' जगातला सर्वात मोठा नायगरा धबधबाही कोरडा पडू शकतो? हे खरंच घडलंय, कारण… – InMarathi

जगातला सर्वात मोठा नायगरा धबधबाही कोरडा पडू शकतो? हे खरंच घडलंय, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जवळजवळ सगळ्यांनाच धबधबे बघायला आवडतात. उंचावरून खाली पडणारा पाण्याचा प्रवाह, मग तो लहान असो की मोठा, तो बघायला असंख्य लोक गर्दी करतात. पावसाळा सुरु झाला की भटकंती आवडणारे लोक धबधब्यांच्या शोधात हिल स्टेशनला जातात. जगात असे अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत ज्यांचा महाकाय जलप्रपात बघण्यासाठी लोक प्रवास करून चक्क दुसऱ्या देशात देखील जातात.

असाच एक प्रसिद्ध जलप्रपात म्हणजे उत्तर अमेरिका खंडातील नायगरा फॉल्स! अतीव सृष्टीसौंदर्य आणि प्रचंड वीजनिर्मिती यासाठी नायगरा फॉल्स प्रसिद्ध आहे.

 

niagara falls inmarathi
tripadvisor.in

नायगारा म्हणजे शान

अमेरिकेला गेलो आणि नायगरा नाही बघितला असे शक्यतोवर होत नाही. नायगरा फॉल्सला सगळ्यात उंचीवरून पाण्याचा महाकाय प्रवाह पडताना स्वतःच्या डोळ्यांनी बघणे ही एक पर्वणीच असते. हा नायगरा धबधबा अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर आहे. त्यामुळे दोन्ही देशांतून हा धबधबा बघता येतो.

अमेरिकेतील बफेलो या शहराच्या जवळ हा धबधबा आहे. ऑन्टॅरिओ आणि ईअरी या दोन सरोवरांना नायगरा नदी जोडते. त्या नदीवर हा धबधबा आहे.

गोट आयलँडमुळे या धबधब्याचे दोन भाग झाले आहेत. अमेरिकेकडील धबधब्याला नायगरा किंवा अमेरिकन फॉल्स म्हणतात तर कॅनडाकडील धबधब्याला हॉर्सशू फॉल्स किंवा कॅनडियन फॉल्स असे म्हणतात.

या धबधब्यातून प्रत्येक मिनिटाला १,६८,००० क्युबिक मीटर्स पाणी पडते असे म्हणतात. या धबधब्यात ताशी ४० किमी पेक्षा जास्त वेगाने पाणी वाहते.

 

niagara falls inmarathi
britannica.com

जितका मोठा तेवढाच जुना…

हा नायगरा धबधबा तब्बल अठरा हजार वर्षे जुना आहे. शेवटच्या हिमयुगानंतर हा धबधबा तयार झाला आहे. दक्षिण ऑन्टॉरियो भागात हिमयुगात दोन ते तीन किमी जाड थराचा बर्फ तयार झाला होता. त्याकाळात झालेल्या भौगोलिक हालचालींमुळे हा प्रदेश निर्माण झाला. साधारणपणे दहा हजार वर्षांपूर्वी बर्फ वितळून नायगरा धबधबा आणि अमेरिकेतील ग्रेट लेक्सची निर्मिती झाली.

आश्चर्य म्हणजे पाण्याचा हा महाकाय प्रपात इतिहासात दोन वेळेला कोरडा पडला होता. १८४८ साली पहिल्यांदा ही आश्चर्यकारक घटना घडली.

 

niagara falls no water inmarathi
theatlantic.com

का कोरडा पडला?

२८ मार्च १८४८ रोजी ईअरी लेकवर तयार झालेला बर्फ फुटू लागला आणि लेकच्या विरुद्ध दिशेने जोरदार वारे वाहू लागले. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यामुळे सगळा बर्फ फुटून तो नायगरा नदीच्या मुखात साठला.

हिमनगासारखे मोठे आणि थंडगार असलेले ते बर्फाचे तुकडे प्रचंड मोठ्या आकाराचे , कोट्यवधी टन वजन असलेले आणि तुटण्यास कठीण होते. त्यामुळे नायगरा नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला आणि पाणी वाहायचे थांबले. त्यामुळे फोर्ट ईअरी नदीचे पात्र पूर्ण कोरडे पडले.

आसपासच्या काही गिरणी कामगारांना नदीचा प्रवाह थांबलेला दिसला आणि त्यांनी नदीवर जाऊन बघितले तेव्हा त्यांना नदीचे पात्र अचानक कोरडे पडलेले दिसले. हा प्रकार बघून लोक घाबरले. त्यांना वाटले जगाचा अंत जवळ आला. त्यामुळे त्यांनी एकत्र जाऊन चर्चमध्ये प्रार्थना केली. तब्बल तीस तासांनी वाऱ्याची दिशा बदलली आणि बर्फ वितळला आणि त्याचे तुकडे झाले.

त्यामुळे अडून राहिलेला पाण्याचा प्रवाह परत वाहता झाला आणि नायगरा नदीत पाणी आल्यामुळे धबधबा देखील पूर्वीप्रमाणे वाहू लागला.

 

niagara falls beauty inmarathi
audleytravel.com

===

हे ही वाचा – २७५ लहान धबधब्यांपासून तयार होणारा महाप्रचंड धबधबा!

===

पुन्हा एकदा कोरडा ठक्क

अशीच नायगरा धबधबा कोरडा पडण्याची घटना दुसऱ्यांदा देखील घडली. पण फरक इतकाच की पहिली घटना नैसर्गिक होती आणि दुसरी मानवनिर्मित! १९६९ साली नायगरा फॉल्स काही महिन्यांसाठी बंद होऊन कोरडा पडला होता.

हजारो वर्षांपासून इतका मोठा प्रवाह इतक्या वेगाने उंचावरून खाली पडतोय म्हटल्यावर तिथे दरड कोसळणे हे ओघाने आलेच. पण दरड कोसळून हा धबधबाच धोक्यात येईल अशी भीती या धबधब्याचा अभ्यास करणाऱ्या काही अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञांना वाटली.

धबधब्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी आणि तिथल्या जमिनीची धूप कशी कमी करता येईल यासाठी तिथल्या दगडांचा आणि प्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन आणि कॅनडियन कमिशनने एकत्र येऊन ठरवले, की काही महिन्यांसाठी हा धबधबा बंद करायचा. चक्क काही महिने हा धबधबा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठरवल्याप्रमाणे धबधबा बंद करण्यासाठी जून १९६९ मध्ये १२०० पेक्षाही जास्त ट्रक भरून २८,००० टन दगड-माती या धबधब्याच्या मुखाशी टाकण्यात आली आणि ६०० फुटांचे एक तात्पुरते धरण बांधण्यात आले. नायगरा नदीचा प्रवाह बदलण्यात आला. हे काम करायला तीन दिवस लागले. यामुळे नायगरा नदीचा प्रवाह अमेरिकन फॉल्सकडे न जाता अधिक मोठ्या असलेल्या हॉर्सशू फॉल्सकडे वळवण्यात आला.

 

horse shoe falls inmarathi
tripadvisor.in

हे तुम्हाला माहित नसेल…

धबधबा कोरडा पडल्यानंतर अमेरिकन आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सने त्यांचा अभ्यास आणि पाहणी सुरु केली. इतक्या मोठ्या धबधब्यात अपघाताने अनेक लोकांचे जीव गेले आहेत, अनेकांनी आत्महत्या केली आहे तरीही त्यावेळी तिथे अभ्यास करणाऱ्यांना फक्त दोनच मृतदेह सापडले.

इंजिनियर लोकांनी नदीचे पात्र तपासण्यास सुरुवात केली आणि खडकाची क्वालिटी, ताण सहन करण्याची क्षमता वगैरे इतर बाबी अभ्यासल्या. तर इकडे उत्साही पर्यटक सुद्धा नदीच्या पात्रात उतरून लोकांनी प्रवाहात टाकलेली नाणी वगैरे गोळा करत होते.

खडकाच्या हालचाली तपासण्यासाठी अनेक ठिकाणी यंत्रे बसवण्यात आली आणि खडक पक्का व स्थिर राहावा यासाठी लुना आयलँड आणि ब्रायडल व्हेल फॉल्सवर स्टीलचे बोल्ट्स, केबल्स लावण्यात आले. तसेच पाण्याचे प्रेशर नियंत्रित राहावे म्हणून अनेक ठिकाणी ड्रिल करून छिद्रे देखील पाडण्यात आली.

हे सगळे काम पाच ते सहा महिने चालले आणि अखेर नोव्हेम्बर १९६९ मध्ये नायगरावर बांधलेला हा तात्पुरता बंधारा डायनामाईट वापरून उडवला आणि प्रवाह परत सुरु केला. हा नजारा बघण्यासाठी अडीच हजारपेक्षाही जास्त लोक तेव्हा त्याठिकाणी जमले होते.

यानंतर मात्र सगळ्यांनी ठरवले की या निसर्गनिर्मित कलाकृतीशी छेडखानी करायची नाही. तरीही परत एकदा या धबधब्याचे पाणी काही काळ रोखून ठेवावे लागू शकते कारण धबधब्यावर बांधलेले दोन पूल आता दुरुस्तीला आले आहेत.

 

niagara falls no water inmarathi
theatlantic.com

या कामासाठी फक्त १५ टक्के नायगराचा प्रवाह वळवला जाईल आणि उर्वरित भागाचा प्रवाह वाढेल. परंतु हे काम करण्यासाठी निसर्गाचे सहकार्य देखील अपेक्षित आहे. जर निसर्गाने त्याच्या कामात हस्तक्षेप सहन केला नाही तर माणसाची सगळी मेहनत एका क्षणात वाया घालवण्याची शक्ती या धबधब्यात म्हणजेच निसर्गाकडे आहे.

निसर्गाच्या कामात आपण ढवळाढवळ केलेली आपल्याला परवडणार नाही हे माणसांच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितके चांगले!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?