या १० शापांमुळे महाभारताच्या युद्धावर झालेले परिणाम तुम्ही वाचायलाच हवेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
व्यासांनी लिहिलेलं संस्कृत भाषेतील अतिप्राचीन महाकाव्य अशी महाभारताची ओळख आपण जाणतोच. यातील पांडव, कौरव, कर्ण असे एकापेक्षा एक धुरंधर जे स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करत होते. पांडव आणि कौरवांमध्ये झालेले कौटुंबिक कलह आणि यातून घडलेले महायुद्ध असे सर्व आपण वाचलेले आणि ऐकलेले आहे.
माणसाला एखाद्या व्यक्तीमुळे राग आला की तो समोरच्याचं वाईट व्हावं या हेतूने शाप देतो. हा शाप अनेक वेळा फार प्रखर असतो. असेच काही शाप महाभारतात सुद्धा एकमेकांना दिले गेले आहेत. ज्याचे महाभारतावर मोठे परिणाम झाले आहेत.
१. किदम्ब ऋषींनी पांडूला दिलेला शाप
एकदा पांडू जंगलात शिकार करण्यासाठी गेला असताना त्याने हरणांच्या जोडीला बाण मारला, जेव्हा तो हरणाजवळ गेला तेव्हा त्याला कळलं की हरणाच्या रूपात किदम्ब ऋषी होते. ते त्यावेळी कामोपभोग घेत होते. मरताना त्यांनी पांडूला शाप दिला, की तू पत्नीजवळ शरीरसुखासाठी जाशील तेव्हा तात्काळ मरण पावशील.
पांडूने त्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण प्रचंड रागात असणारे किदम्ब ऋषि यांनी तरीही त्याला शाप दिलाच.
२. उर्वशीचा अर्जुनाला शाप
अर्जुन जेव्हा इंद्राला भेटायला स्वर्गात गेला, तेव्हा तेथील एक अप्सरा त्याची शरीरयष्टी पाहून आकर्षित झाली. ती अप्सरा म्हणजे उर्वशी! ती कामातुर भावनेने अर्जुनाच्या जवळ आली पण अर्जुनाने कौटुंबिक नात्यांचा दाखला दिला. तो तिला चक्क ‘आई’ म्हणाला.
त्याच्या या वागण्याने तिला प्रचंड राग आला आणि तिने त्याला नपुंसक होण्याचा शाप दिला. अर्जुनाने हे सर्व इंद्राला सांगितले, तेव्हा इंद्र त्याला म्हणला की, घाबरू नकोस हा शाप तुला आयुष्यात योग्य वेळी उपयोगी पडेल.
३. द्रौपदीने घटोत्कचला दिलेला शाप
पाच पांडवांची पत्नी असणारी द्रौपदी अत्यंत रागीट होती. तिला ज्यांच्यामुळे राग यायचा किंवा त्रास व्हायचा त्या सर्वांनाच ती शाप द्यायची. असे तिने अनेकांना शाप दिले होते.
पांडवांसोबत झालेल्या तिच्या लग्नानंतर तिने एक अट ठेवली, की तिच्याव्यतिरिक्त या घरात पांडवांची कोणतीही पत्नी किंवा मूल येणार नाही.
ही अट पांडवांनी मान्य केली. एक दिवस भीम आणि हिडिंबाचा मुलगा घटोत्कच वडिलांना भेटायला आला, तेव्हा द्रौपदी सोडून सगळ्यांना त्याने आदराने नमस्कार केला. ही गोष्ट द्रौपदीला खटकली आणि तिच्या सवयीप्रमाणे ‘तुझं आयुष्य कमी होईल’ असा शाप तिने घटोत्कचाला दिला.
४. परशुरामांनी कर्णाला दिलेला शाप
कर्ण महाभारतातील अत्यंत शोकांतिक नायक असून अनेकांनी त्याला अनेक शाप लाभले होते. जन्मानंतर आईने त्याला सोडल्यापासूनच त्याचे शापित आयुष्य सुरु झाले होते. द्रोणाचार्यांनी त्याला आपला शिष्य बनवून घेण्यास नकार दिल्यावर, तो द्रोणाचार्यांचे शिक्षक असणाऱ्या परशुरामांकडे गेला.
परशुराम मात्र फक्त ब्राह्मण मुलांनाच शिकवायचे हे कर्णाला कळल्यावर त्याने आपण ब्राह्मण आहोत असे खोटे सांगितले. त्याने परशुरामांकडून सगळ्या विद्या शिकून घेतल्या आणि तो एक उत्तम धनुर्धारी बनला.
एक दिवस परशुराम खूप दमलेले असताना ते कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेले. त्याच वेळेला एक मधमाशी कर्णाच्या मांडीवर येऊन बसली आणि चावायला लागली, आपल्या गुरूंची झोपमोड नको म्हणून कर्ण तसाच बसून राहिला आणि वेदना सहन करत राहिला.
परशुराम उठले, त्यांनी पायातून वाहत असलेलं रक्त पाहिलं तेव्हा ते कर्णाला म्हणाले की तू ब्राह्मण नसून क्षत्रिय आहेस. ब्राह्मण इतक्या वेदना सहन करू शकत नाही. कर्ण त्यांना समजवू पाहत होता, पण फसवणूकीच्या रागातून परशुरामांनी त्याला शाप दिला, की तू घेतलेल्या ज्ञानाची जेव्हा तुला सर्वाधिक जास्त गरज असेल तेव्हाच तू ते विसरशील.
५. गायीच्या मालकाने कर्णाला दिलेला शाप
एकदा कर्ण सराव करताना, एक बाण चुकून गायीला लागला. ती वेदनेने व्हिव्हळत असताना तिचा गरीब ब्राह्मण मालक तिथे आला. तिला अशा अवस्थेत पाहून त्याला फार त्रास झाला. या त्रासाचा परिणाम म्हणून त्याने कर्णाला शाप दिला, की जेव्हा तुझा आयुष्याची अत्यंत महत्वाची लढाई असेल तेव्हा तुला माझा गाई सारखाच मृत्यू येईल.
६. पृथ्वीने कर्णाला दिलेला शाप
एकदा कर्ण आपल्या राज्यातून फिरत असताना त्याला एक मुलगी रडताना दिसली. त्याने कारण विचारलं असता, ती म्हणाली की तिच्याकडून मातीचं भांड पडलं, ज्यात तूप होतं. ते तिच्या आईला कळलं तर तिला ओरडा बसेल. कर्णाने तिला तुपाचं नवीन भांड दिलं, पण तिने हट्ट धरला की जमिनीवर पडलेलं तुपच तिला हवं आहे.
कर्णाला दया आली आणि त्याने स्वतःच्या हाताने जमिनीवरील मातीत पडलेले तूप उचलले. ती माती दोन्ही हातात घेऊन, पिळून त्यातून तूप काढण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या हातातून एका बाईचा आवाज आला. धरणीमाता बोलत होती; ती म्हणाली, की “या मुलीसाठी माझी पिळवूणक करत आहेस.” याच रागातून तिने कर्णाला शाप दिला, जसं कर्णाने धरणीला पकडलं आहे, तसंच युद्धाच्या वेळी त्याच्या रथाचा पाय ती पकडून ठेवेल. जेणेकरून शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकेल.
७. कृष्णाने अश्वत्थामाला दिलेला शाप
महाभारत युद्धामध्ये अश्वत्थामा पांडवांच्या विरुद्ध ब्रह्मास्त्र वापरत आहे हे पाहून अर्जुनाने सुद्धा त्याचे ब्रह्मास्त्र सोडले. दोघांच्या ब्रह्मास्त्रामुळे संपूर्ण जग संपून जाईल अशी भीती महर्षी व्यासांनी दोघांना दाखवून दिली. ब्रह्मास्त्र मागे घेण्याची विनंती केली.
अर्जुनाने त्याचे ब्रह्मास्त्र मागे घेतले, पण अश्वत्थामाला मात्र ते कसे मागे घ्यावे हे कळत नव्हते. त्याने अर्जुनाची पत्नी उत्तराच्या गर्भशयाकडे ब्रह्मास्त्राची दिशा वळवली.
हे सर्व पाहून श्रीकृष्णाचा राग अनावर झाला. त्याने अश्वत्थामाला शाप दिला, की “अश्वत्थामा ३००० वर्षे पृथ्वीवर भटकत राहशील, तुझा शरीरातून कायम रक्त वाहत राहील, पृथ्वीवरील कोणतीही व्यक्ती तुझ्याशी बोलणार नाही आणि तू ३००० वर्ष मरणाची वाट पाहशील.”
८. युधिष्ठिरने स्त्रियांना दिलेला शाप
महाभारतात पांडवांना आणि इतर सर्वांना कायमच असं वाटायचं, की युधिष्ठिरच त्यांचा मोठा भाऊ आहे. युद्धानंतर कुंतीने युधिष्ठिरला तिचा पहिला मुलगा कर्ण याच्याबद्दल सांगितलं. तेव्हा रागात असलेल्या युधिष्ठिराने पृथ्वीवरील सगळ्या स्त्रियांना शाप दिला. “कोणतीच स्त्री आजपासून गुपित लपवून ठेवू शकणार नाही.”
गॉसिप करण्यात स्त्रिया कुठेही मागे नसतात, असं म्हटलं जातं. आपण हे नेहमीच ऐकतो, पाहतो. मग या शापावर विश्वास ठेवणारे सुद्धा अनेक असतील, नाही का?
९. गांधारीने कृष्णाला दिलेला शाप
युद्धात जिंकल्यानंतर पांडव हस्तिनापूरचे साम्राज्य घेण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत असणारा कृष्ण गांधारीने तिचे १०० पुत्र गमावले याचं सांत्वन करत होता.
तिच्या या दुःखासाठी तिने कृष्णालाच जबाबदार ठरवले. आपले कुटुंब नष्ट होण्यामागे तूच आहेस असे ती कृष्णाला म्हणाली. या दुःखामुळे अतिशय उद्विग्न होऊन तिने कृष्णाला शाप दिला, की “तुझ्या राज्यासह तुझे जवळचे सहकारी, वंशज सर्व नष्ट होईल.”
१०. परीक्षितला मिळालेला शाप
पांडवांनी राज्याचा संपूर्ण कार्यभार अभिमन्यूचा मुलगा परिक्षीतकडे सुपूर्त केला आणि स्वर्गात निघून गेले. परीक्षितच्या शासन काळात लोक खुश होते.
एकेदिवशी राजा परीक्षित शिकार करण्यासाठी निघाला, त्याचवेळी त्याने ऋषी शमिकांना पाहिले. ते ध्यान करण्यात मग्न होते. हे पाहून परीक्षितने त्यांच्या गळ्यात मेलेला साप सोडला. हे सर्व शमिकांचा मुलगा ऋषी श्रीगिनी यांनी पाहिले आणि त्यांना परीक्षितचा खूप राग आला. त्यांनी त्या रागात परीक्षितला शाप दिला की ७ दिवसाच्या आत तक्षक साप तुला चावेल आणि तुझा मृत्यू होईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.