आज एक स्पर्धा हरला असला, तरीही जोकोविच ‘म्हणूनच’ पुन्हा जिंकू शकतो, कदाचित…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लहानपणी जोकोविचचे आई बाबा रिसॉर्टवर काम करायचे. टेनिस महागडा खेळ असल्याने त्यांना कोर्टची फी परवडण शक्यच नव्हतं. तेव्हा लहानसा नोवाक तिथं वेटरचं काम करून टीपच्या बदल्यात तिथे आलेल्या पर्यटकांकडून रिसॉर्टवर दोन तास टेनिस खेळायचा सौदा करायचा.
आज जगजेत्तादेखील असलेल्या जोकोविचने स्वतःकडे पैसे येताच सर्बियामध्ये मोफत ३० टेनिस कोर्ट्सचं संकुल उभारलं, जिथे कुणालाही पैसे न देता खेळता येतं!
या मुलाचा बारावा वाढदिवस साजरा होत होता, तेव्हा तो सवंगड्यांसोबत टेनिस कोर्टवर होता. मस्त सेलिब्रेशन सुरू असतानाच, अचानक नाटोच्या फौजांनी युगोस्लाव्हियाच्या सैन्यावर हवाई मारा सुरू केला. ‘हॅपी बर्थडे’ वगैरे सारे हवेतच विरले.
पोरगा मोठा होत गेला आणि युद्धाचे ढगही वाढत गेले. असाच एक प्रलयंकर हवाई हल्ला झाला आणि त्या धक्क्याने आई बेशुद्ध पडली. वडील अस्वस्थ झाले. धाकटी भावंडं भेदरली. तरीही हा मुलगा अथक टेनिस खेळत राहिला. रात्री जिथं हवाई हल्ले झाले, तिथंही सकाळी दमदारपणे खेळत राहिला.
–
- “ओपन” : “जगातील सर्वात नावडती गोष्ट” असणाऱ्या टेनिसवर राज्य करणाऱ्या अवलियाचं आत्मचरित्र!
- स्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…हार्डकोर्टवरची गुलमोहर!
–
नोवाक जोकोविच, एक-दोन नव्हे, तर चक्क सहावेळा विम्बल्डन जिंकणारा हाच तो जगज्जेता. ३४ हे वय जिथं म्हातारं मानलं जातं, त्या टेनिसच्या मैदानावर जोकोविच यंदाही अजिंक्य ठरला होता. यंदाची ग्रँडस्लॅम स्पर्धाही त्याने त्याच्या नावे केली होती.
कालची यु.एस. ओपनची फायनल तो हरला; पण म्हणून तो संपला असं म्हणता येणार नाही… तो अजूनही जिंकू शकतो!
प्रचंड मनोनिग्रह, कणखर शरीर, कमाल मुत्सद्देगिरी, विलक्षण जोश आणि बर्फासारखी संयमी शांतता या बळावर जोकोविच आजही उत्तम खेळतोय. त्याच्या विजयांचं, यशाचं गमक हेच आहे.
कितीही ताण येवो, कितीही कठीण परिस्थिती असो, तो जराही डगमगत नाही. त्याची एकाग्रता भंगत नाही. आणि, समजा एखादा अगदी मानहानीकारक पराभव झाला तरी तो हलत नाही. म्हणून तर, एक ना दोन, आजवर वीस ग्रॅंडस्लॅम सामने जिंकलेत या पठ्ठ्यानं…!!
जोकोविच नक्की काय करतो?
तो संयमानं खेळतो. चुका करत नाही. स्पर्धकाला चुका करायला भाग पाडतो. घाई करत नाही. गोंधळून जात नाही. संधीची वाट पाहातो. आणि, मग मात्र मागे वळून पाहात नाही. जिंकतोच तो. आणि, हरतो तेव्हाही तो ‘जोकोविच’च असतो! जगातला नंबर एक टेनिसपटू तो उगाच नाही.
सर्बियातला हा पोरगा, युद्धाच्या ढगांखाली रोज रात्री एकमेकांना बिलगून झोपणारी बाल्कन देशांमधली ही पोरं अशी अजिंक्य कशी ठरली? जोकोविच एकटा नाहीये. ॲना इव्हानोविकदेखील तिथलीच. सर्बियाची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राच्या निम्मी. पण, अनेक चॅम्पियन्स तिथं जन्माला आले.
हे सगळं कशामुळं?
जोकोविचला याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला होता, “द्वेष आणि हिंसा एवढी पाहिली की, त्यातलं फोलपण समजतं. युद्ध कोणी हरलं वा कोणी जिंकलं, तरी ते अर्थशून्य आहे, हे समजतं. मग संयम आणि मनोनिग्रह वाढतो. मन शांत होतं. जगण्यातलं भंगुरपण कळतं, तेव्हा एखाद्या साधुसारखे तुम्ही अविचल होता.”
सततच्या युद्धामुळं असेल कदाचित, पण आपली माणसं एकमेकांच्या आणखी जवळ येतात. एकमेकांचे हात हातात घट्ट धरून रोजचं रणांगण लढू लागतात. त्यातनं मृत्यूची दहशत कमी होते आणि जगण्याची असोशी वाढते. मारण्याची इच्छा संपते आणि जगण्यावरची निष्ठा वाढते. जगण्याचे खरे मोलही समजते.
आभाळ कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहीन मी, अशी विजिगिषु वृत्ती मग अंगी येते.
मन, मेंदू, मनगट अशा एकात्म भावनेनं झुंजता, तेव्हा जय-पराजयाच्या पल्याड जाता तुम्ही. झुंज नव्हेच. साधना असते मग ती… मग, जिंकण्याशिवाय काही पर्यायच राहात नाही!
–
- भर मॅचमध्ये टेनिस चॅम्पियनच्या पाठीत खंजीर… करिअर कायमचं बरबाद…
- २२ व्या वर्षीच कसोटी क्रिकेटचे अवघड विक्रम आपल्या नावावर करणारा अवलिया फलंदाज!
–
आध्यात्मिक माणसं ही अशी असतात. जगणं कळलेली माणसं अशी असतात. ती निकालाच्या, फळाच्या पलिकडं जातात. पण, म्हणून लढणं सोडत नाहीत. कर्म करणं थांबवत नाहीत. उलटपक्षी, अशी झुंज देतात, की ती कधीचीच जिंकलेली असतात!
विखार वा विद्वेष यानं झपाटून एखादा सामना तुम्ही जिंकू शकालही कदाचित, पण सौहार्द, संयम आणि अशी उच्च कोटीची शांतता असल्याखेरीज तुम्ही जगज्जेते नाही होऊ शकत!
आज एक स्पर्धा हरला असला, तरीही जोकोविच म्हणूनच पुन्हा जिंकू शकतो, कदाचित…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.