गप्प रहा पण चेष्टा नको, कोव्हीड-बॅच म्हणून नका हिणवू; केलाय सवाल विद्यार्थ्याने!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
काल १०वी आणि १२ वी चा रिझल्ट लागला. माझ्या एका मित्राचा मुलगा पडल्या चेहऱ्याने पेढे घेऊन आला होता. खरं तर तो खूप हुशार. १०वी ला ९३% टक्के मिळवलेला. सिन्सिअर, कष्टाळू. त्याचा पडलेला चेहरा पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं. त्याने पेढे दिले, नमस्कार केला. मी त्याला बसायला सांगितलं, आतून एक पाकीट आणून त्याला बक्षीस दिलं.
विचारलं किती मार्क्स मिळाले. ९४%. मी त्याला म्हंटलं “वा फार छान, तू वर्षभर मन लावून अभ्यास केला होतास, मला खात्री आहे की परीक्षा घेतली असती तर तुला इतकेच किंवा जास्तच पडले असते”.
आणि काही कळायच्या आत तो ओक्सबोक्शी रडू लागला. मी त्याला मनसोक्त रडू दिलं. पाणी दिलं. थोडा शांत झाल्यावर रडत रडत तो बोलू लागला.
“काका, तरी मी आई -बाबांना सांगत होतो की मला कोणाला पेढे वाटायचे नाहीत. तुमच्या कडे जायच्या आधी ४ घरी जाऊन आलो. सगळीकडे हेच – “काय मजा आहे बाबा तुमची …परीक्षा नाही”.,”मार्क्स नुसते वाटले आहेत..आमच्या वेळी असलं नव्हतं”, “या वर्षी त्या ९५%-९७% टक्क्यांना काही अर्थ नाही..सगळ्यांनाच मिळाले आहेत” ते
एक काका तर म्हणाले “जे नापास झाले त्यांचं खरं कौतुक आहे या वर्षी”. दुसरे म्हणाले “तुमच्या बॅच ला नोकरी मिळण्यात जाम प्रॉब्लेम येणार”
मला सांगा ना काका, यात माझं किंवा आमचं काय चुकलं. पूर्ण वर्ष भर कॉलेज नाही, क्लास नाही. त्या सगळ्या ऑनलाईन शी कोप अप करत अभ्यास केला. सुरवातीचे ६ महिने मला लॅपटॉप नव्हता. बाबा घरी आले, त्यांचे काम झाले की मी रात्री जागून रेकॉर्डेड सेशन्स ऐकायचो, नोट्स काढायचो. हे नाही दिसलं कोणाला. अभ्यासाचा पोर्शन तर ऑक्टोबर, नोव्हेंबर मधेच पूर्ण झाला होता. तेव्हा पासून पेपर सोडवतोय. ३ रिव्हिजन्स पूर्ण केल्या. आपण इन पर्सन शिकलो नाही आहे या भीतीने आणि दबावाने परत -परत वाचलं. अगदी कंटाळा येई पर्यंत. मग कळलं की २५% सिलॅबस कमी केलाय. चिडचिड झाली पण कोणाला सांगणार. उरलेल्या पोर्शन ची परत अजून रिव्हिजन. ती दोनदा झाली. परीक्षेची तारीख नक्की होईना. सगळंच अधांतरी.
मग कळलं की बहुदा ऑनलाईन MCQ बेस्ड होणार. परत त्या दृष्टीने रिविजन. काय विचारतील माहित नाही. स्वतःच MCQ बेस्ड प्रश्न काढायचे. कंटाळा आला होता पण आई -बाबांचे सल्ले, की लकी आहात, जास्त वेळ मिळाला आहे तुम्हाला अभ्यासाला या वर्षी, त्यामुळे चांगले मार्क्स पडले पाहिजेतच. अपेक्षांचं वाढत टेन्शन. वर कोविड मुळे गावाकडे माझे आजोबा गेले, माझ्या मित्राचे बाबा ८ दिवस व्हेंटिलेटर वर होते. त्याच मोराल बूस्ट करायला दिवसातून सतत त्याच्याशी चाट करायचो तर आई ओरडायची तू कशाला तुझा वेळ घालवतोस.
बाबा जरा उशिरा उठला तर धस्स व्हायचं, चार वेळा त्याच्या खोलीत चकरा मारायचो. काका सांगा ना मला, आम्ही काय यंत्र आहोत का ? आम्हाला भावना आहेत का नाही?
या सगळ्या बातम्यांचा आमच्यावर परिणाम होत नसेल? आमच्या बी विंग राहणारी नेहा ताई तर म्हणत्येय, की हे मार्क, ती इंजिनिअरिंग ची / मेडिकलची ऍडमिशन ह्याला काहीच अर्थ नाही. कशाला इतका आटापिटा करायचा?
पण नाही ..हे सगळं लवकरच संपणार आहे अशी स्वतःची समजूत घालायची आणि परत फोकस्ड प्रयत्न चालू. कोणाशी काही बोलायची सोय नाही ..एकच पालुपद …तुला काय करायचं आहे …तू अभ्यास कर. कसा करू ??? रोज इतकी माणसं मरता आहेत, साधा ऑक्सिजन मिळत नाही.
काका, मला सांगा ना या आधी अशा विपरीत परिस्थितीत कोणत्या बॅच ने अभ्यास केला होता. अरे कौतुक नको पण कमीतकमी टोमणे तर मारू नका. मिळालेला पेढा काही न बोलता खाणं इतकं अवघड आहे का हो काका?
खरंच सांगतो काका माझा अभ्यास झालाय. कधीही आणि कशीही परीक्षा घेतली तरी मी ९४%-९५% पाडीन याची खात्री आहे मला. काका, हे बाकीचे पेढे मी येथेच ठेवून जातो पण प्लीज आई -बाबांना सांगू नका. आणि तो गेला.
कृपया कोणी पेढे घेऊन आलं तर त्यांनी विपरीत परिस्थितीत केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करा. एखादी कॅडबरी, छोटीशी गिफ्ट द्या. नसेलच जमणार तर पेढा तोंडात टाका आणि गप्प रहा पण चेष्टा करू नका. मोठ्या उमेदीने ‘भविष्य’ उभं राहू पाहतंय. टेकू द्या. नाहीच जमले तर कमीतकमी मागे तरी ओढू नका.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.