' चॉकलेटचा बंगला नव्हे तर अख्ख साम्राज्य उभारणारा मराठमोळा अवलिया! – InMarathi

चॉकलेटचा बंगला नव्हे तर अख्ख साम्राज्य उभारणारा मराठमोळा अवलिया!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“मराठी माणसाने धंदा करू नये” मारवाडी गोसालिया जेंव्हा मराठमोळ्या भोसलेंना हा टोला लगावतो, तेंव्हा घराघरात प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात चर्र झाल्याशिवाय रहात नाही.

 

sachin khedekar inmarathi

 

केवळ या सिनेमातच नव्हे, तर प्रत्यक्षातही तुम्ही अनेकदा हा डायलॉग ऐकला असेल, सरसकट मराठी माणसावर होणारी ही विशेष टिप्पणी ऐकल्यानंतर काहींना राग अनावर होतो, तर काहींचे चेहरे पडतात. मात्र असं असलं तरी हे विधान खोट ठरवण्यासाठी कितीजण प्रयत्न करतात? आपल्या मुलांनी भविष्यात व्यवसायिक व्हावं यासाठी किती पालक आग्रही असतात? नोकरी सोडून स्टार्ट अपची वाट धरणा-या नव्या पिढीला कितीजण प्रोत्साहन देतात?

जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी मिळत नाहीत तोपर्यंत मराठी माणसावर बसलेला हा ठपका कधीही पुसला जाणार नाही हे नक्की.

मात्र आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या बळावर मराठी माणसावर होणारी ही टिका खोटी ठरवण्याचा चंग एका मराठमोळ्या तरुणाने बांधला, सुदैवाने त्याला कुटुंबाची उत्तम साथ लाभली त्यामुळे स्वप्नांच्या दिशेने सुरु झालेल्या प्रवासाने अधिक वेग धरला आणि जन्म झाल्या भारतातील चॉकलेट इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणा-या एका मराठमोळ्या कंपनीचा!

भारतातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणारी चॉकलेट ब्राऊनी असो वा एखादी स्वीट डिश सजवण्यासाठी वापरले जाणारे डार्क चॉकलेट हे महाराष्ट्रातून येतं हे ऐकल्यानंतर तुम्हाला नवल वाटणं स्वाभाविक आहे, मात्र अशक्य वाटणारी ही कल्पना ४० वर्षांपुर्वीच एका अवलियाने खरी करून दाखवली आहे.

चॉकलेटवर कोरलेलं मोर्डे हे नाव वाचल्यानंतर इटालियन, ग्रीक शब्द वाटल्याने अनेकांची गफलत होते, एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये सजवलेल्या डिशवर परदेशी वाटणारं चॉकलेट मंचरच्या मोर्डे कंपनीतून आलंय हे अनेकांना सांगूनही खरं वाटत नाही. मात्र हे चॉकलेटचं साम्राज्य उभारलंय चंद्रकांत मोर्डे यांनी!

 

chandrakant morde inmarathi

 

व्यवसायाची आवड ते आवडीचा व्यवसाय

पुणे जिल्ह्यातील मंचरचे मुळ रहिवासी असणा-या चंद्रकांत मोर्डे यांनी फुड मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. कोकोआ आणि कॅडब्युरियस इंडिया या नामांकित ठिकाणी त्यांनी चॉकलेटमधील विविध डेरिव्हेटिव्ह्जची माहिती करून घेतली.

मुळातच चॉकलेट सारख्या क्षेत्रात मराठी माणसाने व्यवसाय करावा हा धाडसी निर्णय होता. कारण लाडू,चिवडा यांचे गृहोद्योग ते मराठी पदार्थांचे हॉटेल्स एवढीच मजल मारली जायची. मात्र अशा परिस्थितीत मराठी कुटुंबातील तरुणाने चॉकलेटचा बंगलाच नव्हे तर संपुर्ण साम्राज्य उभारण्याचं ठरवलं होतं.

सुदैवाने कुटुंबाकडून व्यवसायाचं, उद्योगाचं बाळकडू मिळालं होतं. त्यामुळे व्यवसायाची पार्श्वभूमी नसली तरी प्रोत्साहनांचे बळ मात्र नक्कीच होते.

ज्या क्षेत्रात व्यवसाय करायचा, त्याबाबत अधिक परिपूर्ण माहिती मिळवायची, त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचं आणि त्यानंतरच या व्यवसायात पदार्पण करायचं हा गुरुमंत्र त्यांनी कायम जपला.

कॅडबरी इंडिया रिसर्च अण्ड डेव्हल्पमेंट टिममध्ये तब्बल १० वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. या काळात त्यांनी चॉकलेटचे घटक मिळवण्यापासून ते चॉकलेट तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टींचे धडे गिरवले.

 

chocalate inmarathi

 

अखेरिस आपण उद्योग करण्यास सज्ज झालो असल्याचे लक्षात येताच १९८३ मध्ये त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. स्वप्न करोडोंची असली तरी हाती केवळ पाच लाख रुपये होते, त्यामुळे एखाद्या महानगरात व्यवसाय थाटण्याची कल्पना दूर सारत त्यांनी आपले मुळगाव मंचर गाठलं. यावेळी या प्रकल्पामुळेच या गावाचं नाव देशभरात गाजेल याची त्यांना कल्पनाही नव्हती.

याचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे दर्जेदार, उत्तम प्रतिच्या चॉकलेटसाठी गरजेचे असणारे कोको मिळवण्याकरिता थेट स्वतः थेट केरळमध्ये पोहोचले. केरळच्या ठराविक ठिकाणांहून येणा-या कोकोपासून बनणारे चॉकलेट अशी मोर्डेंची खास ओळख बनली.

 

morde inmarathi

 

कंपनी सुरु केल्यानंतर मोजक्या सहका-यांसह त्यांनी केवळ वेगवेगळे प्रयोग करण्याचं ठरवलं. मुळ परदेशी असलेलं चॉकलेट भारतीयांना कोणकोणत्या स्वरुपात आवडतं? वेगवेगळ्या वयोगटातील खव्वैये चॉकलेट कोणत्या रुपात पसंत करतात? याचा अभ्यास केला. सर्वेक्षण, प्रत्यक्ष लोकांच्या भेटीगाठी ही कामाची पद्धत त्यांचा यशाचा पाया ठरली.

मात्र चंद्रकांत मोर्डे यांंचं स्वप्न काही औरच होतं. मराठी माणूस केवळ छोट्या गावात नव्हे तर आपला व्यवसाय देशभरात पोहचवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या हॉटेल्सशी संपर्क साधला.

फाईव्ह स्टार, सेवन स्टार अशा ज्या हॉटेल्सकडे सामान्य माणूस केवळ दूरवरून डोळेभरून पहायचा त्या हॉटेल्सच्या व्यवस्थापनांच्या ऑफिसमध्ये मोर्डे चक्क पोहोचले सुद्धा! आपलं चॉकलेट हे केवळ दुकानांमध्ये विकण्यापुरत मर्यादित राहू नये, तर एका वेळी ते अनेकांच्या जीभेवर रेंगाळावं, देशासह परदेशातील खव्वैयांपर्यंत पोहोचावं यासाठी मोर्डेंनी हॉटेल्सचा पर्याय निवडला होता.

 

morde company 1inmarathi

 

त्याकाळी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये चॉकलेट आणि त्या निगडित पदार्थाचा वापर अधिक होता. अशा हॉटेल्सना आपलंच चॉकलेट पोहोचावं यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. भविष्यात चॉकलेटप्रेमींची संख्या वाढणार पर्यायी लहानमोठ्या सगळ्याच हॉटेल्समध्ये चॉकलेटची गरजही अधिक भासणार यासाठी त्यांनी ताज, ओबेरॉय, हयात अशा बड्या हॉटेल्सकडे प्रस्ताव ठेवला.

भविष्याबद्दलचा दृष्टिकोन, धडपडी वृत्ती आणि त्यासह मोर्डे चॉकलेट्सची अनोखी चव यांच्या आधारे अनेक बड्या कंपन्या, हॉटेल्स यांनी मोर्डेंना डिलरशीप दिली. जे चॉकलेट मंचरची चौकट मोडून पुण्यापर्यंत पोहोचू शकेल का? अशी शंका होती ते चॉकलेट मुंबई, दिल्ली, बेंगलोर अशा वेगवेगळ्या शहरात स्थिरावलं.

पार्ले, ब्रिटॅनिया, ताज, आयटिसी, मॅरिएट अशा नामवंत कंपन्यांच्या पदार्थांमध्ये मोर्डेंच्या चॉकलेट्सची चव चाखता येते.

काळाची गरज ओळखून मोर्डेंनी साधं चॉकलेट, डार्क चॉकलेट, क्रिम, चॉकोपेस्ट, लिव्किड चॉकलेट या उत्पादनांचीही सुरुवात केल्याने मोर्डे अनेक हॉटेल्सच्या किचनचा आधारस्तंभ बनले आहेत.

 

chocalate 1 inmarathi

 

चौकाचौकातील जाहिरातबाजी, टिव्हीवरील अॅड्स, कलाकारांकडून केलं जाणारं ब्रॅन्डिंग असा कोणताही पर्याय न वापरताही मोर्डेंची उत्पादनं मोठ्या हॉटेल्सपर्यंत, आणि परिणामी आपल्यासारख्या खव्वैयांपर्यंत पोहोचली आहेत यातच त्यांचं खरं यश आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?