अब्राहम लिंकन यांचं भूत आजही व्हाइट हाउसमध्ये भटकतं का? वाचा यामागचं गूढ!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
महासत्ता असलेल्या अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी. आणि तिथल्या “व्हाईट हाऊसच्या” अनेक कथा किस्से आपल्याला अधून मधून कळत असतात. अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं हे निवास स्थान. नियमानुसार, प्रत्येका राष्ट्रपतीला आपल्या कार्यकाळात सुरक्षेच्या दृष्टीने व्हाईट हाऊस मधेच राहावं लागतं.
आजच्या टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियामुळे, आपल्याला व्हाईट हाऊसचे सगळेच किस्से थेट घरबसल्या माहित पडतात.
ते कसं आहे, त्यात किती खोल्या आहेत, बाहेरून जसं पांढरं आहे तसंच आतूनही आहे का, तिथलं ओवल ऑफिस, राष्ट्रपतींची खोली या सगळ्याची माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळतेच. पण व्हाईट हाऊस ह्या व्यतिरिक्त अजून एका कारणामुळे ओळखलं जातं, ते म्हणजे, तिथल्या अनैसर्गिक भुताटकी घटनांमुळे.
असं म्हणतात, आजही अमेरिकेचे सगळ्यात लोकप्रिय आणि महान राष्ट्रपती अब्राहाम लिंकन यांचं भूत तिथे वास्तव्यास आहे. अनेकांनी त्यांना बघितल्याचेही अनुभव आहेत. काय आहे ही नेमकी गोष्ट, ते पाहूया.
असं म्हणतात व्हाईट हाऊसमध्ये अब्राहाम लिंकन आणि अनेक माजी राष्ट्राध्यक्षांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आत्मे दिसतात. तिथे राहणाऱ्या अनेक लोकांनी, नोकरांनी, अमेरिकेच्या अनेक फर्स्ट लेडीजना या प्रकारचे अनुभव आल्याच्या अनेक गोष्टी अनेक पत्रकारांनी, मॅगझिन्सनी सुद्धा प्रकाशित केल्या आहेत.
–
हे ही वाचा – अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या हत्येची कथा तुमची झोप उडवेल
–
या सगळ्यांच्या अनुभवांवरून व्हाईट हाऊसमध्ये अब्राहाम लिंकन, त्यांचा मुलगा विली, काही पूर्व राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांचे आत्मे आहेत आणि ते त्यांच्या ठराविक वेळी त्यांच्या ठराविक जागी आल्याचे अनुभव लोकांना येतात.
दुसऱ्या विश्वयुद्धाच्यावेळी जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आपल्या मित्रराष्ट्राच्या म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भेटायला आले तेव्हा त्यांना व्हाईट हाऊसमध्ये थांबवण्यात आले होते. चर्चिल यांना, मोठ्या चर्चासत्रानंतर भरपूर वेळ अंघोळ करण्याची म्हणजे हॉट टब बाथ घेण्याची सवय होती.
नेहमीप्रमाणे ते अंघोळ करून, निर्वस्त्रच बाथरूमबाहेर आले तेव्हा, त्यांच्या खोलीच्या खिडकीजवळ एक लांब हॅट, काळा कोट घातलेला, एक सडपातळ अंगाचा माणूस उभा होता. त्यांनी नीट बघितलं तेव्हा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून, स्वतः अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहाम लिंकन होते.
त्या घटनेनंतर, चर्चिल यांना एका दूरवरच्या दुसऱ्या खोलीत शिफ्ट करण्यात आले होते. असे म्हणतात की अमेरिका जेव्हा एखाद्या संकटात सापडलेली असते तेव्हा अब्राहाम लिंकन लोकांना दिसू लागतात. अजूनही एखाद्या आईप्रमाणे ते अमेरिकेवर लक्ष ठेऊन आहेत असे मानले जाते.
व्हाईट हाऊसमधील अब्राहाम लिंकनच्या खोली जवळील व्हरांड्यात लिंकन अजूनही फेऱ्या मारतायत असा आवाज येतो. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती हॅरी ट्रुमन आणि त्यांची मुलगी मार्गरेट यांनी तिथे कोणीही नसतानासुद्धा हे फेऱ्या मारण्याचे, किंवा पावलांचे आवाज कसे येतात हे अनुभवले होते.
त्यांच्याच एका प्रसिद्ध आणि खूप चर्चिल्या गेलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब जाहीर केली होती. हे दोनच ठळक पुरावे झाले पण अजून एक अशी मोठी व्यक्ती आहे जिने अब्राहाम लिंकन यांना स्वतः पाहिल्याचे सांगितले जाते.
नेदरलँडची राणी Queen Wilhelmina. १९४२ साली Queen Wilhelmina या अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी, त्यांची राहण्याची व्यवस्था अब्राहाम लिंकनच्याच खोलीत केली गेली होती.
दिवसभर सगळे उत्तम होते. पण रात्री त्यांच्या खोलीच्या दारावर अचानक ३ – ४ वेळा थाप पडली. राणीला वाटले की काहीतरी महत्वाची सूचना असेल म्हणून इतक्या रात्री आपल्याला जागं केलं जातं आहे. असा विचार करून तिने दार उघडले, तर समोर खुद्द अब्राहाम लिंकन उभे होते.
पांढऱ्या शुभ्र सूक्ष्म शरीरासारखा तो देह दिसत होता. हे सगळं पाहताच राणी तिथल्या तिथे बेशुद्ध झाली आणि व्हाईट हाऊसमध्ये खरंच भूत आहे का, हा विषय पुन्हा अमेरिकाचा चर्चेचा विषय बनला.
अमेरिकेच्या फोर्ड थिएटर मधेच अब्राहाम लिंकन यांची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा आत्मा अजूनही तिथेच घुटमळतो का, त्यांना सदगती कधी लाभलीच नाही का, असे अनेक प्रश्न अनेक अभ्यासकांच्या डोक्यात येतात.
कारण, फोर्डमध्ये आजही गोळी झाडून हत्या झाल्यानंतर ज्या किंकाळ्या थिएटरमध्ये त्यावेळी आल्या होत्या, तशाच आजही ऐकू येतात. अब्राहाम लिंकनसह, अनेक लोकांचे आत्मे तिथे रडतायत हे दृश्य तिथे ठळकपणे दिसून येते.
अब्राहम लिंकनच्या पत्नी मेरी टॉड लिंकन, ह्या अत्यंत अंधश्रद्धाळू होत्या. त्यांच्या दुसऱ्या मुलाचा, म्हणजे विलीचा ज्यावेळी मृत्यू झाला होता त्यावेळी अब्राहम हे प्रेसिडेंट होते. तेव्हा मेरी व्हाईट हाऊस मध्ये अनेक पादरी आणि एक्स्पर्ट्सना घेऊन, विलीच्या मृतात्म्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असे.
याच मेरी टॉड लिंकनने, आपले पती अब्राहाम लिंकन यांच्या आत्म्यासोबत एक फोटो काढून घेतला होता. प्रसिद्ध भूत फोटोग्राफर, विलियम एच मम्लर William H. Mumler, यांनी हा फोटो काढल्याचे म्हटले जाते.
मेरीच्या म्हणण्यानुसार त्यांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा सहवास लाभत असे आणि यामुळे त्यांचं दुःख थोड्या प्रमाणात का होई ना कमी होत असे.
याव्यतिरिक्त, व्हाईट हाऊस मध्ये राहणाऱ्या अनेक नोकरांनी, पाहुण्यांनी, राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांनी अब्राहाम लिंकन यांना बघितल्याच्या अनेक गोष्टी आहेत. यापैकी जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं एकच होतं, की अमेरिकेवर कोणतं संकट आदळलं, की अब्राहाम लिंकनच दिसणं वाढतं.
प्रसिद्ध ओव्हल ऑफिसमध्ये ते आपल्याला खिडकीतुन बाहेर काही तरी बघताना व विचार करताना आढळतात, कधी जिन्यावर तर कधी व्हरांड्यात त्यांच्या चालण्याचा आवाज येतो.
आजही एका पक्षिणी प्रमाणे, ते आपल्या घरट्याकडे लक्ष ठेऊन आहेत. जेव्हा जेव्हा अमेरिकेला त्यांची गरज पडते ते मदतीसाठी त्वरित धावून येतात.
===
हे ही वाचा – एका लहान मुलीने दिलेल्या सल्ल्यामुळे अब्राहम लिंकन “लोकप्रिय” राष्ट्राध्यक्ष झाले…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.