' एकेकाळी वापरला जायचा लाकडी बोर्ड! हळूहळू असं बदलत गेलं कॅल्क्युलेटरचं रूप… – InMarathi

एकेकाळी वापरला जायचा लाकडी बोर्ड! हळूहळू असं बदलत गेलं कॅल्क्युलेटरचं रूप…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

छोटी मोठी बेरीज सोपी असते. २ + २ हे नेहमीच ४ होणार, हे आपण तोंडी सांगू शकतो. त्यात काही लक्षात ठेवावं लागत नाही. पण हिशोबाची आकडेमोड जशी मोठी होत जाते, तशी आपल्याला ‘गणनयंत्र’ म्हणजेच ‘कॅल्क्युलेटर’ची गरज भासू लागते.

 

calculator inmarathi

 

तीन आकड्यांपेक्षा मोठ्या अंकांची आकडेमोड करायची वेळ आली, की आपण सरळ “कॅल्क्युलेटर कुठे आहे ?” असा प्रश्न विचारतो. दुकान, ऑफिस, घर जागा कोणतीही असो ‘कॅल्क्युलेटर’ ही सर्वात जास्त विश्वास असलेली वस्तू आहे हे निर्विवाद सत्य आहे.

सर्वात पहिला ‘कॅल्क्युलेटर’ कोणी तयार केला असेल? या वस्तूची गरज का भासली असेल? हे आज जाणून घेऊयात.

इसवी सनापूर्वीच…

इसवी सन पूर्व २५०० ते २००० या दरम्यान, इजिप्तमध्ये ‘कॅल्क्युलेटर’चा शोध लागला होता. तेव्हा त्याचं नाव, स्वरूप वेगळं होतं. एका चौकोनी लाकडाच्या बोर्ड वर १० वस्तू ठेवलेल्या असायच्या आणि जसं मोजून ठेवणं होईल तशी ती वस्तू दुसऱ्या बाजूला नेऊन ठेवली जायची. हाताच्या दहा बोटांवरून या बोर्डपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाला बरीच वर्ष लागली होती.

 

egyptian calculator inmarathi

 

आपल्या लहानपणी आपण विविध रंगांची मण्यांची पाटी बघितली होती. ज्या दोरीमध्ये जास्त मणी ती दोरी म्हणजे सर्व मण्यांची बेरीज अशी त्याची मोजण्याची पद्धत होती. हीच पद्धत ‘कॅल्क्युलेटर’ येण्या आधी बेरीज, वजाबाकी करण्यासाठी वापरली जायची. आकड्यांना आजची नावं नव्हती. पण, तरीही दहा वस्तू एकत्र आल्या की, लोक त्याचा वेगळा संच करायचे आणि त्यांना बाजूला ठेवायचे.

अबॅकसच्या रूपाने…

जगात अबॅकस ही आकडेवारीची पद्धती पसरवण्यात रोमन व्यापाऱ्यांनी मोठं योगदान दिलं आहे. इसवी सन १९० मध्ये चीनमध्ये सुरू झालेली ही पद्धत जवळपास ४५० वर्षांपर्यंत वापरली जायची. अबॅकस ही मोजणी पद्धतीची वस्तू आशिया खंडातील काही ठिकाणी वापरली जात असल्याचं सांगितलं जातं. १६१७ पर्यंत ही पद्धत युरोपमध्ये वापरली जायची.

 

abacus inmarathi

 

१६१७ मध्ये जॉन नॅपियर या स्कॉटलंडच्या गणित तज्ञाने ‘रॅबडोलॉजी’ हे रॉड्सच्या सहाय्याने गोष्टी मोजण्याचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित केलं होतं. कोणतंही किचकट गणित हे या पद्धतीने सहज रित्या सोडवलं जाऊ शकतं असा जॉन नॅपियर यांचा दावा होता.

१७ व्या शतकात जॉन नॅपियर यांनी तयार केलेल्या ‘अल्गोरिदम’च्या सहाय्याने ‘कॅल्क्युलेटर’च्या निर्मितीच्या दिशेने पावलं उचलण्यात आली होती.

असेच काही कॅल्क्युलेटर इतिहासात अनेकवेळा बनत गेले आहेत.

पास्कलचा ‘कॅल्क्युलेटर’

१६४२ मध्ये ब्लेझ पास्कल या गणितज्ञाने पहिल्या ‘मेकॅनिकल कॅल्क्युलेटर’चा शोध लावला. या कॅल्क्युलेटरमध्ये एकावेळी केवळ २ अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शक्य होती.

पास्कलने हार न मानता आपलं संशोधन पुढे सुरूच ठेवलं आणि पुढील दहा वर्षांनी ‘रॉयल प्रिव्हलेज’ नावाने जास्तीत जास्त गोष्टी करू शकणाऱ्या ‘कॅल्क्युलेटर’ची फ्रांसमध्ये निर्मिती केली.

 

pascal calculator inmarathi

 

काही वर्ष या पद्धतीचा कॅल्क्युलेटर वापरल्यानंतर १८२० मध्ये लिबनिझ आणि थॉमस डे कॉलरने ‘अरिथोमीटर’ नावाने कॅल्क्युलेटरची निर्मिती केली. १८५१ ते १९१५ या काळात युरोपमध्ये तयार झालेल्या सुधारित आवृत्तीमुळे कॅल्क्युलेटरला खरी मान्यता आणि लोकप्रियता मिळाली.

१९४० मध्ये ‘कर्टा कॅल्क्युलेटर’ या नावाने छोट्या, खिशात बसणाऱ्या कॅल्क्युलेटरची ऑस्ट्रेलियामध्ये निर्मिती करण्यात आली. मेकॅनिकल कॅल्क्युलेटरची सद्दी ही १९६० पर्यंत चालली. तिथून पुढे मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटरची सुरुवात झाली.

इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटरचा वापर वाढला

इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटरची काम करण्याची गती ही कोणत्याही इतर मेकॅनिकल कॅल्क्युलेटरपेक्षा १००० पटीने जास्त होती. अपूर्णांकानंतर १० अंक मेमरीमध्ये साठवून ठेवण्याची इलेट्रॉनिक कॅल्क्युलेटरमध्ये क्षमता होती. सर्वात पहिल्यांदा तयार झालेल्या इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटरचं वजन हे २७ टन इतकं होतं हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल.

१९६१ मध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर करून सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक डेस्कटॉप कॅल्क्युलेटरची निर्मिती करण्यात आली. इंग्लंडच्या ब्रिटिश कंपनी कंट्रोल सिस्टिम्सने तयार केलेल्या या कॅल्क्युलेटरला ANITA हे नाव देण्यात आलं होतं ज्याचा अर्थ A New Inspiration to Arithmetic Computing असा होता.

 

anita calculator inmarathi

 

कॅनॉन, मॅथट्रॉनिक्स, सोनी, तोशीबा सारख्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटरमध्ये खूप गुंतवणूक केली आणि हे मार्केट काबीज केलं.

मायक्रोचिप आल्यानंतर…

डिजिटल कॅल्क्युलेटरच्या शोधात ‘मायक्रोचीप’चा शोध लागणे ही सर्वात महत्वाची गोष्ट होती. छोट्या बॅटरीवर चालू शकणारे कॅल्क्युलेटर बनवणं हे ‘मायक्रोचिप’ मुळेच शक्य झालं. शार्प कंपनीने QT-8D मायक्रो कॉम्पेट या कॅल्क्युलेटरची निर्मिती केली आणि त्यामध्ये रॉकवेल चिपचा वापर केला ज्यामुळे डिस्प्ले, डेसीमल पॉईंट हे अधिक स्पष्ट दिसू लागले.

बीजगणिताचाही समावेश झाला

कॅल्क्युलेटरमध्ये बीजगणिताची सर्व सूत्र टाकण्याचं काम HP-35 या कॅल्क्युलेटरने सर्वप्रथम केलं आणि ‘सायंटिफिक कॅल्क्युलेटर’ची निर्मिती झाली. त्यापुढे जाऊन टेक्सास कंपनीने SR-10, SR-11 आणि SR-50 हे तीन कॅल्क्युलेटर तयार करून Pi, लॉग सारखे सर्व सूत्र एकाच मशीनमध्ये असल्याची सोय केली.

 

scientific calculator inmarathi

 

…आणि कॅसिओची एंट्री झाली

१९८० च्या दशकात कॅल्क्युलेटर तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली. कॅसीओसारख्या नवख्या कंपनीने बाजारात येऊन या इंडस्ट्रीचा सर्वात मोठा वाटा आपल्या नावावर केला होता. कमीत कमी किंमत, जास्तीत जास्त फंक्शन अशी ही स्पर्धा कॅल्क्युलेटरला ‘मिनी कम्प्युटर’ म्हणून जाहिरात करू लागली आणि कॅल्क्युलेटर प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक टेबलावर दिसू लागले.

 

casio calculator inmarathi

 

१९९२ मध्ये आयबीएम सिमोन या कंपनीने सर्वप्रथम फोनमध्ये कॅल्क्युलेटर देण्याची सोय केली. १९९३ मध्ये apple कंपनीने न्यूटन पीडीए नावाचा कॅल्क्युलेटर लाँच केला. १९९६ मध्ये ‘नोकिया ९००० कम्युनिकेटर’मध्ये कॅल्क्युलेटरचा समावेश केला.

२००० साली या सर्व कंपन्यांना मोठा झटका बसला जेव्हा सर्व मोठ्या मोबाईल कंपन्यांनी कॅल्क्युलेटर हे app च्या स्वरूपात लोकांना मोफत देण्याची सुरुवात केली. डिजिटल कॅल्क्युलेटरचं भविष्य इथून पुढे धोक्यात असेल असं भविष्य कित्येक मार्केट तज्ञांनी वर्तवलं सुद्धा होतं. पण, तसं काहीच झालं नाही. आज २०२१ मध्ये सुद्धा प्रत्येक दुकान, ऑफिसमध्ये निदान १ तरी कॅल्क्युलेटर हे बघायला मिळतोच.

काम नसतांना फक्त कॅल्क्युलेटरची बटणं दाबणं हा काही जणांचा छंद सुद्धा झाला आहे. आपल्या लाडक्या कॅल्क्युलेटरला बरेच लोक इतरांना देत सुद्धा नाहीत आणि काहींना तो इतका प्रिय असतो की ते त्यावर राग सुद्धा व्यक्त करत असतात. रागाच्या भरात कॅल्क्युलेटर फेकणारी एखादी व्यक्ती तुम्हाला दिसली तर त्याला हा इतिहास सांगा, ती व्यक्ती कॅल्क्युलेटरला सुद्धा फोन प्रमाणे जपायला शिकेल.

 

calculator inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?