' सर्वाधिक फिल्मी गाणी गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुणाचा, लतादीदी की आशाताईंचा? – InMarathi

सर्वाधिक फिल्मी गाणी गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुणाचा, लतादीदी की आशाताईंचा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आशा भोसले यांचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये सर्वात जास्त गाणी गाण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. विविध भाषांमध्ये मिळून सर्वात जास्त म्हणजे ११००० गाणी आणि ७३ वर्षांपेक्षा जास्त काळ केलेली गायन कलेची सेवा, हे लक्षात घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.

 

asha bhosle song inmarathi

 

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये सर्वात जास्त गाणी गाण्याचा हा विक्रम या आधी ‘लता मंगेशकर’ यांच्या नावाने नोंदला गेला होता. त्यांच्या नंतर मोहम्मद रफी यांचं सुद्धा नाव या विक्रमाच्या यादीत समाविष्ट झालं होतं.

मात्र त्या दोघांनी गायलेल्या आणि नोंद झालेल्या गाण्यांमध्ये काही आकड्यांचा फरक पडला आहे. तो फरक काय आहे ? हे जाणून घेऊयात.

लता मंगेशकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात १९४२ मध्ये, वयाच्या १३ व्या वर्षी एका मराठी गाण्याने केली होती. आशा भोसले यांनी आपलं पहिलं गाणं वयाच्या १० व्या वर्षी गायलं होतं. ते गीत सुद्धा मराठीच होतं.

२०१६ मध्ये आशा भोसले यांनी कुणाल गांजावाला यांच्यासोबत ‘३० मिनिट्स’ या अल्बम साठी गायलेलं ड्युएट गाणं “तेरे इश्क मे…” हे त्यांचं स्टेज शोज व्यतिरिक्त गायलेलं, नोंद असलेलं शेवटचं गाणं मानलं जातं. त्यांचं करिअर हे ७३ वर्षांचं आहे, जे की जगातील कोणत्याही गायकापेक्षा जास्त आहे.

११,००० गाणी गाण्याची नोंद झाल्यामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने आशा भोसले यांना अग्रक्रमी स्थान दिले आहे.

 

asha bhosle inmarathi

 

१९७४ मध्ये लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरमध्ये २५,००० गाणी गायली आहेत असा दावा केला होता. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’कडे ती माहिती दिली होती. ही माहिती नंतर चॅलेंज करत मोहम्मद रफी यांनी १९४४ ते १९८० या काळात आपण २८,००० गाणी गायल्याची माहिती दिली होती.

१९८४ मध्ये जाहीर केलेल्या ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत मोहम्मद रफी यांचा ११ भारतीय भाषांमध्ये गायले असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

१९८७ मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने लता मंगेशकर यांच्या गाण्यांची संख्या ३०,००० वर नेली. सर्वाधिक गाणी गायल्याचा विक्रम हा १९९० पर्यंत मोहम्मद रफी यांच्यासोबत असलेला हा विक्रम आता केवळ लता मंगेशकर यांच्या नावावर अबाधित होता.

 

Mohammed-Rafi-inmarathi

 

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी या दोन्ही गायकांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ला दिलेली ही माहिती फक्त तत्कालीन वर्तमानपत्रांच्या कात्रणांवर आधारित होती. त्यांचं कुठेही अधिकृत रेकॉर्ड नव्हतं.

१९८६ मध्ये योग्य माहिती देण्यासाठी कानपूरचे हरमिंदर सिंग हमराज हे मार्गदर्शक म्हणून समोर आले. गाण्याची प्रचंड आवड असलेल्या या अवलियाने भारतीय गाण्यांवर एक ‘एनसायक्लोपीडिया’ तयार करायचं ठरवलं. १९३१ ते १९७० पर्यंत भारतीय संगीत क्षेत्रात ‘रेकॉर्डिंग’ झालेल्या गाण्यांच्या ४ याद्या हरमिंदर सिंग हमराज यांनी प्रकाशित केल्या.

१९८० पर्यंत ‘रेकॉर्डिंग’ झालेल्या भारतीय गाण्यांची यादी त्यांनी १९९१ मध्ये प्रकाशित केली. या माहिती नुसार लता मंगेशकर यांनी १९८० पर्यंत केवळ ४५०० गाण्यांची ‘रेकॉर्डिंग’ केल्याची अधिकृत नोंद होती.

१९९१ पर्यंतची माहिती जेव्हा प्रकाशित करण्यात आली, तेव्हा ही संख्या वाढून ५,२५० इतकी झाली होती. २००० सालापर्यंत हिंदी आणि इतर सिनेमा, अल्बमची गाणी मिळून ही संख्या ६,००० पर्यंत गेली. लता मंगेशकर यांनी गायलेल्या एकूण ३०,००० गाण्यांचा त्यांना कागदोपत्री दाखला देता आला नाही.

 

lata mangeshkar inmarathi

 

हमराज यांनी प्रकाशित केलेल्या यादीत काही गाणी समाविष्ट झाली नसतील, तर ते सुद्धा लता मंगेशकर यांना सांगता आलं नाही. याचा परिणाम असा झाला, की लता दीदी आणि मोहम्मद रफी या दोन्ही महान गायकांची नावं १९९१ ते २०१० च्या ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मधून काढून टाकण्यात आली.

आशा भोसले यांनी २०११ मध्ये सर्वाधिक गीत गायनाच्या विक्रमावर आपलं नाव कोरण्याचं ठरवलं. आपण सर्वाधिक गाणी गायली असल्याची आशा भोसले यांना खात्री होती. त्यांचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये जावं अशी त्यांच्या असंख्य चाहत्यांची सुद्धा इच्छा होती.

विश्वास नेरुळकर हे आशाजींचे एक चाहते पुढे आले. आशा भोसले यांच्या गाण्यांची रेकॉर्डिंगची माहिती संकलित करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ला सादर करण्याची त्यांनी जबाबदारी घेतली. त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ११,००० गाण्यांच्या रेकॉर्डिंगची माहिती त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ला अपेक्षित पद्धतीत सादर केली.

 

asha bhosle 2 inmarathi

 

२०११ मध्ये या माहितीची पडताळणी करण्यात आली आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने हे जाहीर केलं, की “१९४७ ते २०१० पर्यंत आशा भोसले यांनी एकूण २० भारतीय भाषांमध्ये मिळून एकूण ११,००० गाणी गायली आहेत. ज्यामध्ये ड्युएट, सोलो अशा सगळ्या गीतांचा समावेश आहे.”

कला आणि संख्याशास्त्र ही खरं तर दोन टोकं आहेत. पण, विक्रमांची नोंद करतांना हे दोन घटक एकत्र येतात आणि कुणाला उच्च तर कुणाला खालच्या स्थानावर नेऊन ठेवतात.

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या लोकांना कदाचित ही कल्पना नसेल की मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि आशा भोसले हे लोक जगभरातील संगीतप्रेमींसाठी कोणत्याही विक्रमापेक्षा किती तरी मोठे आहेत.

 

lata mangeshkar mohammad rafi inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?