' हा ब्लॉकबस्टर ऍक्शन हॉलीवूड चित्रपट चक्क मुजाहिदीन लोकांना समर्पित केलेला होता! – InMarathi

हा ब्लॉकबस्टर ऍक्शन हॉलीवूड चित्रपट चक्क मुजाहिदीन लोकांना समर्पित केलेला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

इतिहास साक्ष आहे, जगभरातल्या अनेक देशांच्या भूमिचा वापर प्रबळ महासत्तांनी आपल्या पॉवरप्लेसाठी करून घेतला. अफगाणिस्तान ही अशीच भूमी जिथल्या टोळ्यांचा वापर अमेरिकेनं मुक्तपणे केला, हे काही आता गुपित उरलेलं नाही.

रशियाविरोधातल्या शीतयुध्दात अफगाणी मुजाहिदीनांचा वापर अमेरिकेनं स्वार्थीपणे केला. त्यांची भलामण केली. हॉलिवुडचा एक ब्लॉकबस्टर सिनेमा याची साक्ष आहे. सिल्व्हेस्टर स्टॅलिनचा रॅम्बो ३ हाच तो चित्रपट.

 

rambo 3 inmarathi

 

ऐंशीच्या दशकात हॉलिवुडमध्ये जे ॲक्शनपट बनविले गेले त्यात सर्वात लोकप्रिय होती रॅम्बो सेरीज. व्हिएतनामच्या जॉन रॅम्बो या लोकप्रिय नावाचा आणि त्याच्या वलयाचा वापर करून घेत या सिनेमाच्या नायकाचं हे नामकरण केलं गेलं.

या चित्रपटांमधून युद्ध ही मानवजातीसाठी हानिकारक असतात असा छुपा संदेश दिला गेला. जगभरात समस्यांचं निवारण करत रॅम्बो फिरू लागला आणि जेव्हा रॅम्बोचा तिसरा भाग आला तेव्हा तो या चित्रपटात आपल्या मिशनसाठी अफगाणी विद्रोहींसोबत काम करताना दिसला.

त्याकाळात या विद्रोही गटाला मुजाहिदीन असं संबोधलं जात असे. कालांतरानं यात फूट पडून तालिबानची निर्मिती झाली. आज याच तालिबाननं आधी रशिया आणि मग अमेरिकेला आपल्या भूमितून हाकलून लावलेलं आहे आणि गेला आठवडाभर जगभरातल्या बातम्यांना चर्चेचा विषय पुरवला आहे.

 

taliban govt inmarathi

हे ही वाचा तालिबानी राज्यातील हे जाचक नियम करणार महिलांच्या आयुष्याचा नरक…

यानिमित्तानं चित्रपटातूनही हे बदलते संबंध कसे दिसले याचं उदाहरण सोशल मिडियावरुन सध्या व्हायरल झालेलं आहे. निमित्त आहे रॅम्बो ३च्या श्रेय नामावलीचं.

रॅम्बो ३ मध्ये रॅम्बो आपल्या मित्राला, सॅम ट्रॉटमॅनला वाचविण्यासाठी अफगाण भूमीत येतो. त्या काळात अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुध्द चाललं होतं. मुजाहिदीन रशियाच्या विरोधात असल्याने अर्थात अमेरिकेच्या मर्जीतले होते.

या संपूर्ण शोध कार्यात रॅम्बो मुजाहिदीनांचा मित्र होऊन मित्राला सहिसलामत सोडवतो आणि ही भूमी सोडतो.

या चित्रपटाच्या अखेरीस सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर जेव्हा रॅम्बो आणि सॅम मुजाहिद्दीनांचा निरोप घेत ही भूमी सोडत असतात तेव्हा पडद्यावर कौतुकाची काही वाक्य झळकतात यात म्हणलेलं असतं, This film is dedicated to the brave mujahideen fighters of Afghanistan अर्थात अफगाणिस्तानातील शूरवीर लढवैय्यानां हा चित्रपट समर्पित आहे.

 

rambo credits inmarathi

 

ही आदर भावना २००० पर्यंत तशीच होती मात्र ज्या अफगाणिस्तानचं तोंड भरून कौतुक आणि पाठराखण केली जात असे तो अफगाणिस्तान अल कायदाचा किल्ला होता. जगभरात दहशतवाद पसरविणार्‍या कट्टर इस्लामिक गटांचं माहेर बनलेलं अफगाणिस्तान अमेरिकेच्या डोळ्यात खुपायला सुरवात झाली नसती तरच नवल होतं.

अल कायदाच्या गटानं अमेरिकेवर ९/११ चा भयंकर हल्लाबोल केला आणि समीकरणं बदलली. ९/११ ला उत्तर म्हणून अमेरिकेनं वॉर ऑन टेरर या घोषणेखाली अफगाणिस्तानवर हल्लाबोल केला.

 

9 11 attack 2 inmarathi

 

तालिबानची राजवट असणार्‍या अफगाणिस्तानला या हल्ल्यांच्या मागे हात असणार्‍या ओसामाला आपल्या हवाली करण्याविषयी अमेरिकेनं दबाव आणूनही तालिबान याला बधला नाही आणि काफिरांविरोधात लढणार्‍या ओसामाची तालिबाननं इतर मुस्लिम देशांना हाताशी घेत पाठराखण केली.

घडल्या प्रकारानं अमेरिका इतकी चवताळली की त्याचा परिणाम रॅम्बोच्या त्या क्लायमॅक्सच्या प्रसंगावरही झाला.

त्यात असणारं वाक्य बदलून आता, This film is dedicated to gallant people of Afghanistan असं करण्यात आलं. आजही तुम्ही हा चित्रपट बघितला तर तुम्हाला हे बदललेलं वाक्यच दिसेल.

 

rambo inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?