महाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार असलेला राक्षस माहीत नसेल तर नक्की वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मध्यंतरी कार्टुनरुपात पाहता आलेला घटोत्कच आठवतोय?
गोंडस, खट्याळ असा घटोत्कच कार्टुनच्या रुपांतून घरोघरी पोहोचला असला, तरी महाभारताच्या युद्धात पांडवांना विजयश्री मिळवून देण्यात एका राक्षसाने सिंहाचा वाटा उचलला होता. परंतु त्याची कहाणी अगदीच अज्ञात आहे.
घटोत्कच हा भीम व राक्षसी हिडींबा ह्यांचा पुत्र होता. त्याची आई राक्षस असल्याने तो देखील अर्ध राक्षसच होता. महाभारतात तो अतिशय शूरपणे पांडवांच्या बाजूने लढला.
रणांगणावर (कुरुक्षेत्रावर) त्याने पराक्रम गाजवला, परंतु अखेर महारथी कर्णाच्या हातून त्याचा मृत्यू झाला.
त्याला अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्याच्याकडे उडण्याची शक्ती होती तसेच तो अदृश्य सुद्धा होऊ शकत असे. त्याला अणिमा आणि लघिमा ह्या सिद्धी सुद्धा प्राप्त होत्या.
हे ही वाचा –
===
हे ही वाचा –
===
लाक्षागृहातून सुटका करून घेतल्यावर एकदा भीम व त्याचे सगळे बंधू मत कुंतीसह वनातून प्रवास करत असताना भीमाने हिडींबाला तिच्या बदमाश भावापासून म्हणजे हिडींबासुरापासून वाचवले. त्याने नंतर हिडींबाशी विवाह केला व नंतर घटोत्कचाचा जन्म झाला.
त्यानंतर भीम आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हस्तिनापुराला निघून गेला. घटोत्कचाला त्याच्या आईनेच सांभाळले. त्याला एक दिवस एक मोती सापडला तो त्याने त्याच्या भावाला, म्हणजेच अभिमन्यूला देऊन टाकला.
भगवान श्रीकृष्णाने घटोत्कचाला वर दिला होता की त्याच्यासारखी जादू इतर कोणालाही येणार नाही. त्याचा विवाह अहिलावती नावाच्या स्त्रीशी झाला होता व त्याच्या पुत्राचे नाव बार्बारिक होते.
घटोत्कच लंकेला गेला होता
महाभारतातील दिग्विजय पर्वानुसार जेव्हा राजा युधिष्ठिराने राजसूय यज्ञाचे आयोजन केले होते तेव्हा भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे वेगवेगळ्या दिशांना गेले व त्या त्या राज्याच्या राजांकडून त्यांनी कर गोळा केला.
काही राजांनी अगदी सहज कर देण्याचे मान्य केलं तर काही राजांनी त्यांच्याकडून युद्धात पराजित झाल्यानंतर कर देण्याचे मान्य केलं.
इतर पांडवांबरोबर घटोत्कच सुद्धा कर गोळा करण्यासाठी बाहेर पडला. त्याला लंकेत राजा विभीषणाकडे कर गोळा करण्यास पाठवण्यात आलं होतं.
घटोत्कच त्याच्या मायावी शक्तीच्या सहाय्याने त्वरित लंकेत पोचला. तिथे गेल्यानंतर त्याने राजा विभीषणाची भेट घेतली आणि स्वत:चा परिचय दिला.
घटोत्कचाचा परिचय ऐकून राजा विभीषण प्रसन्न झाला व त्याने घटोत्कचाला लंकेला येण्याचे कारण विचारले. तेव्हा घटोत्कचाने त्याच्या येण्याचे कारण सांगितले. तेव्हा राजा विभीषणाने घटोत्कचाला भरपूर धन देऊन सन्मानपूर्वक त्याला लंकेतून निरोप दिला.
घटोत्कचाच्या जन्माची कथा
लाक्षागृहाच्या आगीतून बचावल्या नंतर पांडव आपल्या मातेसह वनात निघून गेले. त्या वनात हिडींबासूर नावाचा राक्षस आपली बहिण हिडींबासह राहत होता. जेव्हा हिडींबाने भीमाला पहिले तेव्हा ती त्याच्यावर प्रेम करू लागली.
हे कळल्यानंतर हिडींबासूर अतिशय क्रोधीत झाला आणि त्याने भीमाशी युद्ध केले. युद्धात भीमाने त्याचा वध केला आणि कुंतीच्या सांगण्यावरून त्याने हिडींबाशी विवाह केला.
त्यानंतर त्यांना एक महापराक्रमी पुत्र झाला. जन्मानंतर तो क्षणातच मोठा झाला. त्याच्या डोक्यावर केस नव्हते. तेव्हा भीम व हिडींबाने त्याच्या घटावर म्हणजेच डोक्यावर उत्कच म्हणजे केशहीन अर्थात केस नसलेले पाहून त्याचे नाव घटोत्कच असे ठेवले.
घटोत्कचाने केली पांडवांची मदत
वनवासाच्या दरम्यान जेव्हा पांडव गंदमादन पर्वताजवळ जात होते तेव्हा वाटेत वादळ व पावसाचा सामना केल्याने द्रौपदी अतिशय थकून गेली होती. तेव्हा भीमाने घटोत्कचाचे स्मरण केले असता तो तिथे तत्काळ प्रकट झाला. तेव्हा भीमाने त्याला सांगितले की,
तुझी माता द्रौपदी अतिशय थकली आहे तेव्हा तू तिला तुझ्या खांद्यांवर बसवून आमच्या बरोबर चाल म्हणजे तिला कुठलाच त्रास होणार नाही.
तेव्हा घटोत्कचाने भीमाला सांगितले की,
माझ्या बरोबर माझे काही साथीदार आहेत. तुम्ही सगळेच त्यांच्या खांद्यावर बसा. द्रौपदी मातेला मी खांद्यावर घेतो, म्हणजे तुम्ही गंदमादन पर्वतापर्यंत लवकर पोहोचू शकाल.
पांडवांनी तसे केल्यानंतर तर फार कमी वेळात गंदमादन पर्वतापर्यंत पोचले.
हे ही वाचा –
===
घटोत्कचाने सुद्धा दुर्योधनाशी युद्ध केले होते
कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडव एकमेकांशी लढत होते तेव्हा घटोत्कच व दुर्योधन ह्यांचे सुद्धा घनघोर युद्ध सुरु होते
जेव्हा भीष्म पितामह ह्यांना हे कळले तेव्हा त्यांनी द्रोणाचार्यांना सांगितले की घटोत्कचाला कोणीही पराजित करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही दुर्योधनाच्या मदतीसाठी जावे.
तेव्हा द्रोणाचार्य, जयद्रथ, विकर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, व अनेक महारथी दुर्योधनाच्या मदतीसाठी धावून गेले. पण घटोत्कचाने त्याच्या पराक्रमाने ह्या सर्वांना जखमी केले. त्याने त्याच्या मायेने असे काही भयानक दृश्य उभे केले की कौरव सेना रणांगणावरून पळून गेली.
अलम्बुषचा वध
महाभारत युद्धात कौरवांकडून अलाम्बुश नावाचा राक्षस लढत होता. त्यालाही अनेक मायावी गोष्टींचे ज्ञान होते. त्यामुळे घटोत्कच जी माया करेल ती माया अलम्बुष त्याच्या मायावी शक्तींनी नष्ट करून टाकत असे.
अलम्बुषने घटोत्कचाला आपल्या बाणांनी जखमी केले होते. तेव्हा क्रोधीत होऊन घटोत्कचाने अलम्बुषला मारण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या रथावरून अलम्बुषच्या रथावर उडी घेतली व त्याला पकडून जमिनीवर आपटले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
हे बघून पांडव सेना अधिक उत्साहाने लढू लागली.
जेव्हा कर्ण पांडवांच्या सेनेचा संहार करीत होता तेव्हा श्रीकृष्णाने घटोत्कचाला आपल्या जवळ बोलावून कर्णाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली. जेव्हा दुर्योधानाने पाहिले की घटोत्कच कर्णावर प्रहार करणार आहे तेव्हा त्याने जटासूर राक्षसाच्या पुत्राला युद्ध करण्यासाठी पाठवले.
त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि त्याने त्या राक्षसपुत्राला मारून टाकले. त्यानंतर त्याचे शीर घेऊन तो दुर्योधानाकडे जाऊन म्हणाला की,
मी तुझ्या सहाय्यकाचा वध केला आहे. आता तुझी व कर्णाचीदेखील हीच अवस्था होईल. जो धर्म, अर्थ व कामाची इच्छा करतो त्याने कधीही राजा, ब्राह्मण व स्त्रीला भेटायला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. म्हणूनच मी तुझ्यासाठी हे मस्तक भेट म्हणून आणले आहे.
असे म्हणून त्याने जटासुराच्या मुलाचे मस्तक दुर्योधनाच्या दिशेने भिरकावले.
घटोत्कचाचा रथ
महाभारतातील द्रोणपर्वात लिहिल्याप्रमाणे घटोत्कचाच्या रथावर जो झेंडा होता त्यावर मांस खाणाऱ्या गिधाडाचे चित्र होते. त्याच्या रथाला आठ चाके होती व रथ चालताना त्याचा मेघांच्या गरजण्याप्रमाणे आवाज येत असे.
ह्या रथाला शंभर बलवान घोडे जोडले होते, ह्या घोड्यांच्या डोळ्यांचा रंग लाल होता. ह्या रथात सर्व प्रकारची शस्त्रे होती. ह्या रथाचा सारथी विरुपाक्ष नावाचा राक्षस होता.
घटोत्कचाचा मृत्यू
जेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून घटोत्कच कर्णाशी युद्ध करायला गेला तेव्हा दोघांमध्ये भयानक युद्ध झाले. दोघेही अतिशय पराक्रमी असल्याने एकमेकांचे वार निकामी करीत होते.
हे युद्ध अर्ध्या रात्री पर्यंत सुरु होतं.
जेव्हा कर्णाला कळले की घटोत्कचाला कुठल्याही प्रकारे पराजित करता येणार नाही, तेव्हा त्याने त्याचे दिव्य अस्त्र प्रकट केले. हे पाहून घटोत्कचाने सुद्धा आपल्या मायावी शक्तीने राक्षसी सेना प्रकट केली. तेव्हा कर्णाने ते सैन्य नष्ट करून टाकलं.
तेव्हा घटोत्कच कौरवांच्या सेनेचा संहार करू लागला. हे पाहून कौरव कर्णाला म्हणाले की,
आता तू इंद्र देवाने तुला दिलेली वासवी शक्ती वापर आणि ह्याचा अंत कर. नाही तर हा संपूर्ण कौरव सेनेचा संहार करून टाकेल.
कर्णाने वासवी शक्तीचा प्रयोग करून घटोत्कचाला ठार केले.
घटोत्कच ठार झालेला पाहून पांडवांना शोक अनावर झाला, पण श्रीकृष्ण मात्र प्रसन्न झाले. अर्जुनाने ह्याचे कारण विचारले असता श्रीकृष्णांनी सांगितले की,
जोवर कर्णाकडे इंद्राने दिलेली वासवी शक्ती होती तोवर त्याला पराजित करणे अशक्य होते. त्याने ती शक्ती तुझा वध करण्यासाठी वापरायचे ठरवले होते. पण आता ती शक्ती त्याच्याकडे नाही त्यामुळे तुला त्याच्यापासून आता काही धोका नाही.
असा हा महापराक्रमी घटोत्कच राक्षस पांडवांच्या बाजूने लढला व युद्धात त्याने अतुलनीय शौर्य गाजवले.
इतकेच नव्हे – तर त्याच्यामुळेच कर्ण त्याच्या सर्वात घातक अस्त्राचा वापर अर्जुनावर करू शकला नाही. ज्याचा परिणाम, अर्थातच, कर्णाचा पराभव होण्यात आणि शेवटी पांडवांच्या विजयात झाला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.