ख्रिस्ती धर्मात गेलेल्या ब्राम्हण कुटुंबातील मुलगी, अशी बनली पाकिस्तानी पंतप्रधानाची पत्नी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदू-कॅथलिक कुटुंबातील एक मुलगी बंडखोरी करून एका मुस्लिम पुरुषाशी लग्न करते, लग्नानंतर मुस्लिम धर्म स्विकारते आणि नवजात पाकिस्तानची फर्स्ट लेडी बनते.
आयुष्यभरच नव्हे, तर मृत्यूसमयीही तिच्या नावावर गवताची काडीही नसते. इरेन रुथ मार्गारेट पंत जिनं तिची ओळख बेगम राणा म्हणून बनविली त्या मुलीची ही कहाणी!
हिंदुस्थानातील हिमालयातील कुमाऊं घाटीतील अल्मोरा सारख्या छोट्या गावात रहाणारे तारादत्त पंत हे नामांकीत वैद्य होते. श्रीमंत ब्राह्मण कुटुंब म्हणून परिचित असणार्या पंत परिवारातील तारादत्तनी ख्रिश्चन धर्म स्विकारला आणि त्या छोट्याशा गावात खळबळ माजली.
नातेवाईकांनी तारादत्तांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. पंत कुटुंबाची घरं लागून लागून असल्यानं तारादत्तांशी संपर्क तोडण्यासाठी म्हणून त्यांच्या घराभोवती उंच भिंती उभ्या करण्यात आल्या.
तारादत्त मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. हाच ठामपणा त्यांची नात इरेन मार्गारेटमध्येही पुरेपुर उतरला होता. काही वर्षांनंतर कॉस्मो म्हणून परिचित पंत कुटुंबातल्या इरेननं आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या कुटुंबाला मोठा हादरा दिला.
डॅनिअल पंत यांची ही मुलगी पहिल्यापासूनच स्वतंत्र आणि ठाम विचारांची होती. वडिलांच्या विरोधाला न जुमानता इरेननं मुस्लिम पुरुषाशी लग्नाचा निर्णय घेतला.
===
हे ही वाचा – टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी!
===
ज्याच्याशी तिला लग्न करुन संसार थाटायचा होता तो आधीच विवाहित आणि एका मुलाचा पिता होता. मात्र त्याच्या धर्मानं त्याला दुसर्या विवाहाची मान्यता दिलेली असल्यानं त्याच्याकडून या लग्नाला काहीच हरकत नव्हती.
इरेनचे वडील मात्र मुलीसाठी चिंतेत पडले होते. होणारा जावई गर्भ श्रीमंत, प्रचंड हुशार, नामांकीत बॅरिस्टर होता. डॅनिअल पंत यांच्या या भावी जावयाचं नाव होतं, लियाकत अली खान!
पुढे जाऊन जे स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनले त्या लियाकत अलींच्या प्रेमात इरेन आकंठ बुडाली आणि आपल्या घराकडे पाठ फिरवून तिनं लियाकत अलींच्या आयुष्यात त्यांची दुसरी पत्नी म्हणून प्रवेश केला.
हिंदू मूळ असणारी, जन्मानं कॅथलिक असणारी इरेन आता धर्मानं मुस्लिम बेगम गुल- ए- राणा बनली. पाकिस्तान निर्मितीत लियाकत अलींच्या खांद्याला खांदा लावून ती सहभागी झाली. पाकिस्तानी राजकारण आणि समाजकारणात तिनं पुढे जाऊन महत्वाची भूमिका बजावली.
असं फुलत गेलं प्रेम…
इरेन आणि लियाकत अली भेटले कसे आणि त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली याचीही रंजक कथा आहे. इरेन आणि लियाकत अली यांच्यात दहा वर्षांचं अंतर होतं. इरेन तेव्हा लखनऊ येथील महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी होती आणि लियाकत अली स्वातंत्र्य चळवळीतील उभरतं नाव होतं. त्यांचं एकूण व्यक्तिमत्व आणि व्यासंग कोणालाही भुरळ पडावं असंच होतं.
बंगालमधे आलेल्या पुराला मदत म्हणून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यासाठी इरेन स्वयंसेवक म्हणून काम करत होती. कार्यक्रमाची तिकिटं विक्रीचं काम तिच्याकडे होतं.
तिकिटांचा गठ्ठा घेऊन तिनं ठोठावलेलं पहिलंच दार होतं लियाकत अलींचं.
तिनं गळ घालून त्यांना दोन तिकीटं विकत घ्यायला लावली. लियाकत अलींनी या तरूण मुलीचं सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं की दोन तिकीटांपैकी दुसर्या तिकीटावर आणायला त्यांच्याकडे कोणी सोबती नाही, त्यामुळे ते तिकीट वाया जाणार आहे.
इरेननं त्यांना वचन दिलं, की कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत जर त्या तिकीटावर येण्यासाठी त्यांना कोणाची सोबत मिळाली नाही तर ती स्वत: त्यांच्यासोबत कार्यक्रम बघेल. अर्थात तशी वेळ आली नाही. लियाकत अली त्यांच्या एका मित्रासमवेत कार्यक्रम बघायला गेले.
===
हे ही वाचा – मुहम्मद अली जिनांना तोंडावर थेट नकार – भारतात विप्रो जन्मण्याची मुहूर्तमेढ!
===
यानंतर लियाकत अली आणि इरेनचा परिचय वाढत गेला आणि आधी मैत्री आणि मग त्याचं प्रेमात रुपांतर झालं. इरेनच्या कुटुंबाचा विरोध असल्यानं अखेर एप्रिल १९३३ मधे दिल्लीतील मेडेन्स हॉटेलमधे यांचा निकाह साधेपणानं पार पडला.
निकाह आणि धर्मांतर एकत्रच करून तिनं पतीचा धर्म आणि त्यानं दिलेली नवी ओळख, नवं नाव स्विकारलं. मात्र इतर मुस्लिम नेत्यांच्या स्त्रियांप्रमाणे ती केवळ शोभेची बाहुली बनून कार्यक्रमात मिरवण्यापुरती पतीसोबत गेली नाही. तर तिनं राजकारण आणि समाजकारणात भरीव कामही केलं. इतकंच नाही तर मंत्रीमंडळात पदही भूषविलं.
हिंदुस्थानची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर लियाकत अलींसोबत ती विमानात चढली. लग्नानंतर भेट म्हणून जो प्रशस्त बंगला लियाकत अलींनी तिला दिला होता तो लियाकत अलींनी तिला परत मागितला. तिनंही एकही प्रश्न न विचारता सह्या करून अधिकृतपणे तो बंगला देऊन टाकला.
लियाकत अलींनी हा बंगला पाकिस्तानला देऊन टाकला जेणेकरून नंतर भारतातील पाकिस्तानी दूतावासाला याचा उपयोग व्हावा.
याशिवायही भारतात लियाकत अलींची प्रचंड प्रमाणात स्थावर मालमत्ता होती. जी त्यांनी पाकिस्तानी निर्वासितांसाठी देण्याचा निर्णय घेतला. बेगम राणांना स्वत:साठी काही नको असलं तरीही आपल्या दोन मुलांच्या भविष्याची तरतूद मात्र असावी असं वाटत होतं.
त्यांनी लियाकत अलींना तसं विचारलं होतं, की आपल्या मुलांचं काय? यावर त्यांचं एका वाक्यात उत्तर होतं, त्यांना संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तान मिळतो आहे, आणखी कशाची गरजच काय आहे? अर्थात यावर बेगम राणांकडे काही उत्तर नव्हतं आणि आपल्या नावावर अशी काही मालमत्ताही नव्हती. तेव्हाही नव्हती आणि मृत्युपर्यंत कधीच नव्हती.
===
हे ही वाचा – पाकिस्तानचं संविधान लिहिणाऱ्याचा गूढ अंत ठरला पाकिस्तानच्या भविष्याचा कर्दनकाळ!
===
आपल्या कर्तुत्वानं जिनं पाकिस्तानात नाव कमावलं, स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान यांची बेगम म्हणून आणि फर्स्ट लेडी म्हणून जिचा लौकिक होता तिला तिच्या मालकीचं, हक्काचं स्वतंत्र घरही कधीच नव्हतं.
लियाकत अली यांची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांचा होरा होता की आता बेगम भारतात परततील. मात्र तसं काहीच घडलं नाही. एव्हाना त्यांचे माहेरच्या कुटुंबाशी संबंध चांगले झालेले असूनही त्यांनी पाकिस्तानातच रहाण्याचा निर्णय घेतला. पतीच्या माघारीही त्यांनी त्याचं काम चालू ठेवलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.