' रश्मी रॉकेटच्या ट्रेलरमुळे खेळाडूंच्या होणाऱ्या ‘लिंग तपासणी’मागचं उलगडलेलं रहस्य! – InMarathi

रश्मी रॉकेटच्या ट्रेलरमुळे खेळाडूंच्या होणाऱ्या ‘लिंग तपासणी’मागचं उलगडलेलं रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘रश्मी रॉकेट’ नावाचा तापसी पन्नूचा नवीन सिनेमा येतोय. आपल्या अभिनयाच्या जोरावर ही अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट मिळवते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. तापसी पन्नूचा प्रत्येक चित्रपट हा केवळ दिगदर्शकाचा सिनेमा न वाटता ‘तापसी’चा सिनेमा वाटतो हीच तिच्या दमदार अभिनयाची पावती म्हणावी लागेल.

२३ सप्टेंबरला या सिनेमाचं ट्रेलर लाँच झालं आणि इंटरनेटवर या विषयी चर्चेला उधाण आलं आहे. तापसी पन्नू या सिनेमात एका महिला खेळाडूचा रोल करणार आहे. भारताच्या बदलू पहाणाऱ्या तरी प्रामुख्याने पुरषप्रधान असलेल्या संस्कृतीत या महिला खेळाडूला घरातील व्यक्तींचा होणारा विरोध, समाजातील लोकांचे सहन करावे लागणारे टोमणे आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी आणि तेव्हा होणारी लैंगिक चाचणी हा प्रवास रश्मी रॉकेट मधून दाखवण्यात आला आहे.

 

rashmi rocket inmarathi

 

सत्य परिस्थिती, घटनेवर भाष्य करणारा हा विषय दिगदर्शकाने ताकदीने हाताळला आहे असं सिनेमाच्या ट्रेलरवरून जाणवत आहे.

डोपिंग टेस्ट किंवा लैंगिक चाचणीत एखादी खेळाडू बाद झाली अशा बातम्या आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो. पण, हे खेळाडू लैंगिक चाचणीत बाद होतात म्हणजे नेमकं काय होतं? याची माहिती आपल्यापैकी फार कमी जणांना असेल.

लैंगिक चाचणीत बाद झाल्यावर एखाद्या महिला खेळाडूला किती मानसिक त्रास होत असेल याचाही साधा विचार भारताची किंवा जागतिक ऑलम्पिक समिती कधी विचार करत नाही. लैंगिक चाचणीत बाद झालेल्या कित्येक खेळाडूंचं करिअर हे तिथेच संपतं. तेव्हा त्यांच्याकडे कोणताही पत्रकार मुलाखत घेण्यासाठी जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

लैंगिक चाचणीत महिला खेळाडू का बाद होतात ?

अँड्रोजेन नावाचा एक हार्मोन आहे जो पुरुषांमध्ये आढळून येतो. या हार्मोन्स मुळे पुरुषांची छाती ही सपाट असते, आवाज पुरुषी असतो. अँड्रोजेन हा हार्मोन ‘टेस्टोस्टेरॉन’ या हार्मोनचा एक अंश आहे.

अँड्रोजेन हा प्रामुख्याने पुरुषांमध्येच आढळला जातो. पण, त्याचे काही अंश हे महिलांमध्ये सुद्धा सापडत असतात.

androgens inmarathi

 

कोणत्याही महिला खेळाडूला जेव्हा एखाद्या स्पर्धेसाठी पात्र ठरवलं जातं तेव्हा त्या खेळाडूला रक्ताची चाचणी द्यावी लागते. रक्ताची चाचणी करत असतांना महिला खेळाडूंच्या रक्तात ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण किती आहे हेसुद्धा तपासलं जातं.

या तपासणीत जर ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण अधिक आढळलं तर त्या खेळाडूची डीएनए तपासणी केली जाते. हे चक्र इथेच थांबत नाही. महिला खेळाडूंची ‘गायनॅक टेस्ट’, गुप्तांग तपासणी केली जाते. महिला खेळाडूमध्ये पुरुषत्वाचा काही अंश आहे का? हे तपासणं हा सर्व तपासण्यांचा उद्देश असतो.

जर, तो अंश अधिक प्रमाणात आढळला तर त्या महिला खेळाडूंना ‘इंटरसेक्स’ हे नाव दिलं जातं आणि त्यांना या चाचणीत बाद केलं जातं. रश्मी रॉकेटमधील नायिका ही हार मान्य करत नाही आणि या टेस्ट विरोधात न्यायालयात धाव घेते असं प्रतीत होत आहे.

काही स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंचा प्रवास हा केवळ ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण अधिक असल्यानेसुद्धा संपुष्टात येतो. खेळाडूंच्या या शारीरिक स्थितीला मेडिकल भाषेत ‘हायपरअँड्रॉग्निझम’ हे नाव देण्यात आलं आहे.

शरीराच्या या स्थितीत महिलांच्या चेहऱ्यावर केस येतात आणि त्यांचा आवाज सुद्धा जाड होतो. चेहऱ्यावर व्रण उमटतात. हा आजार असलेल्या महिलांना गरोदरपणातसुद्धा त्रास होण्याचा संभव असतो.

‘रश्मी रॉकेट’ ही सत्यकथा आहे का?

ट्रेलरच्या सुरुवातीला असं सांगण्यात आलं आहे की, ही कथा त्या सर्व महिला खेळाडूंची आहे ज्यांना ‘जाचक लैंगिक चाचणी’ला सामोरं जावं लागतं. सिनेमातील नायिका रश्मीची कथा ही ‘दुती चांद’या महिला खेळाडूची कथा असल्याचा भास होत आहे.

 

dutee chand inmarathi

 

२०१४ मध्ये दुती चांद या महिला खेळाडूने एशियन ज्युनियर अथेलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये २ सुवर्ण पदक देशाला मिळवून दिले होते. तपै मध्ये झालेल्या या स्पर्धेत १०० मीटर आणि ४०० मीटर ‘रिले रेस’मध्ये हे यश दुती चांद यांनी मिळवलं होतं.

त्याच वर्षी ग्लासगोमध्ये होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’ साठी दुती चांद यांना या जाचक लैंगिक चाचणीला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यात त्यांना ‘हायपरअँड्रॉग्निझम’ मुळे बाद करण्यात आलं होतं. त्याच वर्षी झालेल्या ‘एशियन गेम्स’ मध्ये भाग घेण्यास सुद्धा दुती चांद यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

दुती चांद यांनीसुद्धा अथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अथेलेटिक्स फेडरेशनविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी २०१५ हे वर्ष उजाडलं होतं.

‘हायपरअँड्रॉग्निझम’चा दुती चांद यांच्यावर लावलेला आरोप हा मागे घेण्यात आला होता. या घटनेनंतर दुती चांद यांनी मैदानावर परत खेळण्यास सुरुवात केली आणि २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये दुती चांदने २ रौप्यपदक भारतासाठी जिंकले होते.

 

dutee chand 2 inmarathi

 

दुती चांद यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना असं म्हंटलं होतं की, “माझ्यावर जेव्हा मुलगा असल्याचे आरोप झाले तेव्हा माझ्या आईला सर्वात जास्त त्रास झाला होता. कारण, तिने त्याआधी ‘हायपरअँड्रॉग्निझम’चं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. आमच्या शेजाऱ्यांनी ही गोष्ट आईला इतकंच सांगितलं होतं की, तुमची मुलगी ही मुलगा असल्याने तिला स्पर्धेतून बाहेर काढण्याचं ठरवण्यात आलं आहे.”

दुती चांद यांच्या कुटुंबाला त्यावेळी तिचं लग्न होईल का? रेल्वेतील नोकरी टिकून राहील का? अशा असंख्य प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं.

खेळाचे नियम काय सांगतात ?

दुती चांद यांच्यासोबत झालेल्या घटनेनंतर १ नोव्हेंबर २०१८ रोजी नियमात सुधारणा केली आणि आंतरराष्ट्रीय खेळात सहभागी होण्यास इच्छुक आणि पात्र महिला खेळाडूंना आपल्या ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण ५ एनमॉल प्रति लि इतकं ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

हे साध्य करण्यासाठी खेळाडूंना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

खेळाडूंची ‘शारीरिक क्षमता’ हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. १९३८ मध्ये डोरा रेजन यांनासुद्धा याच वादात अडकून आपल्या करिअरची काही वर्ष गमवावी लागली होती.

 

athelets inmarathi

 

महिला खेळाडूंची परीक्षा ही केवळ त्यांच्या खेळावरून केली जावी आणि त्यांच्या खासगी, अंतर्गत गोष्टींचा आदर केला पाहिजे इतकीच इच्छा आपण सामान्य नागरिक म्हणून व्यक्त करू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?