इमारतीच्या आत गेलेला पत्रकार पुन्हा बाहेर आलाच नाही, एक रहस्य…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
एखादा पत्रकार इमारतीत जातो आणि परत येतच नाही, असं कसं शक्य आहे? पण होय, ही घटना घडलीय खरी!
त्याचं झालं असं की आपली काही महत्वाची कागदपत्रे आणण्यासाठी सौदी अरेबियाच्या दुतावासात २ ऑक्टोबर २०१८ रोजी गेलेले सौदी अरेबियातील बहुचर्चीत पत्रकार जमाल खश़ोगी हे परत आलेच नाहीत.
२ ऑक्टोबर रोजी इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दुतावासात प्रवेश करताना त्यांना शेवटचे पाहिले गेले.
तुर्की अधिकाऱ्यांना संशय आहे की दुतावासामध्येच सौदी अधिकाऱ्यांनी त्यांची हत्या केली असावी.दूसऱ्या सुत्रांच्या आधारे बातमी अशीही आहे की हत्येनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते ओव्हनमधे जाळण्यात आले व पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानंतर त्या ओव्हनमधे मटण शिजवण्यात आले.
काय आहे ही संपूर्ण घटना? चला तर मग जाणून घेऊया…
५९ वर्षीय जमाल खश़ोगी यांचा जन्म सौदी अरेबियातील ‘मदिना’ या धार्मिक स्थळी झाला. १९८३ मध्ये अमेरीकेतील इंडिआना विश्वविद्यालयातून शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारीतेचा व्यवसाय स्विकारला.
ते पहिल्यांदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी सोव्हिएट संघाचे सैन्य व मुजाहिदीन यांच्यात अफगाणिस्तानात झालेल्या संघर्षाचे रिपोर्टिंग केले होते. त्यांना धडाडीचे पत्रकार म्हणूनही ओळखले जात होते कारण ते अशा पत्रकारांपैकी एक होते ज्यांनी अमेरीका व इतर युरोपीय देश ओसामा – बिन – लादेनच्या शोधात असताना लादेनची प्रत्यक्ष मुलाखत घेतली होती.
यानंतर २००३ साली जमाल खश़ोगी सौदीतील बहुचर्चीत व्रुत्तपत्र ‘अल – वतन’ चे संपादक म्हणून निवडले गेले.
पण आपल्या क्रांतीकारी विचारांमुळे लवकरच त्यांना ते पद सोडावे लागले. सौदी सरकार, तिथले धर्मगुरू यांच्या वर्तणुकीवर टिका केल्यामुळेच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सौदी अरेबिया चे अभिषिक्त युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे मुख्य आलोचक असलेले जमाल सौदी अरेबिया सोडल्यानंतर मागच्या बऱ्याच कालावधीपासून अमेरीकेत वास्तव्यास होते.याच दरम्यान ते अमेरीकेतील मुख्य वृत्तपत्र “वॉशिंग्टन पोस्ट” मध्ये नियमीत रूपात सदर लिहीत होते.
ज्यामध्ये त्यांच्या लिखाणाचा मुख्य विषय सौदी सरकारच्या राजकीय नितीवर टिकेच्या स्वरूपात होता.
युवराज मोहम्मद बिन सलमान द्वारा तुरूंगात डांबण्यात आलेल्या इतर राजकुमार, मंत्री आणि सरकारी अधिकारी यांच्या तुरूंगातील छळाची कहाणी त्यांनी सगळ्या जगासमोर मांडली होती.जमाल हे सौदी अरेबियाने येमेनमध्ये छेडलेले युद्ध आणि कतारवर लावलेल्या प्रतिबंधाविरोधातही लिहीत होते.
त्यांनी अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबणे आणि लेबनॉनचे तत्कालीन पंतप्रधानांच्या अपहरणासंदर्भातही युवराज बिन सलमान यांना आपल्या सदरातून जाब विचारला होता.
“वॉशिंग्टन पोस्ट” सारख्या वर्तमानपत्रात लिहिलेले त्यांचे लेख पुर्ण जगभरात वाचले जात असत. असे सांगितले जाते की त्यामुळेच मोहम्मद बिन सलमान व त्यांचे सहकारी यांचा जमाल यांच्यावर रोष होता.
जमाल खश़ोगी हे चांगल्या प्रकारे ओळखून होते की अशा प्रकारच्या लेखनाने त्यांच्या जिवीतास धोका आहे. सार्वजनिकरीत्या अनेकदा त्यांनी हे बोलूनही दाखवले होते.
गायब होण्याच्या तीनच दिवस आधी बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिच शंका बोलून दाखवली होती.
बोलताना त्यांनी आपल्या एका मित्राचा संदर्भ दिला ; ज्याला सौदीमध्ये तुरुंगात टाकण्यात आल्याची बातमी ऐकीवात होती. ज्याचा खरेतर काहीच दोष नव्हता. पुढे ते असेही म्हणाले की, यानंतर मला असे वाटते मी सौदीमध्ये परतू नये.
माझ्या मित्राची काही चूक नसताना त्याला तुरुंगात डांबण्यात आलं, मी तर खुलेआम बोलतोय. सौदीमध्ये आजकाल असेच काहितरी होते आहे, ज्याची आम्हाला अजिबात सवय नाहीये.
यानंतर तीनच दिवसांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजी जमाल खश़ोगी यांना आपली फियोन्से हैतिस संगीज हिच्याशी लग्न करण्यासाठी लागणारी काही आवश्यक कागदपत्रे आणण्यासाठी तुर्कस्थानातील सौदी अरेबियाच्या दुतावासात जावे लागले. अनेक तास प्रतिक्षा करूनही खश़ोगी परत न आल्याने हैतिस हिने तुर्की पोलिसांकडे तक्रार केली.
तेव्हा प्राथमिक तपासात तपासण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधेही हेच सिद्ध झाले की दुतावासात गेलेले जमाल बाहेर आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर ला सौदी सरकारतर्फे निवेदन देण्यात आले की खश़ोगी आपली कागदपत्रे घेऊन दुतावासातून बाहेर पडल्यानंतर गायब झाले आहेत.
पण सौदी सरकारच्या या निवेदनाचे जमाल यांची प्रेयसी हैतिस व तुर्की राष्ट्रपती रजब तैय्यब एर्देआन यांच्याकडून खंडन करण्यात आले.
एर्देआन यांच्या प्रवक्त्याकडून त्यावेळी स्पष्ट करण्यात आले की जमाल अजूनही दुतावासात असून आम्ही सौदी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. आम्हाला अशी आशा आहे की लवकरच यावर पर्याय काढला जाईल.
पण ५ आक्टोबर रोजी युरोपातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात जमाल यांच्या गायब होण्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यामुळे अडचणीत आलेल्या सौदी सरकारने तुर्की अधिकाऱ्यांना सौदी दुतावासात शोधमोहीम राबवण्याची अनुमती दिली.
त्यानुसार ६ ऑक्टोबर रोजी तुर्की पोलीसांनी दिलेल्या निवेदनात खळबळजनक शक्यता वर्तवली गेली की २ ऑक्टोबर रोजीच सौदी दुतावासात जमाल खश़ोगी यांची हत्या करण्यात आली होती.
एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर अमेरीकी व्रुत्तमाध्यमांना सांगितले,
“आम्हाला पुर्ण विश्वास आहे, जमाल यांची हत्या हा पूर्वनियोजित कट होता.जमाल यांच्या हत्येनंतर मृतदेहाची लगेचच विल्हेवाट लावण्यात आली होती.”
तथापी सौदी सरकारकडून या शक्यतेचे खंडन करण्यात आले.
या प्रकरणाने नवीन वळण तेव्हा घेतले जेव्हा अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पहिल्यांदा या प्रकरणावर मत व्यक्त केले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि यात सौदी अधिकारी दोषी आढळल्यास त्याचे परीणाम गंभीर होतील.
ट्रंप यांच्या या वक्तव्यानंतर सौदी युवराज बिन सलमान यांनी तुर्की राष्ट्रपती एर्देआन यांच्याशी फोनवरून चर्चा केली व त्यानंतर तुर्की विदेश मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली की
सौदी दुतावासाचे सखोल निरीक्षण केले जाईल आणि या शोधमोहिमेत तुर्की व सौदी अरब या दोन्ही देशांचे अधिकारी सामिल होतील.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ आक्टोबर २०१८ रोजी एर्दैआन यांनी तुर्की संसदेत एक निवेदन जाहिर केले की सौदी दुतावासातील भिंती आणि फरशीवर काही विषारी पदार्थांचे अंश सापडले आहेत त्यामुळे या सर्वांची अधीक काळजीपूर्वक तपासणी केली जाईल.
त्यानंतर तुर्की अधिकाऱ्यांनी सौदी दुतावासाचे प्रमुख अधिकारी मोहम्मद – अल- ओताबी यांच्या घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला आणि काही तासांतच ओताबी हे तुर्कस्थान सोडून गेल्याचे निदर्शनास आले!
पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.पण जमाल खश़ोगी यांच्या अशा गायब होण्यानंतर या चौथ्या स्तंभाचे होत असणारे खच्चीकरण हे लोकशाहीस मारक असल्याचे सिद्ध होत आहे.
ही नक्कीच एका अराजकाची गंभीर नांदी आहे असे मानायला हरकत नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.