' डॉक्टर/इंजिनियर नाही तर या कुटुंबाने हे ‘पिढीजात प्रोफेशन’ निवडलंय, कारण… – InMarathi

डॉक्टर/इंजिनियर नाही तर या कुटुंबाने हे ‘पिढीजात प्रोफेशन’ निवडलंय, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही सेवाकार्य ही पिढीजात सुरू असतात. त्यापैकी, सामान्यतः आढळणारी प्रोफेशन्स म्हणजे, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियरचा मुलगा इंजिनियर किंवा सीएचा सीए वगैरे वगैरे.

हे असं होणं म्हणजे, त्या कुटुंबातील लोकांच्या बुद्धीचा कल हा त्या क्षेत्राकडे आकर्षित असतो असं म्हणता येईल. पण एखाद्या खेळाडूचा, अभिनेत्याचा किंवा एखाद्या वाहन चालकाचा मुलगा तेच क्षेत्र निवडेल अशी शक्यता कमी असते.

 

stethoscope inmarathi

 

भसीन कुटुंबाची कहाणी…

दिल्लीतील ‘भसीन’ कुटुंब हे या बाबतीत अपवाद आहेत. त्यांची सलग तिसरी पिढी ही सध्या पायलट आहे. आज त्यांच्या घरात असलेले सगळेच लोक इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट आहेत. काही दिवसांनी त्यांनी “इथे पायलट राहतात” अशी पाटी लावली तरीही त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींना त्याचं आश्चर्य वाटणार नाही.

एकच आवड, एकच वेड ‘भसीन’ कुटुंबाच्या प्रत्येक माणसात कसं असेल? की, भसीन कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती ही पुढच्या पिढीला पायलट होण्यासाठी सक्ती करत असतील? जाणून घेऊयात.

 

pilot inmarathi

१९५६ मध्ये कॅप्टन जयदेव भसीन यांनी सर्वप्रथम इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ३० वर्ष आपली नोकरी करून ते १९८६ मध्ये ‘सिनियर पायलट’ या पदावरून सेवानिवृत्त झाले.

कॅप्टन जयदेव भसीन यांचा मुलगा रोहित भसीन हा सध्या एअर इंडियामध्ये ‘सिनियर कमांडर’ म्हणून कार्यरत आहे. ३० वर्षांपासून ते एअर इंडिया सोबत काम करत आहेत.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी माननीय माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या प्रत्येक विदेश दौऱ्यांच्या वेळी त्यांनी विमान चालवलं आहे.

 

rohit bhasin inmarathi

 

रोहित भसीन यांच्या पत्नी ‘निवेदिता’ यासुद्धा एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जेव्हा एअर इंडियासाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्या पूर्ण भारतातून पायलट होणाऱ्या केवळ तिसऱ्या महिला पायलट होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी दोन वेळेस ‘फक्त महिला क्रू’ असलेल्या विमानाचं नेतृत्व केलं आहे.

२०१८ मध्ये रोहित आणि निवेदिता भसीन यांचा मुलगा रोहन भसीन हा एअर इंडियामध्ये ‘कमांडर’ म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. रोहन ‘बोईंग ७७७’ हे विमान चालवत असतात.

कमांडर रोहन भसीन यांची बहीण ‘निहारिका’ ही सुद्धा पायलट आहे. फरक इतकाच आहे की, निहारिका या ‘इंडिगो एअरलाईन्स’ सोबत काम करत असतात.

भसीन कुटुंबातील व्यक्तींनी भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या विमानाचं सारथ्य केलं आहे. विमान चालवण्याचा इतका अनुभव असलेलं भसीन हे भारतातील एकमेव कुटुंब आहेत.

 

bhasin family inmarathi

 

रोहितची इच्छा वेगळीच होती

एकसारखी विचारसरणी असलेल्या भसीन कुटुंबात केवळ रोहित भसीन याला ‘टेनिसपटू’ होण्याची इच्छा होती. पण, एक दिवस जयदेव भसीन हे रोहितला आपल्यासोबत ‘चेन्नई ते सिंगापोर’ या फ्लाईटमध्ये गेले आणि तो अनुभव घेतल्यावर रोहितचा विचार बदलला.

एअरबस ए-३०० च्या कॉकपिटमधून केलेला हा प्रवास रोहित याला प्रचंड आवडला आणि त्याने ‘बोईंग ७४७’ हे त्या काळातील जगात असलेलं सर्वात मोठं विमान चालवण्याचं स्वप्न बघितलं. उघड्या डोळ्यांनी बघितलेलं हे स्वप्न रोहित भसीन यांनी लवकरच पूर्ण केलं.

१९८५ मध्ये रोहित आणि निवेदिता भसीन यांची कोलकत्ता येथील ‘फोकर एअरक्राफ्ट’ या कंपनीमध्ये ‘ट्रेनी पायलट’ म्हणून काम करत असतांना ओळख झाली. ‘विमान उडवणे’ ही सारखीच आवड असलेले दोघेही लवकरच प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.

लग्नानंतर निवेदिता भसीन यांनी नोकरी सोडून देण्याचा विचार केला होता. पण, त्यांचे सासरे जयदेव भसीन यांनी असं करण्यास नकार दिला. एअर इंडिया सोडून इतर दुसऱ्या एअरलाईन्स सोबत सुद्धा काम करण्यासाठी जयदेव भसीन यांचा स्पष्ट विरोध होता.

 

air india inmarathi

 

विमान चालवण्याबद्दल जयदेव भसीन यांनी आपल्या कुटुंबियांना दिलेल्या या टिप्स, सर्वांसाठीच अगदी दैनंदिन जीवनातही उपयुक्त आहेत;

१. आपल्या फिटनेसवर नेहमी काम करत रहा.
२. फ्लाईटवर जाण्याआधी तुमची झोप पूर्ण करा.
३. तुमच्यातील सर्व मतभेद जमिनीवरच सोडून द्या.
४. हवामानाचा, वातावरणाचा आदर करा.

सक्ती झाली नाही

रोहित आणि निवेदिता भसीन यांनी आपली आवड आपल्या मुलांवर कधीच लादली नाही. निहारिका भसीनने आपल्या वडिलांकडे बघून पायलट होण्याचं ठरवलं. वडिलांचा वैमानिकाचा गणवेश परिधान करणं, टोपी घालणं हेच निहारिका यांच्यासाठी लहानपणी या क्षेत्राची आवड निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं.

 

pilot uniform inmarathi

पायलटचं प्रशिक्षण घेण्याआधी कॉकपीटमध्ये बसण्याची संधी ही त्या चौघांपैकी फक्त रोहन भसीनला प्राप्त झाली होती. आज रोहन, निवेदिता आणि निहारिका हे एअर इंडिया, कोलकत्तासाठी काम करतात तर रोहित भसीन एअर इंडिया, दिल्लीसाठी ‘सिनियर कमांडर’ आहेत.

निहारिका भसीन या लवकरच इंडिगोमधील पायलटसोबत विवाह बंधनात अडकणार आहेत आणि भसीन कुटुंबाची परंपरा पुढे सुरू ठेवणार आहेत.

“भसीन कुटुंबीय हे एकमेकांना एअरपोर्टवरच भेटतात का?” असा प्रश्न बरेच लोक त्यांना विचारत असतात. पण, भसीन कुटुंबीय म्हणतात, की महिन्यातील एक आठवडा तरी एकमेकांसोबत घरी राहता येईल असं नियोजन ते दर महिन्याला करत असतात.

एका कुटुंबातील व्यक्तींनी मिळून एकूण १०० वर्षांपेक्षा अधिक विमान चालवण्याचा अनुभव भसीन कुटुंबाकडे आहे. येणाऱ्या पिढीला या अनुभवाचा फयदा होवो आणि ‘पायलट फॅमिली’ हा ट्रेंड सुरू राहो अशी आशा करूया.

 

bhasin family inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?