिसचं काम सुरू करण्यात आलं होतं. ‘मोहत्ता पॅलेस’ची पुनर्बांधणी करतांना तिथे एक भुयारी मार्ग असल्याचं कारागिरांना लक्षात आलं होतं. शिवरतन यांच्या पत्नीला एक किलोमीटर लांब असलेल्या मंदिरात सुरक्षितपणे जाता यावं म्हणून हा मार्ग बांधण्यात आला होता.

१९९५ मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडून या राजवाड्याची खरेदी केली आणि त्याचं नाव ‘कसर-ए-फातिमा’ हे ठेवण्यात आलं.

शिवरतन मोहत्ता यांच्या मेहनतीने बांधण्यात आलेल्या या राजवाड्याचं नाव आज जरी बदललं असलं तरीही पाकिस्तानातील नागरिक आणि या वास्तूची वेबसाईट ही आजही ‘मोहत्ता पॅलेस’ याच नावाने संबोधली जाते.

‘मोहत्ता पॅलेस’ प्रत्यक्ष जाऊन बघण्याची इच्छा कुणाची असेलच असं नाही, पण निदान सर्व स्त्रियांना शिवरतन मोहत्ता यांच्यासारखी काळजी करणारा पती मिळावा अशी इच्छा व्यक्त करूयात.

 

mohatta palace inmarathi 1

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?