पवार कायम सत्तेत असते, तर बाबासाहेबांसह त्यांचे संबंध कधीच बिघडले नसते, कारण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – तानाजी खोत
===
पुरंदरेंचा इतिहास मी वाचला आहे. हिंदुत्ववादी राजकारणाला, किंबहुना राष्ट्रवादाला पोषक अशी मांडणी त्यात आहे. त्यांनी जाणता राजा नाटकाद्वारेही शिवप्रेमी पिढी घडवण्याचं काम केलं.
त्यांना ब्राम्हण म्हणून टार्गेट केलं जातं असल्याच्या आरोपांचा इन्कार करताना न्या. रानडे, बा.सी. बेंद्रे, कमल गोखले, अ.रा. कुलकर्णी अशा इतिहासकारांची नावे घेतली जातात. परंतु ही नावे बामसेफच्या किंवा हिंदुत्वविरोधी राजकारणाला अडचणीची असल्याचं कारण नव्हतं. कारण ते सगळे विद्वान आणि विद्यापीठीय लेखक होते.
त्यांचे नाव घेऊन ब्राम्हणविरोधी एजेंडा चालवला असता तर एवढा प्रभाव पडला नसता, जेवढा पुरंदरेंच्या नावाच्या वलयामुळे पडू शकणार नव्हता. कारण या विद्वानांचे नावच तोडफोड करण्याची क्षमता असलेल्या अर्धशिक्षित लोकांना माहित असण्याची शक्यताच नव्हती.
पुरंदरेंचा इतिहास किंवा इतिहासावर कादंबरी लेखनाचा उद्देश हा शिवाजी राजांना अलौकिक युगपुरुष दाखवणं हा आहे. त्यात वस्तुनिष्ठ इतिहास घटनांची नाट्यमय मांडणी आणि शिवभक्ती यांची सरमिसळ आहे. काहींना तो अतिशयोक्त वाटण्याची शक्यता आहे.
समस्या मात्र ती नव्हतीच; शिवाजी महाराज हिंदुत्त्वाचे ICon आहेत. हा हिंदुत्त्व विरोधी राजकारणाचा मुख्य problem आहे. यांना वास्तवात शिवाजी महाराजांची हिंदुत्त्व Icon ही ओळख नाकारायची होती आणि आहे. त्यासाठी पुरंदरेंना बळीचा बकरा बनवलं गेलंय.
माझ्या दृष्टीने पुरंदरेंचं इतिहास/कादंबरी लेखन असो की नसो शिवाजी महाराज हे हिंदुत्वाचे सगळ्यात मोठे ICON आहेत आणि राहतील. कुणी कितीही काही केलं तरी त्यात बदल होऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे.
या हिंदुत्त्वविरोधी लोकांनी सुरूवातीला शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगळी मांडणी करून पाहिली. त्यातून उलट परिणाम होऊन मोठा वर्ग विरोधात जातोय आणि हिंदुत्ववादी राजकारणाला पोषक वातावरण निर्माण होतंय हे लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराजांना हायजॅक करून या सगळ्यांबद्दल ब्राम्हणाला व्हीलन करण्याचं कांड योजलं गेलं. तर यातून ही सुरुवात झाली.
त्यासाठी मराठा मतांमध्ये फुट घडवून आणण्यासाठी मराठा समाजाला भडकावण्यासाठी एखादं निमित्त आवश्यक होतं. त्यातून जेम्स लेन, दादोजी कोंडदेव असली भावनिक प्रकरणं उकरून काढण्यात आली. त्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखं Soft Target दुसरं कोणतंही नव्हतं.
मराठ्यांचा एक गट, संपूर्ण दलित, काही ओबीसी जाती आणि अल्पसंख्यांक समुदाय असं एक नवं राजकीय समीकरण मांडलं गेलं. मराठा बहुजन समाजातील मुलं शिवसेनेचे फुटसोल्जर आहेत आणि यातून मराठा नसलेले बाळासाहेब ठाकरे आणि ब्राम्हणांचा पक्ष असलेला भाजप मोठे होतात. असं सांगितलं जावू लागलं.
यावर उतारा म्हणून मराठा समाजाची शिवसेनेसारखी आक्रमक संघटना असणं आवश्यक होतं सुरुवातीला बामसेफच्या विचारांवर आधारलेली मराठा सेवा संघ ही संघटना आणि नंतर छत्रपती संभाजी राजांच्या नावानं ब्रिगेड सुरु करण्यात आली. हे नाव एकेरी आहे असा आक्षेप हिंदुत्त्ववादी घेत असतात. पण त्यात तसा काही अर्थ नाही.
===
हे ही वाचा – जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!
===
एकेरी नाव वापरले म्हणून शिवद्रोही ठरवण्याची पद्धत महाराष्ट्रात याच लोकांनी सुरु केली. हिंदुत्त्वनिष्ठ लेखकांची अगदी ओळ न ओळ भिंगातून पाहून त्यांच्यावर आक्षेप घेतले जाऊ लागले . हडेलहप्पी इतकी वाढली की वेगळी भूमिका मांडणाऱ्या लोकांचे नंबर मिळवून त्यांना फोन करून त्यांना त्रास दिला गेला. याच्या उलटही हिंदुत्त्ववाद्यांनीही असेच प्रत्युत्तर दिले जाऊ लागले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण गढुळ झाले.
पुढे मराठ्यांची हिंदू ही ओळख पुसली जाण्यासाठी मोहीम सुरू झाली. मंगळसुत्र घालू नये, कुंकु लावू नये असा प्रचार सुरु झाला. गुढी पाडव्यासारख्या सणावर आक्षेप घेतले जाऊ लागले. कोल्हापुरची महालक्ष्मी/अंबाबाई, पंढरपुरच्या विठ्ठल या तिर्थस्थळांविषयी नसते वाद उभे करण्यात आले.
दरम्यानच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये या सगळ्याचा राष्ट्रवादी पक्षाला मर्यादित फायदा झाला. पण स्वबळावर सत्तेत येणे हे स्वप्नच राहिले.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी शरद पवारांनी संधान बांधले. २०१९ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी हळव्या झालेल्या शिवसेनेला तेवढे पद देऊन बाळासाहेबांचा अख्खा पक्ष पवारांनी आपल्या दावणीला बांधला. तिथून पुढे काय सुरु आहे हे आपल्या समोर आहे. त्यावर भाष्य न केलेले बरे.
समजा शरद पवार कायम सत्तेत राहिले असते, आणि शिवसेना भाजपच्या मदतीने सत्तेपर्यंत गेली नसती तर कदाचित बाबासाहेब पुरंदरेंचे आणि पवारांचे संबंध शेवटपर्यंत चांगले राहिले असते. आणि बाबासाहेबांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे शरद पवारच असते. कारण त्या स्थितीत पवारांना बामसेफच्या लोकांना जवळ करून ब्रिगेडी प्राणायाम करायची गरजच नसती पडली..
===
हे ही वाचा – बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.