प्रेक्षकांनी टीकेची ‘बरसात’ सुरू करण्याआधीच मालिका ताळ्यावर यायलाच हवी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
सध्या एकंदरच मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्री ही एका विचित्र फेजमधून जात आहे. उत्कृष्ट आणि दर्जेदार कंटेंटचा अभाव हा प्रत्येक चॅनलच्या शोमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मालिकांमध्ये येणारे असंबद्ध सीन असो किंवा बालिशपणे केलं गेलेलं लिखाण असो, सध्या सगळ्याच स्तरातून मराठी सिरियल्सवर टीका होताना आपल्याला दिसत आहे.
फक्त प्रेक्षकच नाहीत तर आता खुद्द इंडस्ट्रीत काम करणारे कलाकारसुद्धा सिरियल्सविषयी उघडपणे बोलू लागले आहेत. रंगकर्मी प्रशांत दामले यांनी त्यांच्या सोशल मीडियावरच्या नुकत्याच टाकलेल्या पोस्टवर एकच कॉमेंट केली जी या चॅनलवाल्यांचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी होती.
प्रशांत दामले यांना त्यांच्या पोस्टवर एका व्यक्तीने कॉमेंट करत एक प्रश्न विचारला की ‘टुकार मालिका कधी बंद होणार?’ यावर प्रशांत दामले यांनी उत्तर दिलं की ‘तुम्ही बघायचं बंद केल्यावर!’
या एका कॉमेंटवरून “त वरून ताकभात” ओळखायला आपण कुणीच मूर्ख नाही. सध्या आपल्या सगळ्यांना हे जाणवतंय की टीव्ही चॅनल्सवर येणाऱ्या मालिका कोणत्या दर्जाच्या आहेत तरी आपला प्रेक्षकवर्ग करमणुकीच्या नावाखाली त्या बघतोय, एंजॉय करतोय आणि सोशल मीडियावर बोंब ठोकतोय पण कुणीच त्या सिरियल्स बघायचं बंद करत नाहीयेत.
–
- “टुकार मालिका प्रेक्षकांमुळेच चालतात…” प्रशांत दामलेंचं सणसणीत प्रत्युत्तर
- तुम्हीच ‘अभिनय’ही करा; ‘मालिका’ तर कुणी पाहतच नाहीये! एक चाहता म्हणतोय, की…
–
याच काही टुकार मलिकांमधली त्यातल्या त्यात sensible आणि चांगली मालिका म्हणजे ‘अजूनही बरसात आहे’! या मालिकेनेसुद्धा इतर मराठी मालिकांप्रमाणे चांगलं टेक ऑफ घेतलं, पण आता या मालिकेचासुद्धा सुर हरवलेला आहे.
उमेश कामत, मुक्ता बर्वे, राजन ताम्हाणे, राजन भिसे, सूहीता थत्ते असे मुरलेले कलाकार आणि काही नवीन चेहेरे घेऊन ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा प्रेक्षकांना थोडं हायसं वाटलं होतं.
एकंदरच झी मराठीच्या जाचाला कंटाळून लोकं कलर्स आणि सोनी मराठीसारख्या चॅनल्सकडे आस लावून बसले होते, आणि त्याच दरम्यान ही सिरियल सुरू झाल्याने लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झालेली, पण आता ही सिरियलसुद्धा इतर सिरियल्सच्या वळणावर जाते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
मुळात या सिरियलचा मुख्य प्लॉट आहे तो मुक्ता बर्वे आणि उमेश कामतच्या भोवती, जुनं रिलेशनशीप वर्क न झाल्याने ते दोघे एकमेकांपासून वेगळे होतात, पण भावनिक गुंतागुंतीमुळे दोघे एकमेकांना विसरू शकत नाही, आणि त्याच आठवणीत दोघेही पुढचे बराच काळ प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टींपासून दूर राहतात आणि स्वतःच्या करियरवर फोकस करतात.
मोठ्या गॅपनंतर दोघेही एकाच वर्कप्लेसमध्ये समोरासमोर येतात, आणि पुन्हा त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, एकाच ठिकाणी काम करत असूनसुद्धा पहिल्यांदा ते दोघेही एकेमकांकडे दुर्लक्षच करायचा प्रयत्न करतात, पण कथेत आलेल्या एका ट्विस्टमुळे हे दोघे पुन्हा एकत्र येतात.
हा ट्विस्ट म्हणजे मीरा (मुक्ता बर्वे) ची बहीण आदिराज (उमेश कामत)च्या भाच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असते, आणि तिला त्याच्या भाच्यामुळे दिवस गेले असतात, तेही कॉलेजमध्ये शिकत असताना.
मुळात हा ट्विस्टच या मालिकेच्या मूळ कथानकाला इतका मारक ठरलाय की या ट्विस्टमुळे सिरियलचा मुख्य टोनच बदलला आहे, म्हणजे भविष्यात आदिराज आणि मीरा हे दोघे येण्यासाठी काही मुख्य कारणांपैकी एक म्हणून हा ट्विस्ट वापरल्यामुळे एकंदरच कथानकाला धक्का लागल्यासारखं वाटतंय.
सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे आता त्याच गोष्टीला सिरियलमधून ग्लोरिफाय केलं जातंय. खूप आधी लग्नाआधीच कॉलेजवयीन मुलीची गर्भधारणा आणि तिचा संघर्ष दाखवणारा प्रीती झिंटाचा ‘क्या केहना’ नावाचा सिनेमा आला होता.
त्यातही हाच मुद्दा उचलला होता, पण त्यामध्ये एक गांभीर्य होतं, भले मेलोड्रामा त्यात ठासून भरला असला तरी त्याच्या मुख्य कथानकाशी तो सिनेमा प्रामाणिक होता आणि बोल्ड विषय अगदी सहज हाताळला गेला होता.
तसाच प्रकार अजूनही बरसात आहेच्या या ट्विस्टमध्ये का दिसत नाही? तरुण मुलीला लग्नाआधीच दिवस जाणे ही गोष्ट खरंतर इतक्या हास्यास्पद रीतीने दाखवली गेली आहे त्यामुळेच त्यातलं गांभीर्य हरवल्यासारखं वाटतंय.
मुळात हा विषय कोणासाठी अगदी कॅज्यूअल वाटतो तर काही लोकांसाठी हा विषय नाचक्कीचा असतो. पण आपण कुणाला काय वाटतं ते ठरवू शकत नाही, आणि या सिरियलच्या या ट्विस्टमधून नेमकं तेच केलं जातंय.
घरच्यांचे विचार कीती मागासलेले असतात, घरच्यांना कशापद्धतीने व्हिलन केलं जातं, अशा परिस्थितीत पालकांनीच मुलांना समजून घेतलं पाहिजे, असे अनेक टोचन देत त्या मुलीच्या गरोदरपणाला जस्टीफाय या सिरियलमधून केलं गेलं आहे.
–
- ‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर
- ‘झी मराठी’च्या बालिश मालिकांमधील या फालतू चुका म्हणजे बावळटपणाचा कळसच!
–
जर घरातली कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलीने लग्नाआधीच गरोदर असल्याचं तिच्या घरी सांगितलं तर कोणत्याही सामान्य घरातली वडीलधारी मंडळी कशी व्यक्त होतील याचा सारासार विचार हे लेखक का करत नाहीत?
बरं एवढं समजल्यावर तिच्या घरचे त्या मुलाच्या घरी अनाहूतपणे कोणाचातरी वाढदिवस साजरा करायला का जातील? या गोष्टी सर्वसामान्य घरातही होतात पण त्या कशाप्रकारे हाताळल्या जातात याचं निरीक्षण किंवा अभ्यास लेखकाने करायला नको का?
अशा प्रकरणाबाबतीत आई वडील हे कायम चुकीचेच रीअॅक्ट होतात असं नाहीये, सर्वसामान्य घरातल्या आई वडिलांनासुद्धा चांगलीच जाण असते, त्यामुळे या सगळ्या बाबतीत सिरियलमध्ये पालकांना वाईट दाखवून या लोकांना काय मिळतं हे मला अजूनही समजलेलं नाही.
सध्याच्या ओटीटी विश्वात लग्नाआधी गरोदर असणं हा तसा सौम्य मुद्दा आहे, पण ते दाखवताना काहीतरी सीरियसनेस दाखवाल की नाही? सध्या सगळेच पुढारलेल्या विचारांचे झाले आहेत त्यामुळे असे विषय प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील पण प्रेक्षकांना मूर्खात काढणं मालिकांना आणि टीव्ही चॅनल्सनी थांबवावं असं मला प्रकर्षाने जाणवतं!
आणि मुळात मीरा आणि आदिराज हे एकमेकांच्या पुन्हा संपर्कात येण्यासाठीच्या कैक कारणांपैकी एक कारण हे गरोदरपणाचं असेल तर तो मुद्दा इतका ताणू नये असं मला वाटतं.
–
हा मुद्दा लवकरात लवकर गुंडाळून मूळ मुद्द्यावर या सिरियलचं कथानक यावं अशी आशा आहे, कारण ट्रेलरमध्ये जे दाखवलं त्यापेक्षा भलतीकडेच ही सिरियल झुकायला लागली आहे. त्यामुळे जे खऱ्या अर्थाने काहीतरी उत्तम कंटेंट बघू इच्छितात त्यांच्याशी प्रतारणा होत असल्याने या सिरियलचंसुद्धा ये रे माझ्या मागल्या व्हायला लागलं आहे.
हेच जर सुरू राहिलं तर टेलिव्हिजनवरची एकमेव चांगली सिरियलसुद्धा लोकांच्या हीटलिस्टवर येईल. मुळात या सिरियलमधले कलाकार हे कलाक्षेत्रातले उत्कृष्ट कलाकार असून त्यांच्याकडेच बघून लोकं ही सिरियल मनापासून बघतायत.
कलाकारांच्या कामात काहीच खोट काढता येणार नाही, पण लेखकाने नक्कीच या सगळ्या बाबींचा विचार करून हे कथानक रुळावर आणायला हवं, नाहीतर झी आणि सोनी यांच्या एकत्र येण्याचासुद्धा या सिरियलला काहीच फायदा होणार नाही, आणि प्रेक्षक याकडे पूर्णपणेच पाठ फिरवतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.