' “पगडी संभाल जट्टा” गाण्यामागची चळवळ आणि शहीद भगतसिंहच्या काकांचं कनेक्शन! – InMarathi

“पगडी संभाल जट्टा” गाण्यामागची चळवळ आणि शहीद भगतसिंहच्या काकांचं कनेक्शन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

उत्तरेत दिल्लीजवळ सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन मधूनमधून बातम्यांमध्ये झळकत असते. या आंदोलनात पंजाब, हरियाणा या प्रांतातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. लढाऊ बाण्याचे शीख आणि जाट शेतकरी जिद्दीने आंदोलन चालवत आहेत. पण हे काही उत्तरेतले पहिले शेतकरी आंदोलन नाही.

शंभर वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन खूप गाजले होते. या आंदोलनात पंजाबमध्ये सरदार अजितसिंह यांच्या रूपाने नवे नेतृत्व उदयास आले.

 

sardar ajit singh inmarathi

 

भारतातील क्रांतिकारी विचारांच्या तरुणांचे आदर्श असलेल्या सरदार भगतसिंह यांचे सरदार अजीतसिंह हे काका होते. अजितसिंह यांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे काँग्रेस पक्षाचे पाठीराखे होते.

त्यांच्याप्रमाणेच त्यांची तिन्ही मुलेही काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. त्यावेळी काँग्रेस पक्षात लोकमान्य टिळकांच्या रूपाने जहाल विचारांच्या राजकारणाचे वारे शिरले होते.

मवाळ विचारधारेच्या आणि ब्रिटिशांना अर्ज विनंत्यांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या तुलनेत लोकमान्यांचे रोखठोक विचार व कृती देशभरातील तरुणांना प्रभावित करत होते.

१९०६ साली कलकत्ता येथे दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास अजितसिंह आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू किशनसिंह उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकमान्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकले आणि ते भारावून गेले.

 

lokmanya tilak inmarathi

 

अधिवेशनाहून परत गेल्यावर जालंधर येथे त्यांनी टिळकांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी अंजुमन मुहब्बाने वतन म्हणजे भारतमाता सोसायटी या संस्थेची स्थापना केली. त्यांनी ब्रिटिश विरोधी पुस्तके आणि साहित्याची छपाई तसेच वितरण केले.

१९०७ साली ब्रिटिश सरकारने शेतीविषयक तीन नवे अन्यायकारक कायदे प्रस्थापित केले. या कायद्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.

ऐन पंचविशीतील तरण्याबांड अजितसिंहांनी आपल्या ओजस्वी भाषणांनी शेतकऱ्यांना जागृत करण्यास सुरुवात केली. मार्च मध्ये लायलपुर येथे झालेल्या एका सभेत संपादक लाला बांकेदयाल यांनी ‘पगडी संभाल जट्टा’ ही कविता सादर केली.

ही कविता इतकी लोकप्रिय झाली की सर्व सभांमध्ये ती म्हटली जाऊ लागली आणि शेतकऱ्यांच्या या आंदोलनास ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन असे नाव पडले.

या काळामध्ये पंजाबमध्ये अनेक सभांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलू लागले आणि लोकांमध्ये ब्रिटिशांच्या जुलमी कारभाराविषयी असंतोष निर्माण करू लागले. जनतेमधील नाराजी इतकी वाढली की सरकारला हा कायदा रद्द करावा लागला.

पण आंदोलनाचे नेते असलेल्या लाला लजपतराय आणि यांच्यावर खटले भरून त्यांना मंडाले येथे सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले.

 

lala lajpatarai inmarathi

 

मंडालेहून परत आल्यावर सूरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास गेले असताना सरदार यांचा स्वतः लोकमान्य टिळकांनी ‘शेतकऱ्यांचा राजा’ म्हणून गौरव केला. याप्रसंगी त्यांच्या डोक्यावर घातलेले मुकुटसदृश शिरोभूषण आजही पंजाबमधील बंगा येथे भगतसिंह संग्रहालयात बघायला मिळते.

सरदार यांची लोकप्रियता आणि त्यांचे जहाल विचार यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून दीर्घकाळ तुरुंगात टाकायची तयारी सुरू केली. याचा सुगावा लागताच १९०९ सालातील ऑगस्टच्या सुमारास ते फरार झाले. त्यांनी कराचीहून निघालेल्या जहाजातून मिर्झा हसन खान या नावाने निसटून जाण्यात यश मिळवले.

पुढे ब्राझीलमध्ये याच नावाने त्यांनी पासपोर्टही बनवून घेतला. १९१४ पर्यंत इराण, तुर्कस्थान, फ्रान्स, जर्मनी, स्विझर्लंड अशा देशांमध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी विविध नेते आणि क्रांतिकारकांच्या भेटी घेतल्या. यामध्ये केमाल पाशा, लेनिन, ट्रॉटस्की, मुसोलिनी यांचा समावेश होता.

१९१४ मध्ये ते ब्राझीलमध्ये गेले आणि १८ वर्षे तेथेच राहिले. या काळात ते लाला हरदयाळ, वीरेंद्र चट्टोपाध्याय, चंपक रमण पिल्ले आणि गदर पार्टी या भारतीय क्रांती संघटनेच्या सभासदांच्या संपर्कात राहिले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते इटलीमध्ये आले, त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना ११,००० भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना उभारण्यासाठी मदत केली.

तरुणपणी कायद्याचे शिक्षण घेतलेले हे भाषाप्रभू होते. त्यांना चाळीस भाषा येत होत्या. परदेशात असताना ते उपजीविकेसाठी परदेशी व्यक्तींना भाषा शिकविण्याचे काम करत असत. महायुद्ध संपल्यावर त्यांना प्रकृती बिघडलेली असूनही जर्मनीमधील तुरुंगात ठेवण्यात आले होते.

त्यावेळी भारतात जवाहरलाल नेहरू हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम बघत होते. त्यांनी लक्ष घातल्यावर सरदार यांची सुटका झाली. सुटकेनंतर दोन महिने लंडनमध्ये विश्रांती घेऊन ते ७ मार्च १९४७ रोजी तब्बल ३८ वर्षांनी भारतात परत आले.

 

sardar ajit singh 2 inmarathi

 

दिल्ली आणि लाहोरमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. परंतु अनेक वर्षांच्या मानसिक आणि शारीरिक ओढाताणीने त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यांच्या गावी परत न जाता त्यांना डलहौसी येथे नेण्यात आले.

१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याची पहाट होताना पंडित जवाहरलाल नेहरूंचे भाषण आकाशवाणीवर ऐकले. जणू काही याच क्षणासाठी त्यांचा आत्मा थांबून राहिला असावा अशा रीतीने त्यांनी पहाटे साडे तीन वाजता अखेरचा श्वास घेतला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?