' या कारणांमुळे मिळाली होती भोपाळच्या राजाला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची ऑफर – InMarathi

या कारणांमुळे मिळाली होती भोपाळच्या राजाला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची ऑफर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जुलै १९५६ महिना हा पाकिस्तानच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहील असा महिना आहे. आपल्याला काय करायचं? असा प्रश्न पडू शकतो. पण, या महिन्याचं कनेक्शन हे भारतातील भोपाळ या शहरासोबत सुद्धा जोडलं गेलं आहे म्हणून ही माहिती वाचनीय आहे.

१९४७ मध्येच स्वातंत्र्य मिळालेल्या पाकिस्तानमध्ये राजकीय स्थैर्य कधीच नव्हतं. १९५६ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान असलेल्या चौधरी मोहम्मद अली यांना जुलै महिन्यात काही नाट्यमय घडामोडींमुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

chaudhari muhammad ali inmarathi

 

३१ जुलै १९५६ रोजी प्रकाशित झालेल्या ‘पाकिस्तान क्रोनिकल’ या वर्तमानपत्रात दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै हा दिवस असा होता जेव्हा की, सरकारचं प्रशासकीय यंत्रणेवरून ताबा पूर्णपणे सुटला होता.

असं काय झालं होतं?

कराची कमिशनर आणि होम सेक्रेटरी यांनी इंटेलिजन्स पोलीस यांच्या ऑफिसवर छापा टाकला होता. हे ऑफिस सील केल्यानंतर त्यांनी सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या फोनचं रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले होते. कराची कमिशनरला हे करण्याची परवानगी कोणी दिली? याबद्दल सगळेच अनभिज्ञ होते.

सामान्य माणसाला पण “काही तरी गोंधळ सुरु आहे” फक्त इतकंच लक्षात येत होतं. राजकीय अस्थिरता निर्माण करणारी ही घटना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला सुद्धा परेशान करणारी होती.

तत्कालीन राष्ट्रपती मेजर जनरल इस्कंदर मिर्झा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुढील निवडणुका या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या.

आपल्या पदाचा वापर करून त्यांनी पंतप्रधान चौधरी मोहम्मद अली यांना राजीनामा द्यायला लावला आणि इस्कंदर मिर्झा यांनी फिरोज खान यांना डावलून हमीदुल्लाह खान यांची परस्पर पुढच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याची घोषणा केली होती.

 

hamidullah khan inmarathi

 

पाकिस्तानमध्ये कधी, काहीही घडू शकतं याची खात्री या घटनांनी जगाला दिली होती.

हमीदुल्लाह खान कोण होते?

इस्कंदर मिर्झा यांनी पंतप्रधान पदी विराजमान होण्यासाठी बोलावलेले हमीदुल्लाह खान हे भोपाळचे रहाणारे काँग्रेसचे नेते होते. भारत आणि पाकिस्तान मधील रेल्वे सेवा तेव्हा सुरळीतपणे सुरू होती.

हमीदुल्लाह खान हे ट्रेनने भोपळहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाले होते. बलुचिस्तानमध्ये हे सगळं नाट्य घडत होतं.

कलात या बलुचिस्तानच्या मध्यवर्ती ठिकाणी या सर्व घटनांचा निषेध म्हणून लोकांचे मोर्चे निघाले होते. जागोजागी जाळपोळ सुरु होती.

वातावरण शांत करण्यासाठी ८ ऑक्टोबर १९५७ रोजी कलात खान यांच्या नेतृत्वाखालील ४४ नेत्यांचं एक शिष्टमंडळ इस्कंदर मिर्झा यांना भेटायला गेलं होतं.

 

iskander mirza inmarathi

 

इस्कंदर मिर्झा यांनी त्यावेळी एक राजकीय डावपेच खेळला आणि कलात खान या नेत्यालाच स्वतःकडे वळवून घेतलं. त्याला १५ दिवसांसाठी राष्ट्रपती भवनात राहण्याचं निमंत्रण दिलं आणि कलात खान यांनी ते निमंत्रण मान्य केलं.

कलात खान यांचा संभाव्य राजकीय धोका लक्षात घेऊन इस्किंदर मिर्झा यांनी कलात खान यांना आर्थिक तरतूद करण्यासाठी लंडनला जाण्याचा सल्ला दिला. पुढच्या वेळी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्याचं त्यांना आश्वासन देण्यात आलं.

हमीदुल्लाह खान यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला होता. इस्कंदर मिर्झा आणि त्यांच्यातील वडिलोपार्जित मैत्रीपूर्ण संबंध लवकरच राजकीय युतीमध्ये बदलणार होते. पाकिस्तानमध्ये पोहोचल्यावर हमीदुल्लाह खान यांनी प्रथम कलात खानला भेटण्याची इच्छा वर्तवली.

या भेटीदरम्यान कलात खान यांनी हमीदुल्लाह खान यांना इस्कंदर मिर्झा यांच्या राजकीय राजकीय कार्यपद्धतीची माहीती दिली. “तुमचं पंतप्रधान पद हे केवळ दिखावा आहे. स्वतःची इमेज वाचवण्यासाठी केवळ तुम्हाला पुढे करण्याचं काम राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा करत आहेत.”

हमीदुल्लाह खान यांनी कलात खान यांनी दिलेल्या माहितीसाठी त्यांचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी सकाळी राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांना भेटल्यावर हमीदुल्लाह खान खान यांनी कुठेही आपली नाराजी दाखवली नाही. लंडन मधील व्यवसाय आणि भारतातील घर विकण्यासाठी फक्त त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्या आधी थोडा वेळ मागितला होता.

 

kalat khan inmarathi

 

आपली नाराजी कुठेही न जाहीर करता हमीदुल्लाह खान खान हे दुसऱ्या दिवशी तडक भारतात निघून आले. इस्कंदर मिर्झा यांनी संपर्क करायचा प्रयत्न केल्यावर हमीदुल्लाह खान यांनी एप्रिल १९५८ मध्ये परत येण्याचं त्यांना आश्वासन दिलं.

भोपाळचे नवाब असलेल्या हमीदुल्लाह खान यांनी पुन्हा कधीच पाकिस्तानचं तोंड बघितलं नाही आणि हा विषय तिथेच संपला.

नवाब हमीदुल्लाह खान यांच्या कुटुंबातील शहरयार एम. खान यांनी काही वर्षांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव आणि पाकिस्तानचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अशी पदं त्यांनी भूषवली होती.

इस्कंदर मिर्झा यांनी हा कट अयशस्वी होत असतांना पाकिस्तान मध्ये लष्करी कायदा लागू करण्याची घोषणा केली. कलात खान यांना सुद्धा बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं करण्याच्या कटात सामील होण्यासाठी अटक करण्यात आली.

 

nawab hamidullah khan inmarathi

 

या घटनेनंतर इस्कंदर मिर्झा यांच्या विरुद्ध जनक्षोभ उसळला आणि त्यांना ऑक्टोबर १९५८ मध्ये आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावा लागला. अयुब खान यांना इस्कंदर मिर्झा यांच्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची धुरा सोपवण्यात आली.

मीर अहमद यार खान यांनी लिहिलेल्या ‘इनसाईड बलुचिस्तान’ या पुस्तकात या सर्व घडामोडींचा उल्लेख करण्यात आला आहे.

विरोधकांसमोर आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात घेऊन इस्कंदर मिर्झा यांचा कट एका भारतीय व्यक्तीमुळे कसा त्यांच्यावरच उलटला हे पाकिस्तानचं राजकारण कधीच विसरणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?