जेव्हा २०० दलित महिलांनी भर कोर्टात एका नराधमाला यमसदनी धाडलं…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘महिला सशक्तीकरण’ ही मोहीम तळागाळात नेण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्ष वाट बघावी लागली हे आपलं दुर्दैव आहे.
ज्या देशात सावित्रीबाई फुले, शिक्षण महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी आयुष्य वेचलं तिथे महिला आजही पूर्णपणे शिक्षित आणि सुरक्षित आहेत का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना नेहमीच त्यांची जागा निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. मग, ती जागा घरात असो किंवा लोकलमध्ये किंवा संसदेमध्ये.
मान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र त्या काहीही करू शकतात हे मात्र आपल्याला इतिहासाने दाखवून दिलं आहे.
दुर्गा जेव्हा कालिमाता बनते तेव्हा ती राक्षसाचा खात्मा करतेच अशी एक घटना २००४ मध्ये नागपूर येथे घडली आहे. त्या घटनेबद्दल या लेखात सांगत आहोत. या घटनेतील राक्षसाचं नाव आहे ‘अक्कु यादव’.
काय झालं होतं?
अक्कु यादव – नराधम हा शब्द ज्याला कमी पडेल इतका नीच असलेल्या या व्यक्तीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या २०० महिलांवर बलात्कार केला होता. हे वाचून तुमचीसुद्धा तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचणार हे नक्की.
पोलीस, प्रशासन हे शब्द काय फक्त सामान्य, चाकरमान्या माणसांसाठीच आहेत का? हा विचार अक्कु यादवसारख्या लोकांबद्दल माहिती मिळाली की लगेच येतो.
१३ ऑगस्ट २००४ पर्यंत हा अक्कु यादव पोलिसांच्या तावडीतसुद्धा सापडत नव्हता इतकं त्याने आपलं जाळं घट्ट केलं होतं. ३ खून आणि शेकडो तरुण मुलींचा विनयभंग करून ही व्यक्ती भारतभर भ्रमण करत होती ही खरंतर आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील कस्तुरबानगरमध्ये राहणारा कालीचरण उर्फ अक्कु यादव हा खेड्यात राहणाऱ्या महिलांवर अत्याचार करायचा ज्या पोलिसांकडे गेल्या तरीही नीट बोलू शकणार नाहीत.
–
- विवाहापूर्वी पत्नीवरील अत्याचाराचा छडा लावण्यासाठी झुंजणा-या लढवय्या पतीची कथा
- CBI ने मृत घोषित केलेली स्त्री चक्क कोर्टात हजर झाली आणि …
–
सिनेमातील पोलीस जसे लोकांशी विचित्र वागतांना दाखवतात तसेच ते अक्कु यादवच्या दुष्कृत्यामुळे पीडित झालेल्या महिलांसोबतसुद्धा वागले. कित्येक महिलांची तक्रार नोंदवून न घेणे, तक्रार करायला आलेल्या व्यक्तीवरच संशय घेणे हे त्या भागात सर्रास घडत होतं.
लहान मुलींना पळवून नेणे, त्यांना धमकावून त्यांचं शारीरिक शोषण करणे, सामूहिक बलात्कार करणे असे गलिच्छ प्रकार अक्कु यादवने पोलिसांना वेळोवेळी पैसे चारून कित्येक वर्ष सुरू ठेवले होते.
प्रत्येकवेळी अक्कु यादव विरुद्ध तक्रार आली, की पोलीस त्याला सतर्क करायचे आणि तो कधीच कोठडीत जायचा नाही. “माझी तक्रार केली तर मी अॅसिड हल्ला करेन, कुटुंबाला इजा पोहोचवेल” अशी धमकी अक्कु पीडित महिलांना द्यायचा.
दहा वर्ष अशीच गेली. अक्कु यादवचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही असा समज त्याने समाजात पसरवला होता. पण, एक ना एक दिवस, या महिलाच त्याचा अंत करतील हे त्याच्या लक्षात येत नव्हतं.
नारीशक्ती:
उषा नावाच्या एका महिलेने पुढे येऊन अक्कु यादवच्या कृत्यांबद्दल बोलण्याचं धाडस दाखवलं आणि गोष्टी पुढे सरकल्या. उषाने आपल्या दिराला अक्कु यादवच्या कृत्यांबद्दल सांगितलं आणि ते दोघेही सतत घडणारा हा प्रकार सांगण्यासाठी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिसकडे गेले.
“या प्रकरणात न्याय होईल” असं आश्वासन त्यांना डेप्युटी कमिशनरकडून मिळालं. त्याच रात्री, अक्कु यादवच्या घरी ‘स्पेशल पोलीस फोर्स’ पाठवून त्याला अटक करण्यात आली. ही घटना घडत असतांना तिथल्या शेजारी लोकांनी पोलिसांना सहकार्य केलं आणि अक्कु यादवला शरण येण्यास भाग पाडलं.
अक्कुला जास्त काळ जेलमध्ये ठेवणं हे योग्य नाहीये हे कमिशनरांच्या लक्षात आलं होतं. त्याला तिसऱ्याच दिवशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
नागपूरच्या माननीय उच्च न्यायालयात या प्रकरणाची १३ ऑगस्ट २००४ रोजी सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरू असताना उषा आणि तिच्या सहकारी, समदुःखी महिलांना असं कळलं की, ‘अक्कु यादवला या प्रकरणात जामीन मिळणार आहे.’
…आणि, तिथून पुढे जे घडलं ते बघणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारं दृश्य होतं. ‘मर्दानी’ सिनेमाच्या शेवटी जसं मुली एकत्र येऊन व्हिलनला मारतात तसं जवळपास २०० महिला एकत्र आल्या आणि त्यांनी कायदा आपल्या हातात घेतला.
अक्कु यादवकडे एकत्रितपणे महिलांनी धाव घेतली आणि त्यांनी नागपूरच्या जिल्हासत्र न्यायालय क्रमांक ७ मध्ये “आज, एक तर तू जिवंत राहशील किंवा आम्ही” असं म्हणत अक्कुला चपलांनी मारायला सुरुवात केली.
सर्व महिला आपल्यासोबत स्वयपाकघरातील चाकु, तिखट घेऊन आल्या होत्या. महिलांमध्ये इतकी आक्रमकता होती की, त्यांच्या समोर पोलीस सुद्धा काहीच करू शकले नाहीत. दगड, चाकू यांच्या सहाय्याने काही क्षणात त्यांनी अक्कु यादव वर ७० वेळेस वार केले.
आरोपीच्या ज्या पिंजऱ्यात अक्कु उभा होता तिथे काही क्षणातच रक्ताचा सडा पडला होता. २०० महिलांना दहा वर्षांपासून छळणाऱ्या अक्कुचा त्याच महिलांनी जीव घेतला होता. त्याचं शरीर त्याचं आहे की नाही, हे सुद्धा ओळखू येत नव्हतं. कोर्टाची पांढरी स्वच्छ फरशी अक्कु यादवच्या रक्ताने लाल झाली होती.
उषा सोबत असलेल्या इतर चार महिलांना पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. पण, इतर सर्व महिला समोर आल्या आणि त्यांनी “आम्हालाही अटक करा” असं म्हणत पोलिसांचा विरोध केला. कस्तुरबा नगरच्या अख्ख्या झोपडपट्टीने अक्कु यादवच्या खुनाची जबाबदारी घेतली होती.
पोलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतलं होतं. कोर्टात केस उभी राहिली होती. २०१२ पर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं. पण, नेमका कोणी खून केला हे सिद्ध न होऊ शकल्याने सर्व संशयित महिलांची या प्रकरणातून ‘स्वसंरक्षणासाठी दिलेलं प्रत्युत्तर’ अशी नोंद करून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
काही वर्षांनी जेव्हा उषाला या प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, “कोर्टात जे घडलं ते कोर्टाचा अपमान असला तरीही त्यातील कोणतीच घटना ही ठरवून करण्यात आलेली नव्हती. तो आमच्या सहनशक्तीचा अंत होता.
भावनांचा उद्रेक झाल्यावर काय घडू शकतं हे त्यादिवशी कायद्याने बघितलं होतं. महिलांच्या मनाची इतकी तयारी झाली होती की, अक्कुच्या दहशतीत जगण्यापेक्षा जेलच्या कोठडीत शांततेत तरी जगता येईल. म्हणून त्यांनी असा पवित्रा घेतला.”
अक्कु यादवच्या खुनाने महिलांवरचे अत्याचार थांबले नाहीयेत. पण, निदान त्रस्त समाज आणि भ्रष्ट पोलीस यांना या घटनेमुळे एक उत्तर मिळालं होतं हे नक्की.
–
- CBI ने मृत घोषित केलेली स्त्री चक्क कोर्टात हजर झाली आणि …
- शांतारामबापू म्हणाले, “तिच्यासोबत अभिनय करायचा नसेल तर चित्रपट सोडून निघून जा.”
–
कस्तुरबानगर येथील पोलीस स्थानकात त्यानंतर प्रत्येक पीडित महिलेची तक्रार गांभीर्याने घेतली जाऊ लागली होती. “आम्ही समाजासाठी एक उत्तम काम केलं आहे ” या आत्मविश्वासात उषा आणि इतर महिला आता वावरत आहेत. उशिरा का होईना, पण नारीशक्तीचा विजय झाला होता.
कायदा हातात घेणं हे चुकीचं असलं तरीही अक्कु यादवसारख्या आरोपींबद्दल ऐकलं की, “जे झालं ते योग्यच झालं” असं सामान्य माणसांच्या मनात येणार हे नक्की. कायद्याने काळाप्रमाणे गतिमान, पारदर्शक होणं गरजेचं आहे हे अश्या घटनांमुळे परत एकदा अधोरेखित होतं.
सतत इंटरनेटची गती वाढवण्यासाठी धडपड करणाऱ्या आपल्या देशाने निदान बलात्कारसारख्या संवेदनशील प्रकरणांचा निकाल लावण्याची गतीसुद्धा वाढवावी अशी इच्छा आपण व्यक्त करूयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.