हे १० उत्कृष्ट भारतीय सिनेमे समजून घेण्यात आपला प्रेक्षकवर्ग नक्कीच कमी पडला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय सिनेमाचा दर्जा गेल्या काही वर्षात उंचावलेला आपल्याला जाणवेल. हीरो हिरॉईन आणि व्हिलन या चौकटीपलीकडे जाऊन रियल लाईफ स्टोरीज आपल्याला सिनेमातून पाहायला मिळू लागल्या आहेत.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
मोठमोठ्या स्टार मंडळींचे सिनेमे बघण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी करणारे लोकं चांगल्या दर्जाचा सिनेमा बघण्यासाठी गर्दी करू लागले. एकेकाळी बच्चन, कपूर, खान मंडळी ही तरुणांच्या गळ्यातला ताईत होती त्यांची जागा नवाजूद्दीन, मनोज बाजपेयी, राजकुमार राव, आयुषमान खुराना सारख्या कलाकारांनी घेतली!
कोरोना काळात फोफावलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मनी तर लोकांना चांगल्या कंटेंटची चटकच लावली पण हा सगळा गेल्या काही वर्षातला बदल आहे. याआधीही दर्जेदार सिनेमे बनायचे फक्त तेव्हा आपला प्रेक्षक तेवढा सुजाण नव्हता हाच इतका फरक!
त्यावेळेस आपणही असे बरेच सिनेमे बघून मनात म्हंटलं असेल की “अरे हा तर उत्कृष्ट सिनेमा होता तरी फ्लॉप का झाला?” अशाच काही दर्जेदार उत्कृष्ट सिनेमांविषयी आपण जाणून घेणार आहोत, जे सिनेमे समजून घेण्यात आपला प्रेक्षकवर्ग कुठेतरी कमी पडला.
१. अलीगढ :
सत्य घटनेवरून प्रेरित असलेला हा सिनेमा समलिंगी संबंधांवर भाष्य करणारा एक धाडसी सिनेमा होता. अलीगढच्या एका गे प्रोफेसरची ही कहाणी होती ज्याला त्याच्या अस्तित्वावरून कायम हिणवलं गेलं आणि नंतर एकांतवासात त्यांचा शेवट झाला हेच या सिनेमाचं कथानक होतं.
२१ व्या शतकात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाकडेसुद्धा प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मनोज बाजपेयी आणि राजकुमार राव या दोघांनी यात मुख्य भूमिका निभावली होती.
ऑफ बीट विषय आणि वेगळी हाताळणी करणाऱ्या हंसल मेहता यांच्या या सिनेमाला पुरस्कार मिळाले कौतुकही झालं पण लोकांनी या सिनेमाकडे दुर्लक्षच केलं!
२. फिलहाल :
२००२ साली सरोगसीसारख्या गंभीर विषयावर बेतलेल्या फिलहाल या सिनेमालासुद्धा लोकांनी निगेटिव्ह रिस्पॉन्सच दिला. २ मैत्रिणींमधलं मैत्रीचं नातं आणि सरोगसीच्या निर्णयामुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम हे यात खूप प्रभावीपणे मांडलं होतं.
तेव्हा हा सिनेमा काळाच्या पुढचा होता, सुश्मिता सेन आणि तबू यांची उत्तम अदाकारी आणि उत्तम विषय असूनही हा सिनेमा फ्लॉप ठरला!
३. नो स्मोकिंग :
प्रसिद्ध कथालेखक स्टीफन किंगच्या कथेवर बेतलेला अनुराग कश्यपचा नो स्मोकिंग हा सिनेमा आजही अनेकांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचा आहे.
एक चेन स्मोकर त्याची स्मोकिंगची सवय सोडण्यासाठी एक पर्याय शोधतो आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडणारा थरार हा आपल्यासमोर एक वेगळंच कथानक उभं करतो. जॉनसारख्या मॉडेलकडून प्रथमच इतकं सुरेख काम करवून घेऊनही हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.
४. दिल से :
भारतातल्या नॉर्थ ईस्ट राज्यातल्या लोकांच्या समस्या आणि त्यातून निर्माण झालेला दहशतवाद एवढा गंभीर विषय हातळणाऱ्या मणीरत्नमसारख्या दिग्दर्शकाचा दिल से हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.
ज्वलंत विषय, त्याची वेगळी मांडणी, शाहरुख मनीषा आणि प्रीती यांची वेगळीच प्रेम कहाणी, गुलजार यांचे शब्द आणि साक्षात रेहमानचं संगीत असूनही हा सिनेमा काहीच कमाल दाखवू शकला नाही.
सिनेमातली गाणी हिट ठरली जी आजच्या पिढीलासुद्धा मंत्रमुग्ध करतात पण हा सिनेमा दर्जेदार आहे हे लोकांच्या फारच उशिरा लक्षात आलं!
५. रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ द इयर :
आजच्या जनरेशनचा सुपरस्टार रणबीर कपूर याने त्यांच्या सुरुवातीच्या स्ट्रगलच्या दिवसांत केलेला एक दर्जेदार सिनेमा म्हणजे रॉकेट सिंग. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला ग्रॅज्युएट मुलगा जेव्हा प्रथम कॉर्पोरेट आणि सेल्सच्या क्षेत्रात उडी मारतो तेव्हा त्याची काय अवस्था होते हे सगळं प्रभावीपणे मांडणारा हा एकमेव सिनेमा.
हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा रणबीर एवढा मोठा स्टार नव्हता, हा सिनेमा रणबीरच्या फ्लॉपच्या यादीतलाच आहे पण नंतर या सिनेमाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
६. स्वदेस :
रेकॉर्ड ब्रेकिंग लगानसारखा सिनेमा दिल्यावर आशुतोष गोवारीकरचा पुढचा सिनेमा एवढा पडेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. परदेशात काम करणाऱ्या NRI जेव्हा बऱ्याच वर्षांनी आपल्या देशात परत येतो तेव्हा त्याच्यासमोर निर्माण झालेले प्रश्न त्याला त्याचं मत बदलायला भाग पाडतात.
खरंतर स्वदेस हा काळाच्या खूप पुढचा सिनेमा आहे, आजच्या काळातही खूप कमी लोकं त्या सिनेमात केलेलं भाष्य समजू शकतील. हा असा काही मोजक्या सिनेमांपैकी एक सिनेमा आहे ज्यात शाहरुख हा त्याच्या सुपरस्टार इमेजच्या बाहेर येऊन पात्रात घुसला होता.
७. एक हसिना थी :
सस्पेन्स थ्रिलर या पठडितल्या सिनेमाच्या बाबतीत श्रीराम राघवन या दिग्दर्शकाचा हात कुणीच पकडू शकत नाही. त्यांचाच एक हसिना थी हा आजवरचा बॉलीवूडमधला सर्वात उत्तम थ्रिलर सिनेमा मानला जातो.
सैफ आणि उर्मिला यांची लाजवाब अदाकारी आणि खिळवून ठेवणारं कथानक असूनही हा सिनेमा तेव्हा फ्लॉप ठरला होता. आजही हा सिनेमा आणि त्यातले काही सीन्स बघताना हा सिनेमा दर्जेदार का आहे याची जाणीव होते.
८. लक्ष्य :
कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला फरहान अख्तर या गुणी दिग्दर्शकाचा लक्ष्य हा सिनेमासुद्धा सुपरफ्लॉप म्हणून घोषित करण्यात आला होता. यातली गाणी कथानक लोकांना आवडलं पण सिनेमाची लांबी आणि युद्धाची पार्श्वभूमी यावरून सिनेमाची खूप आलोचना झाली.
हृतिक रोशन, प्रीती, बमन इराणी, अमिताभ बच्चन अशा दिग्गजांनी या सिनेमात सुंदर अभिनय करूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला!
९. जाने भी दो यारों :
कुंदन शहा दिग्दर्शित जाने भी दो यारों ही आजवरची एक उत्कृष्ट ब्लॅक कॉमेडी फिल्म आहे. देशातला भ्रष्ट कारभार सिस्टिम आणि सरकार यावर ताशेरे ओढणारा हा सिनेमा तेव्हा फ्लॉप ठरला होता.
या सिनेमातला शेवटचा महाभारताचा सीन बघताना तर आजही लॉटपोट होऊन हसायला येतं, हा सिनेमा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतला एक मैलाचा दगड मानलं जातं!
१०. तुंबाड :
केवळ माऊथ पब्लिसिटीवर करोडोचा टप्पा पार करणारा एकमेव सिनेमा म्हणजे तुंबाड. वरकरणी हॉरर वाटणारा हा सिनेमा फार गहन विषयाला हात घालून आपल्याला थक्क करतो.
बरीच वर्षे पैशासाठी रखडलेल्या या सिनेमाला सुरुवातीला फार थंड प्रतिसाद होता, पण नंतर मात्र लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला आणि त्याने इतिहास रचला!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.