' भारत आणि तालिबानमधील संघर्ष अटळ आहे का? काय म्हणतायत अविनाश धर्माधिकारी – InMarathi

भारत आणि तालिबानमधील संघर्ष अटळ आहे का? काय म्हणतायत अविनाश धर्माधिकारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये ‘इस्लाम’ ध्वज फडकला आणि काहीशा सुस्तावलेल्या, किंवा झोपेचं सोंग घेतलेल्या जगभरातील सगळ्या सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ‘न भुतो न भविष्यति’ असे आक्रमण दुरून पाहणाऱ्या अनेक देशांनी अफगाणिस्तानला सहानुभुती दिली, काहींनी चक्क सुधारणेच्या मार्गावर चाललेल्या तालिबान्यांचीही पाठ थोपटली मात्र अवघ्या काही दिवसांत माध्यमांच्या ब्रेकिंग न्यूजपासून सामान्यांच्या स्मरणशक्तीपर्यंत सगळीकडूनच हा विषय आपोआप मागे पडला.

तालिबानची नवी राजवट, त्यातील जाचक नियम, अफगाणिस्तानमधील नागरिकांवरील जुलूम या सगळ्या प्रश्नांकडे ति-हाईत नजरेने बघताना भारत पर्यायाने आपण सगळेच बेसावध झालोय का? या प्रकरणात सध्या भारताची भुमिका नसली तरी देशाच्या भविष्यासाठी ही धोक्याची घंटा तर नव्हे? अशा अनेक प्रश्नांचा अभ्यापूर्ण खुलासा केला आहे सनदी अधिकारी, अभ्यासक अविनाश धर्माधिकारी यांनी!

 

avinash inmarathi

 

आपल्या नव्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी या परिस्थितीचे वास्तव मांडले आहे.

आक्रमणांच्या वेशीवर उभ्या असलेल्या भारत देशाला भविष्यातील संकट ओळखून त्यातून मार्ग काढायचा असेल तर इतिहास आणि सध्याच्या धगधगता वर्तमान यांच्याकडे उघड्या डोळ्यांनी आणि तितक्याच कुशाग्र बुद्धीने पाहण्याची गरज आहे.

तो योगायोग नाहीच…

तालिबानने अफगाणवर ज्या दिवशी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करणारा भारत आणि दुसरीकडे कल्पनेहूनही भयावह परिस्थितीला तोंड देणारा अफगाणिस्तान! प्रत्यक्षात या तारखेकडे कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही, अनेकांनी केवळ योगायोगाचं नाव देत हा मुद्दा दुर्लक्षित केला, मात्र अविनाथ धर्माधिकारी यांच्या मते १५ ऑगस्ट या दिवशीच इस्लामचा कलमा काबुलमध्ये फडकला हा निव्वळ योगायोग नाही.

 

afganistan inmarathi

 

या तारखेचं गणित म्हणजे भारताविरुद्ध पद्धतशीरपणे आखण्यात आलेला प्लॅन आहे, हे स्पष्ट करताना अविनाश धर्माधिकारी यांनी दोहा येथिल मिटिंगचे उदाहरण दिले आहे.काही दिवसात सत्ता काबीज करणं हे एकट्या तालिबानी शक्तीला जमणं शक्य नाही, तर यामागे शिजणारं अमेरिकेचं राजकारण नजरेआड करता येणार नाही.

काही महिन्यांपुर्वी कतारची राजधानी दोहा येथिल अंतरराष्ट्रीय परिषदेला अमेरिकेकडून अफगाणिस्तानला निमंत्रण नव्हतं, भारतालाही या परिषदेपासून दूर ठेवण्यात आलं होतं पण आश्चर्याची बाब ही की या परिषदेसाठी पाकिस्तान, चीन या देशांनी मात्र आवर्जून हजेरी लावली होती. याचेच प्रतिक म्हणजे १५ ऑगस्ट या तारखेलाच घडलेला हा रक्तरंजित इतिहास हा केवळ योगायोग नसून अमेरिकेने तालिबानला अफगाणिस्तान हे चांदीच्या ताटात, रशमी वस्त्रात देऊ केलेलं आंदण आहे असंही अविनाश धर्माधिकारी स्पष्ट करतात.

 

america inmarathi
republic world

 

इस्लामी अतिक्रमणासाठी १५ ऑगस्ट हीच तारीख निवडणं ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे, कारण पाकिस्तानच्या सैन्याकडून तालिबान्यांना सर्वतोपरी होणारी मदत हे उघड सत्य आहे. एरव्ही खुलेआम कारवाया करणाऱ्या पाकला आता आणखी नवे गट जोडले गेल्याने ‘भारत’ हे त्यांचं लक्ष नसेल अशी अपेक्षा करणंही गैर आहे

भितीदायक त्रिकूट

“स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा धोका” असं म्हणत अविनाश धर्माधिकारी हे या घटनेतील तीव्रता मांडण्याचा प्रयत्न करतात. स्वैराचार करणारं तालिबान, छुपा पाठिंबा देणारं पाकिस्तान आणि या दोघांना आर्थिक बळ देणारं चीन या नव्या त्रिकूटाचं आव्हान भविष्यात भारतासमोर उभं ठाकणार यात शंका नाही.

इस्लामवादाची आग भडकवणारं चीन हे नव्याने स्थापन झालेल्या तालिबानी राजवटीला खुली मान्यता देणारं, आर्थिक व्यवहारांसाठी मैत्रीचा हात पुढे करणारं जगातील पहिलं राष्ट्र ठरलं, तेंव्हाच अनेक राष्ट्रांसाठी सावधतेची भुमिका घेतली.

 

flags inmarathi

 

अमेरिकेचे अपयश की…

या घटनेतील अमेरिकेच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना अविनाश यांनी इतिहासावर नजर टाकली आहे.

९ सप्टेंबर २००१ अल् कायदाने ४ विमानांचं अपहरण करत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेला हल्ला आणि त्यानंतरचा इतिहास आजही जग विसरलेला नाही. जाणकारांच्या मते, चौथे विमान हे थेट व्हाईट हाऊसवर धडकवून अधिक घातपाताचा प्रयत्न होता, मात्र विमानातील प्रवाशांच्या हुशारीमुळे हा धोका टळला.

 

attack inmarathi

 

या घटनेमुळे पेटून उठलेल्या अमेरिकेने तालिबान्यांकडे ओसामा बिन लादेनची मागणी केली, मात्र धर्मांध तालिबान्यांनी त्याला नकार दिल्याने अखेरिस ७ ऑक्टोबरला अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तालिबान राजवट विरघळली मात्र संघर्ष थांबला नाही.

वीस वर्षांच्या संघर्षात अमेरिकेला आलेले अपयश, तालीबानी अर्थव्यवस्थेच्या पाठीशी उभं राहिलंल चीन, अफु, ड्रग्सच्या बळावर अमेरिकेवर मात करण्यामुळे आलेला आत्मविश्वास ही सगळीच पार्श्वभुमी भारतासाठी धोकादायक ठरणार असल्याचं धर्माधिकारी सांगतात.

नव्या महासत्तेचा उदयही धोक्याचाच!

तालिबान्यांसमोर टिकाव न धरू शकलेली अमेरिकन सुरक्षा पुन्हा मायदेशी परतली, मात्र या घटनेचे दुरगामी परिणाम दिसतील असेही धर्माधिकारी स्पष्ट करतात. कारण जगातील एकमेव महासत्तेच्या पोटावर पाय देत चीन या नव्या महासत्तेचा जन्म होऊ घातला आहे.

 

taliban china featured inmarathi

 

अविनाथ धर्माधिकारी अफगाणिस्तानसाठी ‘साम्राज्यांचं स्मशान’ ही संकल्पना वापरतात.

अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.

जगाला वेठीस धरलेल्या ‘तालिबान’च्या जन्माचा इतिहास… एक दाहक वास्तव!

त्या आगीची धग भारताला

यापुर्वी १९ व्या शतकात अमेरिकेप्रमाणे महासत्ता असलेल्या ब्रिटननेही अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला त्यानंतर विसाव्या शतकात सोव्हिएत रशियानेही माघार घेतली मात्र त्यानंतर २४ तासांत काश्मीर खो-यातील लष्करी कारवायांना बळ आलं हे उदाहरणंही विसरून चालणार नाही.

पहिल्या पत्रकार परिषदेत काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचा कांगावा करणा-या तालिबान्यांनी हे शब्द हवेत विरण्यापुर्वीच काश्मिर सहित जिथे जिथे इस्लाम धर्म आहे, तिथे त्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा अधिकार असल्याचा दावा करणं म्हणजे दावा म्हणजे भारतासमोरील धगधगत्या भविष्याची ठिणगी पेटवण्यासारखं आहे.

 

taliban 2 inmarathi

 

या निमित्ताने अधिक मजबूत झालेलं चीन – पाकिस्तान यांच्यातील मैत्रीच्या नात्याचा समान धागा म्हणजे भारताशी असलेलं शत्रुत्व! त्यामुळे तालिबान, चीन, पाकिस्तान अशा तिन्ही आघाड्यांवर  ‘भारता, सज्ज हो’ अशी हाक देण्याशिवाय पर्याय नाही.

धोकादायक बावळटपणा

अविनाश धर्माधिकारी यांनी भारतीय मिडीया, काही जाणकार यांच्या मानसिकतेवरही तोफ डागली आहे.  भारतातील अनेक माध्यमं, जाणकार हे तालिबान्यांचं मुखपत्र असलेल्याप्रमाणे तालिबान्यांची चांगली बाजू दाखवत आहेत. मात्र  असं करणं म्हणजे धोकादायक बावळटपणा असल्याचं मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं आहे.

तालिबान बदलला नाही, कधीही बदलणारही नाही फक्त आपण अतिचांगुलपणाने त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलावी असा सल्लाही ते देतात.

जाणकारांच्या मते इस्लामी धर्म असलेल्या तालिबान्यांची प्रमुख ३ उद्दिष्ट्य आहेत. जगभर मुस्लिमेतर वर्चस्व मोडीत काढणं,  इस्लामी जग एकाच राजकीय छताखाली आणणं आणि मुस्लिम धर्माचा प्रचार! ही तिन्ही उद्दिष्ट्य साध्य करताना भारत आणि तालिबान यांच्यातील संघर्ष अटळ आहे.

 

taliban inmarathi

 

भारताला जो धोका परकीय शक्तींकडून आहे, त्यापेक्षा कैक पटीने अधिक तो देशांतर्गत संघटनांकडून आहे. ‘घर का भेदी’ ठरणाऱ्या अनेक संघटनांवर अटकाव करणं गरजेचं आहे. गंगेच्या खोऱ्यातील गझवा ए हिंद या लढाईत पाकिस्तानचा तालिबान्यांना पाठिंबा असणं हे भारतासाठी सर्वात मोठं संकट आहे.

तालिबानच्या नव्या कॅबिनेटमधील तब्बल १७ जणं युनाटेड नेशन्सने जाहीर केलेले दहशतवादी आहेत, यावरूनच भविष्यात घडणा-या संकटांच्या मालिकेचा अंदाज घेता येऊ शकतो.

भविष्यातील या संकटांसाठी अमेरिकेचा भरवसा बाळगणं योग्य नाही असेही धर्माधिकारी सुचवतात. अमेरिकेचा दुटप्पीपणा भारतासाठी नवा नाही, चीनविरोधात युती करणा-या अमेरिकेने ‘क्वॉड’ ची मदत घेतली. वेळोवेळी भारताकडेही मदत मागितली, मात्र भारताला मदत करण्याकडे अमेरिकेने वेळोवेळी कानाडोळा केला आहे.

तालिबान केवळ अफगाणिस्तानात नाही तर भारतात सगळीकडे आपले अस्तित्व टिकवून आहे, किंबहूना हाच सर्वात मोठा धोका आहे. खोऱ्यांमध्ये दडलेले त्यांचे पुरस्कर्ते,  विद्यार्थी दहशतवादी संघटना, केरळमधील पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया यांसह भारतात २०० पेक्षा जास्त पाकिस्तानचे हेर आपल्याच देशविरोधी कारवायात व्यस्त आहेत, त्यामुळे केवळ शस्त्रांनी हा धोका टळणार नाही तर भारतातील त्याची वैचारिक मुळं उघडून टाकली गेली पाहिजे.

 

taliban inmarathi

 

युद्ध जिंकण्यासाठी शत्रुला हरवण्याची क्षमता आणि त्यापेक्षाही जास्त त्यांची मनस्थिती खच्चीकरण करणं गरजेचं असून इस्लामी धर्मांध लोकांचा वैचारिक पराभव केल्याशिवाय भविष्यातील धोका टळणार नाही असंही ते सुचवतात. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही हे भविष्यातील युद्ध जिंकण्यासाठी भारताला अर्थकारण, लष्कर, जीवनशैली, वैचारिक धोरण आणि लोकशाही अशा अनेक पातळ्यांवर बळकटी देणं गरजेचं आहे.

प्रत्येक सामान्य नागरिक ते केंद्रातील प्रत्येक पदावरील व्यक्ती या सगळ्यांनी एकत्र येत बदल आज, या क्षणापासून हा बदल घडवला तरच भविष्यात तालिबान्यांशी दोन हात करणं भारताला शक्य होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?