' ‘पेन्शन’ घेण्याच्या वयात हा अवलिया आपली ‘पॅशन’ जपतोय, खुद्द मोदींनी केले कौतुक! – InMarathi

‘पेन्शन’ घेण्याच्या वयात हा अवलिया आपली ‘पॅशन’ जपतोय, खुद्द मोदींनी केले कौतुक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तहान, भूक विसरून केलं जाणारं काम म्हणजे ‘पॅशन’ हे आपण सगळेच जाणतो. आजच्या तद्दन व्यवसायिक जगात सुद्धा काही लोक असे आहेत जे, स्वतःला आनंद मिळावा यासाठी स्वेच्छेने कित्येक काम करत असतात. लिखाण, गायन, चित्रकला, फोटोग्राफी, खेळ सारखं एखादं जीवापाड प्रेम असलेलं काम केल्यावर मिळणारा आनंद हा जेव्हा आपल्याला पैश्यांपेक्षाही अधिक वाटायला लागतो तेव्हा ते तुमचं ‘पॅशन’ आहे असं आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो.

 

sachin tendulkar featured inmarathi

 

“ज्या व्यक्तीला त्याचं पॅशन लवकर सापडलं, तो तितका जास्त यशस्वी” हे एक सत्य आहे. उदाहरण सांगायचं तर, आपल्या सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर. क्रिकेटबद्दल असलेलं पॅशन त्याला लहानपणीच कळलं आणि म्हणूनच भारताला एक महान क्रिकेटर लाभला.

पॅशनला वयाचं सुद्धा बंधन नसतं हे काही लोकांनी आपल्या कामाने दाखवून दिलं आहे. अवघे ६६ वयमान असलेल्या ‘अॅक्शन फोटोग्राफर’ असलेल्या ‘श्री सुकुमार’ यांचं नाव या यादीत अग्रक्रमी घेतलं जात आहे. टोकियो ऑलम्पिकचे इतके सुंदर फोटो ज्यांच्यामुळे आपल्याला बघायला मिळाले त्यांचा ‘ऍक्शन फोटोग्राफर’ बनण्याचा प्रवास सुद्धा तितकाच सुंदर आहे.

 

sukumar inmarathi 1
canvera

 

कोण आहेत ‘श्री सुकुमार’ ? जाणून घेऊयात.

सुकुमार हे चेन्नईमधील इंडियन ओव्हरसिज बँकेत नोकरी करायचे. १९७८ साली म्हणजे वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांच्या लक्षात आलं, की फोटोग्राफीमध्ये जो आनंद आहे तो रोज बँकेत ‘कॅश टॅली’ करण्यात नाहीये. त्यांनी कॅमेरा विकत घेण्यासाठी चक्क कर्ज काढलं होतं. आपला हा छंद जोपासण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य होता हे त्यांनी जगाला आज आपल्या फोटोमधून दाखवून दिलं आहे.

बँकेत काम करत असतांना सुकुमार यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यात असलेल्या फोटोग्राफरची ओळख झाली होती. बँकेच्या कार्यक्रमात सुकुमार यांनी काढलेले फोटो लोकांना इतके आवडायचे की त्याबद्दल बँकेच्या इतर शाखांमध्ये सुद्धा चर्चा व्हायची.

 

sukumar inmarathi 2
the better india

 

“तुमचं टॅलेंट हे झाकल्या जात नाही” या वाक्याप्रमाणे सुकुमार यांच्या फोटोग्राफीची आवड ही रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्यंत गेली होती. सुकुमार यांची काही काळातच बँकेचा ‘ऑफिशियल फोटोग्राफर’ म्हणून अतिरिक्त नेमणूक करण्यात आली होती.

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेले सुकुमार यांनी सुरुवातीपासूनच ‘क्रीडा छायाचित्रण’ या क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं. गोष्टी घडत असतांना त्या आपल्या कॅमेरात कैद करायच्या हे कसब सुकुमार यांच्या हातात, नजरेत आहे.

फुटबॉल लीग, क्रिकेट विश्वचषक, मोटरसायकल रेसिंग, एशियन गेम्स सारख्या खेळांचे फोटो काढणाऱ्या सुकुमार यांनी २० वर्ष बँकेत नोकरी केली हे त्यांनी काढलेले फोटो बघून कोणालाही खरं वाटणार नाही.

‘क्रीडा छायाचित्रण’ हे क्षेत्र निवडल्यानंतर सुकुमार यांनी काढलेले फोटो बघून त्यांना ‘गेटी इमेजेस’, ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’, ‘फ्रांस प्रेस’ सारख्या नामवंत मीडिया हाऊस कडून सेवा पुरवण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. २००१ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी स्वतःला फक्त फोटोग्राफीसाठी वाहून घेतलं आणि तिथून त्यांच्या फोटोग्राफी करिअरला सुरुवात झाली.

 

olympic photo inmarathi

१९८४ मध्ये चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट सामना त्यांच्या ‘ऍक्शन फोटोग्राफी’ची सुरुवात करणारा होता. एका पत्रकाराचा जुना कॅमेरा ६०० रुपयात विकत घेऊन त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

२०१४ मध्ये सुकुमार यांनी सचिन तेंडुलकरचा क्लिक केलेल्या फोटोला त्याच्या आत्मचरित्रावर जागा मिळाली होती. सचिनने खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यातील हा फोटो आहे ज्याची सचिनने हजारो फोटोंमधून मुखपृष्ठ म्हणून निवड केली होती. सुकुमार हे या गोष्टीला आपल्या करिअरचा सर्वोच्च बहुमान मानतात.

‘रियो ऑलम्पिक’साठी तयार केलेला एक ‘कॉफी टेबल बुक’, ‘दीपा कर्माकर’ आणि ‘सायना नेहवाल’ यांच्या फोटोचा केलेला अल्बम ही त्यांची लोकप्रिय कामं मानली जातात. २०१२ मध्ये सुकुमार यांना फोटोग्राफी क्षेत्रातील योगदानासाठी ‘रोटरी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलं होतं.

सुकुमार यांच्या या कामाची दखल घेऊनच ‘एअर इंडिया’ने त्यांना टोकियो ऑलम्पिकची तिकिटं दिली होती आणि ‘नेव्हेली लिग्नाईट कॉर्पोरेशन’ने सुकुमार यांना कॅमेरा भेट म्हणून दिला होता. टोकियो ऑलम्पिकमध्ये सुकुमार यांनी ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’चं प्रतिनिधित्व केलं होतं.

 

sukumar inmarathi
the better india

 

लंडन ऑलम्पिक साठी सुकुमार यांना साडे चार लाख रुपये जमा करणं खूप अवघड झालं होतं. पण, त्यांनी ते शक्य केलं आणि लंडनहून परतल्यावर सुकुमार यांनी आपल्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवून ही रक्कम कमावली होती.

‘पोर्ट्रेट फोटोग्राफी’मुळे विविध वर्तमानपत्रांनी आपल्या कामाची दखल घेतली आणि त्यांनी काढलेले फोटो हे सर्व मासिकांमधून प्रकाशित होऊ लागले. विविध प्रसार माध्यमांकडून नोकरीसाठी आमंत्रण येऊन सुद्धा सुकुमार यांनी नेहमीच ‘फ्रिलांसर’ म्हणून सर्वांसाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सुकुमार यांना त्यांच्या पत्नीने या पूर्ण प्रवासात मोलाची साथ दिली होती. त्यासुद्धा बँक कर्मचारी आहेत. सुकुमार यांचा आर्थिक संघर्ष बघून मात्र आपल्या मुलांनी फोटोग्राफी या क्षेत्राकडे छंद म्हणूनच बघावं असं त्यांचं मत आहे.

 

sukumar inmarathi 3
shutterbugsukumar.com

सुकुमार यांनी आपल्या कार्यातून ‘अॅक्शन फोटोग्राफी’ या क्षेत्राची भारतीय तरुणांमध्ये आवड निर्माण केली आहे. आपल्या कार्यशाळेतून ते नवीन फोटोग्राफर लोकांना सांगत असतात, की “सर्व प्रकारची फोटोग्राफी करा आणि मग तुम्हाला सर्वात जास्त आवडणारं क्षेत्र निवडा.”

३५ वर्षांच्या फोटोग्राफी करिअरमध्ये सुकुमार यांनी सर्व ‘ट्वेंटी- ट्वेंटी’ क्रिकेट विश्वचषकांना हजेरी लावली आहे. सुकुमार यांची १९७६ मध्ये बँकेत काम करण्यासाठी निवड झाली होती. १९७८ मध्ये त्यांना कामावर रुजू होण्यासाठी पत्र आलं होतं. या दोन वर्षात शिकलेल्या फोटोग्राफीने सुकुमार यांना इतकी मोठी ओळख करून दिली त्याबद्दल ते या क्षेत्राचे कायमच ऋणी असणार आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?