' टॅक्समधून मिळालेल्या पैशांचा ‘सदुपयोग’ म्हणजे अमेरिकेन पब्लिक लायब्ररी! वाचा – InMarathi

टॅक्समधून मिळालेल्या पैशांचा ‘सदुपयोग’ म्हणजे अमेरिकेन पब्लिक लायब्ररी! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – अनामिक

(Whatsapp वरील व्हायरल पोस्टवरून साभार)

===

जवळ जवळ पंचवीस वर्षे झाली असली तरी आजही मला तो दिवस लख्ख आठवतो. मी अमेरिकेत येऊन ८-१० दिवसच झाले होते. एका मैत्रिणीकडे गेले असताना, तिथे मी लहान मुलांकरता असलेली मोठ्या चित्रांची मोठ्या आकाराची पुस्तके पाहिली. ती पुस्तके पाहून मी हरखूनच गेले. तिने ही पुस्तके पब्लिक लायब्ररीमधून आणली होती. लहान मुलांकरता इतकी छान रंगीबेरंगी मोठी मोठी फक्त चित्रांची अशी पुस्तके…

या गोष्टीने भारावून जाऊन मी घरी परतले. दुसऱ्याच दिवशी मी आणि माझा नवरा, माझ्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन लायब्ररीत गेलो आणि पाचच मिनिटात आम्ही दोघेही त्या लायब्ररीचे मेंबर झालो. पाच वर्षावरची वयाचा कोणीही लायब्ररीचा मेंबर होऊ शकतो. अट फक्त एकच – त्या शहराचे रहिवासी असल्याचा पुरावा दाखवायचा (जसे की वीज बिल) त्या दिवशी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या अनेक आनंदाच्या क्षणांची नांदी झाली.

 

liabrary inmarathi

 

मुळात मला वाचनाची प्रचंड आवड. त्यातून लायब्ररी अगदी पाच मिनिटावर. त्यामुळे मी वारंवार लायब्ररीत जाऊ लागले. वेगवेगळ्या विषयाच्या लांबलचक पसरलेल्या पुस्तकांच्या शेल्फमधून फिरताना काय घेऊ आणि काय नाही असं व्हायचं.

मला तो पुस्तके शोधण्याचा अनुभवदेखील खूप आनंद देत असे. आधी कॉम्पुटरवर हव्या असलेल्या विषयाचा किंवा लेखकाचा शेल्फ शोधून काढायचा. बरं, या लोकांनी ही सगळी सिस्टीम करताना एवढा बारकाईने अभ्यास केलेला असतो की काय सांगू. तो शेल्फचा नंबर लक्षात ठेवायला लागू नये, म्हणून कॉम्प्युटरच्या बाजूला चतकोर कागदांची चळत आणि पेन्सिल ठेवलेली असते. मग दोन-चार पुस्तकांचे नंबर त्या कागदावर लिहून मी ते ते शेल्फ शोधत जायची.

त्या लांबलचक पसरलेल्या शेल्फच्या रांगामधून फिरत जाताना येणारा पुस्तकांचा वास मी छातीतच भरून घ्यायची. तो वास आजही मनात भरून राहिला आहे.

ठरलेल्या शेल्फपाशी पोचल्यावर हवं ते पुस्तक तर मिळायचंच पण इतर पुस्तकेही घ्यावीशी वाटायची. म्हणजे असं बघा, राजस्थानातल्या किल्यांचे पुस्तक घ्यायला गेले तर त्यालाच पाठ लाऊन स्कॉटलंडमधल्या किल्यांचे पुस्तक सापडायचं आणि तेदेखील माझ्या गठ्ठ्यात अलगदपणे जाऊन बसायचं. माझा नवरा म्हणायचा, “तरी बरं, एका वेळेस फक्त पंचवीसच पुस्तकं घेऊन देतात. नाहीतर तू अख्खी लायब्ररी उचलून आणली असतीस”.

 

books inmarathi

 

माझ्या दोन्ही मुलांना देखील आमची लायब्ररी प्रचंड आवडते, अगदी माझ्यापेक्षाही जास्त. “दुपारी ४ वाजता लायब्ररीमध्ये जायचे आहे” असे सांगितले की दोघेजण आपापल्या पिशव्या, परत करायची पुस्तके घेऊन ३ वाजताच तयार व्हायची. तिथे गेल्यावरसुद्धा, प्रथम परत करायची पुस्तके एकापाठोपाठ एक कन्व्हेअर बेल्टवर ठेऊन त्याची रिसीट घ्यायची. नंतर त्यांच्या एरियामध्ये गेल्यावर पुस्तके निवडायच्या ऐवजी दिसेल ते पुस्तक घेऊन वाचत बसायची.

मग मी त्यांना सांगायची की मी इथे एका ठिकाणी बसते आहे. तुम्ही तुम्हाला आवडतील ती पुस्तके घेवून या आधी. आणि मग वाचत बसा. माझी मुले त्यांना आवडतील ती पुस्तकं मला आणून देत असत. दोघेही ढीगभर पुस्तकं आणून माझ्या पुढ्यात ठेवत. मग आमच्यात अगदी मॅनेजमेंट विरुद्ध युनियन सारख्या वाटाघाटी होऊन निवडक पुस्तकं घेतली जायची. पुढे पाच वर्षांचे झाल्यावर माझ्या मुलांना त्यांचे स्वतःचे मेम्बरशिप कार्ड मिळाले. तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय होता.

 

book pile inmarathi

हळूहळू ही यंत्रणा किती अवाढव्य आहे याचा अंदाज येत गेला. गुगुलून बघितल्यावर असे समजले की अमेरिकेतील प्रत्येक पब्लिक लायब्ररी अत्यंत अद्ययावत आणि खूप मोठी असते. प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये पब्लिक लायब्ररी असतेच असते. आजमितीला अमेरिकेत १०,००० हून जास्त पब्लिक लायब्ररी आहेत. बेन्जामिन फ्रान्क्लीन ने १७३१ साली पहिली लायब्ररी सुरु केली. त्याचे नाव होते लायब्ररी कंपनी ऑफ फिलाडेल्फिया. त्या काळी लायब्ररीला फी आकारली जात असे. ती लायब्ररी अजूनही चालू आहे.

प्रत्येक लायब्ररीमध्ये असंख्य प्रकारची, असंख्य विषयावरची, अनेक भाषांमधली पुस्तके तर असतातच, पण त्याच्या जोडीला अनेक वर्तमानपत्रे, संदर्भग्रंथ, मासिके, वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म्स (डीव्हिडी किंवा ब्लू-रे), ऑडिओ-बुक, CD, व्हिडीओ गेम्स असं बरचं काही असते.

दृष्टीदोष असणाऱ्या लोकांकरता मोठ्या टाइपमधील पुस्तके देखील मिळतात. प्रत्येक मेंबरला एका वेळेस २५ पुस्तके, मासिके, १० ब्लू-रे (पूर्वी १० व्हिडिओ कॅसेट किंवा डीव्हीडी), कितीही ऑडियो CDs आणि व्हिडीओ गेम्स २ ते ३ आठवड्याकरता घरी नेता येतात. आणि मुख्य म्हणजे मेंबरशिप फ्री असते.

कोणत्याही प्रकारची फी न भरता आपण या सगळ्या गोष्टींचा लाभ उठवू शकतो. लायब्ररीचा खर्च त्या त्या शहरातल्या किंवा गावातल्या लोकांनी भरलेल्या प्रॉपर्टी टॅक्समधून भागवला जातो.

 

american public liabrary inmartahi

 

जर ती पुस्तके किंवा डीजीटल मिडीया रिन्यू करायचे असेल तर ते काम आता ऑनलाईन करता येते. ठरलेल्या मुदतीनंतरही त्या गोष्टी आपल्याला हव्या असतील तर ऑनलाईन रिन्यूदेखील करता येतात. याकरता प्रत्येक लायब्ररीची स्वतःची वेबसाईट असते. आपल्याला हवे असलेले पुस्तक जर उपलब्ध नसेल तर लायब्ररीच्या वेब साईटवर त्याकरता क्लेम लावता येतो.

एकदा, मला हवे असलेले पुस्तक आमच्या लायब्ररीमध्ये नव्हते, तर जवळच्या दुसऱ्या लायब्ररीमधून त्यांनी ते पुस्तक मागवले आणि मला त्यांची पुस्तक उपलब्ध झाल्याची इमेल आली.

लायब्ररीचे स्वतंत्र बुकमोबाईल म्हणजे एक पुस्तकांनी भरलेली व्हॅन असते, जी त्या त्या एरियामध्ये फिरत राहते, जेणेकरून वृद्ध, अपंग, रुग्ण अशा घराबाहेर पडू न शकणाऱ्या व्यक्तींना घरपोच सेवा मिळते. मुलं शाळेत जायला लागल्यावर असंही जाणवलं की, इथे शालेय जीवनातदेखील लायब्ररी किती गरजेची आहे. शाळेतले सायन्स प्रोजेक्ट असतील, इतिहास भूगोलातील माहिती गोळा करणे असेल, सूर्यमालेची मॅाडेल्स तयार करणे असेल किंवा पुरवणी वाचनाची पुस्तके असतील – या सगळ्याकरता पब्लिक लायब्ररी हेच उत्तर असते.

 

public liabrary girl inmarathi
languagemagazine.com

पहिली-दुसरीपासूनच मुलांना लायब्ररीमधील पुस्तके उपयोगी पडायला सुरवात होते. लायब्ररीमध्ये लहान मुलांकरता पुस्तकांचा वेगळा भलामोठा एरिया असतो. तिथे अगदी २-३ वर्षाच्या मुलांना आवडतील अशा चित्रांच्या पुस्तकांपासून १४-१५ वर्षाच्या मुलांना उपयोगी पडतील अशी पुस्तके, चित्रांची पुस्तके, डीव्हीडी (आता ब्लू-रे), मासिके, संदर्भग्रंथ असे सगळे सगळे मिळते. मुलांच्या शालेय इयत्तेप्रमाणे त्यांनी कोणती पुस्तके वाचणे योग्य आहे त्याची यादी लायब्ररीमध्ये मिळते. शाळेच्या अभ्यासक्रमानुसार त्यात आवश्यक ती पुस्तके असतात.

लायब्ररीमध्ये (कोणतेही पैसे न देता) कॉम्प्युटर वापरायला मिळतो. त्यामुळे मुले इथे येऊन होमवर्क करतात. इथे शाळा सर्वसाधारणपणे सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असते. त्यामुळे तीन वाजल्यानंतर हळूहळू शाळेतली मुले लायब्ररीमध्ये यायला सुरुवात होते. मुले कॉम्प्युटरवर काम करतात किंवा स्टडी रूममध्ये ५-६ जण एकत्र बसून अभ्यास करतात.

परीक्षेच्या काळात एक एरिया अभ्यासाकरता राखून ठेवला जातो आणि जोडीला पिझ्झा, कुकीज्, डोनट्स आणि सॅाफ्ट ड्रिंक ठेवलेले असतात. तिथे मुले सलग बसून अभ्यास करत असतात. SAT सारख्या अकरावीमध्ये महत्त्वाच्या समजल्या गेलेल्या परीक्षांची पूर्वतयारी लायब्ररीमध्ये निशुल्क करून घेतली जाते. तसेच वर्षभर प्रॅक्टिस सेशन्सपण घेतली जातात. आता तर पहिली ते बारावीच्या कोणत्याही विषयाकरता ऑनलाईन ट्यूटरिंगची सोय लायब्ररीने केली आहे. अर्थातच फ्री.

 

free inmarathi

 

मुलांचा सगळ्यात आवडता उपक्रम म्हणजे समर रीडिंग प्रोग्रॅम. शाळेला वार्षिक सुट्टी लागली या प्रोग्रॅमला नाव नोंदवायचे. आणि ३ महिन्यांच्या सुट्टीत जास्तीत जास्त पुस्तके वाचायची. प्रत्येक वयाला साजेशी अनेक विषयांवरची असंख्य पुस्तके उपलब्ध असतात. आम्ही एका वेळेस २० पुस्तके घेवून यायचो आणि १० दिवसात परत नवी पुस्तके घ्यायला जायचो. माझ्या मुलाने पहिलीमध्ये १०० पुस्तके वाचली होती आणि त्याला बक्षीस देखील मिळाले होते. पुस्तके अगदी छोटीशी १०-१२ पानांचे एक अशी आणि त्याच्या वयाला साजेशी होती.

हळूहळू पुस्तके मोठी होत गेली. १०० चित्रांच्या पुस्तकांची जागा आता ३० मोठ्या ठोकळ्यांनी घेतली. पण आजही दोघेही जण प्रचंड वाचतात. आता कॉलेजमधे जाणारी मुलगी आणि नोकरीला लागलेला मुलगा जेव्हा घरी येतात, तेव्हा आल्याच्या पहिल्या दिवशी जावून २-४ पुस्तके घेऊन येतातच. दोघांच्या वाचनाचे श्रेय या समृद्ध लायब्ररीचे आहे.

ही जशी शाळेतल्या मुलांची सोय झाली तसेच काही उपक्रम मोठ्यांच्या करता पण असतात. बायकांच्या करता क्रोशे, विणकाम, योगासने यांचे क्लासेस असतात, तसेच बागकाम आणि फोटोग्राफीचे क्लासेस असतात. अगदी ३ ते पाच वर्षाच्या मुलांकरता पण स्टोरी टेलिंग प्रोग्राम असतात. थोड्या मोठ्या मुलांकरता वेगवेगळ्या सणाला क्राफ्ट चित्रकला यांचे सेशन्स असतात.

 

crafts inmarathi
coolcrafts.com

तसेच लायब्ररीतर्फे अनेक व्याख्याने भरवली जातात. जसे की आरोग्य विषयक, हेल्थ इन्शुरन्सविषयी, खगोलशास्त्र, वन्यजीवन, तब्येतीविषयी (डायबेटीस,स्ट्रेस मॅनेजमेंट इ.), मार्च महिन्यात टॅक्स रिटर्न्स भरण्याविषयी, उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगवेगळ्या मैफिली, नाटके यांचे आयोजन केले जाते. वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात.

समाजातल्या सगळ्या घटकांना सामावून घेणारा एक प्रोग्रॅम असतो आणि तो म्हणजे 5K रनिंग. मोठे उत्साहवर्धक चित्र असते ते… हौशी, लहान, मोठे आणि खरे व्यायामपटू अशा सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह असतो . त्या सर्वांना प्रोत्साहन द्यायला त्यांचे पालक, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक असा एकदम कोलाहल असतो मग… लायब्ररीचे एक त्रैमासिक पोस्टाने घरी येते. त्यात पुढच्या तीन महिन्यात लायब्ररीमध्ये होणाऱ्या या सगळ्या कार्यक्रमांची माहिती असते.

कोणत्याही प्रकारचा रिसर्च करायचा असेल, तर लायब्ररीयन हवी ती पुस्तके, संदर्भ शोधून काढायला मदत करते. नुकतेच प्रसिद्ध झालेले जे संदर्भग्रंथ लायब्ररी बाहेर नेता येत नाहीत, ते तिथेच वाचावे लागतात, पण हल्ली ते ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. तसेच अनेक प्रकारची मासिके आता ऑनलाईन उपलब्ध झाली आहेत. कित्येक ई बुक्स लायब्ररीच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येतात. आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

 

e books inmarathi

समाजात वाचन संस्कृती रुजवण्याच्या हेतूने अजून एक प्रकार म्हणजे बुक क्लब किट! एका किटमध्ये एका पुस्तकाच्या २० प्रती असतात. मग लोकं स्वतःचा ग्रुप करून हे किट्स घरी नेतात आणि काही दिवसांनी लायब्ररीमध्ये त्या पुस्तकावर चर्चासत्र भरवतात. हे ऐकायला अनेक इतरही उत्साही लोक आनंदाने येतात.

वेगवेगळ्या सणांना, राष्ट्रीय सुट्ट्यांना या लायब्रऱ्या मोठ्या कल्पकतेने सजवल्या जातात. ते बघायला जाणे हा पण आमचा आवडता उद्योग आहे. त्या सणाची पुस्तके आणि इतर गोष्टी आकर्षकरित्या मांडून ठेवलेली असतात. वेगवेगळे डेज संपन्न केले जातात जसे की चायनीज न्यू इयर, ख्रिसमस, आणि दिवाळी सुद्धा.

 

Diwali03-marathipizza
pinterest.com

 

या लायब्ररीचे व्यवस्थापन पाहणारी खूप मोठी यंत्रणा असते. काही स्टाफ पगारी असतो, तर काही स्वयंसेवक.

प्रत्येक लायब्ररीला एक मॅनेजर असतो आणि त्याच्या हाताखाली वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख असतात. लहान मुलांच्या विभागाकरता, टीन विभागाकरता आणि इतर प्रौढ लोकांकरता. हा सर्व पगारदार वर्ग असतो. लायब्ररीचा स्टाफ हा लायब्ररी विषयात मास्टर्स डिग्री घेतलेला असतो. आणि तोच स्टाफ कोणती पुस्तके विकत घ्यायची आणि कोणती पुस्तके वेळोवेळी काढून टाकायची याचा निर्णय करत असतो.

स्वयंसेवकांचा देखील लायब्ररी चालवण्यात मोठा वाटा असतो. कित्येक स्वयंसेवक लायब्ररीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रोग्रम्समध्ये मदत करतात. मुख्यत्वे करून आलेली पुस्तके परत जागेवर लावणे, आणि लोकांनी क्लेम लावून ठेवलेली पुस्तके उपलब्ध होताच ती क्लेम विभागात आणून ठेवणे याकरता स्वयंसेवकांची जास्त मदत घेतली जाते.

स्थानिक लोक लायब्ररीला अनेक बाबतीत मदत करतात. त्यांच्याकडून लायब्ररीला मिळालेला पैसा स्टाफवर खर्च न होता फक्त पुस्तकांवर खर्च होईल याची खबरदारी घेतली जाते. आपल्या घरातील आता नको असतील ती पुस्तके लोक लायब्ररीला दान करतात. ती पुस्तके लायब्ररी नाममात्र किमतीला विकते आणि येणारा पैसा लायब्ररीच्या फंडात जमा होतो. हे काम देखील स्वयंसेवक करतात.

ज्यांची इंग्लिश ही नवी भाषा आहे त्यांना ती शिकवण्याचे काम लायब्ररीतर्फे स्वयंसेवक करतात.

माझी मुलगी लायब्ररीमध्ये टीन अॅडव्हायजरी बोर्डवर होती. ही मुले वेगवेगळे प्रोजेक्ट्स आखायला, पार पडायला मदत करतात आणि टीन वयोगटाकरता कोणती पुस्तके घ्यावीत याचा निर्णय करायला मदत करतात. तरुण वर्ग वेगवेगळे प्रोग्राम्स राबवतात आणि नवीन कोणती पुस्तके घ्यायची याच्या चर्चेमध्ये वेगेवेगळे ठिकाणचे रिव्ह्यू वाचून, लोकांच्या शिफारशी ऐकून निर्णय घायला मदत करतात.

लेक्चरकरता, चर्चा सत्राकरता, व्हीडीयो प्रेझेंटेशन करता लायब्ररीचे अद्यावत ऑडीओ-व्हिजुअल उपकरणांनी सुसज्ज हॉल नाममात्र भाड्याने मिळतात.

 

huge conference hall inmarathi

 

अनेक उपक्रमांविषयीची माहिती, बसची वेळापत्रके, वेगवेगळे क्लासेस या सगळ्यांची माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे लायब्ररी.
२०१४ साली आमच्या लायब्ररीने एक अभिनव प्रोजेक्ट केला. एक पेटारा ‘टाइम कॅप्सूल’ म्हणून जमिनीत पुरला गेला. त्यात २०१४ सालच्या आमच्या शहरातल्या तरुण मुलांचे विश्व कसे होते या संबंधातल्या वस्तू ठेवल्या होत्या. उदा. हॅरी पॉटरचे पुस्तक, DVD, तरुण मुलांचे फोटो (ज्यावरून त्यांच्या कपड्यांचा अंदाज येईल). हे बरोबर ५० वर्षांनी उघडले जाणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत अजून एका वेगळ्याच दृश्याची भर पडते. रोज संध्याकाळी लायब्ररीच्या बाहेर भारतातून आपल्या मुलं-मुलींना भेटायला आलेले सिनियर सिटीझनचं जणू संमेलनच भरलेलं असतं. जरा उन्हं उतरायला लागली की भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात राहणारे आजी-आजोबा एकमेकांशी भाषेचं कुंपण ओलांडून मनसोक्त गप्पा मारत बसलेले दिसतात. त्यामुळे दिवसभर शांत असलेला हा परिसर संध्याकाळी एकदम गजबजून जातो. असे वाटायला लागते की हा भारतातलाच एखादा कोपरा असावा.

मला लायब्ररीची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथेच बसून वाचण्याकरता असलेला मोठा हॉल. त्याला मोठ्ठाल्या खिडक्या आहेत, ज्यातून बाहेरची हिरवळ दिसते. सगळीकडे मोठमोठ्या चित्रांच्या फ्रेम्स आहेत. गुबगुबीत आरामदायक सोफे आहेत. तिथे उन्हाळ्यात गार, तर थंडीत उबदार वातावरणात अनेक लोकं तल्लीन होऊन वाचत बसलेले बघूनच खूप छान वाटते. अशावेळी लायब्ररी अजूनच शांत वाटते.

 

american public liabrary inmarathi

 

म्हणजे एक दोन ठिकाणी कोणी काही चौकशी करत असतं किंवा लहान मुलांच्या एरियामध्ये कुजबुज चालू असते, पण ते सोडता सर्वत्र अगदी निरव शांतता असते.

लायब्ररी अनेक लोकांना अनेक धाग्यांनी जोडण्याचे काम करते. अमेरिकन समाजाला समृद्ध करण्यात, माणसे घडवण्यामध्ये पब्लिक लायब्ररींचा सिंहाचा वाटा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?